आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Dr. Mrinmayee Bhajak About Experiences Of US

गृहिणीपण (टेक ऑफ)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोकरी-व्यवसायाच्या निमित्तानं कायम व्यस्त असणाऱ्या स्त्रीनं पूर्णवेळ गृहिणी बनून राहणं, ही तशी अवघड गोष्ट. मात्र घड्याळाच्या काट्याशी बांधलेलं रुटीन जगण्यात जसं आव्हान असतं, तसंच कुठलंही रूटीन नसण्यातही गंमत असतेच की. अमेरिकेतल्या अशाच रुटीन नसलेल्या रूटीनची गंमत एन्जॉय करण्याचा लेखिकेचा हा अनुभव...
अमेरिकेत आल्यावर कसलासा अर्ज भरत होते. नाव, पत्ता वगैरे झाल्यावर ऑक्युपेशन हा रकाना आला आणि माझे हात जरासे थबकले आणि आजवर कधीही न लिहिलेलं ऑक्युपेशन मी तिथं लिहिलं, “गृहिणी.” खरं तर अमेरिकेला येण्याचा निर्णय घेतला तेव्हाच हे ठरलं होतं, पण तरीही हात अडखळलाच.

एकदा एका भारतीय घरी आम्ही काही भारतीय कुटुंबं एकत्र जमलो होतो. आम्ही धरून त्यातली चार-पाच कुटुंबं नव्यानेच अमेरिकेत आली होती. आधी छान गप्पाटप्पा झाल्या. मग खाणं झालं, मुलं एकमेकांत मिसळली आणि एकत्र खेळू लागली. आम्ही बायकाही डायनिंग टेबलवर जमलो. गप्पा सुरू झाल्या. कुणी नोकरी सोडून आली होती, कुणी सीएची प्रॅक्टिस सोडून. कुणाला साधीशी नोकरी सोडल्याचं फार काही वाटत नव्हतं, तर कुणी करिअरच्या बाबतीत हळहळत होती. कुणी नवीन लग्न होऊन अमेरिकेचा नवरा मिळाल्याच्या आनंदात होती, तर कुणी तिथेही आणि इथेही गृहिणीच. त्यामुळे ‘ना खंत ना खेद’वाली, तर कुणी इथेही नोकरी करण्याचा निश्चयच करून आलेली. पण तरीही बहुतेकींनी सहजरीत्या किंवा नाइलाज म्हणून गृहिणीपद स्वीकारलेलं होतं. भारतात कायम नोकरी-व्यवसायात व्यग्र असणाऱ्यांना हे गृहिणीपद पचवणं तसं कठीणच.

