आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Dr. Sunilkumar Lavate About 'Amar Sonar Bangala' In Rasic

आमार सोनार बांगला( आंतरभारती (बंगाली))

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताचं राष्ट्रगीत बंगालीमध्ये आहे. भारतीय भाषांतील समृद्ध साहित्य परंपरा बंगालीत आहे. दोन राष्ट्रांचे राष्ट्रगीत रचण्याचा सन्मान, गौरव लाभलेली ही भाषा आहे.

भारताला साहित्याच्या नोबेल पारितोषिकाचा मान मिळवून देणारी एकमेव भाषा म्हणून बंगाली भाषेबद्दल, सर्व भारतीयांच्या मनात आदरभाव आहे. हा आदरभाव बंगालीने अनेक कारणांनी कमावला आहे. भारताचं राष्ट्रगीत बंगालीमध्ये आहे. भारतीय भाषांतील समृद्ध साहित्य परंपरा बंगालीत आहे. बंगाली भाषकांची लोकसंख्या आज ३० कोटींच्या घरात जाऊन पोहोचली आहे. ती जगातली सातव्या क्रमांकाची भाषा आहे. दोन राष्ट्रांचे राष्ट्रगीत रचण्याचा सन्मान, गौरव लाभलेली ही भाषा आहे. कितीतरी भारतीय भाषांचा साहित्यिक इितहास, हा बंगालीच्या पावलावर पाऊल ठेवत झाला आहे. उदाहरणच द्यायचे झाले, तर हिंदीचे देता येईल. सर्व भारतीय भाषांवर प्रभाव टाकणारी भाषा म्हणून बंगालीचे असाधारण महत्त्व आहे. भाषा हा रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग मानणारा बंगाली समाज. सन १९५२ची गोष्ट सांगतो. त्या वेळी आजचा बांगलादेश हा पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जायचा. तत्कालीन पाकिस्तान सरकारने स्वतंत्र पाकिस्तानची राष्ट्रभाषा, राज्यभाषा म्हणून उर्दूला निवडले व ती तत्कालीन पूर्व पाकिस्तानवर लादण्याचा प्रयत्न केला. ढाका विद्यापीठाचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. मोठे भाषिक आंदोलन उभारले. केवळ भाषिक अस्मितेच्या जोरावर ‘बांगलादेश’ हे स्वतंत्र राष्ट्र उदयाला आले. असे भाषिक अस्मितेवर उदयाला आलेले ते बहुधा एकमेव राष्ट्र असावे. नाही म्हणायला प्रत्येक राष्ट्र स्वतंत्र होण्याच्या ज्या आकांक्षा असतात, त्यात भाषिक अभिमान अग्रभागी असतो. असेच आंदोलन स्वतंत्र भारतात आसाममध्ये झालेले आठवते. बंगाली भाषिकांनी आसामची दुसरी राजभाषा म्हणून बंगालीला मान मिळवून दिला. त्यासाठीही त्यांना आंदोलन करावे लागले होते. बंगाली माणूस घरी, दारी, जळी, स्थळी बंगाली जपतो, म्हणून सरासरी बंगाली साहित्याच्या पुस्तकांची आवृत्ती पाच हजारच्या घरात असते. मासिक उत्पन्नाचा काही भाग बंगाली माणसं पुस्तकावर खर्च करतात. पुस्तकांच्या दुकानात रेशनसारख्या रांगा असतात.

तुम्ही कधी कोलकात्याला गेलात की, तिथल्या विद्यापीठात जा. ते भारतातले एकमेव विद्यापीठ असे आहे की, त्याचे कंपाऊंड पुस्तकाच्या टपऱ्यांनी वेढलेले आहे. मध्यंतरी रहदारीला अडथळा होतो, म्हणून बंगाल सरकारने या टपऱ्या हलवण्याच्या हलचाली सुरू केल्या. टपऱ्यांवर बुलडोझर फिरणार होता. एका टपरीवाल्याने नोबेल विजेत्या अमर्त्य सेनना फोन केला. तेव्हा ते अमेरिकेत होते. अमर्त्य सेन यांनी ज्योती बसूंना फोन करून विनंती केली, ‘त्या टपऱ्या नसत्या, तर मला नोबेल मिळालं नसतं. त्या टपऱ्यांनीच माझ्या पडत्या काळात वाचनाची भूक भागवली आहे. त्या टपऱ्या खरं तर आपलं वैभव (हेरिटेज) आहेत.’ आजही त्या टपऱ्या आहे तशा उभ्या आहेत.

