आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवी-कविणीची करुण कहाणी (पुन्हा कोपच्यात)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध्यरात्र उलटून गेली होती. चुनाभट्टीच्या एका अंधाऱ्या गल्लीतून जाणाऱ्या पोलिस-पॅट्रोलच्या जीपला ती दोघं संशयास्पद स्थितीत चालत जाताना दिसली. त्यातला एक जण बोकडदाढीवाला होता. त्यानं खांद्याला झोळी लटकवली होती. त्याच्यासोबत पिंजारलेल्या केसांची एक बाई होती. दोघांनीही अंगात बेंगरूळ झब्बे घातले होते. नामू हवालदारानं ड्रायव्हरला त्यांच्या शेजारी जीप उभी करायला लावली आणि त्या दोघांच्याही विरोधाला न जुमानता त्यानं गाडीत घालून दोघांना पोलिस ठाण्यात आणून रात्रीच्या ड्यूटीवर असणाऱ्या इन्स्पेक्टर हिंगवळेंच्या पुढ्यात उभं केलं. डुलकी घेण्याच्या बेतात असलेल्या हिंगवळ्यांनी नामूनं पुढ्यात उभ्या केलेल्या नमुन्यांकडे जरा वैतागानंच पाहिलं. पण मग एकाएकी त्यांची पेंग उडून गेली. ‘समोरची दोघंही नक्षलवादी असावीत’, असं त्यांना वाटलं.
‘काय रे, नावं काय तुमची?’ त्यांनी खेकसून विचारलं.

‘मी सुकुमार आणि ही कनकलतिका.’ त्यांच्यातला बाप्या उत्तरला.
‘च्यायला माणसांची नावं आहेत का आयुर्वेदिक औषधांची?”
‘नाही, म्हणजे माझं खरं नाव बंकटराम खोडमोडे आणि हिचं सुभद्रा तडमडकर!’
‘अस्सं! म्हंजे खोटी नावं वापरून गुन्हे करता तर!’
‘गुन्हे? गुन्हे कसले? आम्ही त्या नावांनी कविता प्रसवतो!’
‘कविता प्रसवता? कुठं? घरच्या घरीच की आणखी कुठं?’
‘तसं काही नक्की नसतं साहेब. काव्याचं बीज कुठेही पडू शकतं. एकदा पडलं की ते लगेच रुजतं आणि लगेच आम्ही काव्य प्रसवतो.’
‘दोघेही एकाच वेळी प्रसवता की...?’
‘बरेचदा आम्ही एकत्रच, पण वेगवेगळ्या कविता प्रसवतो. कधी-कधी मात्र एकेकालाच स्फूर्ती येते.’
‘असेल, असेल. कुठल्या टाइपच्या कविता करता तुम्ही? लोकांना भडकावणाऱ्या करत असणार नक्कीच!’ हिंगवळेंना त्यांच्या नक्षलवादी असण्याबद्दल ठाम खात्री होती.
‘मी संसर्गकवी आहे साहेब. संसर्गकविता करतो.’
‘संसर्गकविता? च्यायला निसर्गकविता वाचल्या होत्या शाळेत. संसर्गकविता म्हणजे काय असतं?’
‘ज्या वेळी ज्या कुठल्या विषयावरच्या कवितांची चलती असते त्या वेळी त्या विषयावरच्या कविता करतो मी. म्हणजे निसर्गकविता, बालकविता, म्हाताऱ्यांच्या कविता, प्रेमकविता, स्त्रीवादी कविता, पुरुषवादी कविता, सनातनी कविता, पुरोगामी कविता, वगैरे.’
‘हं...! म्हणजे मेड टू ऑर्डर! आणि ही तुमची बायको कोणत्या टाइपच्या कविता करते?’
‘बायको नाहीये मी ह्याची. संगिनी आहे!’ एवढा वेळ गप्प बसलेली कनकलतिका उसळून म्हणाली.
‘संगिनी? पण मघाशी तुम्ही कनकलतिका आहात असं म्हणले ना हे?’ हिंगवळे कन्फ्यूज झाले.
‘अहो, संगिनी आहे ह्याचा अर्थ मी ह्याची लग्नाची बायको नव्हे!’
‘अरारारारा... म्हणजे तसंच?’
‘लिव्ह-इन रिलेशनशिप कशाला म्हणतात, हे माहीत नाही वाटतं तुम्हाला!’ कनकलतिका रागावली.
‘असू दे, असू दे. बरं, तुम्ही कोणत्या प्रकारच्या कविता करता, संगिनीबाई?’
‘तुझ्या आयला लावला...’
‘ओ बाई, इथं शिव्या देण्याचं काम नाही. हे पोलिस ठाणं आहे. इथं शिवीगाळ फक्त पोलिसांनाच अलाऊड आहे.’ हिंगवळेंना सात्त्विक संताप आला.
