आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Dattaprasad Dabholkar About Babasaheb Purandare And Jitendra Avhad In Rasik

बाबासाहेब पुरंदरे, जितेंद्र आव्हाड आणि आपण (रसिक विशेष)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाबासाहेब पुरंदरे आणि जितेंद्र आव्हाड या दोन व्यक्ती किंवा प्रवृत्ती आपणासमोर येतात. व्यक्ती आणि कार्य म्हणून दोघांचेही योगदान मोठे आहे, हे आपणाला माहीत असते. आपल्या दृष्टीने हा बरोबर की तो बरोबर, कोणाच्या बाजूने राहिलो तर या क्षणी देशाच्या दृष्टीने अधिक योग्य, याचा आपण विचार करत राहतो आणि नकळत आपला मार्ग बदलून आपण वेड्यासारखे कात्रजच्या घाटात भटकत राहतो, असे काही होत आहे का?

बाबासाहेब पुरंदरे आणि जितेंद्र आव्हाड ही दोन्ही नावे आपण विसरून गेलो तरी चालेल. कारण वेगवेगळी नावे घेऊन या दोन प्रवृत्ती आता झपाट्याने पुन:पुन्हा आपणासमोर येणारेत. यातील आपण म्हणजे या देशातील सर्वधर्म समभाव मानणाऱ्या लोकशाहीवर प्रेम करणारी माणसे. सर्वधर्म समभाव मानणारी लोकशाही ही मानवी संस्कृतीतील फार मोलाची गोष्ट आहे, हे आपण मानतो. त्याचवेळी आपणाला आणखीही एका गोष्टीचे भान असते. हा खंडप्राय देश, जो धर्म, जात, भाषा, पोशाख, आहार यात विविध रंगांनी नटलेला आहे, असाच अखंड ठेवायचा असेल, त्याला प्रगती पथावर ठेवायचा असेल, तर दुसरा कोणताही पर्याय आपणासमोर नाही.

नवे पर्याय शोधले जाताहेत, राबवले जातहेत, आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम करतो, ती सर्वधर्म समभाव मानणारी आणि प्रत्यक्षात आणणारी रचना उद्ध्वस्त होत आहे. हे कळत-नकळत जाणवत असल्याने आपण अस्वस्थ असतो. अशा वेळी बाबासाहेब पुरंदरे आणि जितेंद्र आव्हाड या दोन व्यक्ती किंवा प्रवृत्ती आपणासमोर येतात. व्यक्ती आणि कार्य म्हणून दोघांचेही योगदान मोठे आहे, हे आपणाला माहित असते. आपल्या दृष्टीने हा बरोबर, की तो बरोबर, कोणाच्या बाजूने राहिलो, तर या क्षणी देशाच्या दृष्टीने अधिक योग्य याचा आपण विचार करत राहतो आणि नकळत आपला मार्ग बदलून आपण वेड्यासारखे कात्रजच्या घाटात भटकत राहतो, असे काही होत आहे का?
बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण मिळाले. त्यावेळी मला खूप वाईट वाटले. पण त्यात काही चूक वाटले नाही. राजवट कोणाचीही असो. कम्युनिस्ट, समाजवादी, ब.स.प. किंवा आणखी कुणाचीही, त्यांच्या विचारधारेच्या लोकांना झुकते माप मिळणार हे अगदी उघड असते. साहित्यसंस्कृती मंडळापासून, दिल्लीचे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ स्थापन करताना, सर्वत्र हे झालय हे आपण पाहिलय आणि स्वीकारलय. गजेंद्रसिंग चौहान यांच्यापेक्षा त्या कामाला खूप अधिक योग्य असलेली माणसे आहेत, हे खरे. पण हाच आवाज डॉ. मोहन आगाशे फिल्म इन्स्टिट्यूटचे प्रमुख झाले त्यावेळी उठला नाही. डॉ. मोहन आगाशेंचे इतर क्षेत्रातले कर्तृत्व फार मोठे आहे. त्यांच्या कार्याला व व्यक्तीमत्वाला कमीपणा आणण्यासाठी हे सांगत नाही. पण चौहान यांनी फक्त एका मालिकेत एक भूमिका ताकदीने केली आहे. नंतर दुय्यमदर्जाच्या सिनेमात दुय्यम भूमिका केल्या आहेत, असा आरडा-ओरडा करायचा. मात्र घाशीराममधील नाना सोडून डॉ. आगाशेंच्या जमेच्या बाजूला पण काही किंवा फारसे काही नाही हे विसरून जायचे असे काही होते आहे.

