आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढम ढम बाजे ढोल !!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खूप दिवसांनी - एक्झॅक्ट सांगायचं तर सोळा मे नंतर प्रथमच - अडवाणींच्या चेह-यावर प्रसन्नतेची हलकीशी छटा दिसत होती. काही दिवसांपूर्वीच भाजपाध्यक्ष अमित शहांनी (पक्षी भाजपाधिराज मोदींनी) मार्गदर्शक मंडळात त्यांचा समावेश केल्यापासून त्यांना आपण एक ‘समृद्ध अडगळ’ असल्याचं कातर फीलिंग आलं होतं. इथं स्वतःचाच मार्ग आपल्याला सापडला नाही न् दुस-यांना कसला मार्ग दाखवणार आपण?
मार्गदर्शक मंडळाचे सन्माननीय ज्येष्ठ सदस्य म्हणे! आता कुणी ओळखही द्यायला तयार नाही. जो देश आपल्याकडे भावी पंतप्रधान म्हणून बघायचा, त्या देशातले लोक हळूहळू आपलं नाव निघताच ‘अडवाणी? अच्छा, ते पांढ-या मिशीवाले आजोबा!’ म्हणू लागतील, असंही त्यांना वाटू लागलं होतं.
जुने रथयात्रेचे, अयोध्येचे रम्य दिवस आठवून अडवाणींच्या चष्म्याच्या काचांवर बाष्प साचलं. झब्ब्याच्या टोकानं ते चष्मा पुसू लागले. एवढ्यात त्यांचा पार्टटाइम पीए आत आला. हल्ली फुल्लटाइम पीए ठेवण्यात काही राम राहिला नव्हता. काम नको त्याला? हा पीए तसा बरा होता. भाजीपाला, वाणसामान वगैरे आणायला सांगितलं तरी कुरकुर करत नसे.
‘मार्गदर्शक मंडळाचे सदस्य आलेत, सर.’ पीए म्हणाला.
‘दे पाठवून त्यांना आत.’ चष्मा पुन्हा डोळ्यांवर चढवून अडवाणी म्हणाले.
पीए बाहेर गेला आणि अडवाणींच्या चेह-यावर पुन्हा प्रसन्नतेची छटा परतून आली. आज मार्गदर्शक मंडळाची पहिली महत्त्वाची सभा आयोजित करण्यात आली होती. पीएमच्या ऑफिसातूनच कनिष्ठ सचिवाचा तसा फोन आला होता.
‘म्हणजे नरेंद्रला अजून आपल्या सल्ल्याचं मोल पटतंय तर!’ असं वाटून अडवाणींनी स्वतःला किंचितसं सुखावून घेतलं होतं. अडवाणींना इकडेतिकडे जाण्याचा त्रास नको, म्हणून मीटिंग त्यांच्याच घरी होणार होती.
‘नमस्कार, अडवाणीजी!’ आत येत मंडळाची आणखी एक समृद्ध अडगळ उद््गारली. मुरलीमनोहर जोशी! हल्ली त्यांच्या चेह-यावर कायम ‘बनारस की गलियों मे भटकलेल्या’ इसमाचे भाव असतात. त्यांच्यासोबत राजनाथ सिंह हे तिसरे मेंबर पण होते. मंडळाचे ज्येष्ठातिज्येष्ठ सदस्य अटलबिहारी वाजपेयी ‘खराब स्वास्थ्य के चलते’ येणार नव्हतेच आणि पंतप्रधानांना इतर बरे कामधंदे असतात, म्हणून मोदीही येणार नव्हते. किमान तीन सदस्य असल्याशिवाय कोरम पूर्ण होत नाही, म्हणून राजनाथ सिंहदेखील नाइलाजानंच आले होते.
दोघांसोबत तिसरीही व्यक्ती होती ती म्हणजे, सांस्कृतिक खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) श्रीपाद नाईक. त्यांनी इथे असण्याचं कारण म्हणजे आजचा विषय थोडाफार भारतीय संस्कृतीशी संबंधित होता.
‘मला जरा लवकर परतायचं आहे. तेव्हा आपण मीटिंग शॉर्ट आणि स्वीट ठेवू या. कसं?’ राजनाथ म्हणाले. दोन मूकनायकांनी मान डोलावली.
‘तर थोडक्यात मुद्दा असा आहे की, महाराष्ट्र आणि हरियाणात निवडणुका होऊ घातल्या आहेत. हरियाणा महत्त्वाचं नाही. महाराष्ट्रातल्या निवडणुका मात्र बीजेपीसाठी फार महत्त्वाच्या आहेत. सोनियांची काँग्रेस आणि पवारांचा राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर येणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ! मात्र, तिथे मुख्यमंत्री आपलाच झाला पाहिजे. शिवसेनेशी युती होवो, न होवो!’ राजनाथ सिंहानी प्रस्तावना केली.
‘हो, खराय्! पण ह्यात आम्ही बापडे काय मार्गदर्शन करणार?’ कमीत कमी बापुडवाणे दिसण्याचा प्रयत्न करीत मुरलीमनोहर म्हणाले.
‘कसंय् ना,’ राजनाथ समजावू लागले, ‘महाराष्ट्रात मोदींची लाट नव्हतीच, आताही नाही, असं शिवसेनेला वाटतं आणि उद्धवजीही तसंच म्हणताहेत. जागा पण वाढवून द्यायला तयार नाहीत ते. तेव्हा आता मोदी लाट कशी असते, हे त्यांना दाखवायला नको का? ‘शत प्रतिशत भाजप’ हे ध्येयच आहे आपल्या पक्षाचं!’
