आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ह्यांनी वेगळे काय केले?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परराष्ट्रमंत्री असूनही स्वराष्ट्रातच अडकून पडलेल्या स्वराजताईंनी ‘गीता हा राष्ट्रीय ग्रंथ आहे, तशी औपचारिक घोषणाच काय ती बाकी आहे', असे विधान केले आणि अवघे राष्ट्र ढवळून निघाले. राष्ट्र ढवळून निघाले म्हटल्यावर महाराष्ट्र तरी मागे कसा राहणार? ‘महाराष्ट्र अस्मिताप्रतिपालक संस्थे'चे सगळे सदस्य तातडीने एका संध्याकाळी एकत्र जमले. जर देशपातळीवर ‘राष्ट्रीय ग्रंथ' असू शकतो, तर राज्यपातळीवर ‘महाराष्ट्रीय ग्रंथ'देखील असलाच पाहिजे, असं संस्थेच्या सर्व सदस्यांचं ठाम मत होतं. असा ग्रंथ निवडायचा आणि त्याची शिफारस फडणवीस सरकारकडे करायची, हाच या सभेचा एकमेव उद्देश होता.
‘महाराष्ट्रीय अस्मिताप्रतिपालन' हेच संस्थेच्या सदस्यांचे मुख्य कार्य होते; कारण सगळे सदस्य वयपरत्वे आपापल्या नोकरी-व्यवसायांतून निवृत्त झालेले असल्याने त्यांना अन्य कामधंदा नव्हता. जात-धर्म-वर्ग-वर्ण-लिंग वगैरे भेद संस्थेत नव्हते. ‘जाज्वल्य महाराष्ट्रीय अस्मिता’ हाच सदस्यत्वाचा एकमेव निकष होता.
सुंठ घातलेला चहा पिऊन झाल्यावर रिटायर्ड जज्ज प्रभुणे यांच्या अध्यक्षतेखाली तत्काळ ‘महाराष्ट्रीय ग्रंथ' या मुख्य विषयाला हात घालण्यात आला. प्रत्येक जण या सन्मानास पात्र ग्रंथ कोणता असावा, यावर हिरीरीने आपले मत मांडू लागला.
"ज्ञानेस्वदी! अम्युताते पैदा दिंकणारा हा ग्दंथच ‘महादास्टीय ग्दंथ' या नामाभिधानाला पात्द आहे.’ नव्यानंच बसवलेल्या कवळीशी अजून अ‍ॅडजस्ट न झालेले चिरमुले म्हणाले.
"त्यापेक्षा ‘दासबोध'च अधिक सरस नाही का? शिवाय समर्थ रामदास म्हणजे, छत्रपतींचे आध्यात्मिक गुरू!’ कानात घातलेली जॉन्सनची इअर-बड हलवीत कानविंदेंनी मतभेद प्रकट केला.
"तुम्हां दोघांचंही राहू द्या! रसाळ, सोप्या भाषेत जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारा तुकारामांचा ‘गाथा’च निवडू या. ‘तुका झालासे कळस' असं म्हटलेलंच आहे!’ दर आषाढीला आपल्या स्कॉर्पिओमधून पंढरपूरची वारी करणारे चौधरी बोलले.
"हा अन्याय आहे! चोख्याचे अभंग का नकोत?’ माजी पोस्टमास्तर थोरातांना सात्त्विक संताप आला.
"मी म्हणते, मुक्ताबाई नाही तर जनाबाईचे अभंगच घ्या. स्त्रियांना जिथं-तिथं डावलता तुम्ही पुरुषमंडळी!’ सौ. धायफोडे, रिटायर्ड शिक्षिका.
नामदेव, एकनाथ, बहिणाबाई आदी सगळ्या संतमंडळींना वेठीस धरण्यात आलं, पण एकमत होईना. शेवटी निवृत्त प्राध्यापक कुचभल्लीवार म्हणाले, "हे बघा सदस्यहो, ‘लीळाचरित्र' हा मराठीतला पहिला गद्य ग्रंथ आहे. त्यालाच ‘महाराष्ट्रीय ग्रंथ' मानले पाहिजे.’
"आय् ऑब्जेक्ट! तसं केलं तर भविष्यात तांत्रिक अडचण उद्भवू शकते.’ सत्तरी उलटलेले ढेकणे वकील ओरडले.