ते असो. पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण मिळाले यात चूक काही नाही. ते अतिशय प्रभावी पद्धतीने पण पूर्णपणे चुकीच्या किंवा विकृत पद्धतीने अनेक काळ शिवाजी महाराज सांगत होते. त्यांनी हिंदू-मुसलमान तेढ वाढविण्यासाठी शिवाजी महाराज कल्पकतेने वापरले आणि त्याचवेळी शिवाजी महाराजांना मुसलमानांच्या घरातून आणि मुसलमान मुलांच्या मनातून बाहेर काढले. त्यावेळी सर्वधर्मसमभाव मानणारे आपण ही गोष्ट गांसू शकलो नाही. शिवाजी महाराजांना सर्वाधिक त्रास, खानदानी मराठे, ब्राह्मण आणि मुसलमान यांनी दिला आणि त्यांना सर्वाधिक मदतपण खानदानी मराठे, ब्राह्मण आणि मुसलमान यांनी केली. लढाई जाती धर्माची नव्हतीच. ती लढाई चांगले राज्य-वाईट राज्य, सुशासन-कुशासन यातील होती.

जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेबांच्या इितहासाच्या मांडणीला विरोध केला. मात्र ही मांडणी त्यांनी शिवाजी महाराजांचा उपयोग ब्राह्मण, ब्राह्मणेत्तर तेढ वाढविण्यासाठी करणाऱ्या संघटनांच्या व्यासपीठावरून केला. तसे नसेल तर त्या भाषणात त्यांनी हिंदू-मुसलमान, ब्राह्मण-ब्राम्हणेत्तर तेढ किंवा खुन्नस वाढविण्यासाठी ज्या संघटना वा ज्या विचारधारा प्रयत्न करताहेत. तशा स्वरूपाचे साहित्य प्रसिद्ध करताहेत, तशी भाषण देताहेत त्या सर्वांचा निषेध करतोय असे म्हणायला हवे होते.

तसे त्यांनी म्हटले नाही, ते तसे बरेच. नाहीतर कदाचित त्यांच्यावर एकाऐवजी दोन हल्ले झाले असते. कारण राडा, खळ्ळखटाक, सातारी झटका, आमच्या पद्धतीने हे आपल्या लोकशाहीत परवलीचे शब्द झाले आहेत आणि आमच्या पद्धतीने याचा साधा अर्थ तुमची लोकशाही मोडीत काढून ठोकशाहीने असा होतो. आपण लोकशाही मानणाऱ्या लोकांनी कधीही लोकशाहीच्या शांततामय मार्गानी या प्रवृत्तीच्या विरुद्ध रस्त्यावर उतरण्याचे धैर्य दाखवले नाही- धैर्य राहू दे तसा विचारही केला नाही. खरतर या प्रवृत्तींचा नायनाट करण्याचे काम लोकशाहीच्या मार्गाने राज्यावर आलेल्यांची असते. पण अडचण अशी, की राज्यकर्ते यांच्याच मदतीने राज्यावर आलेले असतात. त्यामुळे शरद पवार, जितेंद्र आव्हाडांच्याबददल मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवतात तेव्हा आपण अधिक अगतीक होतो. भांडारकर संस्थेवर हल्ला झाला त्यावेळी आपण काही बोललात का? काही केलात का? हे विचारायचे पण आपणाला धैर्य होत नाही.

