आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Girish Prabhune About Confession Of Lying

चुका कबूल करण्याची हिंमत आजही माझ्यात नाही...(कन्फेशन बॉक्स)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माणसाच्या हातून चुका होतात; पण त्या कबूल करण्याची हिंमत लागते. ही हिंमत खूप तपश्चर्येने येते. केलेल्या चुका कधी लपूनही राहत नाहीत. कोणीतरी असतंच सांगायला. पण या चुका कबूल करण्याची हिंमत आजही माझ्यात नाही.
माफी मागायला हवी होती, असे प्रसंग माझ्या आयुष्यात दोन-तीनदा आले. एक प्रसंग अगदी लहानपणीचा पण त्याची खंत आजही कायम असल्यासारखा आहे. यात चूक घडलीय म्हणून माफी नाही, तर नकळत काही गोष्टी घडतात आणि माणसं दुखावतात, असा रंग या प्रसंगात आहे. मी पहिली-दुसरीत होतो. तेव्हा आम्ही चिपळूणला राहात होतो. आमच्या घराजवळ एक ओढा होता. आणि त्या ओढ्यावर पत्र्याचा पूल होता. त्यावर आम्ही खेळत असू. पावसाळ्याचे दिवस होते. ओढ्याला पाणी होतं आणि खेळताना मी ओढ्यात पडलो. वाहून चाललो होतो, तितक्यात तिथून जात असलेल्या भाटवडेकर सरांनी ते पाहिलं आणि त्यांनी थेट पाण्यात उडी मारली आणि मला वाचवलं. मी प्रचंड घाबरलो होतो. त्यांनी काही विचारायच्या आत मी बरोबर खेळणाऱ्या एकाचं नाव घेतलं आणि यानं मला ढकललं, असं सांगून टाकलं. मी खोटं बोलून त्या वेळी सुटलो. सरांनी त्याला शिक्षा केली. असं खोटं का सांगितलं, म्हणून त्यानं मला काही विचारलं नाही. पण माझं आणि त्याचं बोलणं बंद झालं. तो आम्हा भावंडांशी खेळायला यायचा; पण माझ्याशी बोलायचा नाही. हे इतरांच्या लक्षात आलं होतं. मला वाटायचं, त्याला सांगावं की ‘मी चुकलो’ म्हणून. एकत्रच खेळायचो आम्ही.. या ओढ्याच्या कडेला एक कठडा होता. त्या कठड्यावरून उड्या मारत मारत आम्ही नेहमी जायचो. त्या दिवशी तो, मी आणि आम्ही गावातली काही लहान मुलं उड्या मारत चाललो होतो. तो माझ्याशी बोलत नव्हताच. फूटभर अंतरावरच होता. माझ्या मनात यायचं, की ‘आपण बोलूयात का स्वतःहून याच्याशी..’ त्या वेळीही आलं. आणि उड्या मारता मारता त्याचा पाय घसरला आणि तो वाहत्या पाण्यात पडला. वाहात गेला. माझ्या डोळ्यांसमोर तो कायमचा निघून गेला... जवळच होतो आम्ही, पण माफी मागू शकलो नाही. या प्रसंगाची सल आजही माझ्या मनात जागी आहे.

