आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Ashok Pawar In Rasik Magazine In Divya Marathi

तेरी मंजिल यही ..!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कवितेसाठी, कलेसाठी अवघी जिंदगी खर्ची घातली जाते; पण त्यातून त्या कलाकाराचं, कवीचं आयुष्य व्यवहारी जगामध्ये कधीच सावरलं जात नाही. हा संघर्ष टिपायचा प्रयत्न केलाय प्रसिद्ध लेखक अशोक पवार यांनी. ‘बिराड’ या आपल्या आत्मकथनातून बेलदार जमातीची वेदना मांडणाऱ्या तसेच ‘दर कोस दर मुक्काम’सारख्या वा ‘पडझड’सारख्या पुस्तकांमधून वडार समाजाचा संघर्ष रेखाटून दलित साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या पवार यांचा या महिन्यातील हा अक्षरनामा...
हज चर्चेत माझे मित्र कांबळे यांनी एक छोटीशी गोष्ट सांगितली. सहज हसीमजाक करता करता सांगितली. त्यांना त्याचं काहीच वाटलं नाही आणि निघून गेले. या छाेट्याशा गोष्टीवर मी विचार करायला लागलो. जशा प्रकारचा विचार करू लागलो तशा प्रकारचं उत्तर मिळू लागलं. पण त्या प्रश्नार्थक चार शब्दांच्या गोष्टीचं उत्तर हेच आहे, असं मला सांगता आलं नाही. तुम्हाला त्याचं उत्तर सापडलं तर बघा. गोष्ट अशी आहे- एक प्रेतयात्रा घेऊन लोक स्मशानभूमीजवळ आले. त्या स्मशानभूमीच्या बाहेर एक बोर्ड होता, ‘यह है तेरी मंजिल’. मग या प्रेतांनी ते वाचलं. यार खरी हीच आपली मंजिल आहे, ही आपल्या घराच्या जवळच होती; मग हिला ढुंढण्यासाठी, शोधण्यासाठी अख्खी जिंदगी का बर्बाद केली? पूर्ण अायुष्यभर का शोधत राहिलो?’ गोष्ट संपली, प्रश्नार्थक चिन्ह देऊन... ते प्रश्नार्थक चिन्हच माझ्या काळजावर खोलपर्यंत रुजले गेलेले आहे.

माझ्या कवी मित्राची तब्येत चांगली नव्हती. चला त्यांना भेटून यावं, म्हणून बायकोला कल्पना दिली. एका काळात त्यांनी आपल्याला शेरपसाची मदत केलेली आहे. त्याच्या शेरपसाच्या हातभारामुळे माझे जीवन सुखी व समृद्घ झाले. तो लेखनावर प्रेम करणारा कवी अाहे, मग त्याला जातपात वा धर्माचं काहीच देेणंघेणं नाही. त्याच्या बुद्घीला कम्युनिष्ठतेचा स्पर्श झाला असल्यामुळे तो एका छोट्या गोष्टीची खूप मोठी खपली काढत बसायचा. स्वार्थाचा कोणताच गुण त्याच्याकडे नसला तरी तो माणसाला तीन-चार तास सोडायचा नाही. आपण अर्ध्यातच निघालो की तो आपल्यावर रागवायचा. त्याचा स्वभाव लोकांना माहीत झाल्यामुळे कोण आपला अमूल्य तीन तासांचा वेळ बोलण्यात घालवणार आहे? असा वेळ वाया घालवायला कोणाला डसलंय पिसाळलेलं कुत्रं? मग लोक त्याला टाळायला लागले. त्याला भेटायला जायचे नाहीत. या कवीला गप्पा झोडण्याची सवय होती. तो म्हातारा झाल्यामुळे त्याला बाहेर जाता येत नव्हतं, अन‌् तो बोलघेवडा असल्यामुळे लोक त्याला टाळायचे. त्याच्याकडे यायचे नाहीत. चुकून माझ्यासारखा एखादा आला की तो कवी त्याला दोन-चार तास डांबणार, त्याच्या मेंदूचा पार खिमा करणार. मलाही तो सात-आठ कविता नक्कीच प्रत्येक भेटीत एेकवतो. कवी चहा पाजून कविता ऐकवतात, असं लोक म्हणतात. पण हा तर बिना पाण्यानं आन‌् बिना चहानंच कविता एेकवतो. असं वाटतं की, पुन्हा भेटायला येऊ नये...मीही बोअर झालो की तीन-चार महिन्यांत एकदा त्याला भेटायला जातो. तीन-चार तासांचा वेळ काढूनच जातो म्हणा. मी गेलो की त्यांची मुलं-सुना हसतात. आता बाबाजीला जेवायचं भानच नाही राहणार, म्हणतात. अशोकभाऊ आले म्हणजे त्याईला देवच भेटला, म्हणतात. त्याचे तिन्ही पोर आलग आलग राहतात. तिघांच्या झोपड्या खेटूनच आहेत. कवी बुढा आणि त्याची बायको बुढी. प्रत्येक पोरात १०-१० दिवस जेवतात. त्याचे पोरं शिकले नाही. धुंद मस्तीत जगत राहिले. कवा कवा रंगात आला की कवी पाेचाडा काढतो. राजकारण्यांचे प्रसिद्घी करणारे पांपलेट यांनी जपून ठेवले. त्याची डायरी बनविली. एका बाजूनी कोऱ्या असणाऱ्या कागदावर तो कविता लिही.

