Home | Magazine | Rasik | Article By Dr. Milind Kasbe in writes about Divyamarathi

लोककलांना विळखा जातव्यवस्थेचा (रसिक)

डॉ. मिलिंद कसबे | Update - Jan 22, 2017, 10:00 AM IST

लोककलेच्या तिठ्यावर...जागरण, गोंधळ करणारे कोण आहेत? पोतराज, नंदीबैलवाले, मरीआईचे खेळ करणारे, दारावर येऊन भविष्य सांगणारे, पहाटे पिंगळा बनून भिक्षा मागणारे कोणत्या जातिसमूहातील आहेत?... गरीब आहेत की श्रीमंत?

 • Article By Dr. Milind Kasbe in writes about Divyamarathi
  जागरण, गोंधळ करणारे कोण आहेत? पोतराज, नंदीबैलवाले, मरीआईचे खेळ करणारे, दारावर येऊन भविष्य सांगणारे, पहाटे पिंगळा बनून भिक्षा मागणारे कोणत्या जातिसमूहातील आहेत?... गरीब आहेत की श्रीमंत?
  ... ते कलावंत आहेत की देवाच्या नावाने विधिनाट्य करणारे पोटार्थी आहेत?
  भारतीय जातिव्यवस्थेने सांस्कृतिक क्षेत्राला दिलेल्या वळणांकडे पाहिले असता कला क्षेत्रातले जातवास्तव अधिक ठळकपणे दिसते. साहित्य, चित्रपट, नाटक, चित्र, शिल्प अशा अनेक कलाप्रकारांवर काही जातींनी नेहमीच वर्चस्व ठेवले आहे. चित्रपट, नाटक, शास्त्रीय संगीत यांसारख्या अभिजात कलेवर नेहमीच वरच्या जातींनी आपले वर्चस्व ठेवले.
  भारतातल्या वरच्या जातींनी ज्या दुय्यम दर्जाच्या कला आहेत, त्या समाजातल्या खालच्या जातींमध्ये वाटून आपल्या सांस्कृतिक आचरणात जातवर्चस्वाची झूल शाबूत राहील, याची सतत दक्षता घेतली. याकडे बारकाईने पाहिले तर असे दिसते की, ज्या कला प्रतिष्ठेला आणि मोठ्या उत्पन्नाला जोडल्या आहेत, त्या कला भारतातल्या उच्चभ्रू वर्गाने आपल्या हातात ठेवल्या आणि ज्या कलांना प्रतिष्ठा आणि पैसाही मिळाला नाही, अशा कला धर्मव्यवस्थेला जोडून त्या टिकवून ठेवण्याची एक सांस्कृतिक दहशत इथल्या वरच्या जातींनी खालच्या जातींवर ठेवली. एखादी गोष्ट धर्माचरणाला जोडली की ती समाजातून लवकर हद्दपार होत नाही, हे खरे आहे. भारतातल्या लोककलांचेही असेच झाले.
  भारतात कुठेही गेले तरी लोककला प्रवाहित करणारे कलावंत हे खालच्या जातीतलेच दिसतात. लोककला जर आजच्या आधुनिक कलांच्या उद्गात्या असतील तर भारतीय लोककलांची सतत उपेक्षा का होत राहिली? लोककलांच्या अधोगतीचे मोठे दोष जातवर्चस्ववादी भारतीय मानसिकतेला द्यायला हवेत. चित्रपट, नाटक याला अपवाद नाहीत, उलट या क्षेत्रात जातीची ओळख ठेवून काहीएक वैचारिक निष्ठा जपणाऱ्या दिग्दर्शक-कलावंतांना किती त्रास होतो, याची अनेक उदाहरणे आहेत. याबाबत राजदत्त, नागराज मंजुळे, मिलिंद शिंदे, वामनदादा कर्डक, मधू कांबीकर, विठ्ठल उमप, प्रल्हाद शिंदे, अजय-अतुल अशी कितीतरी मोठी नावे सांगता येतील.

  चित्रपट, नाट्य क्षेत्रात कलावंताने जात सांगितली की कलेला मार बसतो, असे म्हणतात. म्हणून अनेक कलावंत आपली जात चोरतात, हेही खरे आहे; पण लोककलेत मात्र उलट आहे. तमाशात जात वा गाव सांगितल्याशिवाय टाळ्या मिळत नाहीत, हे कसे?... भाऊ मांग नारायणगावकर, विठाबाई मांग नारायणगावकर, दत्ताबा साळी शिरोलीकर, रंगनाथ बंडू लव्हार शिंगवेकर, भाऊ गोंधळी टाकळीकर ही काही उदाहरणादाखल नावं आहेत, ज्यांनी आपली जात जाहीर बोर्डावर मिरवली. जागरण, गोंधळ करणारे कोण आहेत?
