आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑडिओ क्लिपक्लिपाट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मार्टफोन नामक तंत्रयंत्राने खासगीपणाच सार्वजनिक करून टाकलाय. कुठे जायची सोय नाही की बोलायची सोय नाही. म्हणजे, लोहा गरम है... मिमिक्री आर्टिस्टांना अच्छे दिन आले आहेत... नरेंद्रांपासून देवेंद्रांपर्यंत कुणाचाही आवाज काढा... नि व्हायरल व्हा... खळबळ माजवा...

हल्ली खाजगी संभाषण असं काही राहिलेलंच नाही. (खरं तर खाजगी असं काहीच राहिलेलं नाही.) ज्याच्या-त्याच्या हाती स्मार्टफोन्स आले आहेत. त्यात रेकॉर्डिंगची सोयही असते. फोनवरचं किंवा प्रत्यक्षातलं संभाषण अगदी सहज रेकॉर्ड करता येतं आणि हे सारं एवढ्या बेमालूमपणे करता येतं की, आपलं बोलणं रेकॉर्ड होतंय, हे कुणाला कळतही नाही. मग एखाद्यावर आरोप करण्यासाठी, एखाद्याचं पितळ उघडं करण्यासाठी किंवा खुन्नस काढण्यासाठी अशी रेकॉर्डिंग्ज तशीच्या तशी किंवा सोयीप्रमाणे एडिट करून व्हायरल केली जातात. सोशल मीडिया अतोनात फोफावल्यानं हेदेखील फारच सोपं झालं आहे. फेसबुक, व्हाॅट्सअॅप, ट्विटर वगैरेंसारख्या माध्यमांमधून अशी व्हायरल संभाषणं आणि त्यांवरच्या प्रतिक्रिया, शिवीगाळ, खंडनमंडन, खुलासे वणव्यासारखे फोफावू लागतात. चॅनेलना चघळायला विषय मिळतात. ज्या जोमानं हे सारं सुरू होतं, तो जोम चारदोन दिवसांच्या वर टिकत नाही. लगेच सारं थंडावतं - पुन्हा पुढची क्लिप व्हायरल होईपर्यंत.

या सगळ्यामुळे येत्या काही दिवसांत मिमिक्री आर्टिस्टना अच्छे दिन येण्याची बरीच शक्यता आहे. कारण कोणाचाही आवाज काढून एखादं नकली संभाषण सहज व्हायरल करता येईल. त्याची सत्यासत्यता पडताळली जाईपर्यंत वाद शमलेला असेल. अशा मिमिक्री ‘कलाकारां’साठी इथे संभाषणांचे काही नमुने सादर करत आहोत. या धर्तीवर अनेक ऑडिओ क्लिप्स काढता येतील. त्यामुळे इतर काही साध्य होवो न होवो, करमणूक मात्र नक्कीच होईल...

