आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मी माझा’चे ‘मर्म’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंद्रशेखर गोखले उर्फ ‘चंगो’ यांचा ‘मी माझा’ हा केवळ चारोळ्यासंग्रह नव्हता; तर जमिनीवरून दोन फूट वर तरंगत चालणा-या नवतरुण पिढीच्या प्रेमाचं, सृजनाचं तो एक प्रतीक होता. भावूक नि प्रेमविव्हळ मनांचा आधार बनलेल्या या संग्रहाच्या प्रकाशनाला २५ वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त चारोळ्यांची ही जन्मकथा...
जपाच्या माळेचं बरं असतं, त्यात एक मेरूमणी असतो; त्यामुळे आवर्तनाची सुरुवात धरता येते. पण आठवणींचं तसं होत नाही. आवर्तनाच्या मागे आवर्तनं सुरू राहतात; पण नेमकी सुरुवात धरता येत नाही. माझं पण या क्षणी असंच झालंय. ‘मी माझा’ ते ‘मर्म’विषयी बोलायचं तर मध्ये पंचवीस वर्षांचा काळ येतो. पण ‘मी माझा’ची सुरुवात तर त्याहून खूप आधी सुरू झाली होती. नेमकी सुरुवात धरायची तर एक आठवण आहे, जी आता अधिकाधिक ठळकच होत चालली आहे...
सन सनावळी आठवत नाही; पण तेव्हा माझी ओळख गोखल्यांचा शेखर इतकीच होती आणि माहिती म्हणाल, तर तो आता घरात राहात नाही, इतकीच होती. तो काय करतो, याच्याशी कुणाचं देणं घेणं नव्हतं. पण त्या काळात स्वामीकृपेने एक फार छान गोष्ट घडली ती म्हणजे, तेंडुलकर परिवाराशी मी तेंडुलकर आईमुळे बांधला गेलो... इतका की, माझं येणं जाणं सोडा; माझं खाणं-पिणंही बरेचदा आईच बघायला लागली. ते घर असं होतं की, जिथे आपली तहान-भूक सांगावी लागायची नाही. बाबांचा तर मी लाडका होतोच; पण प्रिया दीदीचाही मी लाडकाच होतो.
मी घराबाहेर राहतो... याचं तिला भारी अप्रूप वाटायचं आणि काळजीसुद्धा. कारण माझ्यासारखा शामळू मुलगा सहज कुठल्या वाईट संगतीत फसू शकतो, असं तिला वाटायचं. तिने प्रत्यक्ष मला कधी त्याबद्दल छेडलं नाही; पण बसल्या बसल्या ती सहज माझी झोळी चेक करायची. त्यावरून तिला अंदाज यायचा, हे तिनेच मला नंतर सांगितलं होतं... आणि एक दिवस तो क्षण आला... चाहूल लागू न देता जसा मागचा क्षण आला, तसाच तोही क्षण पुढे सरकला, ज्या क्षणाने मला ओळख मिळवून द्यायचं ठरवलं होतं...
त्या दिवशी दीदी मला तिच्या गाडीने वरळीनाक्याला ड्राप करणार होती, म्हणून सांगितल्या वेळी हजर झालो. खांद्याला झोळी होतीच. सवयीने तिने माझी झोळी सहज ओढून घेतली. पण त्या दिवशी काय योग होता बघा, कायम कडीकुलपात बंद असलेली माझी कवितांची वही त्या दिवशी झोळीत माझ्या नकळत जणू टुण्ण्कन उडी मारून बसली होती, ती प्रिया दीदीच्या हाताला लागली...

पाण्याचं वागणं
किती विसंगत
पोहणा-याला बुडवून
प्रेताला ठेवतं तरंगत
तुला वजा केल्यावर
बाकी काही उरत नाही
तुझ्याशिवाय आयुष्य मी
आयुष्यच धरत नाही....
अशा कविता नजरेखालून गेल्यावर तिचे डोळे विस्फारले. तिने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. तो कटाक्ष म्हणजे, माझ्या पुढच्या अनोख्या प्रवासाची नांदी होती. माझ्याशी एकही शब्द न बोलता तिने फोन ताब्यात घेतला, आणि भराभर फोन फिरवत माझ्या कविता ऐकवायला तिने सुरुवात केली.
लगेच राजूला (तेंडुलकर) माझ्यासोबत पाठवून तिने तेव्हाच्या लोकप्रिय साप्ताहिकात माझी पाठवणी केली. तिथे मी चंद्रशेखर गोखले म्हणून गेलो नव्हतो; तर प्रिया तेंडुलकरने पाठवलेला मुलगा, ही माझी ओळ्ख होती. पण त्यामुळेच मी त्यांच्या कार्यालयात उभा राहू शकलो.
उमलणं आणि फुलणं
यात बरच अंतर आहे
उमलणं अगदी स्वाभाविक आहे
फुलणं त्या नंतर आहे...
