आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगात रंगुनि रंगावलीच्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरातची सांस्कृतिक राजधानी असलेल्या बडोद्याची ओळख येथील रांगोळी कलाकारांनी अधिक समृद्ध झाली, असे हल्ली म्हटले जाते. ४० वर्षांपूर्वी भारतात फ्लॅट संस्कृती रुजू लागली. घरापुढील अंगण, तुळशी वृंदावन नाहीसे होऊ लागले. अंगणात रांगोळी काढण्याचा उत्साह, आवड कमी होऊ लागली. त्यामुळे पारंपरिक रांगोळी कलेला नवजीवन प्रदान करण्याच्या आणि कलेपासून दुरावलेल्या तरुण पिढीला रांगोळीच्या सौंदर्याकडे पुन्हा आकर्षित करण्याच्या उद्देशाने १९८५मध्ये स्वस्तिक रांगोळी कलाकार ग्रुपची स्थापना झाली. बडोद्यातील राजेंद्र दिंडोरकर, सदाशिव फडणीस, अभय गडकरी, राजू चौहान यांच्यासह अन्य कलाकारांनी एकत्र येऊन रांगोळीच्या प्रचार आणि प्रसाराचे काम सुरू केले. समूहाने त्या काळी सुरू केलेल्या या कलेच्या प्रसाराचे कार्य आजही अव्याहत चालूच आहे. म्हणूनच हा देशातील सर्वात जुना आणि मोठा ग्रुप आहे.

रांगोळीला विदेशातही ओळख मिळवून द्यायची आणि सामान्यांमध्येही तिला पुनरुज्जीवित करायचे, या उद्देशाने ग्रुपने आजवर हजारो कलाकार घडवले. . त्या काळी रांगोळी म्हणजे रंगीत पावडर, किंवा रंगीत वाळूने ठिपक्यांची, फुला-पानांची नक्षी किंवा मुक्तहस्त नक्षी काढणे असा समज होता. मात्र समूहाच्या कलाकारांनी रांगोळीच्या माध्यमातून पोर्ट्रेट्स, फिगरेटिव्ह, लँडस्केप, सीस्केप, स्टिल लाइफ, वाइल्ड लाइफ असे विषय घेऊन ६ बाय ४ फूट आकारामधील हार्डबोर्ड किंवा फ्लायशीटवर रांगोळ्या काढल्या. आपला वारसा लोकांसमोर ठेवण्यासाठी प्रदर्शन भरवले. रांगोळीने काढलेली, जिवंत वाटणारी चित्रे पाहून कलारसिकांकडून प्रदर्शनांना भरघोस प्रतिसाद मिळू लागला. हळूहळू प्रदर्शनाला प्रायोजक मिळू लागले. हजारो कलारसिकांची झुंबड उडू लागली.

बडोद्यातील ऐतिहासिक कीर्ती मंदिरात १९९३पासून दर वर्षी दीपावलीच्या निमत्ताने राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शन भरवले जाते. देशभरातील कलाकार, विदेशातील कलारसिकही या प्रदर्शनाची वाट पाहत असतात. ग्रुपच्या सदस्यांनी ३० वर्षांपासून प्रत्येक दिवाळी प्रदर्शनस्थळावरच साजरी केली आहे. अहमदाबाद, बंगळुरू आणि इतर शहरांतही आमंत्रणावरून रांगोळी प्रदर्शनं भरविली जातात.

न्यूझीलंडच्या एशिया २००० फाउंडेशन ऑफ न्यूझीलंड या संस्थेने तेथील भारतीयांकरिता ‘दिवाली फेस्टिवल ऑफ लाइट्स’मध्ये रांगोळी काढण्यासाठी तसेच शाळांमध्ये वर्कशॉप घेण्यासाठी ग्रुपला आमंत्रित केले होते. तत्कालीन पंतप्रधान हेलन क्लार्क यांनी खूप बारकाईने कलाकृतींचे निरीक्षण केले व कौतुकाची थापही दिली. दुबई शॉपिंग फेस्टिवल तसेच लंडनमध्येही एका संस्थेच्या आमंत्रणावरून तिथेही रांगोळीचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. भारताबाहेर रांगोळीच्या प्रसाराच्या निमित्ताने गेले असता अनेक अनुभव आले. फक्त पावडर फॉर्ममधील रंगांचा वापर करून एवढं बारकाईने, जिवंत चित्र बनवता येतं, याची कल्पनाही तिथल्या लोकांना नसते.

रांगोळी काढताना झालेली एखादी चूक, तो रंग जागेवरून काढून टाकून सुधरवता येत नाही. ती चूक पुन्हा खरा शेड ओव्हरलॅप करूनच सुधारावी लागते. त्यामुळे १०० टक्के एकाग्रता हाच यावर उत्तम उपाय आहे. रांगोळीप्रमाणेच आयुष्यातही एकाग्रतेने काम करण्याची सवय लागल्यास बऱ्याच गोष्टी सोप्या आणि सहज होतात.
abkam_gadkari@yahoo.com
- लेखक बडोद्यातील स्वस्तिक रांगोळी कलाकार ग्रुपचे सचिव आहेत.
बातम्या आणखी आहेत...