आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Dharmendra Pratap Singh News In Rasik Magazine In Divya Marathi

आभाळ कवेत घेणारा इरफान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजस्थानची राजधानी जयपूर येथे ७ जानेवारी १९७१ रोजी जन्मलेल्या इरफान खानचे मूळ घर व आजोळ टोंक जिल्ह्यामध्ये आहे. मात्र व्यवसायानिमित्त इरफानचे कुटुंबीय जयपूर येथे स्थायिक झाले होते. त्यामुळे टोंक आणि जयपूर या दोन्ही िठकाणी इरफानच्या वाऱ्या होत असतात.
इरफानने सांगितले, ‘जवळचे स्नेही मला इरफान म्हणून हाक मारतात, पण वास्तविक माझे नाव इरफान अली खान असे आहे. आम्ही नवाबी घराण्यातले आहोत.’ जयपूरमधील सेंट पाॅल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजस्थान रॉयल कॉलेजमधून इरफानने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. इरफानला उपजत असलेली अभिनयाची ओढ महाविद्यालयीन जीवनात आणखी वाढली. महाविद्यालयातील थिएटर ग्रुपशी तो जोडला गेला. त्या काळात त्याने खूप मेहनत घेतली. विविध प्रकारच्या नाटकांमध्ये कामे केली. नसिरुद्दीन शहा, मिथुन चक्रवर्ती, ओम पुरी हे त्याचे त्या वेळी आवडते अभिनेते होते. अभिनयाच्या क्षेत्रात इरफानला काहीतरी वेगळे करायचे होते. आपले क्षितिज रुंदावायचे असेल तर जयपूरचा उंबरठा ओलांडला पाहिजे, हे आता त्याच्या मनाने घेतले. १९८४मध्ये इरफानने राष्ट्रीय नाट्य विद्यालयात (एनएसडी) प्रवेश घेण्याचे ठरविले. पुणे येथील एफटीआयमध्ये अभिनयाचा असलेला अभ्यासक्रम बंद करण्यात आल्यामुळे आता फक्त एनएसडीचाच दरवाजा खुला दिसत होता. एनएसडीमध्ये इरफानचे सहाध्यायी होते मीता वशिष्ठ, आलोक चटर्जी, अशोक लोखंडे, भवानी बशीर, सुनील पोखरियाल आदी. एनएसडीत त्याची भेट अजून एका व्यक्तीशी झाली ती म्हणजे सुतापा सिकदर. पुढे इरफानने तिच्याशी विवाह केला. आज या दांपत्याला अयान व बाबिल अशी दोन अपत्ये आहेत. १९९०च्या सुमारास गोविंद निहलानींच्या सांगाव्यावरून इरफान मुंबईत आला. ‘दृष्टी’ या आपल्या चित्रपटात निहलानी इरफानला भूमिका देऊ इच्छित होते. त्या वेळी इरफान अंधेरीला आपल्या मामाकडे राहत असे. तो सांगतो, ‘माझे मामा लेखक होते. पण त्यांच्या कामाचे म्हणावे तसे चीज चित्रपटसृष्टीत झाले नाही.’ ‘दृष्टी’ चित्रपटाची बोलणी सुरू असतानाच मीरा नायरच्या ‘सलाम बॉम्बे’ चित्रपटात इरफानला एक छोटीशी भूमिका मिळाली. मीरा नायरचाही हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटाची फायनल प्रिंट पाहताच त्याला धक्का बसला होता. इरफानच्या भूमिकेला संपूर्ण कात्री लावण्यात आली होती.

काळ पुढे सरकत होता... मुंबईत तगून तर राहायचे होते, पण त्यासाठी हातात कामे तर मिळायला हवीत ना? त्यातून जी कमाई होईल त्यावरच इरफानचा सारा भर होता. ‘एक डाॅक्टर की मौत’ यासारख्या चित्रपटात फुटकळ भूमिका करीत असताना इरफानने चाणक्य, सारा जहाँ हमारा, बनेगी अपनी बात, चंद्रकांता यांसारख्या मालिकांमध्येही कामे करायला सुरुवात केली. इरफान सांगतो, ‘मालिकांमध्ये भूमिका मी नाइलाजाने करीत होतो. ज्या ज्या निर्माता-दिग्दर्शकांना भेटायचो ते मला संपर्कात राहा, असे आवर्जून सांगायचे. या लोकांच्या घरी फेऱ्या मारताना मी किती चपला, बुटांचे जोड झिजवले असतील, त्याची गणतीच नाही.’ मात्र इरफानने मनाशी ठरविले होते की, कधीही हार पत्करायची नाही आणि निराश होऊन घरी परत जायचे नाही...

‘मला उत्तम संधी लाभावी याची पायाभरणी मी स्वत:च करीत होतो’, असे सांगून इरफान म्हणाला, ‘माझी ही प्रतीक्षा ‘द वॉरियर’ या चित्रपटामुळे संपली. ‘एक डॉक्टर की मौत’ या चित्रपटात केलेल्या भूमिकेमुळे मला खूप पैसे मिळाले नसतील, पण त्या भूमिकेतील माझ्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले होते. ही प्रशंसा लंडन येथील दिग्दर्शक आसिफ कापडिया यांच्या कानी गेली. त्यानंतर त्यांनी मला वॉरियरमध्ये प्रमुख भूमिका देऊ केली. या चित्रपटाने मला एका रात्रीत आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली. वाॅरियर चित्रपटाचे जे मानधन मिळाले होते, ती माझी कमाई मी आईला भेट म्हणून पाठविली.’ नेमका अशा क्षणी इरफानला तिग्मांशू धुलियाचा ‘भूख’ हा चित्रपट मिळाला. इरफानच्या चित्रपट कारकीर्दीमध्ये तिग्मांशूचाही मोलाचा वाटा आहे. एनएसडीमध्ये तिग्मांशू हा इरफानचा सहाध्यायी होता. ‘हासिल’ चित्रपटानंतर मकबूल, नासीर साहेबांनी दिग्दर्शित केलेला यूँ होता तो क्या होता, लाइफ इन ए मेट्रो, द नेमसेक, स्लमडॉग, पानसिंह तोमर, लाइफ ऑफ पाय अशा चित्रपटांनी आपल्याला आज दिसतो त्या इरफानला घडविले आहे. नसिरुद्दीन शहा याने आपल्यावर टाकलेला गाढा विश्वास पाहून इरफान भारावला होता. ‘यश किंवा अपयशाच्या काळात चित्रपटसृष्टीतील लोक तुमच्याशी खूप वेगवेगळ्या पद्धतीने वागत असतात. त्यांचे वर्तन कधी बदलेल, याचा नेम नसतो. मात्र सध्या तरी चित्रपटसृष्टीतील लोक माझ्याशी जिव्हाळ्याने वागत आहेत. ते पाहून मन आनंदित होते.’ असेही इरफान पुढे म्हणाला.

यश किंवा अपयशाच्या काळात चित्रपटसृष्टीतील लोक तुमच्याशी खूप वेगवेगळ्या पद्धतीने वागत असतात. त्यांचे वर्तन कधी बदलेल, याचा नेम नसतो.