आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Anuja Karnik In Rasik About Come Back Of Shilpa Shirodkar

उन्मादक शिल्पा, हळवी आई! ( पुनरागमन )

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलाकारांची ‘इमेज’ हे अनेकांसाठी वास्तव असतं. त्यामुळे ऐंशी-नव्वदच्या दशकातली शिल्पा शिरोडकरची बोल्ड इमेज, त्यानंतर लग्न करून तिचं अज्ञातवासात जाणं, अचानक ‘सिलसिला प्यार का’ नावाच्या सीिरअलमध्ये झळकणं, कोणाच्या ध्यानीमनी नसताना मराठी फिल्म निर्मिती करणं, सगळंच अनपेक्षित आणि तिच्याविषयी अजूनच उत्सुकता निर्माण करणारं आहे...

२० वर्षांपूर्वी आपल्या उन्मादक अदांनी तरुणांना वेड लावणारी शिल्पा शिरोडकर आता टेलिव्हिजनच्या विश्वात गळाबंद ब्लाऊज, भरजरी साड्या नेसणारी, किमती दागिन्यांनी मढलेली, आपल्या आवाजाची जरब दाखवणारी आई झालीय. तिच्या स्टार प्लसवरच्या ‘सिलसिला प्यार का’ या नव्या मालिकेच्या सेटवर गेल्यावर तिच्यामध्ये झालेला हा मेकओव्हर जाणवल्यावाचून राहात नाही. शूटिंगमधून जरा मोकळी होऊन गप्पा मारायला सुरुवात करताना शिल्पा, तिच्या या भूमिकांच्या मेकओव्हरबद्दल सांगू लागली, ‘बदल हा स्वाभाविक आहे. त्याच जुन्या भूमिकांमध्ये अडकणं तर शक्य नव्हतं. माझ्या वयाला शोभून दिसतील, अशाच भूमिका करायला मी नेहमीच प्राधान्य दिलंय. मी परतताना चित्रपट आणि टीव्ही ही दोन्ही माध्यमं बदलली. मीही प्रगल्भ झाले.’

अर्थात, चित्रपट आणि टीव्हीच्या चित्रीकरणात खूप फरक असतो. टीव्हीमध्ये १२-१५ तासांची मेहनत असते. पण शिल्पा हे सगळं एन्जॉय करते, ‘‘मला ठाऊक आहे की, इथे खूप ताण असतो. पण मी तणावाखाली काम करणंही एन्जॉय करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, इथे काम करताना तुमच्या अभिनयाचा खरा कस लागतो. प्रत्येक भागाला प्रेक्षकांचा प्रतिसाद येतो. त्यावरून तुम्हाला आपलं काय चुकतंय, हेसुद्धा कळतं.”

शिल्पा स्पष्टवक्ती आहे. आज आपल्या चित्रपटांना आपणहूनच हिट घोषित करणाऱ्या निर्मात्यांमध्ये शिल्पासारखी एखादीच. ती आपली फिल्म फ्लॉप असल्याचं जाहीरपणे मान्य करते. शिल्पा सांगते, ‘निर्माती म्हणून ‘सौ. शशी देवधर’ माझा पहिला मराठी चित्रपट, पण तो चालला नाही. माझ्यासारख्या नवोदित निर्मात्यासाठी ही गोष्ट खूप धक्का देणारी होती. त्यामुळे सध्या काही काळ निर्मितीक्षेत्रापासून विश्रांती घेऊन अभिनयात जम बसवायचा निर्णय घेतलाय. एक मात्र खरं; ‘सौ. शशी देवधर’मुळे मला एक धडा मिळाला की, जरी तुम्ही या फिल्म इंडस्ट्रीचे असलात तरीही तुमच्या मदतीला कोणी धावून येत नाही. ती फिल्म चांगली चालली असती, तर कदाचित मी मराठीत किंवा निर्मिती क्षेत्रात काही केलं असतं. पण चांगले सिनेमे चालतीलच, असं काही नाही.”