दुसरा एक प्रसंग मी तिसरी-चौथीत असतानाचा आहे. आम्ही तेव्हा इस्लामपूरला राहायला होतो. माझं लहानपण कोलाटी-डोंबारी यांच्या मुलांबरोबरच जास्त गेलं. मला त्यांच्याबरोबर राहायला आवडायचं. ही मुलं नेहमी काही ना काही उद्योग करत राहायची. छोटा. छोटा. आणि त्यातून पैसे मिळवत राहायची. मग त्या पैशातून गोळा खा, सिनेमा बघ... असं काही करायची. मलाही वाटायचं, आपल्याकडेही पैसे असावेत. त्या वेळी माझी आई दवाखान्यात काम करायची. कुणाची प्रसूती झाली की, तिला पैसे मिळायचे आणि ती घरी एका डब्यात टाकायची. रोज किती झाले मोजायची. एकदा या मुलांनी ‘दूधभात’ हा सिनेमा पाहिला आणि मला त्याबद्दल अगदी कळवळून सांगितलं. मलाही वाटलं, आपण हा चित्रपट बघायला पाहिजे. मग मी आईच्या डब्यातून एक रुपया आणि दोन आणे घेतले. मी पैसे घेतल्याचं माझी बहीण बेबीला माहीत होतं. ती म्हणाली होती, की ‘तू आईला सांग’ म्हणून. पैसे घेतले आणि ‘दूधभात’ व ‘सीतास्वयंवर’ हे दोन चित्रपट लागोपाठ पाहिले. बाहेर पडलो आणि माझ्या मागे एक कुत्रं लागलं. मला चावलं. तसाच रडत मी घरी आलो. बहीण म्हणाली, ‘तू चुकीचं वागलास म्हणून देवानं तुला शासन केलं.’ मी तिला काही बोललो नाही. माझे वडील दुसऱ्या एका चित्रपटगृहात तेव्हा काम करायचे. मी ज्या चित्रपटगृहात चित्रपट बघितला, तिथला ऑपरेटर माझ्या वडिलांचा मित्र होता. या मित्रानं माझ्या वडिलांना येऊन सांगितलं, “तू मुलाला ‘दूधभात’सारखा चांगला चित्रपट दाखविलास, बरं केलंस.” आईनं रात्री पैसे मोजले तेव्हा पैसे कमी असल्याचं तिच्या लक्षात आलं. आई-वडिलांची त्यावर चर्चा झाली. बेबी पैसे घेणार नाही, याची त्यांना खात्री होती. आणि मी चित्रपट पाहिल्याचंही कळलं होतं. मीच ते पैसे घेतल्याची त्यांना खात्री झाली. समजा आईवडिलांनी विचारलंच तर काय खोटं बोलायचं, याचं नियोजन मी करत होतो; पण त्याची संधीच त्यांनी मला दिली नाही. सकाळी अंघोळ घालताना आई ‘मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची, तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची...’ हे गाणं गुणगुणत होती. ते ऐकून मला रडूच कोसळलं. तिला काय म्हणायचं, हे माझ्या लक्षात आलं होतं. मला समजावताना ती म्हणाली, “तू जे पैसे घेतलेस ते आपलेच आहेत. तू चोरी केलीस, असं तुला वाटत असेल तर ते मनातून काढून टाक. चांगलाच चित्रपट पाहिलास तू. पण चांगलं काम करायचं, तर ते चांगल्या पद्धतीनं करावं. रडू नको. काही हवं असेल, काही लागलं तर सांगत जा.” मला न दुखावता, तिला माझी चूक दाखवायची होती. आई आणि वडिलांची चूक दाखविण्याची पद्धतच निराळी होती.

कुत्रं चावल्यानं मला उपचारासाठी साताऱ्याला आणलं. एक इंजेक्शन रोज असं १४ दिवस घ्यायचं होतं. वडीलही माझ्याबरोबर होते. ३ इंजेक्शन राहिली असताना वडील तातडीनं इस्लामपूरला निघून आले. मला काय घडलं, ते सांगितलं नाही. मी तीन दिवसांनंतर घरी आलो तेव्हा कळलं, माझी बहीण बेबी हार्ट अॅटॅकनं गेली होती... चुकीची शिक्षा भोगून आल्यानंतर तिला मला भेटायचं होतं. पण...