बंगाली समाजात भाषा, साहित्य, संस्कृती, वाचन, रांगोळी, भजन (रवींद्र संगीत) यांना जिवापाड जपले जाते. माझे स्नेही डॉ. प्रभाकर माचवे, मूळ मराठी भाषी. तसे इंदूरचे, पण सर्व भारतीय भाषांची चांगली जाण व जाणकारी असलेले गृहस्थ. पंडित नेहरूंनी साहित्य अकादमी स्थापन केल्यानंतर सचिव म्हणून त्यांना निवडले होते. निवृत्तीनंतर ते ‘संदर्भ भारती’चे संपादक म्हणून कोलकात्यात राहू लागले. एका बंगाली घरात मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम सुरू होता. खलबते बराच वेळ चालली, म्हणून नवऱ्या मुलीने त्या घरात वेळ काढायला म्हणून पुस्तक, मासिक आहे का, विचारलं. नकारघंटा तिला ऐकावी लागली. त्या मुलीने वडिलांना बोलावून घेतले आणि विनंती केली, ‘बाबा, मला या घरात देऊ नका. जिथे मी एक तास काढू शकत नाही, तिथे मला आयुष्य काढण्याची शिक्षा देऊ नका.’ घरात पुस्तक नाही म्हणून स्थळ नाकारणारी मुलगी बंगालमध्ये जन्माला येते, ती तिथे बंकिमचंद्र, शरत््चंद्र, रवींद्रनाथ, ताराचंद बंदोपाध्याय, विष्णू डे, सुभाष मुखोपाध्याय, आशापूर्णा देवी, महाश्वेता देवी, तसलीमा नसरीनसारखे जग बदलणारे साहित्यिक जन्मतात म्हणून! म्हणून ‘युनेस्को’ला ‘मातृभाषा दिन’ जगभर साजरा करावा वाटतो.

अशा बंगाली भाषेचा इितहास खरे तर संस्कृतसारखाच हजारो वर्षांचा. आज ही भाषा प्रामुख्याने भारत व बांगलादेशात बोलली जाते. भारतात पश्चिम बंगालमध्ये तिचं प्राबल्य असलं, तरी ती आसाम, अंदमान निकोबार, त्रिपुरा, झारखंडमध्ये बोलली जाते. तिथे तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. तशी ही इंडो आर्यन भाषा. राढ, पूर्वबंग, बरेंद्रभूमी आणि कामरूप बोलीतून विकसित झालेली भाषा. आजच्या असमिया, मैथिली, ओडिया भाषांची ही भगिनी. तिची लिपी देवनागरीतूनच विकसित झालेली आहे. काही अक्षरे, वर्ण विशेषत: ख, ग, श ही तामीळ लिपीशी साम्य साधणारी आहेत. या बंगाली लिपीतूनच मैथिलीचा विकास झाला, असे मानले जाते.

या भाषेतील साहित्य परंपरा प्रागैतिहासिक आहे. सन ९५० ते १३५० या कालखंडात आपणास प्राचीन बंगाली साहित्य दिसून येते. सन १३५० ते १८०० पर्यंतचा काळ बंगाली साहित्याचा मध्यकाळ म्हणून ओळखला जातो. नंतर येते नवयुग. प्लासीच्या लढाईनंतरचा हा काळ. एशियाटिक सोसायटीची स्थापना (१७८४), बंगाली छापखान्याचा प्रारंभ (१७७८), फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना आदी घटनांनी सुरू झालेला हा कालखंड. विसावे शतक समृद्ध झाले, ते रवींद्रनाथ टागोरांमुळे. त्यानंतर आधुनिक काळ उदयाला आला. आता तो उत्तर आधुनिकच्या रूपात अस्तित्वात आहे. या सुमारे हजार वर्षांचा साहित्यिक इितहास हा बंगालीचा सुवर्णकाळच.

