आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनधास्त, बेधडक,तरीही...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संपादक म्हटल्यावर त्याच्याकडे सांगण्यासारखे खूप काही असते आणि त्यांची लेखणीसुद्धा अभिव्यक्त होण्यास सज्ज असते. विविध इंग्रजी मासिकांच्या संपादकपदी तसेच सतत उच्च पदावर कार्य केलेले दिवंगत संपादक विनोद मेहता यांनीदेखील ‘लखनौ बॉय’ आणि ‘एडिटर अनप्लग्ड’ या दोन पुस्तकांमध्ये १९७४ पासून २०१४ पर्यंतच्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ संपादकीय कार्यकाळातील आठवणींचा दस्तऐवज वाचंकासाठी खुला केला आहे.

मेहतांनी ‘लखनौ बॉय’मध्ये प्रामाणिकपणा, देशप्रेम, स्वार्थत्याग, तत्त्वनिष्ठा याबाबतची आपली निरीक्षणे परखडपणे नोंदविली आहेत. मात्र, मेहता यांचे ‘एडिटर अनप्लग्ड’ हे पुस्तक इथे चर्चेला घ्यायचे आहे. पुस्तकाच्या उपशीर्षकात (Media, Magnets Netas and Me) म्हटल्याप्रमाणे संपादक विनोद मेहता यांचे माध्यमे, आकर्षक व्यक्ती, आणि राजकारणी नेते यांच्याशी आलेले संबंध, त्यासंबंधीची माहिती, त्यावरील भाष्य, प्रकट केलेली मते हा या पुस्तकाचा मुख्य विषय आहे. त्या अनुषंगाने महत्त्वाच्या घटना, अन्योन्य संबंधांशी निगडित प्रसंग या पुस्तकात आहेत. ‘नीरा राडिया अँड द आर्ट ऑफ लॉबिंग’ यासारखी प्रकरणे प्रसारमाध्यमावर बेतली आहेत. ‘रतन टाटा’, ‘मला आवडलेल्या सहा व्यक्ती’, ‘डेव्होस मॅन व्हर्सेस झोलावाला’, अशी प्रकरणे वलयांकित किंवा आकर्षक अशा गाजलेल्या लोकांवर आहेत. नेत्यांमध्ये गांधी घराण्यातील नेते, नरेंद्र मोदी यांच्यावरील प्रकरणे आहेत. घराणेशाही संदर्भात इतिहासातील आणि जगभरातील उदाहरणे देत काँग्रेसमधील घराणेशाही नेहरूंपासून उदयाला आली, संजय गांधीच्या काळात कळसाला पोहोचली, ही माहिती दिल्यानंतर मेहतांनी चक्क एका मर्यादेपर्यंत, काँग्रेसच्या घराणेशाहीचे समर्थन केले आहे. पुढे जाऊन सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या यापुढील नेतृत्वाखाली घराणेशाही कोणती भूमिका साकारणार, याबद्दल त्यांना कुतूहल असल्याचेही जाणवले आहे.

अर्थात, गांधी कुटुंबातील भांडणेही आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात. यात संजय गांधींचे बेताल वागणे इंदिरा गांधी का सहन करत आणि त्याच्याबाबत बोटचेपेपणा त्यांनी का दाखवला, याचे विश्लेषण मेहता यांनी केले, ते फारसे पटणारे नाही. भाजप आणि काँग्रेस या दोहोंत विनोद मेहता यांचा कल काँग्रेसकडे झुकणारा होता. सरत्या निवडणुकीत मतदान करताना आपण ‘नोटा’(नन ऑफ दी अबाऊ) या पर्यायाची निवड केली, त्यामुळे आपण काँग्रेसधार्जिणे नाही, असे जरी त्यांनी सूचित केले असले तरी काँग्रेस ‘धर्मनिरपेक्ष’ तर भाजप ‘कट्टरवादी’, असे त्यांचे ठाम मत पुस्तकात अनेक ठिकाणी व्यक्त झाले आहे. आरएसएसमुळे भाजपचा कट्टरतावाद अधिक टोकदार बनला आहे, या त्यांच्या पूर्वग्रहातून त्यांनी नरेंद्र मोदींविषयी लिहिले आहे. स्वतः विनोद मेहता आणि नरेंद्र मोदी यांच्यातील संघर्षाचे प्रसंग त्याला जबाबदार आहेत. गुजरातेतील भूज भागातील भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन झाले नाही, याबाबतचा अहवाल त्यांनी एका भेटीत नरेंद्र मोदींना सादर केला होता. तो मोदींनी सपशेल फेटाळला. उलट २००२च्या गुजरात निवडणुकीत मेहतांच्या ‘आऊटलूक’ साप्ताहिकाने खोटी जनमत चाचणी घेऊन भाजप पराभूत होईल असे प्रयत्न केले, असा आरोप मेहतांवर केला. थोडक्यात, दोहोंमधील संबंध चांगले नव्हते.

राजकीय पक्ष आणि नेते या विषयावरील विनोद मेहतांचे विश्लेषण काही गृहीतकांवर आधारित आहे. काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष आहे तर भाजप कट्टरवादी पक्ष आहे, हे गृहीतक सिद्ध करण्याची गरज त्यांना वाटली नव्हती. आणीबाणी लागू केली, या एकमेव कृत्यासाठी इंदिरा गांधींना तुम्ही गुन्हेगार कसे ठरवणार? असा प्रश्न उपस्थित करणारे विनोद मेहता इंदिरा गांधी व नरेंद्र मोदी यांच्यात उजवे-डावे करणारे होते, असे म्हणता येईल.

या पुस्तकातील वाचकाला खिळवून ठेवणारा भाग म्हणजे, माध्यमांवरील प्रकरणे. स्वतः विनोद मेहता हाडाचे पत्रकार असल्याने आपल्या वृत्तपत्रसृष्टीतील दीर्घ अनुभवांवरून त्यांनी माध्यमांची भूमिका, माध्यमे आणि सरकार, आदर्श पत्रकारिता, छापील आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे यांच्यातील स्थित्यंतरे आणि विशेष म्हणजे जागतिकीकरणाच्या आजच्या संदर्भात, माहिती-अधिकारांंचा प्रस्फोट विचारात घेता, या दशकातील माध्यमांचे वास्तव यावर प्रकाशझोत टाकला आहे. त्यातून वाचकाला नवीन माहिती तर मिळतेच, शिवाय ती विचारप्रवृत्तही करते. विनोद मेहता यांच्याकडे लिहिण्यासारखे खूप होते. त्यांनी ते लिहिलेही असते; मात्र त्यांच्या अचानक निधनाने, हे लिखाण आपल्यापर्यंत येणार नाही. एका सच्च्या पत्रकाराला, सव्यसाचि, निर्भीड, निर्लेप पत्रकारितेला पूर्णविराम मिळाला, असे म्हणावे लागेल.
बातम्या आणखी आहेत...