आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोणचं सोहळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकाल कोरड्या पदार्थांसह लोणचं, चटण्याही ‘रेडी टू ईट’ उपलब्ध होतात. पण त्याला आईनं साग्रसंगीत केलेल्या, हुकमी चवीच्या लोणच्याची चव नाहीच...
जून महिना म्हणजे शाळेला सुरुवात. तसेच वह्या, पुस्तके, दप्तर, डबा, वॉटर बॅग, रेनकोट, छत्र्या, खरेदीचे दिवस. त्याबरोबरच लोणचं घालण्याचेही दिवस. त्यामुळे बाजारात ठिकठिकाणी हिरव्यागार कैऱ्यांचे नि बाजूला फोडींचे ढीग दिसतायत. ते बघून मला लहानपणीचा आमच्या घरातला लोणचं सोहळा आठवला.

वैशाख वणवा संपून ज्येष्ठातल्या सरी बरसल्या की, घराघरात लोणचं सोहळा सुरू व्हायचा. सुट्टीच्या दिवशी सगळं घर कामाला लागायचं. बाबा माळ्यावरचा कैऱ्या फोडायचा अडकित्ता काढून साफ करत. तर आई फडताळांतल्या आराम करणाऱ्या चिनी मातीच्या मोठ्या बरण्या बाहेर काढून स्वच्छ धुऊन त्यांना ऊन दाखवत असे. बाबांसोबत सायकलवर मी कैऱ्या आणायला जात असे. कैऱ्यांचे मोठमोठे ढीग पाहून मला मोठी गंमत वाटायची. बाबा दगडासारख्या टणक कैऱ्या सहा खडी मापाने पारखून घेत. म्हणजे सतरा कैऱ्यांची एक खडी. त्यावर सहा कैऱ्या फुकट यायच्या. ते माप आता बंद झालं. घरी आणलेल्या कैऱ्या टोपल्याच्या स्विमिंग टँकमध्ये मनसोक्त डुंबायच्या. मी त्यांच्या अंगावर पाणी उडवत, “मजा करून घ्या, तुमच्या मानेवर अडकित्ता बसणार बरं का!” असं म्हणून त्यांना दटावत असे. आई त्यांना कोरड्या कापडावर टाकून आम्हाला स्वच्छ पुसायला लावत असे. बाबा कैऱ्या फोडायला बसले की, आम्ही त्यातल्या कोयींचे तुकडे, टरफलं साफ करत असू.

आईचा कैऱ्यांचा हिशोब ठरलेला असायचा. शंभराचं लोणचं, बाकी शंभरात गुळंबा, मेथ्या घालून केलेला मेथांबा, तिळाची पूड व गूळ घालून केलेला साखबद्धा, तक्कू असे विविध प्रकार करायची. तसेच वर्षभरासाठी लागणारे तिखट, हळद, मीठ इ. ती घरीच करायची. लोणच्यासाठी लागणारा मसाला तिला तोंडपाठ होता. एका मोठ्या परातीत ती लालभडक तिखट, पिवळीचुटूक हळद, पांढरेशुभ्र मीठ, मिश्र चॉकलेटी मोहरीची डाळ असे रंगीबेरंगी आकर्षक ढीग प्रमाणात काढून घेत असे. या सगळ्या मिश्रणाचा एक वेगळाच रंग तयार होई. त्या मिश्रणात प्रथम दोन फोडी घोळवून आई देवासमोर ठेवायला लावी. “आंबामाय, घरातल्या अन्नाला बरकत दे, वर्षभर लोणचं टिकू दे”, अशी प्रार्थना करून जगदंबेचा जप करत बरण्यांत लोणचं भरत असे. त्यावर हिंग-मेथ्याचं तेल टाकून बरणीच्या तोंडाला घट्ट कापड बांधून माठाजवळ गारव्याला पाटावर या बरण्या वर्षभराचा मुक्काम ठोकायच्या. आईचं लोणचं कधी खराब झाल्याचं मला आठवत नाही. शेवटपर्यंत करकरीत चविष्ट लोणचं पुढचा ज्येष्ठ गाठत. या दरम्यान गल्लीत घरोघरी लोणच्याची लगबग असायची. आमच्या घरातल्या अडकित्त्याला या काळात फार मागणी असे. शेजारणी आईच्या मार्गदशनाखाली लोणचं घालायच्या. चव म्हणून घरोघरी वाटीत लोणच्याचा नमुना एकमेकांकडे द्यायची पद्धत होती. या लोणच्याला प्रेमाची, आपुलकीची, सगळ्यांच्या मेहनतीची एक अवीट गोडी असायची. आज लोणचं महोत्सवासारख्या अभिनव कल्पना आयोजित केल्या जातात; पण आईच्या हातच्या लोणच्याची चव आठवली की, आजही माझ्या चाहटळ जिभेला पाणी सुटतं.

anagha.karhade4@gmail.com
बातम्या आणखी आहेत...