आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेकंड इनिंगची लुटा मजा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावर्षीचा जागतिक आरोग्य दिन “नैराश्यावर करूया मात”  या घोषणेने साजरा झाला. नैराश्याचे परिणाम जागतिक आरोग्यावर सध्या सर्वात अधिक आहेत. स्त्रियांमध्ये नैराश्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे. एका सर्वेक्षणानुसार दरवर्षी नैराश्याने साधारणतः १२ दशलक्ष स्त्रिया ग्रस्त होतात तर ६ दशलक्ष पुरुष. महिलांमध्ये चाळिशीनंतर नैराश्याचे प्रमाण अधिक आहे. चाळीशी हा मेनोपॉज म्हणजेच पाळी जाण्याचा काळ. सर्वसाधारपणे पाळी गेल्यामुळे कमी झालेली हार्मोन्सची मात्रा नैराश्याला कारणीभूत आहे, असे मानले जाते. पण पाळी जाणे हि तर नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि सर्वच स्त्रियांना पाळी गेल्यावर नैराश्य येते असेही नाही. 

जर आजूबाजूला बघितले तर लक्षात येईल की, बऱ्याच स्त्रिया चाळिशीनंतर अधिक आनंद,कार्यक्षमता आणि प्रसिद्धी मिळवतात. उदाहरणच बघायचे झाले तर ICICI बँकेच्या चंदा कोच्चर (५५ वर्षे ), नीता अंबानी (५३ वर्षे ) , VLCC  च्या वंदना लुथरा (५८ वर्षे ), मेधा पाटकर ( ६२ वर्षे), सिनेसृष्टीतील हेमा मालिनी ( ६८ वर्षे ) आणि राजकारणातील सुषमा स्वराज (६५ वर्षे ). यांना नसेल का येत मेनोपॉजमुळे नैराश्य?  चाळिशीनंतर शरीरात अनेक बदल होतात जसे की वजन वाढणे, हाडांचा ठिसूळपणा यामुळे कंबरदुखी, गुडघेदुखी, त्वचेवर सुरकुत्या पडणे, वारंवार लघवीला लागणे, लघवीवरील नियंत्रण कमी होणे, उच्च रक्तदाब, मधुमेह, इ. पण जर वर सांगितलेल्यांपैकी कोणताही आजार आपल्यास नसेल तर किती स्त्रियांना नैराश्य येईल, यावर विचार करायला हवा.

 बहुतांश स्त्रिया परिवाराच्या आरोग्याची नीट काळजी घेतात पण स्वतःकडे कानाडोळा करतात.भारतामध्ये स्त्रियांसाठी नवरा आणि मुले म्हणजेच संपूर्ण आयुष्य असते. चाळीशीमध्ये शारीरिक बदलांबरोबरच परिवारातही बदल होतात. मुले लांब गेलेली असतात. नवऱ्याच्या अपेक्षादेखील कमी झालेल्या असतात. घरी फारसे काही करण्यासारखे नसते. यामुळे आयुष्यात पोकळी निर्माण होते. सोबत शारीरिक दुखणे असेल तर कुटुंबीयांकडूनही ‘हिचे नेहमीचेच आहे’, ‘ हिचे सुखच दुखते’ अश्या लेबल खाली दुर्लक्ष केले जाते. नैराश्य हे एक दुष्टचक्र आहे. निराश व्यक्ती अधिक गुरफटत जातो.  पूर्वी भारतीय स्त्रीचे आयुर्मान होते ५० वर्षे आता ते आहे साधारणतः ८० वर्षे.  यामुळे पाळीनंतर व्यतीत करण्याची वर्षे वाढली आहे. साधारणतः स्त्रिया एक तृतीयांश आयुष्य मेनोपॉजनंतर घालवतात. आणि म्हणूनच चाळीशी येण्याआधीच संपूर्ण ताबा आपल्या हातात घ्यायला हवा. महिलांनी पुढील गोष्टी केल्यास निश्चितच फायदा होऊ शकतो.

{उत्तम आरोग्य आणि नियमित व्यायाम :- फॅमिली पूर्ण झाल्यावर स्वतःचे आरोग्य, आहार आणि व्यायामाचे महत्व जाणून दिनक्रम आखावा. सकस व पौष्टीक आहार घ्यावा. दिवसातून किमान एक तास व्यायामास द्यावा. कोवळ्या सूर्यप्रकाशाचा आनंद घ्यावा. वजन नियंत्रित ठेवावे. आरोग्य उत्तम असेल तर चाळिशीनंतर शारीरिक व्याधींचा त्रास कमी होतो. चाळीशीनंतर नियमित आरोग्य तपासण्या कराव्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गरजेनुसार कॅल्शिअम तसेच व्हिटॅमिन्स घ्यावे. काही शारीरिक त्रास होत असल्यास अंगावर न काढता त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. आज सर्व व्याधींसाठी उपचार उपलब्ध आहेत.

