आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Dr. Sunilkumar Lawate About Maithili Language

माय मैथिली महान ( आंतरभारती (मैथिली)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्यापती, जयदेवसारख्या कवींच्या कोमलकान्त पदावलीतून पदन्यास करणारी मैथिली भारतीय भाषांची ‘कोकीळ भाषा’. या भाषेसारखं नादमाधुर्य, कोमलता, अनुप्रासिकता तुम्हास अन्य कोणत्याच भाषेत दिसणार नाही.

मिथिला विद्या गारा’ अर्थात, ‘मिथिला सर्व विद्यांचे आगर’ असं वर्णन लाभलेली मैथिली भाषा गंगा, जनिक, कोशिकी, गण्डिकी, कमला, त्रिजुगा, अमृता, धेमुरा, बागमती, कृतसारा, लक्ष्मणा आदी नद्यांच्या पंचक्रोशीत विकसित झालेली भाषा. प्रामुख्याने भारत आणि नेपाळमध्ये ती बोलली जाते. दोन्ही देशांतील काही प्रांतांची ती राजभाषा. मैथिलीला भारतीय भाषा म्हणून मान्यता आहे. जगभर सुमारे साडेतीन कोटी लोक ती भाषा बोलतात. पूर्वी ती बोली होती. प्रांतनिहाय या बोलीची अनेक रूपं आढळतात. कोरथा, देहाती, किसा, जोलाहा, थेतिया अशा बोलींमध्ये तिचं आद्यरूप सामावलेलं आहे.

ही भाषा आज प्रामुख्यानं देवनागरीत विकसित होत असली, तरी ती मिथिलाक्षर (तिरहुत) लिपीतही लिहिली जाते. शिवाय काही जण ती बांगला, उडिया लिपीतही लिहितात. भोजपुरी, मगही, अवधी भाषा मैथिलीशी साम्य असलेल्या. झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल आणि नेपाळच्या तराई प्रांतात ती प्रामुख्याने बोलली जाते. पूर्णिया, भागलपूर, दरभंगा, मधुबनी, मधेपुर, सरहसा, सुपाऊ जिल्ह्यात तिचं प्राबल्य आजही आहे. सन २००५-०७च्या दरम्यान मी बिहारमध्ये असताना तिचा गोडवा ऐकला आहे. ही भाषा निसर्गसंपन्नता आणि क्रौर्य यांच्या मुशीत विकसित झाल्यानं, एकाच वेळी या भाषेत शंृगारही आहे आणि शौर्यही! विद्यापती, जयदेवसारख्या कवींच्या कोमलकान्त पदावलीतून पदन्यास करणारी मैथिली भारतीय भाषांची ‘कोकीळ भाषा’. या भाषेसारखं नादमाधुर्य, कोमलता, अनुप्रासिकता तुम्हास अन्य कोणत्याच भाषेत मिळणार नाही.

अमोल मिठ बोल, हमरा एहि पर गुमान।
हम छी मिथिला निवासी, माय मैथिली महान।।

असं विमलेंदु सागरसारखा आजचा कवी म्हणतो, तेव्हा तो कालिदास, रवींद्रनाथ, भगवान बुद्ध यांनाही या भाषेची मोहिनी होती, हेच बजावतो.

मैथिली भाषेतील प्राचीन साहित्य आपणास बौद्ध आणि तांत्रिकांच्या उपदेश रूपात आढळतं. दोहा, चर्यागीतात या भाषेचे आदिरूप बंध दिसून येतात. चौऱ्याऐंशी वैष्णवांनी (सिद्ध) लिहिलेली चर्यागीतं आजही सुरक्षित असल्याने विक्रमशीला विद्यापीठ त्यांच्या संशोधनाचं केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. मैथिली काव्य हे मूलत: गेय असल्याने यमक, अनुप्रासप्रधान या भाषेला, तिच्या काव्याला संगीताचं अधिष्ठान आहे. रवींद्र संगीताची मुळं मैथिलीत सामावलेली आहेत. या भाषेचा प्रसिद्ध कवी विद्यापती. संस्कृत, अवहट्ट, मैथिली भाषांत काव्य लिहून त्यांनी आपलं बहुभाषिकत्व सिद्ध केलं आहे. ‘मैथिली कोकिळ’ म्हणून त्यांचा गौरव होतो. त्यांच्या काव्यावर कवी जयदेवांच्या ‘गीत गोविंद’चा प्रभाव आहे. कृष्णभक्ती काव्य म्हणूनही विद्यापतींच्या काव्याचं महत्त्व आहे. विद्यापतींच्या पूर्वीपासून मैथिली काव्य प्रसिद्ध आहे. ज्योतिरीश्वर ठाकूरांचा ‘वर्णन रत्नाकर’ काव्यग्रंथ मैथिलीचा खरा आद्यग्रंथ होय. प्राचीन मैथिली काव्य विकासात अमृतकर, हरपती, चंद्रकला, विष्णुपुरी, भानू, यशोधर, गजसिंह, कविराज, दशावधान, भीषम इत्यादी कवींचं योगदान संस्मरणीय आहे.

मध्यकाळात (इ. स. १६०० ते १८६०) मैथिली भाषेस अवकळा आली, ती येथील राजाश्रय संपल्याने. त्यामुळे तत्कालीन अनेक कवी, कलाकार नेपाळच्या राजाच्या आश्रयाला गेले. विशेषत: ऑइनवार वंशाचा राज्यास्त झाल्यानंतर नाटक, संगीत, साहित्य विकास झाला, तो नेपाळमध्ये. तेथील भातगाव, काठमांडू, पाटण ही गावे त्या काळी नाट्यपंढरी म्हणून ओळखली जायची. जगज्योतिर्मल, जगत्प्रकाश मल्ल, भूपतींद्र मल्ल, रणजित मल्ल, जितामित्र मल्ल या ‘मल्ल पंचकां’नी मध्यकाळात मैथिली नाटकास सुवर्णझळाळी बहाल केली. याच काळात गीतीनाट्यही वैभवी होतं.

