आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरा मायनस मूल प्लस (काटा रुते कुणाला)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूल न होण्यासाठी आपण कारणीभूत आहोत, ही बाब पुरुषांना स्वीकारणं जवळपास अशक्यच असतं. कारण अर्थातच पुरुषी अहंकार. मात्र यातूनही एखाद्या स्त्रीने जर आर्टिफिशियल इनसेमिनेशनचा मार्ग काढलाच, तर अशा वेळी पहिला बळी जातो तो त्या नात्याचा. अशा एका बळी गेलेल्या नात्याची ही गोष्ट...
स्त्रीला मातृत्वाची ओढ असते. त्यासाठी लग्नाची समाजमान्य चौकट व नवरा-बायको नात्यात बसवून घेणं अपरिहार्य. अपवाद आहेत, परंतु तुरळक. समाज परंपरा आणि कायदेशीर बाजूनेही सुरक्षितता हवी असते नात्याला. पत्नी व मूल म्हणून लीगल स्टेटस व सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त व्हायला लग्न ही रास्त बाब. तसं तर लग्न ही गुंतागुंतीची, अनुभवाची, वैताग, त्रास, पुरेपूर चिडचिड आणणारी बाब. डोळ्यांना न दिसणारी, स्पर्शाला न जाणवणारी, सामान्य तर्काचे नियम झुगारणारी, व्यावहारिक शहाणपणाचा धुव्वा उडविणारी ही बाब. अर्थात तरीही लग्न हवं, करावं असं वाटतं. लिव्ह इन रिलेशन हा लग्नाला पर्याय नाही. शिवाय लग्नाच्या फायद्या-तोट्याचा लेखाजोखा मांडल्यास गुणवत्ता आणि जमेचे पारडे जड होते, हे खरेच. ‘ज्याचं जळतं त्याला कळतं,’ असाच एका संसाराचा वास्तव अनुभव जवळचीचा.

निकिताचं लग्न तिच्या वडिलांनी तिच्यावर जणू मनाविरुद्ध लादलेलं. वडील ख्यातनाम डॉक्टर. त्यांच्याकडे पोस्ट-ग्रॅज्युएटसाठी आलेला स्टुडंट
निशीकांत. त्याची नम्रता, बुद्धिमत्ता, व्यवसायाशी बांधिलकी, स्वभावातील ऋजुता हे सगळं भावणारं. दिसायलाही स्मार्ट. भावी जावई म्हणूनच निकिताचे पप्पा त्याच्याकडे पाहायला लागले. निकिताची खरं तर वर्गमित्र परेशशी मैत्री व प्रेमाचे बंध जुळण्याच्या मार्गावर. पण तो थोडासा अबोल, शब्दांपेक्षा नजरेनं बोलणारा. तरीही प्रेमाचा प्रतिसाद व कबुली हवी तेवढी व तशी नाहीच त्याच्याकडून निकिताला, पण प्रेम नक्कीच. मात्र निकिताच्या वडिलांनी निशिकांतशी लग्न ठरवलं आणि झालंही.

सहवासाने प्रेम निर्माण होतं आणि संस्कार म्हणूनही नवऱ्याच्या मागंपुढं राहात, रुंजी घालत निकिता प्रेमाचा संसार करायला लागली. पप्पांचे हॉस्पिटल, पैसा, प्रतिष्ठा, प्रापर्टी आता निशिकांतचीच. एकुलती एक मुलगी व जावईच तर हक्कदार. सगळं कसं मम्मी-पप्पांना खूश ठेवणारं. हल्ली तर नातवंड हवं, अशी भुणभुण लावणारे पप्पा व त्यास दुजोरा देणारी आपली मम्मी यामुळे निकिता वैतागत असे. मात्र बोलणार काय नि कसं?

निकिताला प्रश्न पडायला लागला की, निशिकांत नवरा म्हणून स्वीकारलाय खरा आपण, पत्नी म्हणून कर्तव्ये पार पाडतोय; तरीही त्याच्या सहवासाने आपण मोहरत नाही, मन फुलत नाही, शरीर डुलत नाही. त्याचा अंश शरीरात रुजावा, असं मनापासून वाटत नाही, असं नाही. पण तरीही तो रुजत नाही. आपण परेशला विसरलो तर नाही ना, असाही प्रश्न कधीमधी मनात यायचा. अर्थात ते तितकंसं खरं नव्हतं. निशिकांत निकिताच्या सौंदर्यावर खूप खूश, फिदाच जणू. समाजात निशिकांतची पत्नी म्हणून मान-सन्मान. त्याचा तिला अभिमानसुद्धा. पण हळूहळू त्याची नाराजी निकिताला गर्भधारणा होत नाही म्हणून. दोघांनी तपासणी करून घ्यायचं ठरवलं. दोष निशिकांतमध्ये आहे, असा रिपोर्ट हाती आला आणि तो कोसळलाच मनाने.

