आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न आरोग्याचे माझ्या मनातले...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेल्थ टिप्स :
तोंडाला येणारी दुर्गंधी कशी टाळावी?
तोंडाच्या आतल्या भागाची योग्य स्वच्छता न राखल्यामुळे अनेकांना तोंडाला दुर्गंधी येण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते. मात्र दुर्गंधीपासून बचाव करण्यासाठी काही साधे सोपे उपाय आहेत. प्रत्येक जेवणानंतर दात ब्रशने स्वच्छ करा. मधल्या वेळेतले खाणे आणि चहा प्याल्यानंतर नियमितपणे गुळण्या करा. जिभेवर जमा होणारे किटाणू हे मुखदुर्गंधीचं प्रमुख कारण आहे, त्यामुळे टंगक्लीनरने जीभ व्यवस्थित साफ करा. दही आणि ग्रीन टीचे सेवन करा. यानंतरही ही समस्या कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण कायमची मुखदुर्गंधी ही मधुमेह किंवा यकृत, मूत्रपिंडं, वा हिरड्यांच्या आजारांमधील एक लक्षणही असू शकते.
मेंदूला ऊर्जा कशी पुरवावी?
शरीर तंदुरुस्तीसाठी मेंदू तल्लख आणि कार्यक्षम असायला हवा. शरीराला ऊर्जा पुरवण्यासाठी जसं आपण आहारावर लक्ष देतो, तसंच मेंदूलाही ऊर्जा पुरवण्यासाठी काही खास परिश्रम घ्यावे लागतात. दररोज ३५-४५ मिनिटं चालणं, योगासनं, स्विमिंग, एरोबिक्ससारख्या व्यायाम प्रकारांनी मेंदूला होणारा रक्तपुरवठा उत्तम राहतो. पुरेशी विश्रांती, संतुलित शाकाहार-मांसाहार, फळं, सुकामेवा, डाळी आणि सोयाबीनचे नियमित सेवन मेंदूला ऊर्जा पुरवण्याचं काम करत असतं. सतत काहीतरी नवीन शिकत राहणं हेसुद्धा मेंदूला ताजतवानं करण्याचं एक उत्तम औषध आहे.

नखांवरून माणसाच्या आरोग्याची कल्पना येऊ शकते का?
नखे ही व्यक्तीच्या आरोग्याची निदर्शक आहेत असं आपण म्हणू शकतो. ज्या माणसांची नखे सामान्य पांढऱ्या रंगापेक्षा अधिक पांढरी दिसून येतात, अशंाना अॅनिमिया झाल्याचं ते निदर्शक आहे. ज्यांची नखे गुलाबी किंवा फिकट गुलाबी रंगाची असतात त्यांच्या रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण उत्तम असते. शिवाय काही आजारांमधे नखांवर किंचित पिवळसर रंग दिसून येतो. मात्र आजारपणातून बरं झाल्यानंतर नखांचा रंग सामान्य होतो.

लहान मुलांची लाळ गळणं हे सामान्य आहे का?
वयाच्या दीड वर्षापर्यंत बाळाची लाळ गळणं हे सामान्य लक्षण आहे. सर्वसाधारणपणे सगळ्याच बालकांमध्ये ते दिसून येतं. त्यात काही धोकादायक वगैरे नाही. मात्र काही बाळांची वयाच्या चार वर्षापर्यंत लाळ गळते. त्या वेळी मात्र बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे.
डासांना मारण्याऐवजी झटकून पळवून लावा
अनेकांना डास चावत असताना त्या डासाला रगडून मारून टाकण्याची सवय असते. मात्र तो डास जेव्हा तुम्हाला चावत असतो त्या वेळी त्याला रगडल्यानं डासाच्या तोंडाचा काही भाग तुमच्या शरीरात राहून जाऊ शकतो. त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढू शकते. त्यामुळे डास चावत असताना त्याला रगडून मारणे टाळावे. त्याऐवजी झटकून टाकून पळवून लावावे.
© amrit bharti
बातम्या आणखी आहेत...