आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Dileep Kulkarni In Rasik About Artists And Their Behavior

प्रांत सृजनाचा; ठसे क्रौर्याचे... (रसिक स्पेशल)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एरवी, ज्या कुंचल्याने शुभ्र कॅनव्हासवर रंग शिंपडावे, तोच कुंचला सुरा व्हावा आणि ज्या कॅनव्हासवर रंगांची उधळण व्हावी, त्या जागी रक्त सांडावे…सृजनशीलता आणि हिंसा…म्हटल्या तर या दोन परस्परभिन्न भावना... पण सेलेब्रिटी चित्रकार चिंतन उपाध्याय यांना पत्नी हेमा उपाध्याय हिच्या खुनाची सुपारी दिल्याच्या आरोपाखाली अटक झाल्याने, त्या भावना एकत्र आल्याचेही दिसले. पण मुळात, या भावना आपण समजतो, तशा भिन्न असतात का?

मानवी मनाचा अचूक थांग लागणे ही केवळ अशक्यप्राय गोष्ट. कुणाच्या मनात काय विचार सुरू असतील आणि ते विचार त्याला कुठली कृती करायला प्रवृत्त करतील, याचाही अदमास घेणे अतिशय अवघड. कलाकारही त्याला अपवाद नाहीत. तोही प्रथम तुमच्या-आमच्यासारखा माणूसच. अर्थात, कलाकार म्हणजे, फक्त चित्रकारच नाही. लेखक, कवी, शिल्पकार, गायक, वादक, नर्तक, अभिनेता ही सगळी सृजनात रमलेली मंडळी आहेत. क्रिएटिव्हिटी, ‌मग ती कुठल्याही माध्यमांतील असू देत, ती आपल्याला आनंदच देते. कवी ग्रेस म्हणायचा, ‘जी गोष्ट सौंदर्यनिर्मिती करते, ती कलाकृतीच असते!’

पण या सृजनवीरांचा ताबा कधी हिंसेनं घेतला तर? काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचली होती. एका नामांकित चित्रकारानं ओळखीतल्या माणसांकडून आपल्या बायकोचा आणि तिच्या वकिलाचा खून करवून त्यांचे मृतदेह दोन खोक्यांमध्ये कोंबून एका गटारात फेकून दिले...
‘क्रिएटिव्हिटी’ आणि ‘व्हायोलन्स’ हातात हात घालून कसे काय जाऊ शकतात? खरं म्हणजे, हा प्रश्न मला खूप वर्षांपूर्वी पडला होता. पुण्यात जेव्हा ‘जोशी-अभ्यंकर हत्याकांड’ झालं, त्यामागचे सूत्रधार, हे चित्रकार आणि छायाचित्रकार होते. एका नामांकित कला महाविद्यालयात ते शिकत होते. अत्यंत थंड डोक्याने आणि योजनाबद्धरीतीनं त्यांनी खून केले. खून केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्यातले दोघे आपल्या डार्करूममध्ये प्रिंट्स डेव्हलप करीत. म्हणजे बघा, या कलावंतांनी थोड्याच वेळापूर्वी, त्या निष्पाप जिवांना कायमचं अंधारात ढकललं होतं आणि ते काम उरकताच स्वत:च्या ‘डार्करूम’मध्ये नवनिर्मितीही केली होती...

मग या खुन्यांना कलावंत नाही म्हणायचं का? तसंही म्हणता येणार नाही. कारण, ते खरोखरच उत्तम चित्रकार होते. त्यातला एक पुढं माफीचा साक्षीदार बनला आणि त्यानं त्या ‘अनुभवा’वर आधारित पुस्तकही लिहिलं. त्याचं नाव, ‘येस, आय एम गिल्टी’. खरं तर, त्या घटनेचा मानसशास्त्रीय दृष्टीनं अभ्यास व्हायला हवा. कलावंत असं कसं काय वागू शकतो?