  पोतराज, नंदीबैलवाले, मरीआईचे खेळ करणारे, दारावर येऊन भविष्य सांगणारे, तारेवरची कसरत करणारे, पहाटे पिंगळा बनून भिक्षा मागणारे, चेहरा रंगवून पोटाला चाकू-सुऱ्या लावून फिरणारे, अंगारा हातात घेऊन देवाच्या नावाने दक्षिणा मागणारे...हे सारे कोण आहेत? कोणत्या जातिसमूहातील आहेत?
  ... गरीब आहेत की श्रीमंत?... ते कलावंत आहेत की देवाच्या नावाने विधिनाट्य करणारे पोटार्थी आहेत? या गोष्टींचा विचार कधीतरी गंभीरपणे करायला हवा. या लोककलांचे उदात्तीकरण करून आपल्या हाती काही मिळणार नाही. उलट जातिसंस्था घट्ट करणारी धर्मव्यवस्था अधिक बळकट होईल, एवढेच!
  महाराष्ट्रातील तमाशा कलेत जातींच्या बाबतीत अनेक विरोधाभासी गोष्टी दिसतात. डॉ. आंबेडकरांनी सांगितलेली जातीची उतरंड तमाशातही दिसते. तमाशाचा मालक उच्चवर्णीय म्हणजे मराठा जातीचा. तमाशाचे सावकारही तेच. कलावंत मात्र महार, मातंग, गोंधळी, कोल्हाटी अशा जातीचे आणि तंबू शिवायला मजूर आदिवासी...
  अशी तमाशात जातीनुसार कामांची अलिखित वाटणी झाल्याची दिसते. ही वाटणी आजची नाही. त्याला तमाशाच्या उगमापासूनचा इतिहास आहे. पठ्ठेबापूराव-पवळा, विठाबाई-अण्णा सावंत, कांताबाई-तुकाराम खेडकर, सुरेखा पुणेकर-बाबा पठाण, मालती-मुसा इनामदार... ही काही उदाहरणादाखल नावे आहेत.
  तमाशा क्षेत्रात पती-पत्नी म्हणून अथवा मालक-मालकीण म्हणून ही नावे परिचित आहेत, पण पैशाचा सर्व व्यवहार मात्र तमाशातल्या मराठा-मुस्लिम मालकांनी अथवा सावकारांनी सतत आपल्या हातात ठेवला. त्यामुळे बोर्डावर नाव झळकणाऱ्या अनेक मोठ्या कलावंतीणींचं आयुष्य लाचारीत गेलं. बरं, तमाशा क्षेत्रात सावकारी कर्जाने पैसे देणारे कोण आहेत?
  ... तर तेही उच्चवर्गीय आहेत. तमाशात लावणी अथवा वगलेखन करणारी काही ब्राह्मण नावे दिसतात... पण कलावंत म्हणून तमाशात कुणीही पुरुष अथवा स्त्री ब्राह्मण कलावंत दिसत नाही. अजून एक मजेशीर गोष्ट इथे सांगायला हवी...
  तमाशाचा आश्रयदाता कोण? तर गावगाड्यात दिमाखदारपणे वावरणारा पाटील! गावाचा सरपंच, गावच्या यात्रेचे राजकारणी म्होरके, ही सारी मंडळी तमाशा ठरवायला येतात. तमाशात किती बाया नाचायला आहेत, हे आवर्जून विचारतात... पण तमाशाची बिदागी मात्र कमी करण्यात खळखळ घालतात. पुन्हा वरून गावात तमासगिरीण नाचवल्या म्हणून मिशीवर ताव देऊन पाटीलकी सिद्ध करतात.
  तमाशाच्या पहिल्या रांगेत नशाबाजी करून धुडगूस घालणारे तरुण कोणत्या जातीचे असतात, याचाही सर्व्हे अभ्यासकांनी करायला हवा. या तरुणांच्या जातीही सामंती वर्चस्वाच्या बळी आहेत. तमाशात ब्राह्मण स्त्री नाचत नाही. त्याचप्रमाणे तमाशा पाहायला बहुजन समाजाची स्त्री येत नाही. हे असे का?
  ...तर जातवर्चस्वाची झूल ज्यांनी आपल्या दारात आणि समाजात तशीच ठेवली आहे, त्या सामंती वर्चस्ववादी पुरुषी मानसिकतेला खालच्या जातीतली स्त्री ही नेहमीच शृंगारभोग वाटली आहे. या मानसिकतेने तमाशाची आधुनिक परंपरा प्रबोधनाऐवजी ऑर्केस्ट्राकडे वळवली. नाच-गाणे, मौज-मजा आणि शृंगारसोहळ्यांसाठी तमाशा कलेचा जन्म नक्कीच झाला नाही. त्यात प्रचंड मोठे कलासौंदर्य दडलेले आहे.