असे आपण सर्वत्र करतोय आणि करत आलोय. ‘गो वंश हत्या बंदी’ कायदा झाला त्यावेळी आपण फक्त अस्वस्थ झालो. पण त्याचे एकूण भयावह परिणाम आपल्या लक्षात आले नाहीत किंवा लक्षात येऊनही आपण ते सांगितले नाहीत. खर तर भूमीअधिग्रहण कायद्याप्रमाणेच ‘गो वंश हत्या बंदी’ कायदा शेतकऱ्यांच्यावर अन्याय करणारा आहे. भाकड गाय किंवा बैल तो खाटकाला विकतो. त्यावेळी त्याला काही हजार रुपये मिळतात. पांजरपोळात सरकार काही पैसे देऊन त्यांना विकत घेत नाही. या कायद्याविरुद्ध बोलताना आपण आणखी एक गोष्ट विसरतो. हा भयंकर कायदा शंकरराव चव्हाणांनी काँग्रेसच्या राज्यातच केला आहे. त्यावेळी तो फक्त ‘गो हत्या बंदी कायदा’ असा होता.

त्यांनी केलेला कायदा या देशाच्या दृष्टीने भयंकर आहे, हे पंडित नेहरूंनी सांगितलंय, हे त्यांना माहित नव्हते किंवा नेहरूंना डावलणे ही त्यांची राजकीय गरज होती आणि अशा वेळी जुजबी चर्चा करून गप्प बसणे ही आपली सवय होती. हा प्रश्न केवढा महत्त्वाचा आहे, हे पंडित नेहरूंनी सांगितलय, ७ ऑगस्ट १९४७ रोजी राजेंद्र प्रसादांनी नेहरूंनापत्र पाठवून ‘गो हत्या बंदी करावयास हवी बापूंचे मत असेच आहे’ वगैरे कळवले. नेहरूंनी त्यांना लगेच पत्र पाठवून कळविले, ‘बापूंना गाईचे रक्षण व्हावे असे वाटते. त्यांना तसा कायदा नकोय. आज भारतभर गोहत्याबंदी जी चर्चा आहे, ती काही संघटनांनी, दालमिया नावाच्या उद्योगपतीने दिलेला प्रचंड पैसा घेऊन सुरू केला आहे. हिंदू-मुसलमान तेढ वाढवणे आणि हिंदूधर्माचे पुनरुज्जीवन करणे, हा त्यामागचा हेतू आहे. आपण त्याबाबत सजग असले पाहिजे.’ त्यानंतर २ एप्रिल १९५५ रोजी शेठ गोविंददास यांनी गो हत्या बंदीचा कायदा करावा, म्हणून लोकसभेत विधेयक आणले. नेहरूंनी फार प्रभावीपणे त्याचा विरोध केला, पण नेहरू तेथेच थांबले नाहीत. भाषणाच्या शेवटी त्यांनी सांगितले, ‘असा काही कायदा या देशात होणार असेल, तर मी पंतप्रधान म्हणून या देशाचा पदभार सांभाळू शकणार नाही!’