बौद्ध साहित्यातील ‘चर्यापद’मध्ये प्रारंभिक बंगालीच्या पाऊलखुणा दिसून येतात. नंतर तुर्कांचे बंगालवर आक्रमण झाले. त्यांनी केलेल्या अत्याचारात बंगाली मौन झाली. मग आपणास चंडिदासांच्या ‘श्रीकृष्ण कीर्तन’च्या रूपाने परत जीव आला. वैष्णव गीतांच्या रूपाने ती बहरली. मग ‘मंगल काव्या’चे युग अवतरले. मुकुंदराम चंडिमंगल या काळातले उल्लेखनीय कवी. ‘रामायण’, ‘महाभारत’सारख्या संस्कृती ग्रंथांची बंगाली रूपांतरे, भाषांतरे झाली. त्यांनी बंगालीला अनेक कथा, रूपके, मिथक भेट दिली. त्यातून बंगाली काव्याला धुमारे फुटले.

राजा राममोहन रॉय आणि ईश्वरचंद्र विद्यासागर प्रभृती मान्यवरांच्या विचार व सामाजिक चळवळीतून बंगालीमध्ये सुधारवादी नवयुग उदयाला आले. मायकेल मधुसुदन दत्तांनी ‘तिलोत्तमा संभव’(१८६०), ‘मेघनादवध’(१८६१) या काव्यग्रंथांनी महाकाव्याची परंपरा बंगालीमध्ये निर्माण केली. देवेंद्रनाथ टागोर(१८०८ ते १९०५), द्विजेंद्रनाथ टागोर (१८४० ते १९२६) यांच्या तत्त्वबोधिनी सभा, भगवतगीता भाष्य यातून बंगालीला एक वैचारिक अधिष्ठान प्राप्त झालं. टागोर घराण्याची परंपरा सत्येंद्रनाथ, ज्योतिरिंद्रनाथ यांनी वर्धिष्णू केली, पण कळस चढवला तो मात्र रवींद्रनाथ टागोरांनी (१८६१ ते १९४१).

रवींद्रनाथ टागोर आधुनिक बंगालीचे समग्र साहित्यिक. त्यांनी काव्य, कथा, नाटक, संगीत, कला सर्वच क्षेत्रांत आघाडी घेतली. कादंबऱ्या, निबंध, पत्र, समीक्षा, शिक्षण, राजनीती कोणत्या क्षेत्रात त्यांनी नाव कमावलं नाही? त्यांच्या या चतुरस्र अधिकारामुळे महात्मा गांधींवरही त्यांचा धाक होता. पुण्यात महात्मा गांधींनी प्राणांतिक उपोषण सुरू केल्यानंतर ते मरणाच्या दाढेत होते. भल्याभल्यांच्या विनंत्या गांधीजींनी ठोकरल्या. टागोरांच्या एका पत्राने महात्मा गांधींचे उपोषण सुटले. त्यात त्यांनी लिहिले होते, की ‘सत्याग्रह, उपोषणासारखी हत्यारं आपण रोज (सर्रास) वापरू लागलो की त्याचे महत्त्व राहात नाही. शिवाय नैतिकतेचा धाक एकाधिकार म्हणून वापरून आपण समाजमनाची हिंसा तर करीत नाही ना, याचा विचार करायला हवा.' त्यांच्या ‘गीतांजली’ला नोबेल मिळालं. ‘काबुलीवाला’ कथा बालसाहित्याचा दीपस्तंभ ठरली. त्यांचे ‘शांतिनिकेतन’ भारतीय आंतरशाखीय शिक्षणाची उगमस्थळी बनली. त्यांच्या ‘चोखेर बाली’ कादंबरीने बंगाली कादंबरीत क्रांती घडवून आणली.

