आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवनागरीच्या उत्सवात अल्जेरियन दंग!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एमिरेट्स एअरलाइन्स’च्या मुंबई-अल्जेरिया या विमानात पाऊल ठेवले, तेव्हा एका अनोळखी देशात जात असल्याची भावना होती. त्याच वेळी उत्सुकता आणि अनभिज्ञताही जाणवत होती. यापूर्वी इंग्लंड, चीन, जर्मनी, कोरिया आदी देशांमध्ये प्रवास केला; परंतु अशी भावना कधीही नव्हती. अगदी पहिल्यांदा त्या देशांमध्ये गेलो तेव्हादेखील. कारण या देशांबद्दलची माहिती कधी वाचनातून, कुणा मित्रांच्या बोलण्यातून, तर कधी हिंदी चित्रपटांतून झाली होती. गेल्या २५ वर्षांच्या कारकीर्दीत मात्र प्रथमच एका अनोळखी प्रदेशात पाऊल टाकत होतो. तत्पूर्वी ‘गुगल सर्च’ करून अल्जेरियाची भाषा, चलन, संस्कृती आदी माहिती मिळवली होतीच. स्पेन, फ्रान्स या युरोपीय देशांच्या सीमारेषांलगत असणारा अल्जेरिया हा मुस्लिमबहुल देश मोरोक्को, लिबिया या अशांत टापूच्या प्रदेशांशी खेटून दिसत होता. इस्लामी संस्कृती म्हणजे बुरखाधारी स्त्रिया, अरबी वेश असेच काहीसे चित्र डोळ्यासमोर रेखाटत असतानाच सुमारे नऊ तासांचा प्रवास करीत राजधानी अल्जिअर्सच्या विमानतळावर उतरलो.
‘इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स’च्या वतीने निवड झाली असल्याने मला विमानतळाहून प्रदर्शनाच्या ठिकाणी नेण्यासाठी भारतीय दूतावासाच्या काही अधिका-यांबरोबर सेंटरचे अधिकारीसुद्धा आले होते. इंडो-अरब सांस्कृतिक उत्सवाचा भाग असलेल्या या मेळाव्यात भारताबरोबरच इजिप्त, ओमान, इराक, सुदान, ट्युनिशिया या देशांचे प्रतिनिधी आले होते. भारतातून देवनागरी लिपीचा अभ्यासक आणि सुलेखनकार म्हणून मी आणि कुराण ग्रंथाचे वाचन करणारे दिल्ली येथून अब्दुल्ला आले होते. अल्जेरियाच्या भूमीमध्ये पाय ठेवल्यावर खरे तर या देशाविषयी माझ्या मनातील प्रतिमेला तडाच गेला. कधीकाळी अल्जेरिया हा देश फ्रेंचांच्या वसाहतीचा भाग असल्याने अल्जेरियामध्ये फ्रेंच भाषेला अरेबिक भाषेबरोबरचा दर्जा आहे. त्यामुळे अरेबिक आणि फ्रेंच या दोन भाषांमध्ये तिथे संवाद साधला जातो. फ्रान्सप्रमाणेच इथेदेखील इंग्रजीमध्ये फारसा संवाद साधला जात नव्हता.
