आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्‍न तर विचारा, उत्तर सापडेलच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक जणी नकारात्मक विचारांची कास धरत, आपल्याला अमुक एक गोष्ट करायची होती पण आपण करू शकलो नाही, याचे शल्य उरात बाळगून आयुष्य कुढत जगतात. खरा प्रश्न त्यांचा असतो. खरंच इतकं कठीण असतं का अपूर्ण स्वप्न, इच्छा घेऊन आयुष्याचं समायोजन करणं? सुखांशी संधान साधत जगण्यासाठी पर्यायच उपलब्ध नसतात का?
अनंत अमुची ध्येयासक्ती,
अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला…
अशा जिद्दीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्वत:ला सिद्ध करण्याचं आव्हान समर्थपणे पेलतेय आजची स्त्री. स्वत:च्या स्वप्नांना गवसणी घालून समाधानाने कार्यरत असणाऱ्या प्रत्येकीला मानाचा मुजरा. पण किती तरी मुली पाहण्यात येतात की, ज्या शिकत असताना वा लग्नापूर्वी खूप ध्येयवादी होत्या, आयुष्यात खूप काही मोठं करण्याची स्वप्नं उराशी बाळगून धडपडत होत्या, खेळाडू होत्या, मैदान गाजवून लौकिक मिळवला होता पण आज कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करताना, वेगवेगळ्या भूमिका निभावताना त्यांची स्वप्नं, ध्येयं कुठेतरी मनाच्या अडगळीत मरणासन्न, बंदिस्त अवस्थेत गेलेली आहेत. संसारात स्थिरावलेल्या आणि कुटुंब केंद्रस्थानी असणाऱ्या स्त्रियांचा विचार केला तर कितीतरी स्त्रिया आजूबाजूला अशा दिसतात की, ज्या संसारात रमल्या आहेत पण त्यांच्याकडे पाहिले तर सतत वाटत राहते या अस्वस्थ आहेत, असमाधानी आहेत. खूपदा असे वाटायचे, आपण उगाच जास्त विचार करतोय; असे काही नसेल. पण हस्ताक्षर मनोविश्लेषणासाठी माझ्याकडे येणाऱ्या अनेक स्त्रियांच्या अक्षरात एक गोष्ट वारंवार दिसू लागली ती म्हणजे, सगळे काही आहे पण काही तरी कमी आहे. कशाची उणीव आहे ही? कोणती खंत असेल? उत्तर शोधताना लक्षात आले की, कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावताना एकाच वेळी अनेक भूमिका स्त्री निभावते. तिच्या आयुष्यात सातत्याने अनेक बदल होत असतात. हे बदल वेगवान असतात. स्वत:पेक्षा कुटुंबातील इतर सदस्यांच्या इच्छा, स्वप्न पूर्ण करण्याकडे तिचा कल असतो. रोजच्या दिनचर्येत स्वत:शी संवाद साधायलाही उसंत मिळत नाही. ती बदलत राहते फक्त कॅलेंडरची फडफडणारी पानं. पण कुठेतरी सलणाऱ्या अपूर्ण इच्छा, स्वप्नं मात्र जगण्यातल्या प्रत्येक प्रसंगात डोकावत असतात तिच्याही नकळत. आज या विषयावर लिहिताना आठवतेय ती कमल. कमल तरुण, उत्साही, काहीतरी नवीन करण्याची धडपड असणारी सालस तरुणी. अभिनयाच्या क्षेत्रात विशेष आवड आणि गुणवत्ता असणारी. अभिनयाच्या क्षेत्रात शालेय जीवनापासूनच वेगळा ठसा उमटवत एक स्थान तिने निर्माण केले होते. महाविद्यालयीन शिक्षण घेताना हौशी, व्यावसायिक रंगभूमीवर स्वत:ची छाप उमटवली होती तिने. तिच्या यशाचा आणि कर्तृत्वाचा हा आलेख असाच उंचावत होता. दरम्यानच्या काळात तिच्याच क्षेत्रातील तरुणाशी तिने प्रेमविवाह केला. सामंजस्याने त्यांचा संसार सुरू होता. त्या दोघांमध्ये ‘अहं’शी संबंधित समस्या, स्पर्धा, चढाओढ असे काही नव्हते. आयुष्य पुढे सरकत होते. जीवनात स्थैर्य यावे, यासाठी म्हणून त्यांनी एक अभिनय शाळा सुरू केली. घरातील जबाबदारी आणि शाळेची जबाबदारी या दोन्हीत कमल उत्साहाने कार्य करत होती. हे करत असताना तिची रंगभूमीवरची भूमिका मात्र हरवू लागली होती. हे सगळे इतके वेगाने होते की, त्याची त्या वेळी तिला जाणीवच झाली नाही. कालांतराने तिची धावपळ कमी झाली व दिनक्रम सरावाचा झाला. पस्तिशीच्या जवळपास येताना तिच्या लक्षात आले की, आपले passion तर कधीच मागे सुटून गेले. ही जाणीव होताच मनात आतल्या बंद रेडिओची खरखर सुरू झाली. सगळे चांगले असूनही काही तरी कमी आहे, असे वाटू लागले. अस्वस्थता जाणवू लागली. तिच्या वागण्यात चिडचिड, वैताग नकळत डोकावू लागला होता, जवळच्या लोकांकडून ‘ही अशी नव्हती, ही अलीकडे अशी का वागते?’ अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या.