: च्च च्च… माप घटलंय…
: काय सांगताय काय? गेल्या खेपेला तर अगदी बरोब्बर होतं माप. आता काय झालं माप घटायला?
: ते तुम्हालाच ठाऊक. मी बापडा टेलर कसं सांगणार साहेब?
: हं… किती घटलंय माप?
: साडेसात इंचांची घट झालीय साहेब. साडेअठ्ठेचाळीसच राहिलेत.
: पण तरी तुम्ही कुर्ता आधीच्याच मापानं बेता बरं का.
: पण साहेब, तसला कुर्ता फारच बॅगी-बॅगी वाटेल ना. लक्षात येईल लोकांच्या.
: मग आता काय करावं म्हणता?
: आपण एक काम करू या. कुर्त्याचं कापड आणि आतलं अस्तर यांच्यामध्ये पुढच्या बाजूला साडेसात इंच जाडीचं पॅडिंग केलं तर?
: गुड आयडिया! तसंच करा. शिवाय कडक हिवाळा सुरू होतोय, दिल्लीचा. वेगळं स्वेटर पण घालायला नको.
-----------------------------
: संपादक साहेब, एक लोच्या झालाय!
: आता काय झालं? अरे, लोकांचे दिवाळी अंक मार्केटात आलेदेखील, आणि आपला अजून प्रेसवरपण चढायचाय. तुम्ही उपसंपादक काय झोपा काढताहात की काय?
: तुम्हीच म्हणाला होतात ना, जाहिराती येण्याची वाट पाहायची म्हणून…
: पण आता आल्यात ना सगळ्या जाहिराती? मग?
: शेवटचा फॉर्म तयार झालाय, पण अर्धं पान मजकूर कमी पडतोय. आता आयत्या वेळी काय टाकणार तिथं?
: द्या की टाकून एखादी कविता-बिविता.
: सगळ्या कविता आधीच गेल्यात अंकात.
: मग एक काम करा. गेल्या वर्षीच्या अंकातल्या कवितांची एकेक ओळ घ्या आणि नवीन कविता म्हणून छापून टाका. आपल्याला काय? पान भरण्याशी मतलब.
: पण साहेब, ती आपल्या वाचकांशी प्रतारणा नाही का होणार?
: कायच्या काय तुमचं! अहो, कोण बसलंय इथं कविता वाचायला?
: ठीक आहे. करतो तुम्ही म्हणता तसं. पण खाली कवी म्हणून कोणाचं नाव घालू?
: टाका की एखाद्या दुर्बोध कवीचं नाव!
-----------------------------
: गुड मॉर्निंग, एम!
: कम इन डबल ओ सेव्हन. स्कॅरामँगा इंडियात लपलाय, याचा पक्का पुरावा मिळालाय आपल्याला सॅटेलाइट्स फोटोंवरून.
: यस, एम! मी आजच निघालोय तिकडे!
: दॅट्स गुड, बाँड. एनकडून नवीन प्रकारची शस्त्रं वगैरे घेतलीस ना? लक्षात घे, तुला फ्री हँड दिलाय सरकारनं. लायसन्स टु किल!
: इथून शस्त्रं नेण्याची गरज नाही सर. या वेळी मी इंडियातच एका अत्यंत प्राणघातक शस्त्राचा बंदोबस्त केला आहे.
: काय सांगतोस काय? कुठलं हे शस्त्र? रिमोट कंट्रोलनं वापरलं जाणारं सुदर्शन चक्र? की विषारी धूर सोडणारं पुष्पक विमान? की…
: नाही नाही. तसलं काहीही नाही.
: मग?
: पान मसाला!
: पान मसाला? ही काय भानगड असते?
: इंडियातले बरेच लोक पान मसाला खाऊन रवंथ करत असतात. फार डेडली चीज आहे सर!
: अरे पण बाँड, तू या पान मसाल्याचा वापर कसा करणार आहेस?
: सोप्पंय अगदी. मी एक ड्रग स्मगलर असल्याचं भासवून, भरपूर पान मसाला तोंडात कोंबून स्कॅरामँगाला भेटायला जाणार आहे. तोंडात भरपूर पिंक जमा झाली की, त्याच्या चेहऱ्यावर खच्चून फवारा मारणार! बस्स, स्कॅरामँगा खलास!
: दॅट्स ग्रेट, बाँड! यंदा आपल्या राणीच्या वाढदिवसाला तुला नक्कीच ‘सर’ नाहीतर ‘लॉर्ड’ पदवी मिळणार. आय अॅम शुअर!
-----------------------------
: तुमच्या दुकानात फायबर-बियबरच्या अनब्रेकेबल काचा आहेत का हो?
: आत्ता नाहीयेत, इंपोर्ट कराव्या लागतील. पण नेमक्या कशासाठी हव्या आहेत तुम्हाला अनब्रेकेबल काचा?
: काय आहे ना, आमची मल्टिप्लेक्स सिनेमांची चेन आहे. काचेची तावदानं फार महाग असतात ना, सारखी सारखी खळ्ळ्कन खट्याक होतात. नवी बसवायला फार खर्च येतो, प्रत्येक वेळी. आता तर फारच अर्जन्सी आहे.
: अशी कुठली अर्जन्सी आहे?
: पाकिस्तानी कलावंत असलेले दोन सिनेमे रिलीज होतायत ना!
-----------------------------
: बाहेरून कसला गलबला ऐकू येतोय?
: भगव्या वस्त्रांतले बरेच लोक दिसताहेत साहेब.
: अरेच्या! कोण आहेत ते? काय हवंय त्यांना? जरा जाऊन बघा!
: चौकशी करून आलो साहेब. ते साधू, साध्व्या, बुवा, बापू, आचार्य, महाराज, महंत, माता, मां वगैरे लोक आहेत.
: पण इथं आमच्या बंगल्यावर काय करताहेत ते? पुढच्या शपथविधीला तीनेक वर्षं आहेत अजून. तेव्हा या म्हणावं. आत्ताच काय काम?
: त्यांनी तुमचं म्हणणं शब्दशः घेतलंय साहेब. तुम्ही परवा त्या महाराजांच्या वाढदिवसाला म्हणाला होतात ना, की धर्मसत्ता राजसत्तेपेक्षा श्रेष्ठ असते?
: हां हां. ते होय? अहो, पण तो एक जुमला होता. असे जुमले वापरायचे असतात अधूनमधून. लोकांच्या भावना सुखावतात त्यानं. शिवाय काय होतं, नरेंद्र नावाचं कोणीही पुढ्यात आलं की मला धड बोलणं सुचत नाही. पण ही मंडळी माझ्या वक्तव्याबद्दल, मला धन्यवाद देण्यासाठी आली असणार नक्कीच!
: छे छे, साहेब. ते म्हणताहेत, आम्ही श्रेष्ठ आहोत, हे तुम्ही स्वतःच सांगितल्यानं आता पायउतार व्हा. यापुढं सत्ता आम्हीच सांभाळू!

gajootayde@gmail.com
बातम्या आणखी आहेत...