आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहेरची ओढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘माहेर’ म्हणजे एक असा शब्द जो ऐकल्यावर ओठावर हसू आणि डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहतच नाही. काही विशिष्ट दिवशी किंवा काही विशिष्ट सणांना तर माहेरची आठवण आल्याशिवाय राहतच नाही, मग ती विशीतली तरुणी असो किंवा साठीतल्या आजीबाई. दिवाळी त्याचपैकी एक सण.

दिवाळी म्हणजे अभ्यंगस्नानाचा एक सोहळाच असतो. माझ्या कायम लक्षात राहील आई-बाबांचे सकाळी सगळ्यात आधी उठणे, पाणी तापवून ठेवणे, मगच आम्हाला उठवणे, आईने अंगाला सुगंधी तेल लावून छान मालिश करून देणे. आणि मालिश करताना नेहमीचं ठरलेलं वाक्य म्हणणे, ‘दमते गं बाई माझी काम करून करून.’ अंगाला तेल लावून, उटणे लावून अंघोळ घालणे व नंतर औक्षण करणे हे अभ्यंगस्नान फक्त पुरुषांनाच असते अनेक घरांमधून. पण आजही आमची आई आम्हा तिघी बहिणींना हे सगळे करते.

लेक माहेरी येणार म्हटलं की, आईबाबांचे काळीज कसे भरून येते, त्यांना त्या सणापेक्षा आपली लेक आपल्याला भेटणार हा आनंदच खूप सुखावणारा असतो.
लेकीलासुद्धा सासरी कितीही चांगले असले तरी माहेरी जाण्याची ओढ कायम असते. माहेरी काढलेले ते दिवस अगदी मंतरल्यासारखे असतात आणि याच सुखद आठवणी वर्षभर सुखाने सासरी राहायला मदत करतात. माहेर म्हणजे जुन्या मैत्रिणींचे भेटणे, आईने लेकीला आवडणारे पदार्थ प्रेमाने करणे, बाबांनी रोज लेकीला आवडणारा खाऊ आणणे हे सगळेच सुखावून जाणारे असते. आईशी सासरच्या चांगल्या-वाईट गोष्टींचे हितगुज हे सगळेच मन मोकळे करणारे असते. पण एकेदिवशी नवरोबाचा फोन येतो आणि जाण्याचा दिवस ठरतो. तो दिवस जसा जसा जवळ-जवळ येतो तशी मनात कालवाकालव व्हायला लागते. बॅगमध्ये भरणा-या कपड्यांपेक्षा या मनात साठलेल्या आठवणीच खूप असतात. गाडीत बसल्यावर आईबाबांना हात करून निरोप घेताना त्यांच्या आणि आपल्यादेखील डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्याशिवाय राहतच नाही.

प्रत्येकीने हा माहेरपणाचा अनुभव भरभरून घ्यावा आणि तसाच पुढे आपल्या लेकीला द्यावा. अनेक वर्षं जातील, पिढ्या बदलतील; पण माहेरपणाची ही ओढ कधी कमी होणार नाही.