{बाहेर पडा - लोकं जोडा :- मुले थोडी मोठी आणि स्वत्रंत झाल्यावर स्वतःसाठी वेळ काढा. नवरा-मुले हा आयुष्याचा महत्वाचा भाग आहेत परंतु पूर्ण आयुष्य नव्हे. दिवसाचा किमान १ तास तरी स्वतःच्या आवडीच्या कामांसाठी द्या. उदा.हिंडणे,गप्पा मारणे, वाचन ,पेंटिंग इ . आपले जुने छंद-खेळ जोपासा. नोकरी सोडली असल्यास पार्ट-टाइम जॉब किंवा घरून काही तरी काम करण्यास सुरुवात करा. जुन्या मित्र-मैत्रिणींशी संपर्क साधा. नव्याने एखाद्या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हा. निसर्गासोबत वेळ घालवा. नवीन काही शिकण्याची इच्छा असल्यास ते शिका. लोकांना समोरून मदत करण्यास सुरुवात करा. यामुळे नवीन लोकांशी ओळखी होऊन तुमचे स्वतःचे मंडळ वाढीस लागेल. जेव्हा मुले घराबाहेर जातील तेव्हा तुम्हाला एकाकी न वाटता आवडत्या कामासाठी अधिक वेळ देता येईल. 

{उद्दिष्ट्ये निश्चित करा :- आई-पत्नी या जबाबदाऱ्यांतून थोडा वेळ मिळताच नजीकच्या भविष्यकाळासाठी वास्तवाला धरून उद्दिष्ट्ये निश्चित करा आणि ती पूर्ण करण्याची जबाबदारी घ्या. उदा.पुढील दोन महिने मी कामावर जाईल, पेंडिंग कामांची सूची, नवीन शिकायचे असल्यास ,वजन कमी करणे, फोन करणे  इ. महत्वाच्या कामासमोर एक अंक घाला, अशी कामांची क्रमवारी करा. महत्वाच्या आणि सोप्या कामाने सुरवात करा.प्रत्येक उद्दिष्ट्यपूर्तीनंतर स्वतःला शाबासकी द्या.

{ध्यान व मेडिटेशन :- तणाव व नैराश्यामुळे शरीरातील ऊर्जा बंदिस्त होते.ध्यान केल्याने शरीरातील ऊर्जा आनंद आणि उत्साहच्या रूपाने संचार करू लागते. नियमित ध्यान व मेडिटेशनमुळे मन शांत होते आणि आतून आनंदित वाटू लागते. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, झोपेचे त्रास अश्या अनेक आजारांमध्ये देखील यामुळे मदत होते.

{निगेटिव्ह विचारांवर मात करा :- एक निगेटिव्ह विचार दुसऱ्या निगेटिव्ह विचाराला खेचतो. त्यामुळे कोणत्याही निगेटिव्ह विचारांना मनात थारा देऊ नका. सकारात्मक गोष्टींचा विचार करा.एखादी दुर्दैवी गोष्ट घडली तरी ‘माझ्याच बाबतीत का?’ अश्या विचारात अडकून पडू नका. समस्येवर उपाय शोधा. समाजाकडे उघड्या डोळ्यांनी पहा. हीच घटना तुमच्या 
मैत्रिणीसोबत घडली असती तर तिला काय समजावले असते याचा विचार करा. नेहमीच आयुष्यात घडलेल्या चांगल्या गोष्टी स्मरणात ठेवा. त्याविषयी कृतज्ञ राहा. आपल्या समस्या आपले परिवारजन, मित्रमंडळी यांच्याशी शेअर करा .’मला हे जमणार नाही’, ‘ आता काही होऊ शकत नाही’ अश्या कोणत्याच नियमांमध्ये स्वतःला अडकवू नका. 
माझ्यामते, स्त्रियांसाठी चाळिशीनंतरचा काळ हा सुवर्णकाळ आहे. लहानपणी आई-वडील, तरुणपणी नवरा-मुले यातून स्वत्रंत होऊन खऱ्यारीतीने स्वतःसाठी स्वतःच्या मर्जीने जगण्याचा हा काळ आहे. उत्तम आरोग्य, समाजशील वृत्ती, सकारात्मक दृष्टी आणि ध्येय असेल तर निश्चितच सेकंड इंनिंगचे स्वातंत्र्य आपण उपभोगू शकतो. चला तर मग लुटुया सेकंड इंनिंगची मज्जा !!!
बातम्या आणखी आहेत...