त्यामुळे इंग्रजीमधून संवाद साधायचा तर तिथे इंग्रजी समजणारे आणि बोलणारे खूपच कमी होते. परंतु प्रदर्शनाच्या ठिकाणी मात्र खूपच वेगळा अनुभव आला. कलेला भाषेच्या, धर्माच्या, देशांच्या सीमा आडकाठी आणत नाहीत, याचा प्रत्यय मला आला. आमच्या आयोजकांनी माझी ओळख करून देताना सांगितले की, मी भारतातून आलो आहे... तेव्हा समोरच्या गर्दीतून शाहरुख खान... अमिताभ बच्चन...असा बॉलीवूडमधील कलाकारांच्या नावांचा उद्घोष होऊ लागला. शाहरुख, सलमान, आमिर, अमिताभ हे कलाकार अल्जेरियामध्ये खूपच लोकप्रिय आहेत, हे मला तत्क्षणी जा‌णवले. याच एकसमान धाग्यामुळे मला अल्जेरियन रसिकांबरोबर संवाद साधायला सोपे गेले. पुढे पुढे तर एखाद्या चित्रपटातील गाणे लोकांमधून सुरू झाले की, त्याच्यापुढची ओळ किंवा ते सबंध गाणं मी तालासुरात गाऊ लागलो. त्याच सौहार्दपूर्ण वातावरणाचा फायदा घेत आपल्या देवनागरी लिपीमध्ये मी कॅन्व्हासवर अक्षर रेखाटू लागलो. गाणं गुणगुणत किंवा त्या गाण्याच्या तालावर पदन्यास करत प्रेक्षकातील एखाद्या तरुणाला ते अक्षर गिरवण्यास बोलावू लागलो.
अत्यंत सुंदर आणि देखण्या तरुण-तरुणी अत्यंत मोकळेपणाने पुढे येऊन माझं अनुकरण करू लागले. काही लग्न ठरलेल्या तरुणी आपल्या भावी नव-याबरोबर येऊन मोठ्या उत्साहाने स्वत:चे आणि नव-याचे नाव माझ्याकडून रेखाटून घेऊ लागल्या. त्यातल्या काहींनी तर माझी रेखाटने नव्या घरात भिंतीवर फ्रेम करून लावणार असल्याचे सांगितले.
एका नवविवाहित मुलीने घरात फ्रेम करून लावण्यासाठी म्हणून भारतीय भाषेमध्ये संदेश लिहून देण्याची फर्माईश केली. तिला ‘माझ्या घरात सुखशांती आणि आनंद नांदू दे’, हा संदेश मी दिला; तर दुसरीने देवनागरीत ‘शहनाझ-फैझल’ असे स्वत:च्या नावासोबत आपल्या होणा-या नव-याचे नाव लिहून घेतले. पारंपरिक पेहराव असलेल्या एका मुस्लिम मुलीने तर हात समोर करीत स्वत:चे कॅलिग्राफिक नाव काढायला सांगितले.
या संपूर्ण सात दिवसांच्या कार्यक्रमात शाळेच्या मुलांबरोबर शिक्षक, पालक, तरुण-तरुणींबरोबरच सत्तरीतील पाहावृद्धांनीदेखील भरघोस प्रतिसाद दिला. प्रत्येक भाषेला स्वत:चा गोडवा, कलात्मकता असते, तसाच अरेबिक भाषेलादेखील आहे. ‘नजाकता’ या शब्दाचा अर्थच मुळी मला अरेबिक कॅलिग्राफी पाहताना उमगला. शब्द, भाषा, संस्कृती, देश, धर्म या सर्वावर मात करत फक्त कलेच्या माध्यमातून माणसे जोडता येतात. कोणत्याही सीमारेषा त्यांना थांबवू शकत नाहीत, हाच त्याचा अर्थ. प्रदर्शनात एका उत्साही अल्जेरियन रसिकाने माझ्याकडे हिंदी गाणे गाण्याचा लकडा लावला. मग त्यानेच अरेबिक लहेजात सुरुवात केली. मेरा तुझसें है पहले का नाता कोई... मग मी चटकन, त्याला साथ देत पुढली ओळ अलगद उचचली, यूँ हीं नही दिल लुभाता कोई...अखेरीस या गाण्यातील शब्द खरे असल्याची भावना घेऊनच मी भारतात परतलो.
वांद्रेसारखे वातावरण
अल्जेरियाच्या ज्या भागात मी फिरलो तो प्रदेश आपल्याकडील वांद्रे-पाली हिलसारखा जाणवला. छोटे छानसे टुमदार कौलारू बंगलेवजा घरं, चिंचोळ्या गल्ल्या, मातीची पायवाट असे दृश्य होते. हा प्रदेश युरोपच्या लगत असल्याने केव्हाही पावसाचा शिडकावा व्हायचा.
शब्दांकन - विकास नाईक