सुरुवातीचा महिना तरी घर, सामान, शाळा यांमध्ये गेला. हळूहळू रुटिन लागलं. सकाळी नवरा ऑफिसला, मुलगा शाळेला गेला की, पुढे जवळजवळ आठ तास रिकामा वेळ. हळूहळू या गृहिणीपणाचीही सवय झाली. अर्थातच पूर्णवेळ गृहिणी होणं, ही काही सोपी गोष्ट नव्हती. पूर्ण वेळ रिकामा असल्यामुळे घरातल्या कामांची चालढकलच व्हायची. एकदा कॉम्प्युटर चालू केला की, तासन‌्तास फेसबुक आणि चॅटिंग, यूट्यूब सुरूच राहायचं आणि नंतर मात्र वेळ वाया गेल्याची टोचणी लागायची. घरातल्या कामांमध्येही खूप वेळ जायचा. एकूण वेळ तसा बरा जायचा. फार काही कंटाळा वगैरे नाही यायचा; पण सारखी खंत वाटत राहायची की, आपण काहीच करत नाही. विचार करता-करता एक कल्पना सुचली की, या गृहिणीपदाचा पूर्णपणे आनंद घ्यायचा. जे आजवर कधीही केलं नाही ते करायचं. आणि माझं विचारचक्र सुरू झालं. मला आठवलं की, पुण्यात असताना आमच्या सोसायटीमध्ये मुलांना शाळेला सोडल्यानंतर एक बायकांचा गट बागेत बसायचा. त्यांच्या गप्पाटप्पा नंतर बराच वेळ चालायच्या. कधी कधी त्या बागेत खाऊ घेऊन यायच्या आणि मजा करायच्या. किटी पार्टीला तर त्यांची खूपच मजा असायची. या गोष्टी आजवर फक्त पाहिल्या होत्या, ऐकल्या होत्या, कधीतरी नाकंही मुरडली होती; पण कधीच अनुभवल्या नव्हत्या. गोष्टी खरं तर खूप छोट्या छोट्या होत्या आणि त्यातून आनंद घ्यायचा म्हटला तर आनंददायीही होत्या. ऑफिसला जाताना नवऱ्याला दारापर्यंत सोडायला जाणं, बाल्कनीतून बाय करणं, मुलाच्या, नवऱ्याच्या आणि स्वतःच्याही आवडीचे नवनवीन पदार्थ करून बघणं, फेसबुकवर जुन्या मित्रमैत्रिणींशी जोडलं जाणं, मैत्रिणींशी मन भरून गप्पा मारणं, लांबलचक पत्र (म्हणजे मेल) लिहिणं, घरातला पसारा तसाच पडून देऊन बेडवर लोळत पुस्तक वाचणं, कॉफीचा मग घेऊन बाल्कनीत समोरच्या लेकच्या लाटांवर झुलणं, कधीतरी ढगांत वाहावत जाणं, आवडती गाणी, आवडते सिनेमे बघणं, बाहेर फेरफटका मारून येणं, खाली कुणी भेटलं तर उगीचच इकडच्या तिकडच्या गप्पा मारून येणं या आणि यांसारख्या अनेक गोष्टी मी एकटीही करू शकत होते आणि त्या मी करू लागले. इथे काहीच रुटिन नव्हतं आणि ते रुटिन नसणंही मी एन्जॉय करायला लागले. हळूहळू अनेक भारतीय मैत्रिणी मिळत गेल्या, मग आणखी मजा यायला लागली. बहुतेक सगळ्याच नव्यानं गृहिणी झालेल्या. मग किटी पार्टी सुरू करायची, असं ठरलं. त्या निमित्ताने नटणं- मुरडणंही मुद्दाम करायचं, असा मी आग्रह धरला.

“इथे आल्यावर आयुष्यात पहिल्यांदाच मी आरशासमोर एवढा वेळ घालवतेय. आजवर स्वतःकडे पाहायलाही वेळ मिळाला नव्हता.” प्रज्ञा.
“हो ना. प्रोफेशनल कॉलेजला असल्याने कॉलेजच्या दिवसातही कधी एवढा वेळ आरशासमोर नव्हता घालवला.” नीता.
“मी आता वेगवेगळ्या ठिकाणी जाताना वेगवेगळी पर्स घेऊन जाते, ज्या गोष्टीचं मला नेहमी अप्रूप वाटायचं.” सोनाली.
“मॅचिंग टिकली, मॅचिंग बांगड्या, नखांना आकार देणे, नेलपॉलिश लावणे या गोष्टी आजवर कधी केल्याच नव्हत्या गं.” मीरा.
खरं तर या सगळ्या अशा गोष्टी होत्या की, कधी करून पहिल्या नव्हत्या. साध्याच होत्या; पण गरजेच्या नव्हत्या म्हणून धकाधकीच्या आयुष्यात हातातून निसटून गेलेल्या होत्या.

थोड्या काळासाठी येणाऱ्यांसाठी या गोष्टी छानच आहेत; पण ज्यांना जास्त काळ इथं राहायचं आहे आणि नोकरी करायची आहे, त्यांना वर्क परमिट मिळेपर्यंत तरी या गोष्टी करायला काय हरकत आहे? गावातल्या लायब्ररीचा शोध लागला आणि एक नवं दालनच उघडलं. अमेरिकेत स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी अनेक गोष्टी असतात. त्यात आपल्या आवडीच्या, घराजवळच्या गोष्टी निवडून तिकडे जायला लागलं की, आपला वेळ चांगला जातोच; पण आपण काहीतरी काम करतोय, ही भावनाही छान वाटते. त्या निमित्ताने घराबाहेर पडणं होतं. तिथल्या लोकांशी ओळखी होतात, संवाद होतो आणि त्यांचं जगही आपल्याला कळतं. आपलं जगही विस्तारतं. आणि मग नकोसं वाटणारं गृहिणीपण आयुष्यातील सुंदर ठेवा देऊन जातं.

drmrunmayeeb@gmail.com