वरील नाटकांतून मैथिली भाषेचं आद्य गद्यरूप विकसित झालं. आधुनिक काळात गद्य साहित्यच प्रमुखधारा बनून गेली. आधुनिक मैथिली गद्यात कथा, कादंबरी, नाटक, निबंध लेखन झालं. विसाव्या शतकाच्या प्रारंभी मुद्रणकला प्रचार, प्रसारामुळे वृत्तपत्रे, नियकालिके मोठ्या प्रमाणात प्रकाशित झालीत. ‘मिथिला हित साधना’(१९०५), ‘मिथिला मिहिर’(१९०८), ‘मिथिला प्रभाकर’(१९३०), ‘जीवनप्रभा’(१९४०) या स्वातंत्र्यपूर्वकालीन वृत्तपत्रांनी मैथिली गद्य विकासास गती दिली; पण साहित्यिक आधार लाभला तो मात्र हरप्रसाद शास्त्री, प्रबोधचंद्र बागची, सुनीतीकुमार चतर्जी, नगेंद्रनाथ गुप्त, खगेंद्रनाथ मित्र यांच्या लेखनामुळे.

एकोणिसाव्या शतकाचे मैथिली काव्य राम आणि कृष्ण कथेची आळवणी करत राहिले, हे जरी खरे असले तरी, विसाव्या शतकाच्या प्रारंभी मथुरानंद चौधरींच्या ‘कृषक’(१९४६), व्यासलिखित ‘संन्यासी’(१९४८) इत्यादी काव्यांनी त्याला जनरूप बहाल केलं. आधुनिक मैथिली काव्यावर हिंदी आणि बंगाली काव्याचा प्रभाव लक्षात येण्याइतका स्पष्ट आहे. या काव्यात जीवनाची समग्र रूपं, प्रश्न फेर धरताना दिसतात. परंपरेनेच मैथिली काव्यात पूर, दुष्काळ, रोगराई, अज्ञान, दारिद्र्य यांचं चित्रण प्रामुख्याने होत आलं आहे. त्याचं कारण भौगोलिक व निसर्ग प्रकोप हेच आहे. वैद्यनाथ मिश्र हे आधुनिक कवी होत. ते मैथिलीत ‘यात्री’ या टोपणनावाने लिहितात, तर हिंदीत ‘नागार्जुन’ या नावाने. ‘पत्रहीन नग्न गाछ’ या त्यांच्या काव्यास सन १९६८चा साहित्य अकादमी पुरस्कार लाभला आणि मैथिली आधुनिक भारतीय भाषा म्हणून मान्य झाली.

सुजन नयन मनि।
सुनु सुनु सुनु धनि।।

म्हणत आजचे कवी नागार्जुन प्राचीन प्रासादिक मैथिलीच जपतात. आधुनिक मैथिली काव्यात काशिकांत मिश्र, सुरेंद्र झा ‘सुमन’, बैद्यनाथ मलिक ‘विधु’, उपेंद्र टागोर ‘मोहन’, मार्कण्डेय प्रवासी, आरसी प्रसाद सिंह, कांचननाथ झा ‘किरण’, जीवकांत, विवेकानंद टागोर प्रसिद्ध आहेत.

जीवकांत कवी तसेच कथा, कादंबरीकार असून मैथिलीत अग्रगण्य साहित्यकार म्हणून ओळखले जातात. ‘दू कुहेसक बात’(१९६८) आणि ‘पानिपत’(१९६९) या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या. प्रभासकुमार, रामकिसन झा, रामदेव, गणेश गुंजन, उपेंद्रनाथ झा हे अलीकडील प्रसिद्ध कादंबरीकार होत. ‘मंत्रपुत्र’(१९८८), ‘इ बतहा संसार’(१९८०), ‘नैका बंजारा’(१९७३) सारख्या कादंबऱ्या मैथिलीत मोठ्या प्रमाणात वाचल्या गेल्या.

जागतिकीकरणानंतरच्या काळात मैथिली साहित्यात कादंबरीपेक्षा कथेचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. नियकालिकांचे प्रकाशन हे त्याचं प्रमुख कारण होय. मायानंद मिश्र लिखित ‘मांग का लोटा’(१९५१), रामानंद रेणूंचा ‘कचोट’(१९६९), जीवकांतांचा ‘एकसरी थारही कदम्ब तर ते’(१९७२) सारखे कथासंग्रह म्हणजे बिहारचं जिवंत चित्रण!

मैथिली आधुनिक साहित्यात नाटक, निबंध, बालसाहित्य, समीक्षा असं सर्व प्रकारचं लेखन होत असतं. पण सर्वसामान्य मैथिली भाषिकांना भावतं ते गीत, संगीतच. त्यामुळे मैथिलीत आज गीताच्या ऑडिओ, व्हिडिओ कॅसेट्सचं पेव फुटलं आहे. काळाची आव्हाने पेलत मैथिली आपली इंटरनेटवर हजेरी देत आहे. ‘मिथिली, मैथिली, मैथिल सँ संबंधिल साइटक’ लिंक क्लिक केली की, मैथिलीच्या अनेक साइट्सची यादी हाती येते. मैथिलीमध्ये ‘विदेह पोथीक’ ‘देसिल बयना’ ही साहित्यिक, सांस्कृतिक संकेतस्थळे म्हणून मैथिलीवासीयांच्या गळ्यातले ताईत (हेडफोन्स) बनून दृक्-श्राव्य प्रसार करतात.

drsklawate@gmail.com