आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लेडी चंगेज खान’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुस्लिम समाजात रूढ असलेल्या ‘तिहेरी तलाक’ पद्धतीविषयी सार्वजनिक चर्चा सुरू झाली आहे. राजकीय आणि सामाजिक कंगोरे असलेल्या या विषयाला भिडताना इस्मत चुगताई यांचे ‘कागदी पेहराव’ हे आत्मकथन अटळ थांबा असल्यासारखे आहे.

असं म्हणतात की, फार पूर्वी इराणमधे न्याय मागण्याची एक वेगळीच पद्धत होती. आपल्या तक्रारी कागदावर लिहायच्या आणि त्या कागदाने बनवलेला अंगरखा घालून अधिकाऱ्याकडे फिर्याद घेऊन जायचे. या अंगरख्याला ‘कागजी पैरहन’ म्हणत. इस्मत चुगताई या सुप्रसिद्ध उर्दू लेखिकेच्या आत्मकथनाचे नाव ‘कागजी पैरहन’ आहे त्याला हा संदर्भ आहेच, शिवाय या आत्मकथनाच्या पहिल्या पानावर उदधृत केलेला मिर्झा गालिब यांचा शेर हे शीर्षक अधिक उलगडून दाखवतो. “कुणाच्या लेखन सौंदर्याचे, नक्षीकामाच्या मोहकतेचे प्रतीक फिर्याद करणारे आहे? प्रत्येक चित्राच्या आकाराचे वस्त्र कागदाचे आहे.” अशा आशयाचा तो शेर आहे. मराठीत या पुस्तकाचा अनुवाद सुलोचना वाणी यांनी ‘कागदी पेहराव’ या नावाने केला आहे. पद्मगंधा प्रकाशनाने तो प्रसिद्ध केला आहे.

या आत्मकथनाची आठवण होण्याचं कारण आहे, सध्या देशभरात मुस्लिमस्त्रियांवर अन्याय करणाऱ्या तिहेरी तलाक पद्धतीविषयी उलटसुलट चालू असलेली चर्चा. केंद्र सरकारने या पद्धतीच्या विरोधी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. तर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने तिहेरी तलाक पद्धत रद्द करायला हरकत घेतली आहे. राजीव गांधी पंतप्रधान असताना शाहबानो प्रकरणात सर्वोच्च नायालयाने तिला पोटगी देण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला होता. या निर्णयामुळे घटस्फोटित मुस्लिम स्त्रीला पोटगी मिळण्याचा मार्ग खुला झाला होता. पण मुस्लिम धर्ममार्तंडांच्या दबावाखाली राजीव गांधींनी संसदेचा अधिकार वापरून तो निर्णय बदलला. आता शाहिरा बानो या मुस्लिम स्त्रीने तिहेरी तलाक पद्धतीविरुद्ध न्यायालयात दाद मागितली आहे आणि पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे. या सदरात या विषयाच्या निमित्ताने याआधीही एका आत्मकथनाची नोंद घेतली होती. सय्यदभाई यांचं ‘दगडावरची पेरणी’ हे आत्मकथन, त्यांनी तिहेरी तलाक पद्धतीविरुद्ध आयुष्यभर दिलेल्या लढ्याचं चित्रण आहे.

आज या विषयाच्या निमित्तानं इस्मत चुगताई या बंडखोर लेखिकेच्या आत्मकथेची आठवण झाली. चाळीसच्या दशकात मुक्त विचारसरणीचा आविष्कार करणाऱ्या त्यांच्या लेखणीने आधुनिक विचारांच्या वाचकांच्या मनात खास स्थान मिळवले होते. त्यांचा उल्लेख ‘इस्मतआपा’ असा केला जाण्यामागेही वाचकांनी त्यांच्यावर केलेले प्रेम दिसून येते. त्यांचा जन्म १९१५मध्ये उत्तर भारतातल्या बदायूं इथं झाला आणि १९९१मध्ये मुंबईमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर २५ वर्षांनी जेव्हा आपण ही आत्मकथा वाचतो तेव्हाही अगदी आजच्या आधुनिक काळातही त्यांचे विचार कमालीचे बंडखोर वाटतात. मग जेव्हा त्या प्रत्यक्ष ते विचार अंमलात आणत होत्या, त्या ३०-४०च्या दशकात, त्यातूनही मुस्लिम कुटुंबात, अशा प्रकारचा विचार करायला आणि त्या प्रकारे जगायला केवढी हिंमत पाहिजे, याची कल्पना करणंही अवघड आहे.