नामवंत साप्ताहिकात जशा माझ्या चार ओळींच्या कविता छापून यायला लागल्या, तशी माझी ओळख व्यापक होत गेली. ब-याचशा पेपर स्टाॅलवर साप्ताहिकातलं माझ्या कवितेचं पान कापून छान पुठ्ठ्यावर चिकटवून लटकवलेलं असायचं. मग रसिकांनी आग्रह धरला, हा कवी दिसतो कसा बघायचंय... म्हणून एका साप्ताहिकाने माझ्या कविता माझ्या फोटोसकट छापायला सुरुवात केली. तेव्हाच ठरवलं की, कधी काव्यसंग्रह प्रसिद्ध केलाच तर मुखपृष्ठावर माझाच फोटो असेल. पण सांगितलं तर खोटं वाटेल, इतक्या कविता लोकप्रिय होऊनही सहा प्रकाशकांनी
माझा काव्यसंग्रह काढायचं नाकारलं. एक प्रसंग सांगतो... शाळेत असताना अभ्यासात ढ... व्यवहारज्ञान शून्य. दिसायला उंंचापुरा, धडधाकट; पण बाकी कर्तबगारी झिरो. त्यात आपल्याकडे लोकांना एक वाईट खोड आहे, ज्यांचा मुलगा काही करत नाही त्यांनाच जाऊन विचारतात, तुमचा मुलगा करतो काय? या प्रश्नाने माझ्या वडलांचं डोकं भणभणायचं. तर एकदा अशाच तिरमिरीत ते मला बखोटीला धरून मार्केटात घेऊन गेले. तिथे राम मंदिरसमोर अण्णा साठ्यांचं संपन्न असं किराणामालाचं दुकान होतं. अण्णा साठे खूप साधे सज्जन व्यक्तिमत्त्व. त्यांच्या दुकानात माझ्यासारख्या निखट्टू मुलांना नोकरी मिळायची. भागवत, केतकर, बर्वे, कर्वे, बापट, जोशी, चितळे, कान्हेरे अशा घरातली मुलं बाह्यांचा बनियन आणि खाकी हाफ
चड्डी घालून कामाला असायची. दादांना मला त्या कंपूत पाठवायचं होतं, किंवा निदान हे काम तरी जमतंय का, हे त्यांना बघायचं होतं. मला माझा वकूब माहीत होता. या दुकानात उभा राहून पुड्या बांधण्यात मी रमणार नाही, याची मला कल्पना होती. पण मला बोलायचा अधिकार नव्हता...
दादांची चूक नव्हती आणि माझ्या नशिबात तो दिवस लिहिलेला होता. पण त्या क्षणी मला माहीत नव्हतं की, ज्याने मला हा दिवस दाखवला तो आणखी एक दिवस दाखवणार आहे, फक्त त्याला काही काळ जाणं गरजेचं होतं. माईच्या साहाय्याने ‘मी माझा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि माझं आयुष्यच बदललं. जसा खप वाढला, तसं नावाभोवती वलय यायला
लागलं. तुम्ही यशस्वी झालात, हे मुद्दाम तुम्हाला कोण सांगायला येत नाही; पण लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. मी हे सगळं अनुभवत असताना परमेश्वराने ठरवलेला तो दिवस आला. अंधेरीला एका शाळेत मी त्यांच्या वार्षिक समारंभाला प्रमुख पाहुणा म्हणून हजर होतो आणि माननीय अण्णा साठे त्याच व्यासपीठावर शाळेचे प्रमुख विश्वस्त म्हणून बसले होते. त्यांच्या हातूनच माझा सत्कार झाला...
अशा अनुभवांनी मला आयुष्यात कायम चकित करून सोडलं... मुळात मी कवी होतोच, त्यात कवितेसोबत कथाही आकार घ्यायला लागल्या. गेल्या पंचवीस वर्षांत माझे पाच काव्यसंग्रह आले. ‘मर्म’ हा कथासंग्रह या वर्षी प्रकाशित झाला... पण या सगळ्याची सुरुवात ‘मी माझा’पासून झाली. आणि ‘मी माझा’ची सुरुवात? मला सुचण्यापासून...
बाकी मुलं शिस्तीत बसून वाचायची, आणि प्रश्नपत्रिकेत पुस्तकात वाचलेलं लिहायची. मी मात्र सुचलेलं लिहिण्यात रमायचो... पण सुचलेलं
लिहिण्याला मार्क्स मिळत नाहीत, रिमार्क्स मिळतात. त्याने खूपदा गांगरून जायला होतं. आपली जडणघडणच बदलते. माझ्यासारखी मुलं आपली जडणघडण बदलायला तयार होत नाहीत. मग त्यांची घरं सुटतात. नाती तुटतात. गावं बदलतात. पत्ते बदलतात. पण ओळख?... ती लख्ख होत
जाते. ते समाधान काही औरच असतं. जे मी सध्या तुमच्या कौतुकामुळे अनुभवतोय... मनापासून तुम्हाला ‘जुग जुग जियो’ म्हणावंसं वाटतंय...
या पंचवीस वर्षांचं मर्म विचाराल तर इतकंच आहे-
काही हवं असणं म्हणजेच
आपलं जगणं आहे
येणा-या प्रत्येक क्षणाकडे
आपलं काही मागणं आहे...
- शब्दांकन:पीयूष नाशिककर
बातम्या आणखी आहेत...