त्याच्या कवितेला मागणी नसल्याने प्रकाशक त्या छापायला तयार नाहीत, हे सत्य सांगण्यापरीस माझ्याकडे इलाज नव्हता. त्या कवीच्या लोकल वर्तमानपत्रात सात-आठ कविता आलेल्या होत्या. त्याची कात्रणं त्यांनी व्यवस्थित वहीत चिकटवून ठेवली होती. ते भेटायला आलेल्या प्रत्येकाला दाखवायचं, फारच नाजूक हातानं त्याला हाताळायचं, त्याविषयी खूप काही सांगायचं आणि हळूच हातातून वही घेऊन पडक्या देवळीत पेपरात गुंडाळून वही ठेवायाचे. त्या वहीला ते जिवाजतन जपायचे...

असाच आठ-पंधरा िदवसांनी मी त्याला भेटायला त्याच्या घरी गेलो, तवा पोरं त्याला शिव्या देत होते. त्या अशा- ‘तुम्ही स्वत:ला खूप मोठा समजता, आम्हाला लाज वाटते तुम्हाला बाप म्हणायची. कवितेच्या नादाला लागून काय कमवीलं तुम्ही आयुष्यभर. लोकांच्याच हजामती करीत राहिले. बरोबर आम्हाला शिक्षणही देऊ शकले नाही.कवितेच्या काळ्या कागदांनी स्वत:चं कुटुंब बर्बाद केलं. अाईला राब राब राबविलं.’

‘पोरा मी तुम्हाला शिकविलं. काहीच कमी पडू दिलं नाही. पण तुम्ही शिकले नाही त्यात माझा दोष नाही. तुमचा दोष माझ्या माथी मारून कशाला मोकळे होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन वाचा, म्हणजे कळेल शिकलो असतो तर बरं झालं असतं. पश्चात्ताप होईल तुम्हाला शाळा न शिकून. आपण आपल्या पायावर फार मोठा धोंडा हानून घेतला असंच वाटेल...’ कवी समजावत म्हणाला.

‘तत्त्वज्ञानाची भाषा बंद करा. आता तुमचे तत्त्वज्ञान म्हणजे आम्हाला फुसका बार वाटतो.’

मी उगीच आलो वाटलं. त्यांचं भांडण मिटवामिटवी करून घरी आलो. समदी हकीकत बायकोला सांगितली. बायकोला त्याचं काहीच वाटलं नाही. ती हसायला लागली. मी तिला हसण्याचे कारण विचारले तवा म्हणाली, ‘आज त्याच्यावर पाळी अाली, उद्या आपल्यावर येणार आहे.’ ितचं बोलनं एेकून माझ्या काळजात चर्रर्र झालं. एक दिवस कवी बिचारा मेला. मला कळल्यावर मी तातडीने गेलो. त्याची मूठमाती करायाचा समदा खर्च मी माझ्यावर घेतला. कवीला नदीकाठी नेऊन जाळला. बरेच दिवस करमत नाही. मग सहज पोरांना भेटण्यासाठी एक दिवस त्याच्या घरी गेलो. बघतो तर काय, त्यांचा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा रद्दी जाळत होता. घरात गर्दी, घाण नको म्हणून त्या जाळात त्याची देवळीतली डायरी टाकलेली, अर्धीअधिक जळाली होती. त्या जळत्या डायरीकडे बघून मला माझे काळीज जळाले, असं वाटलं. मी परत फिरलो. नारायण सुर्वेंची कविता डोकशात घुमत होती -

कवितेएेवजी रद्दी विकली असती तर बरे झाले असते
निदान देणेकऱ्यांचे तगादे तरी चुकविता आले असते
असे झाले नाही आम्ही शब्दांतच इतके नादावलो, बहकलो
असे झाले असते तर कदाचित इमलेही बांधले असते.
लोकसेवकाच्या भूमिकेतच सारे जीवन अदा केले असते
अाडलेल्या हरेक याचकाने झुकून सलाम केले असते
फियाटच्या मऊ गादीत बसून वाऱ्यालाही गुलाम केले असते
जमलेच असते तर गावात चार कारखाने बांधले असते
आम्ही नसताे तर हे सूर्य, चंद्र, तारे बिचारे फिक्के फिक्के असते
बापहो! तुमच्या व्यथांना शब्दांत अमर कोणी केले असते
जन्ममरणाच्या प्रवासात आम्हाशिवाय सोबतीस कोणी असते
चला बरे झाले, आम्हालाच कवितेत खराब व्हायचे होते...

कवी मेला तेव्हा
त्याचे दुसऱ्या क्रमांकाचे पोर त्याची देवळीतली कवितांची डायरी
जाळत होते.
ते पाहून ‘कवितेऐवजी
रद्दी विकली असती तर
बरे झाले असते’ या नारायण सुर्वेंच्या कवितेची आठवण झाली.