मी सांगितलं त्याप्रमाणे माझे सगळे मित्र डोंबारी-कोलाटी-पारधी असे होते. मी त्यांच्याबरोबरच फिरायचो. ब्राह्मण मित्र मला कमीच. त्यामुळं मी ‘बिघडलो, वाया गेलो’ असा समज पसरला होता. कैकाडी समाजातला आमचा एक मित्र, तो नेहमी वर्गात पहिला यायचा. आणि मी दुसरा. त्यांचा परिवारही सहा महिने बाहेर असायचा. त्यामुळे तो सहा महिनेच वर्गात असायचा. तो सतत फिरायचा आणि मी जीव तोडून अभ्यास करायचो तरी तो पहिला का येतो, याची मला उत्सुकता होती. मग एक दिवस घरी काहीही न सांगता त्यांच्या परिवाराबरोबर मी त्यांच्या पालासोबत गेलो. जिथं त्यांचा तंबू ठोकला होता, त्या वेळी तिथं चोरी झाली म्हणून पोलिस या पालावर आले आणि सगळ्यांना पकडून नेलं, त्यात मीही होतो. मग त्यांनी सांगितलं, की हा ब्राह्मणाचा मुलगा आहे. हा आमच्या बरोबर आलाय फक्त. पोलिसांना हे कळल्यावर त्यांनी गाडीत घालून मला घरी आणलं. मी गायब झालो, म्हणून घरी शोधाशोध सुरू झालेली. पोलिसांची गाडी पहिल्यांदाच घरी आली म्हणून घरचे घाबरले. मी काहीतरी चोरी वगैरे केली, असा वडिलांचा समज झाला आणि गाडीतून उतरल्या उतरल्या त्यांनी मला बेदम मारायला सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना अडवलं. म्हणाले, अहो कशाला मारताय त्याला. याची काही चूक नाही. हरवला होता म्हणून गाडीत आणलं त्याला. नंतर सगळी कहाणी त्यांना कळली. माझ्या मनातली उत्सुकता सांगितली. आई म्हणाली, तू तिकडं मजेत राहिलास आणि आम्ही इकडं शोधत होतो तुला, असं म्हणत आई खूप रडली.

मी नंतर सामाजिक कार्यात आलो. पारधी समाजासाठी काम केलं. करतो आहे. एक प्रसंग आहे. दोघं जण होते, त्यांनी मर्डरचे गुन्हे केले होते; पण ते नाव बदलून राहात होते. पोलिस रेकॉर्डवर त्यांचे फोटोही नव्हते, सापडत नसल्यामुळं ते फरार असं घोषित केलेलं. पोलिसांनी या दोघांवर खूप खोटे गुन्हे टाकले होते. एकदा काही कारणानं हे नाव बदललेले दोघे आणि पोलिस समोरासमोर आले. मीही होतो. पोलिसांनी सांगितलं, ‘यांनी एवढे गुन्हे केले आहेत.’ तर हे दोघे म्हणाले, की हे खोटं आहे. यातले अमुक अमुक मर्डरचे गुन्हेच त्यांनी केले आहेत. इतर मर्डर त्यांनी केले नाहीत. बलात्काराचेही नाहीत. पोलिसांनी तुम्हाला काय माहीत विचारल्यावर त्यांनी थेट सांगितलं, की ते दोघे आम्हीच आहोत म्हणून. हे असं चुका कबूल करण्याचं धाडस या पारधी लोकांच्यात होतं. त्यांच्या आयुष्यात अशा असंख्य गोष्टी घडतात. पण त्यांचं आयुष्य थांबत नाही. कोळ्याचं जाळं आपण काढलं की तो जसं पुन्हा नव्या जोमानं ते विणतो, तसंच हे पारधी लोक पुन्हा नव्या नजरेने आयुष्याकडे पाहतात. रोजचा दिवस जगतात. आपण शिकलेले लोकही अनेकदा बुरखा पांघरतो. हे तर शिकलेलेही नव्हते. तरी असं पांघरलेपण त्यांच्यात नाही. स्वच्छपणे सांगतात, हे मी केलं. हे मी नाही. कुठून येतं हे बळ? हा प्रश्न मला आजही पडतो.
आमच्या ‘पुनरुत्थान समरसता गुरुकलम्’मधला प्रसंग सांगतो. अगदी कालपरवाचाच. ग्रँट रोड रेल्वेस्टेशनवरून एक लहान मुलगी आमच्या गुरुकुलमध्ये आली. तिचे आई-बाबा तिला इथे ठेवून गेले. एक तास झाला आणि ती माझ्याकडे आली, म्हणाली, “काका माझ्या आईला फोन लावून द्या.” मी म्हटलं, की संध्याकाळी लावू. संध्याकाळी आली पुन्हा तेच. म्हटलं, जेवण झाल्यावर लावू या. जेवण झाल्यावर पुन्हा ती आली. मी म्हटलं, सकाळी लावू या.. पुन्हा सकाळी आली आणि म्हणाली, आता लावा ना फोन.. तर मी पुन्हा तेच दुपारी लावू या, असं सांगितलं. तर झालं असं की, ती छोटीशी मुलगी तिच्या नव्या दहाएक छोट्या दोस्तांना घेऊन आली. आणि सगळ्यांसमोर मला म्हणाली, “हे काका खोटारडे आहेत. हे माझ्या आईला फोन लावून देत नाहीत. असा मोठा माणूस कधी खोटारडा असतो का? मी तुम्हाला खोटारडा म्हणणार...” असं म्हटल्यावर मला एकदम काय झालंय नेमकं, हे जाणवलं. या मुलांबरोबर असताना मी लहानच असतो. लहानांसारखंच वागतो. कामाच्या ओघात राहून जातात गोष्टी. जाणीवपूर्वकच आपण असं वागतो, असं नाही. बऱ्याच वेळा ही लहान मुलंच माझ्या अशा गोष्टी सांभाळून घेतात. समजून घेतात.