सध्या अक्षयकुमार, अजय देवगणसारखे हिंदीतले अनेक नट मराठी निर्मितीक्षेत्रात आलेत. पण शिल्पा, त्यांच्यात आणि आपल्यात जमीन-अस्मानाचा फरक असल्याचं सांगते, “अक्षयकुमार आणि अजय देवगण हे सध्याचे मोठे स्टार आहेत. त्यांच्या फिल्म बॉलीवूडमध्ये चालतात. त्यामुळे मराठीतही त्यांना चांगला पाठिंबा मिळतो. माझं मात्र अगदी उलट होतं. मी १३ वर्षांच्या विश्रांतीनंतर अगदी एखाद्या नवोदितासारखी परतले होते. एक बरं झालं की, या अपयशाने माणसं कळली. आता पहिल्यांदा स्वत:ला सिद्ध करणार, मग निर्मितीसंस्थेला.”

सध्या शिल्पा छोट्या पडद्यावर आणि खऱ्या आयुष्यातही आईच्या भूमिकेत शिरलीय. एका मुलीची आई असलेली शिल्पा आपल्या मुलीबद्दल सांगते, “आमच्या रणजीत घराण्यात ६७ वर्षांनी मुलीचा जन्म झाला. त्यामुळे अनुश्का घरात विशेष लाडाची आहे. तिच्या जन्मानंतर मितभाषी स्वभावाचे माझे सासू-सासरे चक्क छान खुललेले मी पाहिले. अनुश्का आता १२ वर्षांची झालीय. ती माझी ‘बेस्टेस्ट फ्रेंड’ आहे.”

शिल्पा आपल्या मुलीच्या संगोपनाबाबत खूप सजग असल्याचं तिच्या गप्पांवरून जाणवतं. ती सांगते, “मी शूटिंग करत असले तरीही, शाळा सुटल्यावर बसमध्ये बसल्यावर तिचा पहिला फोन मला असतो. तिच्या अभ्यासाची आणि दिवसभराच्या वेळापत्रकाची इत्थंभूत माहिती मला असते. अर्थात, मी मोकळ्या वातावरणात वाढलेय, त्यामुळे मुलीला विनाकारण बंधनं घालणं मला पसंत नाही.”

शिल्पाची आजी मीनाक्षी शिरोडकर या एकेकाळच्या गाजलेल्या अभिनेत्री. आता शिल्पानंतर तिची मुलगी ती परंपरा पुढे चालवणार का, असं विचारल्यावर शिल्पा सांगते, “ती अभिनेत्री झाली तर मला नक्कीच आवडेल. पण याविषयी आम्ही कधी चर्चा केली नाही. आम्ही तसंही घरात फिल्मविषयी खूप बोलत नाही. माझा नवरा बँकर आहे, आणि मी घरात गेल्यावर फक्त आई असते. एखाद्या आईसारखीच मुलीवर सतत लक्ष ठेवून असते. व्यवस्थित वागली नाही की ओरडते. आजकाल मात्र मी ओरडू लागले की, मलाच हसू येतं. कारण एकच गोष्ट तिला मी शंभर वेळा सांगितलेली असते. एरवी, तिच्या आजारपणांची मला खूप भीती वाटते. ती आजारी पडली की घाबरून माझी पोटदुखी चालू होते.”

शिल्पाची मुलगी मोठी होताना तिच्याकडून शिल्पा खूप शिकतेय. “तिने मला पाश्चात्त्य संगीताबाबत शिकवलं. ‘वन डिरेक्शन’ हा तिचा आवडता रॉक बँड आहे. तिला वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, सोनम कपूर खूप आवडतात. मी जसे सलमान खानचे सिनेमे आजही ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहते, तशी ती सोनमचे सिनेमे ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहते.”

karnikanuja@gmail.com