८०च्या दशकात, एका पुस्तकाच्या निमित्तानं मी बराच काळ नागपूरला वास्तव्याला होतो. तिथं कवी ग्रेसशी मैत्री झाली. रोज आम्ही भेटायचो. काय बोलायचो, याचा तपशील आता आठवत नाही; पण, त्याचं अखंड धूम्रपान चाललेलं असायचं. इतकं की, तो कवीराज तोंडात सिगारेट ठेवूनच माझ्याशी बोलायचा. मी एकदा म्हटलं, ‘बावाजी, वो सिगारेट हाथ में क्यो नहीं पकडते?’ तेव्हा पाठीमागे एकमेकांत बांधलेले हात सोडवत हाताचे दोन्ही तळवे त्यानं माझ्या चेहऱ्यासमोर धरले. त्याच्या अंगठ्याशेजारच्या दोन्ही बोटांत जिथं सिगारेट (धूम्रप्रेमी लोक) धरतात, तिथल्या दोन्ही बोटांची कातडी हाडापर्यंत जळून गेली होती...

ते पाहताच मी म्हणालो, ‘अब तुम्हारे होठों का भी ये हाल होनेवाला है!’ त्यावर तो म्हणाला, ‘होने दो... अरे, कभी कभी ये सिगारेट मै चबाके खा जाता हूँ, तो भी मेरा जी नही भरता!’ त्यावर गमतीनं मी त्याला म्हटलं की, ‘बावाजी, धीरे धीरे ये अपने आपको मिटाने की कोशिश हो रही है!’
विझत चाललेल्या सिगारेटनेच त्यानं पुन्हा नवीन पेटवली आणि अधिक आरामात बसत, तो फक्त धुराची वलयांमागून वलयं सोडत राहिला...
‘मी म्हणतो, ही हिंसाच आहे! फार तर स्वहिंसा! मग हा प्रज्ञावंत ती वारंवार का करीत राहिला?’

चित्रकार, मूर्तिकार, लेखक, गायक हे काही २४ तास कलेचा, सृजनाचा विचार करीत नसतात. ‘जेव्हा निर्मिती होत असते, तेव्हाच तो मनुष्य कलाकार असतो. बाकी वेळी तो सामान्य माणूस असतो.’ असं काही जण म्हणतात. पण निर्मितीचे क्षण असे काही ठरलेले नसतात, सृजनवेळा केव्हाही येतात आणि कलाकार असामान्य निर्मिती करून जातो. विशेषत: लेखक आणि कवींच्या बाबतीत या वेळा त्याला अगोदर सूचना करून येत नाहीत. कलाकार क्रूरपणे वागू शकतो, याची असंख्य उदाहरणं देता येतील. सामान्य माणसे कलाकारांशी क्रूरपणे वागतात, हे काही नवीन नाही; पण दोन कलाकारही एकमेकांशी क्रूरपणे वागू शकतात. ‘नटसम्राट’ सिनेमा सध्या गाजतो आहे. पुण्यात या सिनेमाचं शूटिंग सुरू होतं. सिनेमात ‘नटसम्राट’ची मध्यवर्ती भूमिका करणाऱ्या नटासमोर कुणीतरी, पुण्यात पंचवीस वर्षे रस्त्यावर राहणाऱ्या एका कसबी नटाची गाठ घालून दिली, एका दैनिकात या नटाची दुर्दैवी कहाणी सविस्तरपणे छापून आलेली आहे. आयुष्यभर फक्त नाटकच जगलेल्या या नटसम्राटाच्या नाटकानं लिम्का बुकातदेखील विक्रम नोंदविला. त्या क्षणाचा आनंदही त्यानं रस्त्यावरच आनंदानं साजरा केला. या नटाला घर नाही, कुणी नातेवाईक नाहीत. व्यावसायिक रंगभूमीवर पन्नासहून अधिक नाटकांत त्यानं कामं केलेली आहेत. पाच/सहा नाट्यसंस्थाही काढल्या. हौशी कलावंतांना अभिनय शिकविला. एकांकिका लिहिल्या, कामगार नाट्यस्पर्धेत साठ वर्षे प्रयोग केले, पण उतारवयात नटवर्यांना रस्त्यावर यावं लागलं. तर या फाटक्या नटाला कुणीतरी सिनेमातल्या त्या ‘नटसम्राटा’समोर उभं केलं. मळके कपडे भरलेली प्लास्टिकची पिशवी काखोटीला मारून हा वृद्ध इसम मूकपणे उभा राहिला, तेव्हा सिनेमातल्या त्या प्रमुख नटानं सांगितलं की, ‘आता शूटिंग संपेपर्यंत तुम्ही माझ्या डोळ्यांसमोर असलं पाहिजे.’ आणि हा भूतकाळातला एकेकाळचा नटसम्राट आता कंगालपणे शूटिंग संपेपर्यंत त्या नटाच्या केवळ सान्निध्यात राहिला.