  हे कलासौंदर्य त्याला विधिनाट्यात गोवल्यामुळे पुरेसे बाहेर पडले नाही. त्यामुळे तमाशा हा कला म्हणून आणि व्यवसाय म्हणूनही विकसित झाला नाही. मागील वर्षी नारायणगावात तमाशाने तीन कोटी रुपयांची उलाढाल केली, ही बातमी खरी आहे. दरवर्षीही ती होते
  ... परंतु यातले पैसे नेमके कुणाच्या खिशात जातात, याचाही अभ्यासकांनी जातीय-आर्थिक अभ्यास मांडायला हवा. हा एवढा मोठा पैसा गावगाड्यातल्या सामंती जातीतले म्होरके आपल्या सामाजिक आणि राजकीय प्रतिष्ठेसाठी गोळा करतात खरा...
  परंतु तो दलित-उपेक्षित कलावंतांच्या खिशात न जाता पुन्हा उच्चवर्णीय मालक आणि सावकारांच्या खिशात जातो. या आर्थिक सांस्कृतिक दहशतवादामुळे तमाशा कला ही कला म्हणून संपली आणि फक्त बाजार म्हणून उरली, असे जर कुणी म्हटले तर ते नाकारता येणार नाही.
  संगीतबारी, डान्स बार यात जाणारा बहुतांशी वर्ग कोण आहे, याचीही शहानिशा केली पाहिजे. महाराष्ट्रातल्या अनेक कलाकेंद्रांच्या शेजारी लॉजेस का उभे राहिले, याची जातीनिहाय तपासणी करण्याची सोय असती तर ब्राह्मणेतर जातीतल्या पुढारलेल्या जातींची नावे अग्रभागी आली असती.
  डान्स बारमध्ये बारबालांवर पैसे उधळणारे चैनखोर कोण होते, याचा सुगावा सुसंस्कृत राजकारणी म्हणून आर. आर. पाटलांना नक्कीच लागला असणार, पण राजकारणातील आपली नवी पिढी बरबाद होऊ नये म्हणून त्यांनी डान्स बार बंदीचा घेतलेला निर्णय दोन्ही बाजूंनी महत्त्वाचा होता, हेही नाकारून चालणार नाही.
  आपल्या जातिव्यवस्थेने केवळ तमाशाचेच सांस्कृतिक सपाटीकरण केले असे नाही, तर थोड्याफार फरकाने सर्वच लोककला या अधोगतीच्या बळी ठरल्या आहेत. तमाशा ही गोष्ट प्रातिनिधिक आहे. कोकणात दशावतारी खेळ होतात. त्यात ब्राह्मण कलावंत असतात, पण त्यापेक्षाही तेथील देवळी हा ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर यात सामील आहे. पण दशावतार हे पाहिल्यांदा विधिनाट्य आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे.
  त्यातला विधी, कर्मकांड, देवदेवतांच्या अंधश्रद्धा, कहाण्या, रंजक पुराणकथा हे सारे काढून टाकले तर केवळ प्रबोधनासाठी या जाती दशावतारी खेळ करत राहतील का, हा मोठा प्रश्न आहे. भारूड, जागरण-गोंधळ, लळिते या लोककलांचेही तसेच आहे. त्या केवळ धार्मिक रूढी-परंपरा म्हणून टिकून आहेत. त्यांचे उदात्तीकरण करून लोककलांच्या अभ्यासकांनीही मोठी दिशाभूल केली आहे.
  प्रभाकर मांडे, तारा भवाळकर, रा. चिं. ढेरे, तसेच प्रकाश खांडगे, रामचंद्र देखणे आदी अभ्यासकांनी आपापल्या जातीचा आब राखून या लोककलांचा अभ्यास केला, त्यांच्या प्रसारासाठी कार्य केले. या कामाचा आदर ठेवून असे म्हणावेसे वाटते की, त्यांनी लोककलांची जातीय चिकित्सा का केली नाही? ही चिकित्सा करण्यासाठी गणेश चंदनशिवे, कृष्णा किरवले, प्रशांत पवार, उत्तम कांबळे या लेखकांनाच का पुढे यावे लागले?
  जातीच्या वर्चस्वामुळे आणि धर्माच्या रूढीग्रस्त पगड्यामुळे लोककलेने कला म्हणून आपला आत्मा हरवला, हे कधीतरी मान्य केल्याशिवाय लोककलांमध्ये वावरणारा ‘"ब्रोकन मॅन'’ कलावंत म्हणून मोकळा श्वास घेणार नाही. जातीच्या, धर्माचरणाच्या आणि उच्च जातींच्या आश्रयात राहून तो सतत गुदमरेल. ही गोष्ट महात्मा फुल्यांनी ओळखली होती. त्यांनी ‘सत्यशोधकी जलसे'’ हा सुंदर पर्याय दिला होता.
