प्रिय सॅन्टाभाऊ,
सप्रेम नमस्कार.
तसं ईसेस काई न्हाई. तुही लय आठवन आली म्हनुन ल्याहाले घेतलं. दर वर्सी डिसेंबरमंदी तू येतं. म्हनुन तुवं स्वागत कराचं ठरोलं. आम्ही हरेकाचं स्वागत करतो ना. आम्ही नव्या वर्साचं, नव्या नेत्याचं, नव्या सरकारचं, नव्या नवतीचं, नव्या लेकराचं, नव्या हंगामाचं आन् नव्या युतीचं... सा-यायचं आम्ही स्वागत करतो ना. थे आमची परंपराच हाये. म्हनुन तुवं बी स्वागत.
सॅन्टा भाऊ, तू हरसाल काई ना काई गिफ्ट घेऊन येतं ना. सारं जग इसरते. पन तू मातर कसा म्हनुन इसरत न्हाई. पक्का आठवनीचा हाय बा तू. आता तुले तर म्हाईतच हाय ना,
आपन माईक टायसन हावो म्हनुन. माईक टायसन म्हनजे, एकदा का आपल्या हाती माईक आला का आपन काई म्हनता थो सोडत न्हाई. तसा आता बी सोडनार न्हाई. कावुन का, तुले लय गोष्टी सांगायच्या हाये ना बावा. तू येतं वर्सातून यकदा. म्हनुन तुयाशी लयच बोलाचं हाय. तसी बी आपल्या आन् शेतक-याच्या जगन्याची सा-यायलेच अडगय हाये. आपली अडगय नको म्हनुन, शेतकरी आत्महत्या करत हाय. आता हे अडगय काई थ्या नेमाडेबावाजीसारकी समृद्ध गी म्हनतेत तसी न्हाई बावा. थो नेमाडे बावाजी हरसाल नेमानं एकच गोष्ट बरूबर येळ साधून सांगते. त्यातनी त्याचा हात कोनी धरत न्हाई. आता बी साहित्य संमेलन रिकामटेकड्या मानसायचा उद्योग हाय, हे सांगून त्यानं खयबय उडवून देल्ली. इंग्रजी शायाच बंद करा, असं बी त्यानं सांगटलं. मराठी साहित्यात म्हने, त्यापायी तरंग का वर्तुळ गी उठले व्हते म्हने. अर्थात, आपल्याले भासेचं ना काई वैर हाय, ना वावडं हाये. दर दहाबारा कोसावर भासा बदलते ना. भासा निदान दहाबारा कोसावर, तरी बदलते. पन मानसं, थे तर दहा हातावरच बदलते ना बावा. पन थ्या इसयी कोनीच काई बोलत न्हाई...
एखाद्या भासनात हिंदी, मराठी दोन्ही बी लोक रायते. अस्यायेळी दोन्ही भासेत थोडं थोडं बोला लागते ना. म्हनुन म्या बी वऱ्हाडी आन् मराठीत लिवनार हावो. आपन रायतोच वऱ्हाडात ना. अठी हिंदी, मराठी आणि विंग्रजी, वऱ्हाडी सा-याच भासा बोलते ना लोक. आपल्याले सारा जांगडबुत्ता ज्यमवा लागते ना. शेतकरी आत्महत्या म्हनलं का सरकार पॅकेज देऊन टाकते. हे पॅकेज देन्याची सरकारी प्रथाच पडते, का मालूम न्हाई. पॅकेज म्हनजे, ‘फोड गांडीले अन् मलम मांडीले’, असी गत हाये. पन कोनी समजून घ्यायलेच तयार न्हाई... पन ते बी राह्यलं...
*****
तर सॅन्टा, मागचे वर्ष तसे फारसे चांगले नाही गेले. खूप वाईट गेले असे मी म्हणणार नाही. कारण लोकांची वाईटातले वाईट सहन करण्याची व त्याला सामोरे जाण्याची शक्ती वाढली आहे. माणूस सा-या संवेदनाच हरवून बसला आहे. काही दिवसांनी माणसाचा यंत्रमानव झाल्याचे तुला पाहावे लागले, तर नवल नाही. कदाचित, कॉम्प्युटर गाणे वाजवतो आहे व यंत्रमानव ते ऐकत आहे, असेही चित्र असू शकते. असो, हे थोडे विषयांतर झाले; माफ कर. (अडचणीच्या वेळी विषयांतर करणे ही आमची जुनी सवय आहे, हे लक्षात घे.) काळ सापेक्ष असतो, पण काळाला सापेक्षतावादाचा सिद्धांत लावणारी माणसे सापेक्ष नसतात. या माणसांचे राग-लोभ, सुख, दु:ख, ईर्षा, प्रेम काहीच सापेक्ष नसते. कुठल्या गळ्यावरून सुरी फिरवावी आणि कोणत्या गालावरून मोरपीस फिरवावे, हे सापेक्ष काळाच्या उदरात दडलेल्या पाऊलखुणांवरून ठरते. तुझ्यासोबत या पाऊलखुणा नसोत. म्हणून तुझे स्वागत.