कमल हे प्रातिनिधिक उदाहरण. वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या वा काम न करणाऱ्या पण खूप स्वप्नं बघणाऱ्या, ही स्वप्नं कधीतरी पूर्ण करू, अशी इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येक स्त्रीमध्ये अशी अस्वस्थता डोकावताना दिसते. खूप स्त्रियांना ही अस्वस्थता कशाची आहे नि ती कुठून येतेय, हे लक्षातच येत नाही आणि या अस्वस्थतेला जसं जमेल तसं हाताळण्याचा त्या प्रयत्न करतात. काहींना ते जमते; पण काही मात्र नकारात्मकतेकडे झुकतात. ज्या मार्ग काढू पाहतात त्या सर्वात आधी या अस्वस्थतेमागची कारणे शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा कल या संदर्भातल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याकडे असतो. कोणती स्वप्नं, इच्छा, कोणत्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत, याचा धांडोळा त्या घेऊन त्यातून पर्याय शोधून मार्गक्रमण करू लागतात. मात्र ज्या नकारात्मक विचारांची कास धरतात, आपल्याला अमुक एक गोष्ट करायची होती पण करू शकलो नाही, याचे शल्य उरात बाळगून पुढचे आयुष्य कुढत जगतात. खरा प्रश्न त्यांचा असतो. खरंच इतकं कठीण असतं का अपूर्ण स्वप्न, इच्छा घेऊन आयुष्याचं समायोजन करणं? सुखांशी संधान साधत जगण्यासाठी पर्यायच उपलब्ध नसतात का? जे झालंय, जे हातातून निसटलंय ते पुन्हा पूर्ववत तर होणार नसतं, पण त्यातून मार्ग नक्कीच काढता येऊ शकतात. यासाठी काय करता येईल, याचा विचार केला तर सर्वप्रथम परिस्थितीचा स्वीकार करावा, मनात कोणताही अपराधीभाव न बाळगता. अपूर्ण स्वप्न आजच्या परिस्थितीत खरंच वास्तवात उतरवता येऊ शकतं का? त्यानंतर सद्य:परिस्थितीत अपूर्ण इच्छांच्या पूर्ततेसाठी काही नियोजन करता येईल का? ते पूर्ण करण्याची आंतरिक ऊर्मी किती शिल्लक आहे? हे एकदा तपासून बघावे. एखादी अशी चांगली गोष्ट करावी, की जी केल्याने आपल्याला समाधान मिळतंय. आयुष्यात घडणाऱ्या घटना-प्रसंगांशी समायोजन तर करावंच लागणार असतं, मग जे आहे ते मनातून स्वीकारले तर त्रास कमी होतो आणि जगणं सुसह्य होऊन त्याचे आयुष्यावर होणारे नकारात्मक परिणाम नक्कीच टाळता येऊ शकतात. आयुष्य जगायचं आहेच तर छोट्या छोट्या गोष्टींच्या स्वीकारातून मिळणाऱ्या समाधानाने, आनंदाने जगण्याचा स्वत:चा अधिकार आपणच का गमवायचा?
आणि छोट्या छोट्या गोष्टी करूनही मनाचं समाधान होत नसेल, आतले स्वप्न स्वस्थ बसू देत नसेल तर आतल्या आत घुसमटण्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकून बघा, एखादं छोटंसं पण ऊर्मी असलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न तर करून बघा. सुरुवातीला खूप भीती वाटेल, आता जमेल का? नाही जमले तर लोक काय म्हणतील? अशा अनेक विचारांनी अडखळायला होईल; पण तुमची आंतरिक इच्छा तुमची ताकद ठरेल. फक्त एक पाऊल तुमच्यातल्या स्वप्नाकडे टाकून तर पाहा.
डॉ. निशिगंधा व्यवहारे, औरंगाबाद
v.nishigandha@gmail.com