त्याचा इगो दुखवला. पुरुषार्थाला ठेच पोहोचली. मूल न होण्यामागचे कारण आपण आहोत, हे मान्य करणे अवघड. त्याहीपेक्षा ते इतरांना कळू नये, म्हणून निकितावर जबरदस्त प्रेशर. शिवाय स्वत:ची कमतरता अमान्य करीत त्याचा राग, चिडचिड, संताप निकितावर. हल्ली तर रोजचेच ड्रिंक घेणे, बडबड, निकितावर संतापणं, आरडाओरडा. आयुष्य बरबाद होऊन चाललंय निकिताचं. जातायेता टोमणे, सासऱ्याला दूषणं देणं तर उठता-बसता “टेंभा मिरवू नको, मिजास करू नको, मस्तवालपणा वाढलाय, रिपोर्ट खोटा आहे, मी इतका हेल्दी आहे, कसा दोष असणार? तू लबाडी केली आहेस...’ वगैरे बोलणे. त्रस्त, संतप्त होऊन जायची निकिता. शिवाय कसं होत नाही मूल बघतोच, असे बडबडत दारू पिऊन रोजचीच रात्री निकितावर जबरदस्ती. जणू एक प्रकारचा बलात्कारच! सोसून सोसणार किती? तोंड दाबून बुक्क्याचा मार.
शेवटी निकिताने आर्टिफिशियल इनसेमिनेशनचा मार्ग स्वीकारलाच. मात्र निकिताचं गरोदरपण व गर्भाशयात मूल वाढविणं म्हणजे अग्निदिव्य. कारण निशिकांतचे जहरी बोल व खुनशी नजर. तरीही निसर्गक्रमानुसार निकिताला गोंडस मुलगा झाला. निशिकांत सोडून सगळेच सुखावलेले. आई म्हणून निकिता तृप्त, खूश, आनंदात.

प्राक्तन असं की, निनाद हा निकिताचा मुलगा म्हणून त्याचाही निशिकांत दुस्वास करायचा. तो दिसायलाही आईसारखाच. त्यामुळे निनाद डोळ्यासमोर नकोसा. उच्छाद मांडणं नेहमीचंच. सत्य माहीत होते त्या नवराबायकोंनाच. सांगायची चोरीच. सत्य उघड न करणं हा खरं तर निकितावर अन्याय. तरीही ती पथ्य पाळतेय. निशिकांतचं मन सांभाळायचं तरी किती? कसं? किती काळ? खरं तर हे आता आयुष्यभर सोसणं निकिताच्या माथी. वडिलांची तिच्यावर अतोनात माया आणि आईची ती जीव की प्राण. वडिलांची प्रतिष्ठा, आईचे संस्कार त्यामुळे निशिकांतला ती घटस्फोट देणार नव्हतीच. शिवाय तिचा दोष नव्हताच. आईशी मनमोकळेपणाने बोललीच निकिता, अगदी असह्य झाल्यावर. आईला तर हे सगळं धक्कादायक.

इतकी वर्षे आपल्याच घरात हे मुलीनं कसं सोसलं तेही एकटेपणाने? व्यसनाधीन होत चाललाय निशिकांत. पण निकिता निनादवर लक्ष केंद्रित करून जगतेय. आईपण संपूर्णपणे जगतेय. आता निशिकांतशी काही देणं-घेणं नाही, असं ठरवून त्याच्याशी वागतेय. आता ‘नवरा मायनस-निनाद प्लस’ हेच ब्रीद कवटाळून हळूहळू या ‘रोज मरे त्याला कोण रडे’ या न्यायाने गेंड्याचं कातडे घेऊन वावरतेय निकिता. तरीही भोग भोगणं सुरूच आहे.
कारण काय?
बातम्या आणखी आहेत...