समीर म्हणजे वारा. रणरणत्या उन्हात अंगाची लाही लाही होत असताना, थंड वाऱ्याची एक झुळूक जो आनंद देते, तसाच आनंद गीतकार समीरची गाणी देतात. ज्या काळात सुमार दर्जाच्या मारधाडपटांमुळे हिंदी चित्रपट संगीताला ग्रहण लागलं होतं, त्या काळात समीर यांच्या मर्यादांचं भान जपलेल्या गीतलेखनाने गीतांना लोकप्रियता मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.
नव्वदीच्या दशकात अॅक्शनपटांनी धुमाकूळ घातला होता. सुवर्णयुगातील गाण्यांवरच रसिकांना समाधान मानावे लागत होते. श्रवणीय गाण्यांचा दुष्काळ पडलेला असतानाच ‘नजर के सामने जिगर के पास..’ने रसिकांना साद घातली. नव्या युगाची ही नांदी होती, आणि नांदी देणारा गीतकार होता, समीर! ‘आशिकी’ने हिंदी चित्रपटसृष्टीत एका नव्या युगाची सुरुवात केली. हृदयाला िभडणाऱ्या गाण्याची वानवा संपली. याचे श्रेय होते, आनंद-मिलिंद, नदीम-श्रवण या संगीतकार द्वयींचे आणि त्यांना समर्पक साथ देणाऱ्या गीतकार समीर यांचे. ‘आशिकी’सोबतच ‘दिल’ मधून ‘मुझे नींद ना आये, मुझे चैन ना आये...’ असे सांगत समीर यांनी रसिकांची झोप उडवली होतीच. त्यानंतर समीर यांच्या लेखणीतून उतरलेल्या प्रेमळ गाण्यांनी जो इतिहास घडवला, तो सर्वश्रुत आहे.
उत्तर प्रदेशातील बनारसजवळच्या ओद्दर नावाच्या खेड्यात जन्मलेला हा मुलगा पुढे गीतकार होईल, असे त्याच्या घरच्यांना वाटले नव्हते. शीतला ऊर्फ राजन पांडे हे समीर यांचे मूळ नाव. लालजी पांडे अर्थात गीतकार अंजान हे समीरचे पिता. घरात गीतलेखनाचा मोठा वारसा असतानाही समीरचा ओढा शिक्षणाकडे जास्त होता. बनारस हिंदू विद्यापीठातून मास्टर ऑफ कॉमर्सची पदवी त्यांनी मिळवली. त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळाली. मात्र बँकेच्या रुक्ष आकडेमोडीत त्यांचे मन रमेना. त्यांनी सरळ नोकरी सोडली. तडक मुंबईत दाखल झाले. गीतकार पिता अंजानसह कुटुंबातल्या सर्वांचा यास विरोध होता. चित्रपटसृष्टीच्या बेभरवशाच्या करिअरबाबत सर्व जण साशंक होते. मात्र समीर
आपल्या निर्णयावर ठाम राहिले. आपल्या लेखणीच्या, प्रतिभेच्या जोरावर त्यांनी हा विश्वास सार्थ ठरवला. ‘बेखबर’ चित्रपटात त्यांना पहिली संधी मिळाली. यातले ‘गोरी परेशान है’ हे गाणे बऱ्यापैकी गाजले. समीर हे नाव खरे प्रकाशात आले, ते ‘दिल’ या चित्रपटामुळे. त्याच वर्षी आलेल्या ‘आशिकी’ने समीर ही काय चीज आहे, याचा मासलाच जणू पेश केला.
गतकाळातील गुणवान संगीतकार चित्रगुप्त यांची मुले आनंद-मिलिंद यांनी समीरच्या लेखणीची जादू ओळखली. त्या वेळी ‘दिल’ त्यांच्या हाती होता.