‘मग पुन्हा त्या ‘अच्छे दिन’वाल्या जाहिराती दाखवा ना टीव्हीवर!’ अडवाणी.
‘नको, मतदारांना उगाच डिवचल्यासारखं होईल ते.’
‘पण ‘केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ अशी ऑलरेडी घोषणा देताहेत ना महाराष्ट्र बीजेपीवाले?’ अडवाणी.
‘महाराष्ट्र बीजेपीवाले नव्हे, फडणवीसांच्या बैठकीतले दोन-चार मित्र न् काही रिकामटेकडे फेसबुक न् व्हाट्सअॅपवालेच म्हणताहेत तसे. शिवाय आपल्याला देवेंद्र लाट नको, मोदी लाट हवीय. त्या लाटेसह आपली महान भारतीय संस्कृती- म्हणजेच भाजप संस्कृतीही उसळली पाहिजे.’ श्रीपाद नाईक म्हणाले.
‘मग पुन्हा ‘हर हर मोदी’ म्हणा. आवडेल मराठी लोकांना ते. ‘हर हर महादेव’ अशी रणगर्जनाच आहे मराठ्यांची! शिवाय तिकडचे लोक लहान मुलांना अंघोळ घालतानाही ‘हर हर गंगे’ म्हणतात.’ जोशीबुवांनी आपलं जीके प्रकट केलं.
‘ते पण नको. शंकराचार्य-बिंकराचार्य लोक रागावतात तसं म्हटल्यानं. काही तरी नवी कल्पना काढायला पाहिजे. आपण दोघंही जुने जाणते आहात. म्हणून तर मार्गदर्शन हवंय!’ नाईक.
‘मग त्या बात्रांना सांगूया महाराष्ट्रात प्रचारसभा घ्यायला. त्यांच्याइतकी संस्कृती कुणाला कळली आहे भारताची?’ जोशी.
राजनाथ अस्वस्थपणे घड्याळाकडे पाहत, जांभई आवरत म्हणाले, ‘लवकर करून टाका बुवा मार्गदर्शन. उशीर होतोय मला. ह्या वेळी आपलं सरकार महाराष्ट्रात निर्विवादपणे आलं पाहिजे! अगदी डंके की चोट पर!!’
हे ऐकताच अडवाणींचा चष्मा लक्कन् चमकला आणि ते टाळी वाजवून ओरडले, ‘डंके की चोट पर!! सुचली मला आयडिया!’
‘बहुत अच्छा! बता दीजिये!’ राजनाथ.
‘असं बघा, ऐन निवडणुकांच्या काळातच नवरात्र येतंय्. आपण महाराष्ट्रात ठिकठिकाणी गरबा-रास, दांडिया आयोजित करायचा...’
‘त्यात काय विशेष? महाराष्ट्रात दरवर्षी मोठाले दांडियाचे कार्यक्रम करतात नवरात्रात!’ अडवाणींना मध्येच तोडून राजनाथ म्हणाले.
‘खराय्! पण हा दांडिया विशेष असेल. त्यात एक खास आकर्षण असणार आहे... खुद्द मोदीजी!’ ‘म्हणजे? मोदीजी काय गावोगावी जाऊन ‘मेहंदी रंग लाग्यो’च्या तालावर दांडिया खेळणार आहेत?’ राजनाथांचा विरस झाला होता.
‘पुरतं ऐकून तरी घ्या,’ अडवाणी उत्साहानं करवादून म्हणाले, ‘मोदींनी ढोल वाजवायचा. त्यांचं ढोलपटुत्व सर्वांना ठाऊकच आहे. मागे नाही का त्यांनी जपानमध्ये ढोल वाजवला होता?...’
‘मुरलीपण वाजवली होती ना?’ मुरलीमनोहरांनी मध्येच पुसले.
‘जोशीजी, तुम्ही गप्प बसा हो! दांडियात काय मुरली वाजवतात का? शिवाय एकसमयावच्छेदेकरून ढोल आणि मुरली दोन्ही वाजवता येईल का?’ अडवाणी नम्रपणे खेकसून म्हणाले, ‘जपान्यांना जशी मोदींनी आपल्या ढोलवादनाने मोहिनी घातली, तशीच मोहिनी आता ते दांडियाच्या निमित्तानं मराठी जनतेला घालतील!’
‘अहो पण इतक्या ठिकाणी अॅट-अ-टाइम उपस्थित राहायला ते काय रासक्रीडा करणारे चमत्कारी कृष्ण आहेत का?’ राजनाथांनी रास्त खुसपट काढलं.
‘होलोग्राफिक थ्री-डी प्रोजेक्शनचं तंत्र कशासाठी असतं मग?’ उत्साहानं फसफसत अडवाणी म्हणाले, ‘महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात गरबे आयोजित करायचे. मोदीजी एकाच जागी बसून ढोल बडवतील. त्याचं लार्जर दॅन लाइफ प्रोजेक्शन सगळीकडे करायचं. मोठ्ठे मोदीजी मोठ्ठा ढोल दोन मोठ्ठ्या दांडक्यांनी बडवतील!! स्टिरिओ डॉल्बी साउंड! फुल्ल व्हॉल्यूम!! अवघा नवरात्राचा सीझन मोदीमय होतो की नाही बघा!’
राजनाथांच्या चेह-यावरचा कंटाळा आता कुठल्या कुठं पळून गेला. त्यांच्या मनात अडवाणींविषयी भयानक आदर दाटून आला आणि परमविनम्रभावाने सद‌्गदित होऊन त्यांनी अडवाणींपुढे दोन्ही कर जोडून दंडवत घातला!
gajootayde@yahoo.com