आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Dr. Pradeep Awate In Rasik About Other Type Of Love

प्रेम कुणावरही करावं…!(अडीच अक्षरांची गोष्ट)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एरवी, स्वत:ची प्रेमकथा प्रत्यक्ष जगताना युगुलांच्या हृदयाची धडधड वाढलेली असते, मात्र पोटच्या मुलीचा खून करणाऱ्या समुंदर सिंगला मोकळ्या मनाने माफ करत प्रेमभावाचे अद्भुत दर्शन घडवणारी राणी मारियाच्या आईची कृती ऐकणाऱ्यांच्या हृदयाचा ठोका चुकवते...
कुणाची समाधी आहे ही? इतक्या दूर जंगलात, या टेकडीवर का बांधली असेल ही समाधी?
वारा वाहतो आहे, आजूबाजूच्या झाडांचा पालापाचोळा त्या समाधीच्या चौथऱ्यावर सतत पडत राहतो. इतक्यात तो त्या चौथऱ्याशी येतो. सदरा-पायजमा, शिडशिडीत बांधा… आयुष्यातील ऊनपावसाने लिहिलेली कहाणी त्याच्या चेहऱ्यावर दिसते आहे. तो अत्यंत भक्तिभावाने समाधीवर साचलेला पालापाचोळा दूर करतो, आणि शेतात पिकलेल्या या वर्षीच्या धान्याचा वानवळा त्या समाधीवर अर्पण करतो. मनापासून समाधीला नमस्कार करतो आणि समाधीला मिठी मारल्यासारखा काही काळ बसून राहतो, दूरवर पाहात. त्याच्या डोळ्यांतून दोन नद्या उगम पावतात आणि त्याच्या गालावरून समांतर वाहू लागतात...
वारा सैरभैर होऊन वाहू लागतो, त्याच्या गालावरून वाहणारे पाणी पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागतो. त्या शिवाच्या टेकडीवर येणाऱ्या-जाणाऱ्या पांथस्थाला वारा तिची कहाणी सांगू लागतो…

ती खरं तर केरळमध्ये जन्मली. मेरी कुंजू वट्टालील हे तिचे मूळ नाव. सात भावंडांमध्ये दुसरी...! पण तिचा ओढा प्रथमपासून धर्माकडे, अध्यात्माकडे. तिने ख्रिश्चन धर्मोपदेशकासाठी आवश्यक रीतसर शिक्षण घेतले आणि १९७४मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी सिस्टर राणी मारिया म्हणून मिशनरी कामात दाखल झाली. १९९४मध्ये मध्य प्रदेशमधील उदयपूर येथील स्नेहसदन कॉन्वेन्टच्या समाजसेवा विभागाची जबाबदारी राणी मारियावर सोपविण्यात आली. ती इथं आली, तेव्हा या कॉन्वेन्टकडे असणारी सारी जागा निव्वळ दलदलीची होती, पण सिस्टर राणी मारियानं या जागेचा कायापालट केला. उदयपूर हा आदिवासी भाग. निसर्गाच्या सान्निध्यात राहणारी ही निरागस पाखरे, पण त्यांना आधुनिक जगाचे रीतीरिवाज, छक्केपंजे ठावे नाहीत. तिथले मोठमोठे जमीनदार त्यांचे शोषण करत. रुपया-दोन रुपयांवर दिवस दिवस राबवित. कुणी विरोध केला, तर त्यांना पोलिसांची भीती दाखवत. राणी मारिया हे पाहात होती. या अादिवासींना एकत्र करून तिने काम सुरू केले. त्यांचे बचत गट तयार केले. त्यांना बँक व्यवहार शिकविले, त्यांना अनेक सरकारी योजनांमधून मदत मिळवून दिली. आदिवासींवर लादलेले खोटे-नाटे खटले चालविण्याकरिता तिने त्यांना कायद्याची मदत मिळवून दिली. अगदी अल्पावधीत सिस्टर राणी या परिसरातील घराघरातील एक व्यक्ती होऊन गेली. तिने तिच्यासोबत आणलेल्या सूर्यकिरणांची ऊब या भागातील आदिवासींना मिळू लागली. उदयपूर भागातील आदिवासी शहाणा होऊ लागला.

