आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तंत्रज्ञानाचा ताळेबंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाजालामुळेे माहितीचा पूर आला आहे. या पुराबरोबर जे काय वाहात येतं, त्यातून काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही, याबाबत माणूस गोंधळलेला आहे. कोणतंही तंत्रज्ञान वापरायला परिपक्वता यावी लागते. त्यासाठी ते तंत्रज्ञान जाणून घेण्याचा, शिकण्याचा, चढ चढावा लागतो. आज समाज हा चढ चढत आहे. यंत्र वा तंत्र माणसातील माणूसपणाला पूरक असली पाहिजेत; उणेपणा आणणारी असता कामा नयेत, याची काळजी माणसानेच घेतली पाहिजे.
मानवी इतिहासाच्या लिखित नोंदी नव्हत्या, त्या काळाला प्रागैतिहासिक काल म्हणतात. या काळाचे तीन भाग. ‘अश्मयुग’, ‘ब्राँझयुग’ आणि ‘लोहयुग’. तंत्रज्ञानाच्या कौशल्यावर हे वर्गीकरण आहे, हे महत्त्वाचे. तंत्रज्ञान आज नाही, युगानयुगे मानवी जीवनाचे ठळक अंग. आज जसे आपण डिजिटल व जुने तंत्रज्ञान याची तुलना करतो, तसे पूर्वीही झाले असेल.
अश्मयुग सरून ब्राँझयुग येऊ घातले होते. त्याचा हा संधिकाल. एका गुहेत पांढरे केस, शुभ्र दाढीवाला म्हातारा गारगोटीचे तीक्ष्ण तुकडे करत होता. राठ केसाचा तरुण ते तुकडे काठीला बांधत होता. गुहेबाहेर गिल्ला झाला. दहा-बारा जणांच्या घोळक्याचा म्होरक्या घोषणा देत होता, ‘ब्राँझ तेजस्वी, ब्राँझ यशस्वी’ ‘ब्राँझची कास धरा’. गुहेतील तो तरुण त्या म्हाताऱ्याला म्हणाला, ‘आपणही आता ब्राँझचे बाण बनवू या.’ ‘चूप...’ म्हातारा म्हणाला, ‘या गारगोटीच्या बाणासारखे बाण नाहीत. दोन बाणांत मोठा प्राणीही जमिनीवर लोळतो.’
‘पण मी ब्राँझ तयार करण्याचं शिक्षण घेणार.’ तरुण म्हणाला.
‘घे, पण जुनं विसरू नको.’ म्हातारा.
विश्वाचा आकार
‘विश्वाचा आकार केवढा / ज्याच्या-त्याच्या डोक्याएवढा’ असं केशवसूत म्हणाले, तेव्हा त्यांना म्हणायचं असेल, आतलं ज्ञानाचं विश्व जेवढं मोठं, तेवढं बाहेरच्या जगाचं आकलन व आकार मोठा. भवतालचं जग व आतलं जग परस्परावलंबी असतात. तंत्रज्ञानानं बाहेरचं जग झटकन बदलतं, पण आतलं जग बदलायला वेळ लागतो. डिजिटल युग वेगानं आलं, आणि त्याच वेगानं ते पुढं जात आहे.
माणूस गांगरला आहे. संगणक-इंटरनेट, मोबाइल फोन, स्मार्ट फोन - संदेशवहनाची साधनं इतकी वेगवान झाली की, त्यामुळे लँडलाइनचं महत्त्व गेलं. मनिऑर्डर, फोनोग्रॅम, तारा, काळाच्या उदरात कायमच्या गुडूप झाल्या. फोटो काढणं, चलत‌्चित्रण करणं हे मोबाइलमुळे सामान्य माणसाच्या हातात आलं. पण नव्या तंत्रज्ञानाची पावलं ‘कोडॅक’ने ओळखली नाहीत. २०१२मध्ये ‘कोडॅक’ ही महाकाय आंतरराष्ट्रीय कंपनी
‘बँकरप्ट’ झाली. आपण नवीन तंत्रज्ञान आत्मसात केलं तर आपणसुद्धा पुसले जाऊ, असं सामान्य माणसालाही वाटतं. ते काही चुकीचं नाही.
डिजिटल युगानं विज्ञानाच्या सर्व शाखांवर प्रभाव पाडला आहे. नॅनोटेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, जनुकविज्ञान, वैद्यकीय विज्ञान, एवढंच काय आर्किटेक्चरपासून आर्किऑलॉजीपर्यंत सर्व शाखांनी डिजिटल तंत्रज्ञानाची कास धरली. हे डिजिटल युगाचं व्यापक स्वरूप. बाहेरचं विश्व.
इंटरनेट, सोशल मीडिया, स्मार्टफोन, अ‍ॅप्स आज नागरी जीवनाचे अविभाज्य भाग झाल्यामुळे जिव्हाळ्याचे झाले आहेत. कुमारवयीन असो, तरुण असो, वा वृद्ध; ज्याला स्मार्ट फोन वापरता येऊ लागतो, तो त्याच्यात अडकतोच. यामुळे माणसाचं आतलं विश्व ढवळून निघालं आहे. महाजालामुळे माहितीचा पूर आला आहे. या पुराबरोबर जे काय वाहात येतं, त्यातून काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही, याबाबत माणूस गोंधळलेला आहे.
कोणतंही तंत्रज्ञान वापरायला परिपक्वता यावी लागते. त्यासाठी ते तंत्रज्ञान जाणून घेण्याचा, शिकण्याचा चढ चढावा लागतो. आज समाज हा चढ चढत आहे.
या काळात नवं व जुनं याची तुलना होतच असते.

भारतासारख्या विकसनशील देशात ही डिजिटल आयुधं सगळ्यांच्या हातात पोहोचलेली नाहीत. ही आयुधं वापरणारे व अशी आयुधं वापरू न शकणारे, असे दोन भाग पडले आहेत, हे विसरून चालणार नाही. याचं भान असलं, तरच आतलं विश्व मोठं होतं.

तंत्रज्ञानाचा ताळेबंद युगानयुगे घेतला जात आहे व पुढेही घेतला जाईल. तो गरजेचा असतो. यंत्र वा तंत्र मग ती गारगोटीच्या तुकड्यापासून वा सिलिकॉन चिपपासून बनवलेली असोत; ती माणसातील माणूसपणाला पूरक असली पाहिजेत, उणेपणा आणणारी असता कामा नयेत, याची काळजी माणसानेच घेतली पाहिजे. मग तो माणूस गुहेतील असो, वा वातानुकूलित कार्यालयातील असो.

drjoshianand628@gmail.com
बातम्या आणखी आहेत...