Home | Magazine | Akshara | article about World Library by jayashree bokil

ग्रंथदालनांचे विस्तारणारे विश्व

जयश्री बाेकिल | Update - Dec 23, 2016, 03:18 AM IST

‘ग्रंथ हेच गुरू’ या अर्थाचे पारंपरिक वचन आहे. पण, सध्याच्या सोशल मीडियाने बुजबुजलेल्या वातावरणात ‘पुस्तकं कोण वाचतंय’ असाही सूर अधूनमधून ऐकू येत आहे. या दोन्ही बाजूंकडे स्वत:ची अशी बलस्थाने आहेत आणि मर्यादाही आहेत.. पण तरीही ग्रंथदालनांना मिळणारा प्रतिसाद सकारात्मक आहे, असे चित्र शहरी भागात तरी दिसत आहे. मान्यवर प्रकाशक मंडळींची स्वत:ची ग्रंथदालने सुरू झाली आहेत. काही स्वतंत्र ग्रंथदालनांनी ग्रंथप्रदर्शनांची साखळी निर्माण करून स्वत:ला ग्रंथांशी आणि वाचकांशी जोडून घेतले आहे. त्यांच्याशी चर्चा करताना ‘वाचनसंस्कृती संपली’ हा सूर तितकासा योग्य नाही, असेही दिसत आहे. वाचकांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे, हे वास्तव असले तरी वाचन पार हद्दपार झाले आहे, असे अजिबात नाही. नव्याने सुरू झालेली ग्रंथदालने हेच अधोरेखित करत आहेत.

 • article about World Library by jayashree bokil
  ‘ग्रंथ हेच गुरू’ या अर्थाचे पारंपरिक वचन आहे. पण, सध्याच्या सोशल मीडियाने बुजबुजलेल्या वातावरणात ‘पुस्तकं कोण वाचतंय’ असाही सूर अधूनमधून ऐकू येत आहे. या दोन्ही बाजूंकडे स्वत:ची अशी बलस्थाने आहेत आणि मर्यादाही आहेत.. पण तरीही ग्रंथदालनांना मिळणारा प्रतिसाद सकारात्मक आहे, असे चित्र शहरी भागात तरी दिसत आहे. मान्यवर प्रकाशक मंडळींची स्वत:ची ग्रंथदालने सुरू झाली आहेत. काही स्वतंत्र ग्रंथदालनांनी ग्रंथप्रदर्शनांची साखळी निर्माण करून स्वत:ला ग्रंथांशी आणि वाचकांशी जोडून घेतले आहे. त्यांच्याशी चर्चा करताना ‘वाचनसंस्कृती संपली’ हा सूर तितकासा योग्य नाही, असेही दिसत आहे. वाचकांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे, हे वास्तव असले तरी वाचन पार हद्दपार झाले आहे, असे अजिबात नाही. नव्याने सुरू झालेली ग्रंथदालने हेच अधोरेखित करत आहेत.
  गुरुमुखी विद्याग्रहणाचे एक युग आपल्या परंपरेत होते. आजही वेदपरंपरेला ‘श्रृती किंवा श्रौत वाङ‌्मय’ अशीच संज्ञा आहे. लेखनविद्या अवगत झाल्यावर संपादित ज्ञानाचा साठा लिखित स्वरूपात जतन करण्यास प्रारंभ झाला. भूर्जपत्रे, ताडपत्रे, धातूपत्रे, शिलालेख.. अशा स्वरूपातील प्राचीन लेखन आजही संग्रहालयांतून उपलब्ध आहे आणि संशोधक-अभ्यासक त्यांचा अभ्यास करत आहेत. कालांतराने लेखनसामग्री, लेखनमाध्यमे.. यात बदल होत गेले. मूळ लेखनाच्या आवृत्त्या काढण्याची प्रथाही सुरू झाली. मौखिक विद्या लेखनविद्येत बदलली. मुद्रणकलेच्या शोधानंतर तर लेखन, वाचनाचा कल्पनातीत विकास झाला. नवे उच्चांक निर्माण होत राहिले. आपल्या देशापुरता विचार करायचा झाला तर स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणाचा प्रसार जसजसा होत गेला तसतसे वाचनाचे प्रमाणही समांतर पद्धतीने वाढत गेलेले दिसते.

  अर्थात बदल हा प्रत्येक क्षेत्राचा स्थायिभाव असतो. त्यानुसार मुद्रणकला, लेखन आणि वाचन यातही परिवर्तनाचे वारे वाहू लागले. सध्याच्या काळात समाजमाध्यमांचा (सोशल मीडिया) रेटा वाढला तशी ‘वाचनसंस्कृती संपली’चा ओरडा सुरू झाला. पण प्रकाशक, ग्रंथविक्रेते, ग्रंथदालनांचे मालक आणि अर्थातच वाचक यांच्याशी मुक्त चर्चा झाल्यावर ‘वाचनसंस्कृती संपली’ अशी हाकाटी पिटण्याची गरज नाही, असेही वाटले. आजही चांगल्या पुस्तकांना वाचकांची उत्तम मागणी आहे. दर्जेदार पुस्तकांच्या आवृत्त्यांमागून आवृत्त्या निघत आहेत. ग्रंथालयांतून उत्तम पुस्तकांसाठी ‘क्लेम’ आहेत, ग्रंथप्रदर्शनांमधून अनेक पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. मराठी भाषेतील पुस्तकांप्रमाणेच इंग्रजी भाषेतील पुस्तकेही युवा पिढीत ‘वाँटेड’ आहेत. ब्रिटिश लायब्ररीसारख्या प्रतिष्ठित ग्रंथालयाचे सभासदत्व मिळवण्यासाठी प्रतीक्षा यादी आहे. राज्यात कित्येक ग्रंथालयांनी शताब्दी पूर्ण करून पुढील वाटचाल सुरू केली आहे. नव्या वाचनालयांची, ग्रंथालयांची, पुस्तकदालनांची निर्मिती केली जात आहे. ग्रंथप्रदर्शनांची संख्या वाढली आहे. हे चित्र नक्कीच आशादायक आहे.