‘हीहीहीही! अहो, शिव्या नाहीयेत काही, माझ्या कवितेचं शीर्षक आहे ते! मी किनई बाई, नर्मविद्रोही कविता करते. पूर्ण कविता ऐका ना... तुझ्या आयला लावला घोड्डू, सूर्यानं ठोकला शड्डू, खाऊया क्रांतीचा लड्डू...’
‘आलं लक्षात, बाई! राहू द्या पुढची कविता.’
ही दोघं नक्षलवादी-बिक्षलवादी नसून मेंटल केसेस आहेत, असं आता हिंगवळेंना वाटू लागलं होतं. यांना पटकन इथून घालवावं आणि डुलक्या घ्याव्यात, असा विचार करून त्यांनी विचारलं, ‘बरं, एवढ्या रात्री त्या रस्त्यावर काय करत होतात?’
‘घरी जात होतो, आणखी काय?’ सुकुमार.
‘कुठून येत होतात?’
‘घुमानहून!’
‘घुमान? ते पंजाबातलं? हां हां, तिथं कायतरी लेखक-बिखकांचा उरूस भरला होता म्हणे. पण तो उरूस तर कधीच संपला. मग तुम्ही काय मुक्कामाला राहिला होतात की काय तिथं संमेलन आटोपल्यानंतर?’
‘छे हो, मुक्कामाला कसले राहतोय? आम्ही मुंबईहून निघणाऱ्या स्पेशल ट्रेननं जाऊन त्याच ट्रेननं परतदेखील येणार होतो. तिथल्या कविसंमेलनात आम्ही कविता वाचणार होतो आमच्या. पण ऐन वेळी घोळ झाला. आमची नावंच आमंत्रित कवींच्या यादीत नव्हती! कुणी तरी मुद्दाम आमची नावं गाळून आपले पित्तू घुसवले असणार! आम्ही दोघंही प्रचंड चडफडलो, पण करणार काय? बसलो गप-गुमान! तरी तिथं बाकी काही नाही तरी खाणं-पिणं बरं होतं म्हणून कसाबसा तग धरला आम्ही समारोप होईपर्यंत. मग संमेलन आटोपताच सगळ्यांसोबत घर-वापसीसाठी स्पेशल ट्रेनमधून मुंबईला परत यायला निघालो.’ सुकुमार.
‘पण ती स्पेशल ट्रेन तर कधीचीच पोहोचली मुंबईला. मग तुम्ही एवढे लेट कसे झालात?’ हिंगवळेंना रास्त शंका आली.
‘पुढे ऐका ना साहेब,’ सुकुमार म्हणाला, ‘आम्ही निराश मन:स्थितीत ट्रेनमध्ये बसलो. कवीला काव्यवाचनापासून वंचित ठेवण्यासारखं वाईट काहीच नसतं. ट्रेन सुरू झाली आणि थोड्याच वेळानं एका नेमाडेछाप मोठ्ठ्या मिशीवाल्या कवीनं ट्रेनमध्येच साहित्य-संमेलन भरवण्याची आयडिया काढली! आता तरी कविता वाचायला मिळणार, म्हणून आमच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. आम्ही दोघंही वाट काढत त्या बोगीकडे जाऊ लागलो. वाटेत काव्यवाचनेच्छूंची ही गर्दी होती. रीघच लागली होती. कसेबसे वाट काढत आम्ही त्या मिशीवाल्या कवीपर्यंत पोहोचणार, तोच एका निब्बर चेहऱ्याच्या कवीनं आम्हाला हटकलं आणि आम्ही कुठं जातो आहोत, असं विचारलं. आमचा हेतू त्याला सांगताच त्यानं आम्हाला सांगितलं की, ट्रेन-संमेलनात काव्यवाचनासाठीचं बुकिंग काल रात्रीच फुल झाल्यानं आम्हाला कविता वाचता येणार नाहीत! हे ऐकल्यावर मी आणि कनकलतिका प्रचंड उद्विग्न झालो आणि आम्ही निषेधपूर्वक सभात्याग करण्याचा निर्णय घेतला आणि चालत्या ट्रेनमधून खाली उड्या घेतल्या!’
‘काय? आणि सहीसलामत राहिलात?’ हिंगवळे चकित झाले!
‘छ्या:! त्या ट्रेनला काय वेग होता का साहेब? गोगलगायीच्या गतीनं चालत होती ती! मात्र, उड्या मारताना आमचं सगळं सामान, पैसे गाडीतच राहिल्याचं आमच्या लक्षात उशिराच आलं. मग मजल-दरमजल करत, लंगरांमध्ये खात-पीत आम्ही पायीच मुंबईला निघालो आणि थोड्या वेळापूर्वीच इथं पोहोचलो.’
त्यांची करुण कहाणी ऐकून पोलिस असूनही हिंगवळेंचे डोळे पाणावले.
‘नाम्या, या दोघांना जीपमधून नीट घरी पोचव रे. आणि रस्त्यात कुठं तरी भुर्जी-पाव पण खाऊ घाल.’ त्यांनी हुकूम सोडला.

gajootayde@gmail.com