शूटिंग संपले आणि पुन्हा हा मनुष्य हाडं गोठविणाऱ्या थंडीत रस्त्यावर येऊन थांबला. व्हायचं तेच झालं. तापानं फणफणलेला हा मनुष्य रस्त्यावर पडून होता. कुणीतरी दयाळूपणे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले. तिथं ते बरेही झाले; पण पुन्हा जायचं कुठं, हा प्रश्न होताच. आणि पुन्हा हा नट रस्त्यावर आला.

प्रश्न असा पडतो की, सिनेमातल्या त्या ‘नटसम्राटा’नं परिस्थितीनं भणंग केलेल्या या नटाला केवळ ‘डोळ्यांसमोर’(शूटिंग संपेपर्यंत) का ठेवलं? हीसुद्धा क्रूरताच आहे! एका कलावंताने दुसऱ्या कलावंताबरोबर केलेली!

ही कहाणी इथंच संपत नाही. त्या वृद्ध नटाला कसबा पेठेतल्या त्या दयाळू दांपत्यानं शेवटी फळणीकरांच्या ‘अपना घर’मध्ये पोहोचवलं. “नाट्यसेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या एका कलावंतासाठी ‘आपलं घर’ उघडं आहे.” असं फळणीकर म्हणाल्याचं त्या वृत्तात आहे.

‘सुहागरात’ सिनेमाच्या सेटवरदेखील इंदोरचा एक भणंग नट आशाळभूतपणे उभा होता. अंगात फाटका कोट घालून. पायात चप्पल नाही. शत्रुघ्न सिन्हाचा शॉट सुरू होता. फाटका कोट घालून शत्रूघ्न एका भिकाऱ्याचा रोल करीत होता. त्याला भिकाऱ्याचा भरपूर ‘मेकअप’ केला होता. १०-१२ रिटेक झाले, पण शॉट काही ओके होईना. डायरेक्टरनी ‘पॅक अप’ सांगितलं आणि हा भणंग नट एकदम डायरेक्टर साहेबांच्या समोर उभा राहिला.

‘साब, वो जो डायलॉग है, शत्रूसाब बोल रहे थे, मै बोल सकता हंू।’
‘ए भाई, जरा कॅमरा ऑन करना, एक सच्चा भूखा आया है, चलो इसे भी देख लेते है।’ डायरेक्टर म्हणाले आणि त्यांनी पुन्हा युनिट सुरू गेलं. पाच मिनिटांत शॉट ‘ओके’ झाला. युनिटमध्ये वळून डायरेक्टरसाहेब म्हणाले,
‘अरे, कोई तो इसे खाना खिलाना और खाने के बाद हाकाल दो साले को...’
शत्रुघ्न जो शॉट ‘ओके’ करू शकला नाही तो या भणंग नटानं केला, पण डायरेक्टरमधल्या कलावंतानं अखेरीस क्रूरतेचंच दर्शन घडवलं. ही घटना खूप वर्षांपूर्वीची आहे. आजही हा ‘नटसम्राट’ मुंबईत आहे. आज जरी त्याची ‘भूमिका’ बदलली तरी जगण्याचं ‘नाटक’ चालूच आहे.

एकूण काय तर, हिंसा, हत्या-अत्याचार हा काही कलाप्रांतात नव्यानं दिसलेला प्रकार नाही. कलावंताकडे जग वेगळ्या दृष्टीनं पाहतं, म्हणून अशा काही बातम्या वाचल्या की, प्रचंड अस्वस्थ व्हायला होतं.

या आणि अशा अनेक घटनांचे मानसशास्त्रीय निष्कर्ष काढले जातील. काहींना ते पटतील, काहींना अजिबात पटणार नाहीत. पण सौंदर्य निर्मिती करणारे एखादे चित्र, शिल्प किंवा एखाद्या अनवट रागाचे विलंबित सूर आपलं काम करतच राहतील...

intelligentdileep@rediffmail.com