आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Gajoo Tayade In Rasik Magazine In Divya Marathi

थाटमाट नगरातलं जागावाटप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एरवी, राजा हा राजाच असतो. परंतु राज्यारोहणाचा क्षण जवळ आला की प्रजेला आपण राजा असल्याचा भास होऊ लागतो आणि राजेमंडळी लाचार, लोचट आणि स्वार्थी होऊन जाते...
आटपाट नगरं असतात तसंच एक थाटमाट नगर होतं. थाटमाट नगर नाव असण्याचं कारण म्हणजे, या नगरात सगळ्यांना थाटामाटाचं जगणं जामच आवडायचं. अर्थात, प्रत्येकाला तसं जगणं जमायचंच असं नाही; पण तशी थाटामाटाची स्वप्नं मात्र सगळेच बघायचे. स्वप्नं बघायला पैसे लागत नाहीत आणि नगरातल्या अगदी दारिद्र्यरेषेखालच्या, अर्धपोटी जगणाऱ्या पब्लिककडेही भरपूर चॅनलं दाखवणाऱ्या टीव्हीमुळे स्वप्नांचा रतीब चोवीस तास सुरूच असायचा - लोडशेडिंगचे तास वगळता. लोडशेडिंग असण्याच्या टायमाला लोक आपापली महत्त्वाची किरकोळ कामे आटपून घेत.

प्रजाजन स्वतःला सुसंस्कृत, रसिक, कष्टाळू वगैरे समजत. इतिहासातल्या दोन-चार थोर सुधारक लोकांचे हवाले देत थाटमाट नगर पुरोगामी, पुढारलेले आहे, अशी प्रजाजन इतरांची आणि स्वतःचीही वारंवार खात्री पटवून देत. ते बरंचसं खरंही होतं. दलित अत्याचार, महिला अत्याचार वगैरे थाटमाट नगरात पुरेशा प्रमाणात घडत नसत. अधूनमधून आत्महत्या करणारे काही शेतकरी सोडले, तर लोक इन-जनरल सुखी होते.

साधारणतः अशा गोष्टींमध्ये एक राजा असतो. तो प्रजाहितदक्ष तरी असतो, नाहीतर एकदमच गयागुजरा असतो. थाटमाट नगरात मात्र एकच एक राजा नसायचा. आलटून-पालटून वेगवेगळे राजे राज्य करायचे. म्हणजे, एक मुख्य राजा असायचा आणि त्याला साहाय्य करणारे उपराजे, साहाय्यक राजे, शिवाय इतर चिल्लर आम दरबारी वगैरे मंडळी असायची. हे राजे स्वतःला नेहमीच ‘जनतेचे सेवक’ म्हणवून घ्यायचे, कारण तशी रूढीच होती. राजे निवडायचा अधिकार प्रजाजनांचाच होता. ते त्यांचे परमपवित्र कर्तव्यही होते. यात काही काही जण पुन:पुन्हा राजे व्हायचे. मात्र सगळं अवलंबून होतं, ते प्रजाजनांनी वाडग्यात टाकलेल्या भिकेवर!

‘भीक’ म्हटल्यावर दचकायला झालं असेल; पण थाटमाट नगराची ही महान परंपराच होती. नगरात राजे निवडायची पद्धत मजेदार होती. राजे निवडायचा प्रसंग दर पाच वर्षांनी यायचा. मोठी जत्रा भरवली जायची. बांद्र्याच्या ‘मोतमावलीची जत्रा’ असते, तशी ही ‘मतमावलीची जत्रा’! या वेळी राजे होऊ इच्छिणारे लोक भिकाऱ्यांच्या भूमिकेत जायचे. म्हणजे ते खरोखर भिकारी असायचे, असे नव्हे. कोट्यवधीची संपत्ती बाळगून असलेलेच धष्टपुष्ट गणंग असायचे ते; मात्र जत्रेच्या काळात ते भिकाऱ्यांची भूमिका अक्षरशः जगायचे. तोंडं वेंगाडायचे, बोटं वळवून माथ्यावर टेकवायचे. आशाळभूत, लोचट भाव मुद्रेवर आणायचे. ओशट-लाचार हसायचे. दुवा द्यायचे. प्रजाजन मात्र त्यांना भीक घालणाऱ्या दानी लोकांच्या भूमिकेत असायचे. अगदी खरेखुरे भिकारीसुद्धा जत्रेच्या टायमाला दानी बनायचे.