माधुरी दीक्षित व
आमिर खान या जोडीची आगळी प्रेमकथा गीतरूपाने फुलवायचे काम समीर यांच्यासमोर होते. मुझे नींद ना आये.., हम प्यार करने वाले.., ओ प्रिया प्रिया.. सारखी सहज ओठी रुळणारी गाणी देत समीर यांनी आनंद-मिलिंद यांच्यासह रसिकांची मने जिंकली. ‘दिल’ तुफान चालला. त्यापाठोपाठ आलेल्या ‘आशिकी’ने तर कमालच केली. नदीम-श्रवण ही संगीतकार जोडी त्या वेळी चित्रपटसृष्टीत जम बसवण्यासाठी संघर्ष करत होती. संघर्ष काळात या त्रिकुटाने असंख्य गाणी तयार करून स्वत:ची म्युझिक बँक तयार केली होती. त्यातलीच काही गाणी टी-सिरीजचे मालक गुलशनकुमार यांना पसंत पडली होती. पुढे या गाण्यांभोवती कथानक गुंफून सुपरहिट ‘आशिकी’ तयार झाला होता. समीरच्या लेखणीने रसिकांच्या मनावर जी फुंकर घातली त्याला तोडच नव्हती. ‘जाने जिगर जानेमन’मधला आगळा निर्धार, ‘मैं दुनिया भूला दूंगा तेरी चाहत में’मधला प्रेमावरचा विश्वास, ‘बस एक सनम चाहिए’मधली प्रेमळ मागणी, ‘तू मेरी जिंदगी’मधली आर्त आर्जवता, ‘अब तेरे बिन जी लंेगे हम’मधला विरहभाव, ‘मेरा दिल तेरे लिए’मधली सच्चाई आणि ‘नजर के सामने जिगर के पास, कोई रहता है वो हो तुम...’मधून प्रेमाची महती सांगणारा भाव समीर यांच्या गीतांतून ‘आशिकी’मध्ये उतरला होता. ‘आशिकी’ची गाणी तरुणाईचा अक्षरश: श्वास बनली होती. सामर्थ्य आणि मर्यादांचं भान हे समीर यांच्या गीतलेखनाचं वैशिष्ट्य होतं. साहिर, मजरुह किंवा गुलजार होता नाही आलं, तरीही सामान्य माणसाचं मन आपल्याला गीतांमधून मोकळं करता यायला हवं, इतपत भानही त्यांनी पुरेपूर जपलं होतं.
आनंद-मिलिंद व नदीम-श्रवण यांच्याशी जुळलेल्या सुरांतून समीर यांनी अनेक अविस्मरणीय गाणी दिली. सडक, साजन, राजा, फूल और कांटे, हम हैं राही प्यार के... अशा अनेक चित्रपटांतून त्याचे प्रत्यंतर येत गेले. ‘देखा है पहली बार साजन की आँखों मे प्यार’मधून प्रेमाची पहिली ओळख, ‘तुमसे मिलने की तमन्ना है’मधली प्रेमळ ओढ, ‘मेरा दिल भी कितना पागल है’मधून प्रेमाची कबुली व्यक्त करताना होणारी मनोवस्था समीर यांनी अगदी अचूक टिपली आहे. तर ‘बहोत प्यार करते हैं’मधून तिच्या मनोविश्वाचे केलेले रेखाटन निव्वळ अद्वितीयच. मग ‘जिए तो जिए कैसे बिन आपके’मधून येणारा सवाल अस्वस्थ करणारा आहे...‘साजन’मधील या गाण्यांनी आज चाळिशीत असणाऱ्या पिढीवर राज्य केले ते उगाच नाही. त्यानंतर आलेल्या ‘सडक’मध्येही समीरची लेखणी किती बहुप्रसवा आहे, याचे प्रत्यंतर आले. ‘तुम्हे अपना बनाने की कसम खायी है’मधला निर्धार असो, ‘हम तेरे बिन कहीं’मधील अपरिहार्यता असो. ‘जब जब प्यार पे पेहरा हुआ’मधील प्रेमाची महती ‘मोहब्बत की है तुम्हारे लिए’मधून जास्तच गहरी होते. असाच प्रेमळ अनुभव मग समीरच्या ‘हम हैं राही प्यार के’ने दिला. त्यानंतर आलेल्या ‘राजा हिंदुस्तानी’, ‘कुछ कुछ होता है’, ‘फिजा’, ‘प्यार तो होना ही था’, ‘धडकन’मधून समीर यांनी अविस्मरणीय गाणी दिली.
प्रेमाची महती सर्वसामान्य प्रेक्षकाला आकलन होईल अशा अचूक उपमा व अलंकारांनी सजवून गीतांतून ती अलगद रसिकांच्या मनी रुजवणे, हे समीर यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य. अशी अनेक गाणी देणारा, आनंद बक्षींना गीतलेखनातला आदर्श मानणारा हा निगर्वी आणि साध्या मनाचा हा गीतकार आजही साँवरिया, देवदास, बागबान, सन ऑफ सरदार, दबंग-२ मधून आपल्या लेखणीची जादू गीतरूपी झुळकीतून दाखवतो आहे.
प्रेमाची महती सांगणारा भाव समीर यांच्या गीतांतून ‘आशिकी’ मध्ये उतरला, त्याला नदीम-श्रवण यांच्या संगीताने नादमय रंग भरले.
‘आशिकी’ची गाणी तरुणाईचा अक्षरश: श्वास बनली. ती आजही तरुणांच्या भावविश्वात प्रेमळ कप्प्यात विराजमान आहेत.