पुरोगामी महाराष्ट्राला तडे देणा-या अनेक घटना सरत्या वर्षात घडल्या. खाप पंचायतींपेक्षाही भयंकर असणा-या जातपंचायतींनी माणुसकीला मातीत गाडण्याचा चंगच बांधला आहे. दलितांवरील अत्याचार वाढत आहेत-
अरे ही पाटी कसली ‘पाणपोई सर्व जातिधर्मांना खुली’
म्हणजे माणसामाणसांत का होत्या उच्चनीच उतरंडी!
छान केले, असले शहर मातीत गाडण्याच्या लायकीचे
कसले हे यंत्रयुग, विसाव्या शतकात दर्शन अश्मयुगाचे!
*****
प्रिय सॅन्टा,
दया पवारांनी ‘शहर’, नावाच्या कवितेत दाखवलेली परिस्थिती जराही बदललेली नाही. आजही एकविसाव्या शतकात अश्मयुगाचेच दर्शन होत आहे आणि असली शहरे पुन्हा मातीत गाडावी, असे तीव्रपणे वाटायला लागले आहे. आमच्या प्रल्हाद चेंदवणकरने यावर उपाय सांगितला आहे
अजूनही संधी आहे
चूकभूल विसरून जाऊ
तुमच्या पापांची एक्सेस बॅलन्स
रिटर्न ऑफ करून घेऊ;
तुम्ही फक्त एवढंच करा
माणसांसारखे वागत चला
तेही जमलं नाहीच तर,
दिवाळखोरी जाहीर करा
दिवाळखोरी जाहीर करण्यापेक्षा माणसांना माणसांसारखे वागण्याची बुद्धी देईल, असे एखादे खेळणे तू आणावेस म्हणून तुझे स्वागत.
सरत्या वर्षात राजकारणाच्या सारीपाटावर प्याद्यांची अदलाबदल झाली. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्राचे सरकार आले. नव्या बदलाचे वारे वाहायला लागले. तर इकडे चित्रपटाच्या पडद्यावरील सदाशिव अमरापूरकर, स्मिता तळवलकर, नयनतारा, देवेन वर्मा हे तारे निखळले. सितारा देवीची लयदार गिरकी घेणारी पावले कायमची विसावली. तर महाराष्ट्राला ख-या अर्थाने गतिमान प्रशासन देणारे बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले अल्लाला प्यारे झाले. येणा-या वर्षात जगणे सांधणारे आणि माणुसकी फुलवणारे गिफ्ट घेऊन तू ये.
प्रिय सॅन्टा,
आम्हाला तुझ्याबद्दल काळजी वाटते आणि तितकीच अनामिक ओढही. काळाची भीती बाळगण्याचे तसे माणसाला आता काही कारण नाही. अशा अनेक भीषण काळाला सामोरे जाऊन माणूस नावाचा प्राणी अजूनही अस्तित्व राखून आहे. दोन महायुद्धांच्या आगीत होरपळूनही तिस-या महायुद्धाची मनीषा करणारे काही िवध्वंसक मानवी पशू आमच्यात वावरत आहेत. या पशूंची मनोकामना िवफल करणारे एखादे यंत्र येताना सोबत घेऊन ये.
महायुद्धाच्या वर्षाचेही स्वागत इथल्या माणसांनी केले नि युद्धाच्या राखेतून ती फीनिक्ससारखी उभी राहिली. पण अलीकडे माणसाला आपण माणूस आहोत, याचाही विसर पडत चालला आहे. राजकारण्यांचे सोडून दे, त्यांची कातडी गेंड्याची असते. सामान्य माणसाचे तसे नसते. म्हणून त्यांच्या उभारीच्या साफल्याविषयी मी साशंक आहे. अलीकडे माणूस म्हणजे, स्वत:च्या स्वार्थासाठी तयार झालेला एक रबरी चेंडू झालेला आहे. काळाने कुठल्याही उंचीवरून फेकले तरी उतारावरून खाली गडगडत येण्याशिवाय त्याला पर्याय नाही.
सॅन्टा,
माणुसकीचे एकही वर्ष आम्ही आजपर्यंत साजरे केले नाही. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री कुठल्याही घराच्या खिडकीतून माणसाचे हृदय असलेले एकही खेळणे तू कधी िदलेले नाहीस. कारण मोठ्या माणसांनाच असे खेळणे अजून गवसलेले नाही. हृदयाच्या थोडे वर आणि आत्म्याच्या थोडे खाली जे एक चिरंतन मानवी सत्य आहे, ते अलीकडच्या एकाही वर्षाच्या मध्यरात्री कुठल्याच माणसाला दिसलेले नाही. असे सत्य गवसलेला एक तरी माणूस तू आम्हाला दे. मग यानंतर कुठलेही भयंकर वा प्रलयंकारी वर्ष येऊ दे, आम्ही त्याचेही स्वागतच करू. तसे तुझेही स्वागत!
pethkaratul09@gmail.com