राजे लोकांच्या निवडीची प्रक्रिया साधी-सोपी होती. जत्रा नगरभर पसरलेली. नगराचे अनेक वेगवेगळे भाग पाडलेले. प्रत्येक भागात काही राज्योत्सुक भिकारी आपापले वाडगे, कटोरे, वाट्या, डबे, भांडी, टमरेलं वगैरे घेऊन बसत. काही भिकारी टोप्यासुद्धा उलट्या करून बसत. ज्याच्या वाडग्यात सर्वात जास्त भीक पडेल, त्याला त्या भागाचा ‘आम दरबारी’ घोषित करण्यात येई. सगळे आम दरबारी मिळून मुख्य राजा, उपराजा, साहाय्यक राजे वगैरे ठरवत. एकीचं बळ काय असतं, हे या टेंपररी भिकाऱ्यांना कधीच कळून चुकलं होतं, त्यामुळे हे भिकारी गटागटानं भीकयाचना करीत. अशा अनेक टोळ्या असत. त्यांच्या वाडग्यांचेही विशिष्ट रंग असत. भगवा, हिरवा, लाल, निळा वगैरे. शिवाय भीक मागण्याच्या पद्धतीही भिन्नभिन्न होत्या. कुणी ‘ओम् भवती भिक्षां देहि’ म्हणे, कुणी ‘पैसा-दोन पैसा टाका गरिबाला’ म्हणून पुकारत. आपल्या टोळीतल्या भिकाऱ्यांनाच जास्तीत जास्त भीक कशी मिळेल, यासाठी सगळे टोळीवाले जिवाचं रान करीत. कारण, ज्या टोळीतले भिकारी बहुभिकेनं निवडून येत, तीच टोळी नगरावर राज्य करी.

सुरुवातीची काही वर्षे सगळं बरं चाललं होतं. पण पुढे-पुढे भिकाऱ्यांच्या टोळ्यांना निर्विवाद बहुभीक मिळणं दुरापास्त होऊ लागलं. मग ज्यांच्या वाडग्यांच्या रंगछटा एकमेकींशी थोड्याफार मिळत्याजुळत्या होत्या, अशा काही टोळ्या एकत्र आल्या आणि त्यांनी परस्पर सहकार्य करार केला.

अशा रीतीने दोन मुख्य जुगाड करण्यात आले. एकाला नाव देण्यात आले ‘घुटी’, कारण नगराच्या महान प्राचीन संस्कृतीची घुटी लोकांना पाजणे हे ते आपले परमकर्तव्य समजत असत. दुसऱ्या जुगाडाला ‘खादाडी’ हे नामाभिधान प्राप्त झाले. या जुगाडाचे सदस्य खाण्याचे फारच शौकीन होते. घुटी अस्तित्वात आल्यानंतर काही वर्षं त्यांना वाट पाहावी लागली. पण दहा वर्षांनी त्यांना बऱ्यापैकी भीक मिळाल्याने साडेचार वर्षे घुटीने राज्य केले. मात्र पुढची दहा वर्षे खादाडीच्या वाडग्यांमध्ये बहुभीक पडली.

एकदा काय झाले, थाटमाट नगर ज्या संघराज्याचा हिस्सा होते, त्या संघराज्यात एक लाट आली आणि एक शूर सम्राट संघराज्याच्या सत्तेवर आला. हा सम्राट घुटीतल्या एका टोळीशी संबंधित होता. सम्राटाचा एकचालकानुवर्ती कारभार सुरू झाला अन् तीनच महिन्यांत थाटमाट नगरात भीकदानाची जत्रा भरण्याची वेळ आली. घुटीतली एक टोळी आत्ताआत्तापर्यंत स्वतःला मोठा भाऊ म्हणवत असे, पण दुसऱ्या टोळीतला माणूस सम्राट झाल्यानं त्या टोळीवाल्यांचे बाहू स्फुरण पावू लागले आणि त्यांनी पहिल्यांना भिकारी बसण्याच्या जागा वाढवून मागितल्या.

दरम्यानच्या काळात काही घडामोडी घडून, आणखी चार चिल्लर टोळ्या घुटीकडे येऊन ‘महाघुटी’ची स्थापना झाली होती. (अवांतर- या चारही टोळ्यांचे नायक लहानमोठ्या दाढ्या राखीत असत. त्यात एक कविमनाचे टोळीनायकही होते.) मात्र ‘ज्येष्ठ भ्रात्यां’ना ही लाट-बीट मंजूर नव्हती. मग भरपूर प्रस्ताव-प्रस्तावी, फॉर्म्युला-फॉर्म्युली झाली. पण तिढा काही सुटेना. तिकडे खादाडीतल्या टोळ्याही एकमेकांना पुरत्या विटल्या होत्या. संवाद खुंटला. भांडण होऊन अबोला धरलेले नवरा-बायको जसे आपल्या मुलांमार्फत एकमेकांशी संवाद साधतात, तसे दोन्ही जुगाडांमधले लोक व्हाया टीव्ही चॅनल एकमेकांशी संवाद साधू लागले. धमक्या देऊ लागले. पितृपक्ष संपताच दोन्ही जुगाडांनी आपापले जुगाड मोडले आणि स्वतंत्रपणे भीक मागण्याचे ठरवले. मध्यंतरी घुटीतल्या एका पक्षात असलेले आणि नंतर वेगळे झालेले एक नवटोळीप्रमुख थाटमाट नगरीच्या विकासाची बहुप्रतीक्षित ब्ल्यू प्रिंट आणते झाले. मग इकडून-तिकडे, तिकडून-इकडे, दोन्ही माजी जुगाडांतले भिकारी उड्या मारू लागले. पुरता गच्च्यागोळ झाला. चड्डी कुणाची, नाडा कुणाचा, काही कळेनासे झाले आणि थाटमाट नगरीतले लोक नशिबावर हवाला ठेवून गपगार, चिडीचिप होऊन बसून राहिले.