आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेमाचा संप्रदाय : संप्रदायाचा सिनेमा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमा हे जितकं मनोरंजनाचं साधन आहे तितकंच किंबहुना अधिकच ‘प्रपोगंडा’ करण्याचंही साधन आहे, हे जितक्या लवकर समजेल तितकं बरं. देशविदेशामधली सरकार, गुप्तचर संस्था जशा या माध्यमाचा आपल्याला हवा तसा वापर करून घेतात तसे अनेक धार्मिक संप्रदायसुद्धा करतात.

माझ्या मित्रासोबत घडलेला किस्सा. नाशिकमध्ये. आता हयात नसलेल्या एका धार्मिक संप्रदायाच्या एका गुरूंवर बनलेला एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने बऱ्यापैकी हवा केली होती. किमान तसा आभास तरी महाराजांच्या भक्तमंडळींनी तयार केला होता. उत्सुकतेने मित्राने चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला. पण ‘बुक माय शो’वर बुकिंग चेक केलं तर पूर्ण आठवड्याचे सर्व तिकिट्स सगळ्याच थिएटरात सोल्ड आउट! हाउसफुल! काहीतरी टेक्निकल एरर असेल, शिवाय देवावरचा सिनेमा चांगला असू शकतो, या शक्यतेने मित्र एका मल्टिप्लेक्सला गेला. सिनेमा खरोखर ‘हाउसफुल’ होता. मात्र, तो डोळ्यात धूळ झोकण्याचा प्रकार होता हे मित्राला कळालं. स्वामी पीठाकडून सगळी तिकीट खरेदी करण्यात आलेली, आणि तीच तिकिटे बाहेर स्वामीभक्तांकडून स्टॉल लावून अधिकृतरीत्या विकण्यात येत होती. मित्र त्यांच्याकडे तिकीट घ्यायला गेला तेव्हा ते लोक ६० रुपयांची तिकिटे २००ला विकत होते. भक्तांकडून उघडउघड ब्लॅकचा धंदा चालू होता. त्यांना मित्राने याचा जाब विचारला, तर ही सर्व रक्कम स्वामींच्या पीठाला देणगी स्वरूपात जाणार असल्याचं समजलं! नंतर हेही समजलं की, स्वामींच्या केंद्रात ही तिकिटे फुकटात वाटण्यात आली. ज्याला सिनेमा स्वतःच्या पैशाने पाहायचा होता, त्याला मात्र ब्लॅकचं तिकीट घ्यावं लागत होतं. असा अनुभव महाराष्ट्रात इतर शहरांमध्ये अनेक लोकांना आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे काही लोकांना धक्कादायक वाटू शकतं. पण सिनेमा हे जितकं मनोरंजनाचं साधन आहे तितकंच किंबहुना अधिकच ‘प्रपोगंडा’ करण्याचंही साधन आहे, हे जितक्या लवकर समजेल तितकं बरं. देशविदेशामधलं सरकार, गुप्तचर संस्था जशा या माध्यमाचा आपल्याला हवा तसा वापर करून घेतात तसे अनेक धार्मिक संप्रदायसुद्धा करतात.

धर्म, प्रपोगंडा आणि सिनेमा यांचं हे त्रैराशिक पुन्हा ऐरणीवर आलं आहे, ते ‘डेरा सच्चा सौदा’ या धार्मिक संप्रदायाचे कर्ताधर्ता डॉ. राम रहीम सिंग ‘इन्सान’ यांच्या ‘एमएसजी’ चित्रपटत्रयीमुळे. या चित्रपटाचे ट्रेलर आपल्यापैकी अनेकजणांनी पाहिले असेलच. खूप लोकांनी ते ट्रेलर सोशल मीडियावर शेअरही केलं आहे. ट्रेलर भारी होते म्हणून नाही, तर अतिशय विनोदी होते म्हणून. या चित्रपटत्रयीमधलेच सगळे चित्रपट हे ‘It’s so good that it’s bad’ चं मूर्तिमंत उदाहरण आहेत. म्हणजे, तांत्रिकदृष्ट्या एकदम चकचकीत आहेत, पण ‘कंटेंट’ अतिशय वाईट. हे सिनेमे डॉ. राम रहीम सिंग इन्सान यांचं महिमामंडन करण्यासाठी तयार केले आहेत हे उघड आहे. तर या बाबाजींनी स्वतःचं डोंगराएवढं कौतुक करणारी गाणी लिहिली आहेत. उदाहरणार्थ, एका गाण्यात ते म्हणतात की माझी चाल सिंहासारखी आहे आणि ताकद हत्तीसारखी. आता बोला! हे तिन्ही चित्रपट सुपरहिट आहेत असा बाबांचा आणि अनुयायांचा दावा आहे. पण हे चित्रपट पाहिले आहेत, असा दावा करणारा एकही माणूस मला तरी भेटलेला नाही.

या धार्मिक संप्रदायांच्या चित्रपटांचं अर्थकारण कसं असेल, याच्याबद्दल मनात उत्सुकता होती. कारण या संप्रदायाच्या अनुयायी सोडून इतर प्रेक्षक हे चित्रपट पाहात असतील, याची शक्यता कमीच आहे. त्यात चित्रपट बनवणे ही महागडी कला आहे. मी या चित्रपटत्रयीमधला दुसरा भाग प्रदर्शित झाला होता, त्या वेळेस bookmyshowवर सहज चाळा म्हणून याचं बुकिंग चेक केलं होतं, तेव्हा चक्क थिएटर हाउसफुल होतं. तिसऱ्या भागाच्या वेळेस पुन्हा चेक केलं, तर थिएटर बऱ्यापैकी भरलं होतं. हा सिनेमा बघणार पब्लिक आहे, तरी कोण याचा उलगडा होत नव्हता.

