आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईचा आग्रह मला उमगलाच नाही...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझा मूळचा स्वभाव हा माफ करण्याचा आहे. त्यामुळे आपल्यामुळे कोणी दुखावलं गेलं, तर त्याला माफ करायचं, आपल्यालाही माफ करायचं आणि पुढं जायचं, अशी साधारणपणे माझ्या जगण्याची पद्धत आहे. त्यामुळे पुन्हा त्यासाठी देवाच्या दारात जाऊन कन्फेशन द्यावं, असं काही मला वाटत नाही. जिथे ते द्यावं असं वाटतं, ते इतकं वैयक्तिक आहे, तीव्र स्वरूपाचं आहे की, त्याची देवापुढेच काय स्वतःपुढेही कबुली द्यायची मला भीती वाटते. त्यासाठी प्रचंड आंतरिक बळ लागतं, ते सध्या तरी माझ्यात नाही.

याचा अर्थ असा नाही की, माझ्या हातून माफी मागण्यासारख्या चुका घडल्याच नाहीत. कसं असतं, आपल्या जे जास्त जवळ असतात त्यांचीच मनं आपल्याकडून कळत-नकळत जास्त दुखावली जात असतात. त्यातही ज्यांचं आपल्यावर खूप प्रेम असतं, त्यांचं मन समजून न घेता आल्यानं अशा गोष्टी घडतात. माझ्या आईबाबत असं घडलेलं आहे. तिचं हे प्रेम जेवणातून जास्त झिरपायचं. मला जेवण्यासाठी आग्रह करणे, हे तिच्या खास आवडीचं काम. आपल्या मुलानं चांगलं जेवावं, असाच त्यामागचा उद्देश असला तरी ती ‘जेव रे बाबा, घे आणखी थोडं’, असं सारखं टोकत राहायची, ते फार त्रासदायक वाटायचं मला. त्यामुळे मी जेवण करताना, ती मला समोरच नको असायची. व्हायचं काय की, मी वेगळ्या विचारात असायचो, आणि त्यात जेवणाकडे कायमच दुर्लक्ष व्हायचं. अशात तिचा हा आग्रह अधिकच चीड आणायचा. एकदा असंच मी जेवत असताना तिला बाहेरच बसायला सांगितलं आणि मी बकाबका घास गिळत जेवू लागलो. जेवण होईपर्यंत तिनं आपली उबळ कशीबशी दाबून धरली, पण मी हात धुवायला गेलो तेव्हा मात्र न बोलताच फक्त नजरेनंच, एवढ्यातच झालं होय जेवण, अशी मूक विचारणा तिनं केली. ते बघताच माझा राग अनावर झाला आणि हातातलं खरकटं ताट मी तसंच तिच्याकडे भिरकावलं. माझी चूक झाली, हे तेव्हा मला कळलं नाही. पण नंतरच्या काळात जेव्हा मी स्वतः एका मुलाचा बाप झालो, तेव्हा मात्र मुलाला जेवण्यासाठी आग्रह धरताना मला आईच्या आग्रहामागचं प्रेम व काळजी कळू लागली. कारण आता माझा मुलगाही कधी कधी माझ्यावर चिडत असतो. त्यामुळे मला ती गोष्ट आता प्रकर्षाने जाणवते.

आई आता या जगात नाही. पण तिचा तो आग्रह आणि माझी चीड, याची सांगड मला आत्ताही अधनंमधनं छळत असते. मी तिची माफी मागू शकलो नाही, ही गोष्ट मात्र अनेकदा डाचत असते. त्यामुळे मी मात्र एक शिकलोय की, आपले लोक जे वागतात त्याचा कितीही त्रास होत असला तरी त्यामागचं त्यांचं प्रेम आठवून त्याकडे दुर्लक्ष करायला आपण शिकायला हवं. नाही तर नात्यांची वीण विस्कटण्याची भीती कायम राहते.

दुसरी एक गोष्ट मला आठवते. लहान असताना आम्ही पोरं गुलेलनं दगडं मारून निशाणा साधण्याचा सराव करायचो. कधी एखाद्या चिमणीला मार, कधी आंबेच पाड, कधी एखाद्या गुराढोरांच्या कळपावर दगड फेक, असं ते चालायचं. एकदा असेच आम्ही दगड मारत चाललो होतो, तर दूर आमचाच एक मित्र जाताना दिसला. त्यानं त्या वेळी काही कारणानं टक्कल केलं होतं आणि उन्हात ते चांगलंच चमकत होतं. आमच्यातल्या एका मुलानं मग म्हटलं की, त्याच्या टकलाला जो दगड मारेल, तो खरा नेमबाज. तो मुलगा चालत होता आणि अशा चालत्या निशाणावर नेम साधणं ही अवघडच बाब होती. मी ते आव्हान स्वीकारलं. माझा नेम चांगला असल्यानं, मला थोडी ‘ग’ची बाधा झाली होतीच. मी गुलेल घेतली, त्यात दगड ठेवला आणि बरोब्बर नेम साधत त्या पोराच्या टकलावर हाणला. त्याचं डोकं फुटलं आणि रक्त वाहू लागलं. तशी बाकी पोरं लगोलग आपापल्या घरी पसार झाली, पण मी घरी गेलो नाही. एका देवळात जाऊन लपून बसलो, ते थेट रात्रीच घरी परतलो. पण माझा हा पराक्रम माहीत असल्यानं आणि त्यात न सांगता मी बाहेरच राहिल्यानं घरच्यांना राग होताच, पण काळजीही होतीच. मला पाहिल्यावर त्यांनी मला बेदम मार दिला. नंतर मी कधीही कोणावर नेमबाजीचे प्रयोग केले नाहीत. मला आता वाटतं की, केवळ माझ्यात एखादं कौशल्य आहे, म्हणून मी कोणाचं नुकसान करण्याचा अधिकार मला मिळत नाही. कोणी आपल्याला हिणवलं तरी चालेल, पण कोणी म्हणतंय म्हणून काही करण्याआधी त्याचे परिणाम काय होतील, याचा सारासार विचार करूनच आपण वागायला पाहिजे. माझ्या पुढच्या आयुष्यात हा धडा मी कधी विसरलो नाही व माझ्या जगण्यात त्याचा फायद्याच झाला.

(भगवान रामपुरे नामवंत शिल्पकार आहेत.)
rampurearts@yahoo.in
शब्दांकन : प्रतीक पुरी