तो याच भागातला. समुंदर सिंग त्याचं नाव. एका शेतकऱ्याचा पोर. सात भावंडांत सगळ्यांत थोरला. पण वडिलांच्या साध्याभोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन नातेवाइकांनी आणि मित्रांनी पैसे बुडविले आणि समुंदरचं घर एकाएकी ढासळलं. शिक्षण तर काही नव्हतंच. सहावीतूनच शाळा सोडलेली. वाईट लोकांची संगत लागली. समुंदर गावातल्या जमीनदार नेत्यासोबत फिरू लागला. हा जमीनदार लोकांना लुभावणारी गोड गोड भाषणं करायचा. त्याच्या सभा-मोर्चांना जाणे, हेच समुंदर सिंगचे मुख्य काम बनले. तो त्याच्या गावचा म्होरक्या बनला, जमीनदाराचा खास माणूस बनला. इकडे सिस्टर राणी मारियाचे काम आदिवासींमध्ये नवी जागृती निर्माण करत होते. ही चाळिशीची बाई हळूहळू आपल्या साम्राज्याला सुरुंग लावणार, हे जमीनदाराच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. एका ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी जमीनदाराने पोलिसांना हाताशी धरून विरोधी गटातील आदिवासी लॉकअपमध्ये टाकले; पण सिस्टर राणी मारियाने वकिलांची मदत घेऊन, या आदिवासींना त्याच रात्री सोडविले. जमीनदाराच्या तळपायाची आग मस्तकाला गेली.

२५ फेब्रुवारी १९९५चा दिवस होता. राणी मारियाला काही दिवसांकरिता आपल्या गावी केरळला जायचे होते. तिने इंदोरहून भोपाळकडे जाणारी बस पकडली. बस नोचिमपूरच्या टेकड्यांजवळ आल्यावर बसमधील एका प्रवाशानं ड्रायव्हरला बस थांबवायला सांगितली. बस थांबली, तो प्रवासी खाली उतरला. त्यानं समोरच्या दगडावर नारळ फोडला. शिवाची टेकडी म्हणून अनेकांची श्रद्धा होती या टेकड्यांवर. प्रवासी नारळाचा प्रसाद सर्व प्रवाशांना वाटू लागला. प्रसाद वाटता वाटता तो सिस्टर राणी मारियाजवळ आला. तिने त्याच्या चाकूला लटकलेला नारळाचा तुकडा घेतला आणि प्रसन्न हसत म्हणाली, “बहोत खूश दिख रहे हो आप. कुछ खास बात?”

“खूश होने का ये कारण है…”, असे म्हणत त्यानं तिच्या चेहऱ्यावर चाकूने सपासप वार केले आणि तिला ओढत बसखाली खेचले. सारे प्रवासी सैरभैर झाले. एक नाही दोन नाही, तब्बल ५४ वार केले त्यानं.
समुंदर सिंग होता तो…!
बसमधील पन्नासेक प्रवाशांसमोर त्याने सिस्टर राणी मारियाचा निर्दय खून केला होता...

लोकांच्या लाडक्या सिस्टर राणी मारियाच्या अंत्ययात्रेला पंधरा हजार लोक हजर होते. ख्रिश्चन, हिंदू, स्थानिक आदिवासी असे सारे...
समुंदर सिंगला लगोलग अटक झाली. त्याला हा खून करण्यासाठी उद्युक्त केलेल्या जमीनदाराने पद्धतशीररीत्या स्वतःची सुटका करून घेतली, आणि त्याचे नाव न घेण्याची समुंदर सिंगला धमकीही दिली. १९९७मध्ये समुंदर सिंगला जन्मठेप झाली. त्याची बायको, भावंडे, मित्र कोणीही त्याला भेटायला गेले नाहीत. इंदोरच्या कारागृहात समुंदर सिंग रागाने आणि पश्चात्तापाने जळत होता. त्याला आत्महत्या करावी वाटत होती, पण त्यापूर्वी हे कृत्य आपल्याला करायला भाग पाडलेल्या जमीनदाराचा आपण सूड घेतला पाहिजे, असेही वाटत होते. आपण हे काय करून बसलो, हेच त्याला उमगत नव्हते.