चुका या दर वेळी समोरचाच एखादा आपल्याला दाखवतो, असं नाही; तर आपलं आपल्यालाही ते जाणवत असतं. मला लहानपणापासून डायरी लिहिण्याची सवय. बरीच वर्षं ती कायम होती. आताही लिहितो. पण त्यात इतकी सलगता नाही. यदुनाथ थत्ते यांनी मार्क ट्वेनवर लिहिलेलं पुस्तक तिसरी-चौथीत असताना माझ्या वाचनात आलं. मार्क ट्वेन हा जगप्रसिद्ध लेखक. त्यानं स्वतःवर खूप प्रयोग केले. तो चोऱ्या करायचा, लबाड्या करायचा, पण त्याची ते कबूल करण्याची हिंमत नाही व्हायची. मग तो कुणाला दुखावलं, फसवलं, खोटं बोललो, चोरून खाल्लं... असं सगळं डायरीत लिहायचा. मला हे खूप आवडलं. मी त्यात सुधारणा करून प्रत्येक गोष्टीला चिन्हं केली. खोटे बोलणे, ओरडणे अशा विविध गोष्टी त्यात होत्या. या गोष्टींना चौकोन, गोल, त्रिकोण अशी चिन्ह मी ठरवली होती. या चिन्हाच्या भाषेत मी स्वतःच्याच न पटलेल्या गोष्टी लिहायचो. हे कमी झालं पाहिजे, असं वाटायचं. मग मी स्वतःला गुण द्यायचो. ए, बी, सी, डी असे. ‘ए’पर्यंत पोहोचावं, असं मला वाटायचं. पण ‘डी’तून फार फार तर मी ‘सी’पर्यंत येऊ शकलो. हे असं चार-पाच वर्षं सुरू होतं. पण या प्रयोगामुळं स्वतःकडे पाहण्याची मला सवय लागली. स्वतःच्याच चुका स्वच्छपणे दिसायला लागल्या. माणसाच्या हातून चुका होतात; पण त्या कबूल करण्याची हिंमत लागते. ही हिंमत खूप तपश्चर्येने येते. केलेल्या चुका कधी लपूनही राहात नाहीत. कोणीतरी असतंच सांगायला. पण या चुका कबूल करण्याची हिंमत आजही माझ्यात नाही.
शब्दांकन : अभिजित सोनावणे

abhi.pratibimb@gmail.com