  आंबेडकरांच्या अनुयायांनी त्याचे रूपांतर आंबेडकरी जलशात केले. विशेष म्हणजे, अण्णाभाऊ साठेंनी तमाशाचे नामकरण करून ‘‘लोकनाट्य'’ हा चांगला पर्याय दिला; परंतु हे सारे बदलाचे मार्ग महाराष्ट्राच्या लोकपरंपरेत इथल्या वर्चस्ववादी जातींनी रुजू दिले नाहीत किंवा सामंती जातींच्या आश्रयात धन्यता मानणाऱ्या दलित कलावंत जातींनी हे पर्याय मनापासून स्वीकारले नाहीत, हेही नाकारता येणार नाही.
  या लोककला धर्मापासून दूर गेल्या की त्या प्रागतिक होतील, त्या विज्ञानवादी होतील, धर्मनिरपेक्ष होतील आणि विशेष म्हणजे, त्या मानवतावादी होतील, स्वावलंबी, स्वतंत्र आणि निर्भीड होतील. हे सारे आपल्या जातिव्यवस्थेलाच नको होते. तसे झाले असते तर आज महाराष्ट्राचा सांस्कृतिक चेहरा प्रागतिक झाला असता. पण महाराष्ट्रातल्या लोककलांना कला म्हणून ‘अच्छे दिन'’ येण्याचे संकेत मागील काही वर्षांत प्रबोधन जलशांनी दिले आहेत, याकडे नीट पाहायला हवे.
  संभाजी भगत, प्रशांत मोरे यांसारखे कितीतरी कलावंत लोककलांचा फॉर्म घेऊन मोठ्या ऊर्जेने लोककलांना नवा आशय देऊ पाहात आहेत. हा प्रागतिक आशय, ही क्रांतिकारी ऊर्जा आणि ही नवी व्यावसायिक संधी लोककलावंतांनी घेतली, तरी प्रबोधनाचे एक जुने दालन नव्याने खुले होईल, परंतु लोककलेत वावरणाऱ्या सर्वच जातिसमूहांना हे जमेलच असे नाही.
  कारण लोककला निळ्या, भगव्या, हिरव्या झाल्या तर अनेक गडबडी होऊ शकतात. प्रश्न एवढाच आहे की, त्यांनी रूढी-परंपरांच्या कचाट्यातून बाहेर येऊन परदेशी लोककलांप्रमाणे समग्र मानवी नैसर्गिक कलेला जोडून घ्यावे. पण भारतात हे सहजासहजी शक्य होईल, असे नाही. त्यासाठी नक्कीच वेळ लागेल.
  ओढग्रस्तीचे फड
  आज महाराष्ट्रातल्या नावाजलेल्या पस्तीस तमाशा फडांपैकी एकही तमाशा फड फायद्यात नाही. बहुतांशी फड सावकारी कर्जापोटी सावकाराकडे गहाण आहेत किंवा कर्ज देणाऱ्या पतसंस्थांकडे थकीत म्हणून तगाद्यात आहेत. शासनाकडून मिळालेल्या अनुदानात सीझनपुरतेच लहान-लहान फड उभे राहतात. शेवटी शंभर-दीडशे लोकांचा संसार घेऊन फिरणे सोपे नाही. त्यांचे खाणे, राहणे, बिदागी, गाड्या, डिझेल, मजूर अशा अनेक गोष्टींपायी हा व्यवसाय मालकांच्या आणि कलावंतांच्या दृष्टीनेही अडचणीचा झाला आहे...
  शासन आणि सावकाराची कात्री
  तमासगीर "व्होट बँक' ’नाहीत, म्हणून शासनाचे दुर्लक्ष आणि तमाशा कलावंतांच्या घामातून मिळणाऱ्या पैशावर सावकाराचे लक्ष... अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या दलित-उपेक्षित-भटक्या लोककलावंताने कलावंत म्हणून किती जपायचं आणि माणूस म्हणून कसं जगायचं, हाही तमाशापुढील प्रश्न आहे.
  हागणदारीमुक्तीची घोषणा करणाऱ्या राजकीय भूतकाळाने आणि "स्वच्छ भारत'चा नारा देणाऱ्या वर्तमानाने तमाशा कलावंतांच्या हागणदारीचा प्रश्न सोडवला, तरी तमाशा कलेसाठी उत्सवापलीकडे आणि श्रेयापलीकडे काही एक कार्य केल्याचा दुवा मिळू शकेल.
  m.kasbe1971@gmail.com
  संपर्क - ९७६६९८४७७०

Trending