आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Ganesh Bagal In Rasik About Photography

सपनों के सौदागर (लेन्स आय)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिग्नलवर भीक मागणाऱ्या मुलांचे जे फोटो माझी जमात (फोटोग्राफर) काढते, त्याला माझा विरोधच आहे. कारण गरिबी दाखवून किंवा तिचे फोटो काढून, प्रश्न संपणारे नसतात; उलट, त्याचा बाजार मांडण्यासारखं होतं. त्यामुळे माझ्यापुरतं तरी माझ्या फोटोमधला सब्जेक्ट कधीच केविलवाणा किंवा दीन दिसावा, असं मला नको असतं...
पुण्यात, जगताप डेअरीजवळच्या सिग्नलला गाडी थांबली, म्हणून सहज लक्ष गेलं. दोन राजस्थानी स्त्रिया ‘Winnie the Pooh’चं (बाल अस्वलाच्या रूपातलं लहान मुलांचं आवडतं कार्टुन कॅरेक्टर, ज्यातला ‘एच’ सायलेंट.) हवा भरलेलं बाहुलं विकत होत्या. तिथेच एक रिकाम्या त्रिकोणी जागेत त्यांची मुलं खेळत होती. मी पुढे जाऊन परत आलो. नेहमीप्रमाणे, कॅमेरा सोबत होताच. ते हवा भरलेलं बाहुलं आणि सोबत ती मुलं खेळताना पाहून एक कम्पोझिशन आठवलं.


सिग्नलवर भीक मागणाऱ्या मुलांचे जे फोटो माझी जमात (फोटोग्राफर) काढते, त्याला माझा विरोधच आहे. कारण गरिबी दाखवून किंवा तिचे फोटो काढून, प्रश्न संपणारे नसतात; उलट, त्याचा बाजार मांडल्यासारखं होतं. त्यामुळे माझ्यापुरतं तरी माझ्या फोटोमधला सब्जेक्ट कधीच केविलवाणा किंवा दीन दिसावा, असं मला नको असतं.तो त्रास देणारा असेल. सुंदर असेल. अस्वस्थही करेल; पण दीन कधीच नसेल.

यथावकाश काही फोटो काढून झाले. पण त्यातल्या एका बाईनं आमचे फोटो नको, असं हातानेच सांगितलं. मी पण त्यांना बाहुलीकडे बोट दाखवत सांगितलं, की तुमचे काढत नाहिये. माझे फोटो झाल्यावर, मी त्या ताईला काढलेले फोटो दाखवले, त्यात एकही मुलाचा क्लोजअप नव्हता, ना मला तो हवा होता. फोटोत मला गरिबी नाही, पण विरोधाभास दाखवायचा होता. फोटो घेताना त्यांच्या चेहऱ्यावर काहीच एक्सप्रेशन नव्हते. त्यांना समजलंच नाही, काय क्लिक केलं मी...

हे रस्त्यावर जगणारे, भटके लोक. ना जात कोणाला माहीत, ना कुठल्या मतदार यादीत यांचं नाव. मतदार यादीत नाहीत म्हणून, मतांचं राजकारण करणारे कुठलेच राजकीय पक्ष यांच्या मागे नाहीत. आणि अनुसूचितच्याही पलीकडची जात यांची, माणूस म्हणूनसुद्धा नाकारलेली...
सिग्नलवर लोकांना आनंद विकणारे, आणि तो विकता विकता स्वत:चीच ओळख, आयुष्य हरवलेली ही माणसं. पण तरीही मुलं खूश दिसत होती. काय कारण असेल? ‘विनी द पु’ला निरोप देताना त्याच्या मित्राने एक वाक्य सांगितलं होतं.
‘Promise me, you’ll always remember : You’re braver than you believe, and stronger than you seem, and smarter than you think.’
असंच तो ‘पु’ यांना रात्री झोपताना सांगत असावा बहुधा, जे दिवसभर उन्हा-पावसात टवटवीट राहायला त्यांना बळ देत असेल...

ganeshbgl23@gmail.com