"तांत्रिक अडचण? ती कशी?’ जज्जसाहेबांनी खुलासा विचारला.
"अहो, ‘लीळाचरित्र' विदर्भात लिहिलं गेलंय ना? मग उद्या विदर्भ वेगळा झाला तर उर्वरित महाराष्ट्राची पंचाईत नाही का होणार? विदर्भ राज्यात लिहिला गेलेला ग्रंथ ‘महाराष्ट्रीय ग्रंथ' म्हणून चालेल का?’ ढेकणे वकिलांचा प्रतिवाद बिनतोडच होता.
"मग अंबाजोगाईच्या आद्य मराठी कवी मुकुंदराजांचं ‘विवेकसिंधू' घ्या. अजून मराठवाड्यानं वेगळं राज्य मागितलेलं नाहीये." प्रा. कुचभल्लीवार.
"आणि मागितलं म्हणजे, वेगळं राज्य? त्यापेक्षा मोरोपंतांचं ‘केकावली' घेऊ या. बेटर सेफ दॅन सॉरी!’ ढेकणे वकील.
"मला वाटतं, आपण संत-पंतसाहित्य तूर्तास बाजूला राहू द्यावं. अन्य ग्रंथांविषयी विचार मांडण्याची मी सदस्यांना विनंती करतो.’ जज्जसाहेब.
"बाबासाहेबांचं...’ थोरात बोलू लागताच चिरमुल्यांनी त्यांना मध्येच थोपवलं.
"मीही तेच म्हणतोय्. बाबाथाहेब पुदंदद्यांचं शिवचदित्दच घ्यावं आपण!’ चिरमुले.
"पुरंदरे नव्हे, मी बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्मकथेबद्दल बोलतोय्, चिदमुले, आय् मीन् चिरमुले!!’ थोरात चिडले.
"पण ते मुळात इंग्रजीत लिहिलंय् ना, डॉ. आंबेडकरांनी! निकषांमध्ये बसत नाही!’ पुन्हा ढेकणे वकिलांचा युक्तिवाद.
"मग ‘गीतारहस्य' घ्या. राष्ट्रीय ग्रंथ ‘गीता', तर महाराष्ट्रीय ग्रंथ ‘गीतारहस्य'!’ अत्यंत मार्मिक विधान केल्याच्या आनंदात कानविंदेंनी डाव्या कानातली कापूसकांडी काढून उजव्या कानात घातली.
"नको! ते उगाच नक्कल केल्यासारखं वाटेल. त्यापेक्षा आपण जोतिबा फुल्यांचं ‘गुलामगिरी' घेऊ या. मोदींनी ओबामांना ‘गीता' भेट दिल्यामुळे जर तो ग्रंथ ‘राष्ट्रीय' होऊ शकतो, तर भुजबळांनी त्याआधीच ओबामांना ‘गुलामगिरी' दिलंय्!’ थोरात.
"गोडथे भटजींचं ‘माझा प्रवाथ’! मदाठीतले पहिले प्दवासवण्णन! जिवंत इतिहाथ उभा केलाय् भटजींनी!’ चिरमुले चिरकले.
"प्रवासवर्णनच हवं तर मग बाबा पदमनजींचं ‘यमुनापर्यटन' का नको?’ कानविंदे म्हणाले.
"नावावरून तसं वाटलं तरी ‘यमुनापर्यटन' हे प्रवासवर्णन नाही, कानविंदे. ती मराठीतली पहिली कादंबरी आहे!’ प्रा. कुचभल्लीवार म्हणाले. कानविंदे कानकोंडे होऊन दोन्ही कान आलटून-पालटून कोरीत गप्प बसले.
दोन अडीच तास उलटले. हळूहळू चर्चा ललित साहित्यावर घसरली. नावामागून नावं सुचवली जाऊ लागली.
"ह. ना. आपटेंच्या ‘पण लक्षात कोण घेतो'ला पर्याय नाही.’
"राम गणेशांचं ‘एकच प्याला'! अप्रतिम!!’
"लक्ष्मीबाई टिळकांचं ‘स्मृतिचित्रे'! मराठी स्त्रीचे पहिले प्रांजळ आत्मकथन!’
"आचार्य अत्रेंचं ‘क-हेचं पाणी'! असं आत्मचरित्र गेल्या दहा हजार वर्षांत झालं नाही!’
"जीएंचं ‘काजळमाया' सर्वोत्कृष्ट आहे!’