रवींद्रनाथांप्रमाणेच विसाव्या शतकात शरतचंद्र चतर्जींनी आपल्या कथा, कादंबऱ्यांद्वारे सारे भारतीय साहित्य प्रभावित केले. ‘देवदास’, ‘परिणिता’, ‘श्रीकांत’, ‘चरित्रहीन’सारख्या कादंबऱ्या शतक उलटले, तरी वर्तमानावर मोहिनी ठेवून असणे, यातच त्यांच्या लेखन सामर्थ्याची प्रचिती येते.

गंगा, पद्मा, ब्रह्मपुत्रा, मेघना, यमुना (जमुना) नद्यांचा हा प्रदेश. नद्या सर्वच महानद्या. समुद्रासारख्या आर न पार. म्हणून त्यांना नद म्हटले जाते. या नद्यांच्या पाण्यात निरंतर सृजनाची शक्ती म्हणून प्रत्येक बंगाली साहित्यिक हा बहुप्रसव साहित्यिक असतो. ज्ञानपीठ विजेत्या सर्व बंगाली साहित्यिकांची साहित्यसूची डोळ्याखालून घालताना हे लक्षात येते. पहिले ज्ञानपीठ विजेते ताराशंकर बंदोपाध्याय. यांच्या साहित्यकृती किती? तर १०८. त्यात काव्य, कादंबरी, कथा, नाटक, आत्मकथा. साऱ्याचे वैविध्य. त्यांच्या ‘गणदेवता’ कादंबरीस हा पुरस्कार लाभला. दुसरे विजेते विष्णू डे. त्यांच्याही ४० साहित्यकृती आहेत. त्यांचा काव्यसंग्रह ‘स्मृति सत्ता भविष्यत‌्’ला सन १९७१चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. आशापूर्णा देवींनी किती लिहावं? ११३ कादंबऱ्या, २३ कथासंग्रह. छाती दडपून जाते. त्यांच्या ‘प्रथम प्रतिश्रुति’ कादंबरीस ज्ञानपीठाचा बहुमान लाभला. सन १९९१चा हा पुरस्कार पटकावणारे बंगाली साहित्यिक सुभाष मुखोपाध्याय असेच बहुप्रसव. त्यांनी कविता, कादंबरी, प्रवासवर्णन, बालसाहित्य, भाषांतर असे वैविध्यपूर्ण लेखन केले. सर्वसामान्यांच्या कैवारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाश्वेता देवी. त्यांना सन १९९६चा पुरस्कार समग्र लेखन कार्यार्थ बहाल करण्यात आला. त्यांच्या ‘अरण्येर अधिकार’ कादंबरीस साहित्य अकादमीने सन्मानित केले होते. ज्ञानपीठ मिळूनही त्या नाराज होत्या. आपण सामान्यांचा सर्वोदय करू न शकल्याची खंत, त्यांनी खालील ओळीत व्यक्त केली होती-
झिलमिलाती रोशनी की माला पहने
शहर जगमगा रहे है,
फिर भी देश में अंधकार फैला है
मानो अंधकारही हमारा दिन और रात है।

‘आमार-सोनार बांगलादेश’ वर्णन सार्थ ठरविणाऱ्या बांगलादेशाची तसलिमा नसरीन. तिने आपल्या साऱ्या कादंबऱ्या, आत्मकथांतून स्त्रीचं ठसठसतं दु:ख वेशीवर टांगत एकविसावं शतक स्त्री-पुरुष समानतेचं असलं पाहिजे, हे ठणकावून सांगत देश सोडला, पण लेखणी नाही मोडली. हे असतं ब्रह्मपुत्रेचं पाणी, गंगेचं तेज! आजच्या ऑगस्ट क्रांतिदिनी अशा क्रांतिकारी भाषा व साहित्याचं स्मरण म्हणजे मानवंदनाच!!
drsklawate@gmail.com