आपण विसून गेलोय किंवा आपणाला माहीतही नाही. या देशाची एकता टिकवायची असेल तर हिंदू-मुसलमान सहकार्य नव्हे तर समन्वय हवा, हे सर्वप्रथम १० जून १८९८ रोजी सर्फराज मोहमद हुसेन यांना पाठविलेल्या पत्रात स्वामी विवेकानंदांनी सांगितलय. नेहरूंना याची आठवण आहे. दि. २६ मार्च १९५० रोजी आपल्या मनातील खंत पटेलांना कळविताना त्यांनी म्हटलंय ‘मला भिती वाटते आहे. आपली काँग्रेस नकळत पाकिस्तान, हिंदू महासभा यांच्या मार्गाने जाते आहे. या देशाला सर्वधर्म समभाव हवा आहे. आपण अल्पसंख्यांकांना केवळ संरक्षण देऊन चालणार नाही, त्यांचा आपल्यावर पूर्ण विश्वास असला पाहिजे, हे आपणाला बापूजींनी सांगितलय’ आणि या पत्राला उत्तर पाठविताना सरदारांनी याच्याही पुढे जाऊन त्यांना सांगितलय ‘मी हिंदू संस्कृती श्रेष्ठ असे मानत नाही. मी मुसलमान संस्कृती श्रेष्ठ असे मानत नही. कुराण किंवा वेद यांना मानवाने काय करावे हे सांगण्याचा अधिकार आहे, असेही मानत नाही. कोणत्याच धर्मग्रंथांना असा अधिकार नाही. हिंदू मुसलमान परस्पर विश्वास आणि एकमेकांच्या भावनांबद्दल आदर आणि त्यांची जपणूक ही या देशासाठी एक अत्यावश्यक गोष्ट आहे.’ हे सारे फार कठीण का आहे हे पटेलांनी ६ मे १९४८ रोजी शामाप्रसादांना पत्र पाठवून सांगितलंय. ते लिहितात ‘गांधीजींचा खून संघाने कट करून केला, की नाही हे कदाचित कधीच सांगता येणार नाही. पण संघाने या देशात जे विषारी वातावरण िनर्माण केले त्यातून हा खून झाला हे नक्की सांगता येते. माझ्याकडे आलल्या माहितीप्रमाणे खुनानंतर संघाच्या स्वयंसेवकांनी भारतभर अनेक ठिकाणी मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केलाय. ही गुप्तता पाळणारी निमलष्करी संस्था आहे. त्यामुळे हिंदू महासभेपेक्षा संघ अधिक धोकादायक आहे.’ आज ‘लव्ह जिहाद’ खेळणाऱ्या लोकांना माहीत नाही. पटेलांनी १२ अॉगस्ट १९५० च्या पत्रात म्हटलंय ‘मी जाहीरपणे हिंदू मुसलमान विवाहांचा पुरस्कार करतो.’

आता त्या फार जुन्या गोष्टी आहेत. केंद्रात काँग्रेसचेच सरकार असताना आपण बाबरी मशीद उध्वस्त होताना पाहिली. या देशात उभी असलेली एक वास्तू, न्यायालयाची वा संसदेची मान्यता न घेता रस्त्यावर जमाव जमवून उध्वस्त करता येते, त्यातून अर्धशिक्षीत अल्पसंख्य बांधवांना डिवचून रस्त्यावर आणून चिरडता येते, हे आपण पाहिले. हे अधर्मकृत्य करणारे लोक, हे अधर्मकृत्य केल्यामुळे केंद्रात सत्तेवर येताना आपण पाहिले. या दंगलीमुळे त्यानंतर मुंबईत घडलेल्या अमानवी, अमानुष दंगलीवरील ‘श्रीकृष्ण आयोगाचा’ अहवाल काँग्रेसच्या शासनानेही प्रसिद्ध केला नाही.

परिवाराला काय करायचय हे त्यांनी कधीच लपवून ठेवलेले नाही. गुरू गोळवलकरांनी आपल्या विचारधनात सांगितलय ‘फाळणीनंतर या देशात राहिलेले सारे मुसलमान पंचमस्तंभी आहेत.’ आणि परिवारातील सर्वसमावेषक असलेल्या सरसंघचालक देवरसांनी पण स्पष्टपणे सांगितलय ‘आम्ही एकचालकानुवर्तीत्व मानतो आणि ‘हिंदुचाच हिंदूस्थान’ हे हिंदू राष्ट्र आहे, हा आमचा एककलमी कार्यक्रम आहे. बाकीचे सर्व प्रसंगानुरूप घेतलेले मुखवटे आहेत.’

हा एककलमी कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून संघ परिवार गेली ६०-७० वर्षे भारतभर अनेक रचना फार कल्पकतेने आणि कौशल्याने वापरतोय. हिंदू-मुसलमान दुरावा वाढवत त्यांच्यात द्वेष निर्माण करणारा पुरंदरेंचा शिवाजी महाराजांचा इतिहास ही या अनेक रचनांपैकी फक्त एक रचना आहे. प्रश्न एवढाच, हे सारे समजून न घेता आपण ‘आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी’ असे काही करतोय का?