"पुल! ‘व्यक्ती आणि वल्ली'!’
"बेडेकरांचं ‘रणांगण' मैलाचा दगड आहे!’
"शंकरराव खरात! तराळ अंतराळ!’
"उदाहरणार्थ नेमांड्याच्या ‘कोसला'ला ओलांडताच येत नाही! तंतोतंत!!’
"ढसाळ विसरू नका! ‘तुही यत्ता कंची'!’
"दळवींचं ‘श्रीमंगलमूर्ती आणि कंपनी'! मराठीतली सर्वश्रेष्ठ विनोदी कादंबरी!’
"खांडेकर!’
"फडके!’
"कुसुमाग्रज!’
"विंदा!’
"ग्रेस!’
वर्तमानपत्राच्या संपूर्ण पानावरदेखील मावणार नाहीत इतकी नावे सुचवली जाऊ लागली. सगळेच जाज्वल्य अभिमानी असल्यामुळे ‘महाराष्ट्रीय ग्रंथा'वर एकमत होईना. ओरडून-ओरडून सगळ्यांचे घसे सुकले. रात्रीच्या जेवणाची वेळ टळून गेली होती. सगळ्यांना कडाडून भुका लागल्या होत्या. मधुमेह्यांची शुगर लो होऊ लागली होती. थकून सगळे थोडा वेळ गप्प बसले. त्या मिनिटभराच्या शांततेचा भंग करीत एक हळुवार आवाज उमटला. सौम्य-शांत चेह-याच्या शांताबाई बोलत होत्या. शांताबाई साठी उलटूनही अजून कार्यरत गृहिणी होत्या.
"मी म्हणते जरा माझं ऐकता का? आपण लक्ष्मीबाईंच्या...’
"लक्ष्मीबाई टिळकांवर झाली ना मघाशी चर्चा? मग पुन्हा तेच?’ अध्यक्षमहाराज करवादले.
"खु:खु:खु:खु:!’ मंद खिदळत शांताबाई म्हणाल्या, "मी बापडी लक्ष्मीबाई धुरंधरांबद्दल बोलत्येय्. मराठीतला पाककलेवरचा आद्य ग्रंथ लिहिलाय् त्यांनी. शंभराहूनही जास्त वर्षांपूर्वी! किती तरी आवृत्त्या निघाल्यात त्याच्या. अजूनही बायका विकत घेतात हा ग्रंथ, माहित्यैय्?’
सगळ्यांची उत्सुकता चाळवली. जज्जसाहेब म्हणाले, "अच्छा? नाव काय ह्या ग्रंथाचं? आणि असं काय विशेष आहे त्यात?’
"ग्रंथाचं नाव ‘गृहिणीमित्र अर्थात हजार पाकक्रिया!' हजार शाकाहारी, मांसाहारी पदार्थ, शिवाय लोणची, मुरांबे, चटण्या वगैरे बनवण्याच्या तपशीलवार पद्धती दिल्या आहेत यात! नुसती नावं तरी बघा एकेका पदार्थाची! खमीराचा भात, ग्वाल्हेरी भरली वांगी, बदामाची थाळी, हरणाची लेग, भरलेली कोळंबी, झालंच तर...’ शांताबाईंच्या बोलण्यानं उत्सुकतेपाठोपाठ आता उपाशी सदस्यांची भूकही चाळवली जाऊ लागली. तशातच बाईंनी सोबत आणलेलं पुस्तक उघडून एकेक रेसिपी वाचायला सुरुवात केली. सगळ्यांना आता भूक अनावर झाली. लाळांचे प्रवाह वाहू लागले. कानविंदे तर चक्क कापूसकाडी तोंडात घालून चघळू लागले.
अखेरीस न राहवून जज्जसाहेबांनी शांताबाईंना हातानंच गप्प राहण्याची खूण केली. लाळ सावरत त्यांनी सगळ्यांना विचारलं, "मग? हा ग्रंथ निवडायचा का आपण सर्वानुमते?’
सगळ्यांनी आवाजी मतदान करून प्रस्तावाला मान्यता दिली आणि ते भुकेले जीव सांधेदुखी, दमा, मधुमेह, रक्तदाब आदी व्याधी सांभाळीत, शक्य तितक्या त्वरेने आपापल्या घरांकडे धावत सुटले...
gajootayde@gmail.com