आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ह्यांनी वेगळे काय केले?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपचे सर्वेसर्वा झालेले नरेंद्र मोदी आणि मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन या पक्षाचे सर्वेसर्वा असलेले खासदार असदुद्दीन ओवेसी या दोन नेत्यांच्या कृती आणि धोरणतलं साम्य आपण पाहिलं. हे साम्य बहुतांशी चांगल्या धोरणांच्या बाबतीत होतं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी आखलेल्या कार्यपद्धतीतलं आणि संबंधित पक्षाचे नेते म्हणून त्यांनी राबवलेल्या धोरणातलं साम्य होतं. त्यामुळे दोघांनाही मिळालेला विजय अनपेक्षित होता, भलेही संख्येच्या बाबतीत त्यात जमीन-अस्मानचे अंतर असेल. दोघांनीही नव्या पिढीतल्या मतदारावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक लक्ष केंद्रित केलं आणि जुन्या मतदारांसाठी परंपरागत कार्यपद्धती अवलंबली.

एकीकडे असं सकारात्मक आणि मतदारांवर सहज प्रभाव पाडू शकेल, असं धोरण अवलंबत असताना या दोन्ही नेत्यांनी परंपरागत राजकारण्यांसारखे आपल्याच धोरणाशी काडीमोड घेणारे निर्णयही घेतले. त्यातून मतदारांचा विश्वासही ते काही प्रमाणात गमावून बसले आहेत, हेही दुर्लक्षून चालणार नाही. या बाबतीतही दोघांमध्ये साम्य असावं, याला काय म्हणायचे? या दोन्ही नेत्यांनी सर्वसामान्यांचा विश्वास मोठ्या प्रमाणात संपादित केला. त्या आधारावरच त्यांचा एकतर्फी विजय झाला; पण हा विजय मिळताच आपण प्रचारात जसे भासलो तसे प्रत्यक्षात नाही आहोत, हे दाखवण्याची घाईही दोन्ही नेत्यांना झाली आहे की काय, असे वाटावे अशी परिस्थिती आहे. त्या बाबतीतली उदाहरणं मोठीच मजेशीर आणि गंभीर आहेत. नरेंद्र मोदींच्या बाबतीत ते आधी पाहू. राष्ट्रवादी काँग्रेस ही भ्रष्टवादी काँग्रेस पार्टी आहे, असे मोदी जाहीर भाषणातून अनेकदा बोलले. या भ्रष्टांना धडा शिकवा, त्यांनी खाल्लेल्या पैशातली पै अन् पै आपण वसूल करू, असेही भाषणांमधून सांगितले जात होते. प्रत्यक्षात काय झाले? सरकार स्थापनेनंतर बहुमत सिद्ध होईपर्यंत आणि शिवसेना सत्तेत सामील होईपर्यंत फडणवीस सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचाच आधार मिळाला. तो आपण घेतला नाही, असे दाखवण्याचे भाजपने प्रयत्न चालवले असले तरी ते म्हणणे कोणाला पटणारे नाही. त्यातून झालेली भाजपची बदनामी टाळण्यासाठी अखेर शिवसेनेला बरोबर घेण्याचा निर्णय त्यांनी, अर्थात नरेंद्र मोदी यांनी घेतला. मात्र, तोपर्यंत जनतेच्या मनातून ज्या प्रमाणात उतरायचे, ते उतरलेच. हेच ‘एमआयएम’च्या ओवेसींच्या बाबतीतही म्हणता येईल.
ज्या काँग्रेस पक्षावर कठोर टीका करीत ओवेसींनी या विधानसभा निवडणुकीत दोन आमदार मिळवले; पण काँग्रेसला त्यांचा सत्तेत राहण्यासाठी पाठिंबा होता, हे त्यांना निवडणुकीनंतर लगेचच जाहीर करावे लागले. नुकत्याच झालेल्या मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत हिंदुत्ववादी शिवसेनेने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या एमआयएम पक्षाला मदत केली. शिवसेनेचे सत्तेसाठीचे हे तडजोडीचे राजकारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा वेगळे नाही, हे दाखवून दिल्याने भविष्यासाठी नक्कीच घातक ठरणार आहे. दोघांमधले हेही साम्य लक्षात घेण्यासारखे आहे.

राजकारणाला कोणी कितीही समाजकारणाची तोंडी फोडणी देत असले तरी शेवटी सत्ता हेच राजकारणाचे अंतिम ध्येय असते, यात शंका नाही. अर्थात, त्यात चुकीचे काही आहे, असेही नाही. राजकारणात यायचे तेच मुळी या क्षेत्राची ताकद खूप मोठी आहे म्हणून. समाजाचे काही भले करण्याची इच्छा असेल, तर अनेक क्षेत्रं आहेत, अनेक पद्धतीही आहेत. आमटे, कामटे, बंग, डॉ. कोल्हे या आणि अशा अनेक कुटुंबांनी, व्यक्तींनी आणि त्यांच्याही आधी गाडगेबाबांपासून अनेकांनी महाराष्ट्रात ते सिद्धही करून दिले आहे. मात्र, त्याला मर्यादा आहेत, हेही समोर आहे. त्या तुलनेत समाजाचे भले करायची सर्वाधिक ताकद कोणात असेल तर ती राजकारणात आहे, सत्तेत आहे, हे नाकारता येणार नाही. म्हणून राजकारणात येऊन सत्ता मिळवणे आणि त्या सत्तेच्या माध्यमातून फार मोठ्या समूहाचे भले करणे हा कोणाचा उद्देश असेल, तर त्याला वाईट ठरवता येणार नाही. म्हणूनच राजकारण वाईट नाही आणि त्या माध्यमातून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणेही वाईट नाही.
प्रश्न आहे तो, ते प्रयत्न कोणत्या स्तराला जाऊन केले जावेत हा. मोदींनी चांगल्या हेतूने सत्ता मागितली आणि देशभरातल्या मतदारांनी ती त्यांच्याकडे सोपवलीही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांनी ज्यांना भ्रष्ट ठरवले, त्यांच्याशीच हातमिळवणी केल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे बहुतांश जनतेच्या मनातून ते उतरले, असे दिसू लागले आहे. ओवेसींच्या बाबतीतही महाराष्ट्रातील मुस्लिमांचा, विशेषत: त्यांच्यावर विश्वास ठेवून एमआयएमच्या मागे गेलेल्या मुस्लिम मतदारांचा भ्रमनिरास करणारे प्रसंग लगेचच समोर आले आहेत. त्यामुळे हेही काही वेगळे नाहीत, असा विचार मतदारांच्या मनात यायला लागला आहे. विशेषत: तरुण मतदार त्या बाबतीत संयमी नाही, हे या दोन्ही नेत्यांनी लक्षात घेतेलेले दिसत नाही.
deepakpatwe@gmail.com