माझ्या मित्रयादीत एक ज्येष्ठ समीक्षक आहेत. त्यांनाही या धार्मिक संप्रदायाचे चित्रपट आणि त्यांचे अर्थकारण यासंदर्भात माझ्यासारखेच प्रश्न पडले होते. त्यांनी हे ‘बिझनेस मॉडेल’ बऱ्यापैकी डिकोड केलं आहे. त्यांच्या मते, धार्मिक संप्रदायाचे अनुयायीच एकगठ्ठा तिकीट बुक करतात. त्यांनी थिएटरमध्ये याच प्रकारचा एक चित्रपट पाहताना त्यांना आलेले काही अनुभव सांगितले. हा चित्रपट चालू असताना काही लोक दीड तासानंतर आले, कुणीही कुठंही बसत होतं असं निरीक्षण त्या समीक्षकांनी नोंदवलं. मुख्य म्हणजे, ओळखीचे असल्याने एकमेकांशी ते प्रेक्षक सिनेमा सुरू असताना गप्पा मारत होते, याचे दोन फायदे आहेत. एक तर बाहेरच्या माणसाला ‘हाउसफुल’चा बोर्ड पाहून उत्सुकता वाटते, आणि आहे तरी काय भानगड बघुयात तरी म्हणून सिनेमाचे तिकिट काढतो. दुसरं म्हणजे, यातून बेहिशेबी काळ्या पैशाचं रूपांतर पांढऱ्या पैशात (?) करता येतं. मुख्य म्हणजे, हा खटाटोप आर्थिक फायद्यासाठी नाहीये, तर आपल्या गुरूंची किंवा संप्रदायाची प्रतिमा देशभरात ‘लार्जर दॅन लाइफ’ बनवण्यासाठी आहे. जेणेकरून, संप्रदायाला जास्तीत जास्त अनुयायी मिळावेत. हे संप्रदाय यासाठी डिजिटल माध्यमांचा पुरेपूर वापर करतात. त्यांच्या यूट्यूब चॅनलवर असणाऱ्या व्हिडिओखालच्या कॉमेंट पाहिल्या तरी हे किती नियोजनबद्ध आहे, हे कळतं. त्यांची मजा उडवणाऱ्या किंवा नापसंती असणाऱ्या कॉमेंट उडवल्या जातात आणि मोठ्या प्रमाणावर फेक अकाउंटवरून (जे लगेच कळतात) बाबांची स्तुतिसुमनं वाहणाऱ्या कॉमेंट्स ढीगभर असतात. थोडक्यात, भाऊ आपल्या व्यवस्थेची व्यवस्थित थट्टा उडवत आहेत. यात कायदेशीर काहीच चुका काढता येत नाहीत. पण नैतिकदृष्ट्या यात बरीच छिद्रं आहेत. ‘सब कुछ गलत है और कुछ गलत भी नहीं है.’

एकूणच धार्मिक संप्रदाय आणि त्यांचा प्रपोगंडा यांना भविष्यकाळात बरंच झेलावं लागणार आहे. डॉ. राम रहीम सिंग ‘इन्सान’ यांचा कित्ता गिरवत बाकीची बाबामंडळीही सिनेमानिर्मितीमध्ये उतरली तर आश्चर्य वाटायला नको! अर्थातच त्यांना असे सिनेमे बनवण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र सिनेमा खूप चालला आहे, असं दाखवण्याच्या खटपटीत त्या पंथाच्या अनुयायांना जे द्राविडी प्राणायाम करावे लागतात, ते केविलवाणे वाटतात इतकंच. असे फक्त आपल्याकडेच होते, असे नाही. ख्रिश्चन धर्माचा उदोउदो करणाऱ्या अनेक फिल्म्स हॉलिवूडने तयार केल्या आहेत. विशेषतः पन्नास आणि साठच्या दशकात अशा फिल्म्सचा पूर आला होता. ‘दुष्ट’ कम्युनिस्ट येऊन आपल्या धर्मावर घाला घालतील, अशी भीती अमेरिकन जनतेच्या मनात त्या काळात होती. त्याला या प्रकारच्या सिनेमांनी खतपाणीच घातलं. नंतरही असे अनेक सिनेमे बनले. एकट्या २००६ या वर्षात या थीमवर जगात तब्बल साठ फिल्म्स बनल्या. याला ‘ख्रिश्चन फिल्म इंडस्ट्री’ असं नाव आहे. गुगलवर उचकापाचक केली, तर या संदर्भातला बराच मालमसाला हाती लागेल. त्या तुलनेने मुस्लिमधर्मीय देशांमध्ये प्रपोगंडा फिल्म्स तयार करण्याचं प्रयत्न कमी दिसतं. मुस्लिम देशांमध्ये असलेला धर्माचा अति पगडा, वैचारिक मागासलेपणा, सर्व प्रकारच्या कलांवर असणारे निर्बंध याला कारणीभूत आहेत.

धर्म ही एक ‘कमाॅडिटी’ आहे हे एकदा मान्य केलं की, तो जास्तीत जास्त भाविक कम ग्राहकांपर्यंत पोहोचवणं ही त्या धर्मातल्या मुखंडांची जबाबदारी बनतेच. आणि त्यासाठी सिनेमापेक्षा अधिक योग्य माध्यम कोणतं असणार?

amoludgirkar@gmail.com
बातम्या आणखी आहेत...