  ‘पुस्तकपेठे’ची निर्मिती
  पुण्यातल्या कोथरूडमध्ये प्रसिद्ध लेखक संजय भास्कर जोशी यांनी त्यांचे स्नेही माधव वैशंपायन यांच्यासह ‘पुस्तकपेठ’ या अद्ययावत पुस्तकदालनाची नुकतीच सुरुवात केली आहे. डहाणूकर कॉलनीत ‘अक्षरधारा’ आणि ‘राजहंस प्रकाशन’ यांनी नवे ग्रंथदालन सुरू केले आहे. कॉस्मोपॉलिटन परिसरात ‘क्रॉसवर्ड’ची पंचतारांकित ग्रंथदालने आहेत. मेहता पब्लिशिंग हाऊसने सर्व सोयींनी युक्त असे ग्रंथविक्रीदालन सुरू केले आहे. रसिक साहित्यतर्फेही वातानुकूलित ग्रंथदालन सुरू झाले आहे. वाचनसंस्कृतीच्या दृष्टीने हे चित्र आश्वासक आहे, यात शंकाच नाही. शिवाय ग्रंथदालने सुरू करताना अधिकाधिक पुस्तके सामावतील अशी रचना, वाचकांना पुस्तके नीट हाताळता यावीत, बसून पुस्तकांची निवड करता यावी यासाठी आधुनिक डिस्प्ले, आकर्षक रंगसंगती, संगीताचे

  हळुवार स्वर यांची पार्श्वभूमी असणारे वातावरण, योग्य प्रकाशयोजना, वेगवान बिलिंग पद्धती, सध्याच्या काळानुरूप बिलिंगचे सर्व पर्याय, सवलती, बक्षीसयोजना, वाचक मेळावे यांची रेलचेल या दालनांतून सुरू आहे.

  ग्रंथदालनांची संख्या शहरी भागांत अधिक असणार हे उघड असले तरी गावोगावी ग्रंथप्रदर्शनांच्या माध्यमातून वाचनाचा प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील असणारी ग्रंंथप्रदर्शने सातत्याने आयोजित करणाऱ्या ‘अक्षरधारा’, ‘सहित्यदर्शन’ या संस्थाही महत्त्वाच्या आहेत. पुण्या-मुंबईत एकवटलेला प्रकाशनव्यवसाय या ग्रंथप्रदर्शनांच्या माध्यमातून नाशिक, कोल्हापूर, नगर, सोलापूर, जळगाव, औरंगाबाद, कोकण अशा सर्व ठिकाणी पोहाेचत आहे. वर्षभर विविध प्रकारची जी साहित्य संमेलने आयोजित केली जातात, त्यातूनही ग्रंथप्रसाराच्या संधी मिळत जातात. पुस्तकांची देवघेव हा साहित्य संमेलनातला चर्चेचा विषय असतो.

  पुस्तकांचा ‘इ’ फंडा
  नव्या टेक्नोसॅव्ही जगात ग्रंथव्यवहारानेही पारंपरिक वाचनाच्या जोडीने तंत्राधारित फंडे आपलेसे केले आहेत. इ-बुक्स, ऑडिओ बुक्स, दृकश्राव्य पुस्तके यांची भर ग्रंथव्यवहारात पडली आहे. बुकगंगा डॉट कॉम, डेलीहंट, बुकहंगामा..असे टेक्नो पार्टनर ग्रंथविश्वाची नाळ तंत्रज्ञानाशी जोडू पाहात आहेत. त्यातून मराठी पुस्तकापासून दुरावलेली अनिवासी मराठी मंडळींची दुनिया पुन्हा मराठी पुस्तकांमध्ये रमते आहे.
  -जयश्री बाेकिल, पुणे
  पुढील स्लाईड वर बघा काही फोटो आणि शेवटच्या स्लाईडवर संजय भास्कर जोशी यांचे मत...

 • article about World Library by jayashree bokil
 • article about World Library by jayashree bokil
 • article about World Library by jayashree bokil
  वाचाल तर समृद्ध व्हाल
   
   - वाचनसंस्कृतीचा प्रसार हेच उद्दिष्ट ठेवून मी आणि माझे मित्र माधव वैशंपायन यांनी ‘पुस्तकपेठ’ हे ग्रंथदालन सुरू केले. वाचकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. लवकरच ‘वाचनानंद’ हे इ-मासिकही सुरू करत आहोत. वाचाल तर वाचाल, याच्या पुढे जाऊन वाचाल तर समृद्ध व्हाल, हे आमचे ब्रीदवाक्य आहे.
  संजय भास्कर जोशी, पुस्तकपेठ ग्रंथदालन
   
   

Trending