सूड आणि पश्चात्तापाच्या दुहेरी आगीत जळणाऱ्या समुंदर सिंगला २००२मध्ये एके दिवशी स्वामी सदानंद भेटले. स्वामी कॅथॉलिक धर्मगुरू होते. नरसिंगपूरला त्यांचा सच्चिदानंद आश्रम होता. त्यांनी समुंदर सिंगला समजावले, त्याला समजावून घेतले. त्याच्या मनातून सूडाची भावना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केले. तुझा प्रामाणिक पश्चात्ताप हीच तुझी खरी शिक्षा आहे, हे मनी रुजविले.

“कोण माफ करेल मला, कोण क्षमा करेल, कोण प्रेम करेल माझ्यावर?” समुंदर सिंग स्वतःला विचारत होता. बायको म्हणणारी भेटायला येणे तर दूरच, पण तिने दुसऱ्याशी लग्न केले. एकुलता एक मुलगा मरण पावला. आता मला कोण समजावून घेईल? कोण पोटात घेईल माझा गुन्हा? समुंदर स्वतःशीच भांडत होता. तो तुरुंगाच्या गजातून पाहात होता, त्याच्या समोर एक सावळीशी मुलगी उभी होती. सेल्मी तिचे नाव…! सिस्टर राणी मारियाची सख्खी धाकटी बहीण. त्याचा विश्वास बसत नव्हता, आपण जिला मारलं, तिची सख्खी बहीण आपल्याला भेटायला आली आहे, आणि सांगते आहे- “समुंदर, अरे मी माफ केले आहे तुला. कारण आभाळीच्या बापाने तुला क्षमा केली आहे.” तो वादळात वेल थरथरावी तसा थरथरत होता. काय बोलते आहे ही सिस्टर सेल्मी. आज राखी पौर्णिमा आहे. तिने राखी आणली आहे बांधायला. त्याच्या डोळ्यांतून ओघळणारे पाणी थांबायला तयार नव्हते. सेल्मीने त्याला राखी बांधली. सारा तुरुंग आवाक होऊन पाहात होता. एक ख्रिश्चन बहीण आणि एक हिंदू भाऊ. काही दिवसांनी राणी मारियाची आई समुंदरला जेलमध्ये येऊन भेटली.

किती प्रेमाने तिने त्याला जवळ घेतले. म्हणाली, “माझा मुलगा आहेस तू...!”
“इतका कसा गं वाया गेलो आई मी?” समुंदर स्वतःला विचारत होता. पण या प्रेमानं समुंदर आतून बदलत होता. त्याचं खारेपण मावळू लागलं होतं. शहाळ्याची गोडी अंतःकरणात ओतप्रोत भरत होती. राणी मारियाच्या कुटुंबाने कोर्टाला अर्ज करून समुंदरची उरलेली शिक्षा माफ करण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करण्यात आली आणि २००६मध्ये समुंदर सिंगची तुरुंगातून सुटका झाली. तो जेलबाहेर पडला, तेव्हा त्याला न्यायला घरचे, मित्र कोणीच आले नाही. समुंदर स्वामी सदानंदांसोबत थेट केरळला राणी मारियाच्या आईवडिलांना, भावंडांना भेटायला गेला. राणीचे आजारी वडील, आई, दोन भाऊ साऱ्यांनी त्याचे मनापासून स्वागत केले. राणी आणि सेल्मीच्या आईने त्याच्या हाताचे चुंबन घेतले, “माझं चुकलेलं लेकरु, आज पुन्हा घरी आलं.”

समुंदर सिंगला नवं घर मिळालं. नवे आई बाप, नवी भावंडं मिळाली. राणी मारियाच्या क्षमाशील आणि प्रेमळ कुटुंबाने त्याचा पुरा कायापालट केला आहे. आज तो इंदोरजवळ शेती करतो. आपली प्रत्येक सुगी तो राणी मारियाच्या समाधीजवळ अर्पण करतो. “मी माझ्या बहिणीच्या- सिस्टर राणी मारियाच्या वाटेने चाललो आहे.” तो स्वतःला पुन:पुन्हा सांगत राहतो.

नोचामपूर टेकड्यांवरला वारा गात असतो -
प्रेम कुणावरही करावं,
कारण
प्रेम आहे
माणसाच्या संस्कृतीचा सारांश
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष
आणि भविष्यातील
त्याच्या अभ्युदयाची आशा,
एकमेव…!

dr.pradip.awate@gmail.com