त्या काळात मुलींना शिक्षणाची दारे नुकतीच उघडली जाऊ लागली होती. मुस्लिम मुलींसाठी तर शाळा अजून सुरू व्हायच्या होत्या. असे असताना कुटुंबियांशी सतत संघर्ष करत इस्मतआपा शिकल्या. अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून त्यांनी बीए आणि नंतर बीएडची पदवी मिळवली. शिकत असतानाच त्यांचे लेखनही सुरू झाले होते. लखनौमधल्या प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनच्या बैठकीत त्या सहभागी होत. त्या काळच्या अनिष्ठ सामाजिक रूढी आणि परंपरांवर बोचरे भाष्य करणारे त्यांचे लेखन परंपरावादी आणि धर्ममार्तंडाच्या रोषास कारणीभूत ठरले नसते, तरच नवल. १९४२मध्ये लाहोरहून निघणाऱ्या मासिकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘लिहाफ़’ (रजई) या कथेमधे अश्लील लेखन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तिथल्या न्यायालयात बादशहाच्या वतीनं खटला भरण्यात आला होता. त्याच वेळी असाच आरोप सादत हसन मंटो यांच्यावरही करण्यात आला होता आणि त्यांनाही लाहोर न्यायालयात सुनावणीसाठी पाचारण करण्यात आले होते. इस्मतआपांनी आत्मकथनाच्या सुरुवातीलाच या खटल्याचे आणि त्या निमित्ताने मंटोसह केलेल्या लाहोर सफरीचे धमाल वर्णन केले आहे.

या प्रकरणात सरळ माफी मागावी म्हणजे खटला पुढे चालणार नाही आणि दंड किंवा शिक्षा होणार नाही, म्हणून त्यांच्या अनेक नातेवाईकांनी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. इस्मतआपा मात्र ठाम राहिल्या, खटल्याच्या सुनावणीसाठी त्यांना दोनदा लाहोरला जावे लागले. सुनावणीत कथेमध्ये कोणतेही गैर शब्द वापरले नसल्याचे सिद्ध झाले आणि न्यायालयाने त्यांची विनाअट सुटका केली. स्त्रियांमधल्या समलिंगी संबंधांविषयी सूचक अशी ही कथा आहे. इस्मतआपांनी आत्मचरित्राच्या सुरुवातीलाच या कथेविषयी विस्ताराने लिहिले आहे कारण या कथेला एवढी प्रसिद्धी (त्यांच्या वेळी कुप्रसिद्धी) मिळाली की, ही कथाच जणू काही त्यांच्या लेखनाची ओळख बनली. या कथेचा जो शिक्का त्यांच्यावर बसला त्यातून बाहेर पडणे, त्यांनाही शक्य झाले नाही. शाहीद लतीफ यांच्याशी विवाह केल्यानंतर आरजू, जिद्दीसारख्या चित्रपटाच्या कथा आणि निर्मितीमधे त्यांचा सहभाग होता. ‘गरम हवा’ हा फाळणीसंदर्भात त्यांनी लिहिलेला चित्रपट खूप नावाजला गेला. इस्मतआपांना त्यासाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. शशी कपूरच्या ‘जुनून’ चित्रपटासाठी त्यांनी संवादलेखन केलं होतं. दुर्दैवाने, त्यांच्या या आत्मकथनात त्यांचा मुंबईतील जीवनप्रवास आलाच नाहीये. ‘कागदी पेहराव’मधे इस्मतआपांचे लहानपण, कॉलेजमधले आणि बोर्डिंगातले दिवस इथपर्यंतचं वर्णन आहे. त्यामुळे एका लेखिकेचे आत्मचरित्र म्हणून ‘कागदी पेहराव’ वाचायला घेतले, तर वाचकांची निराशा होते . सुरुवातीला ‘लिहाफ़’च्या खटल्याविषयी लिहिल्यानंतर इतर कुठल्याही लिखाणाबद्दल यात लिहिलेले नाहीय.

इस्मत चुगताईंचा पिंडच मुळात कथाकाराचा आहे. म्हणूनही असेल कदाचित या आत्मकथेतही त्या स्वतःविषयी लिहिताना आपल्या असंख्य नातेवाईकांच्या अनेक छोट्यामोठ्या, गंमतीजमती सांगत राहतात. उदार विचारसरणीच्या, मॅजिस्ट्रेट असलेल्या आपल्या वडिलांविषयी विस्ताराने लिहितात, तर जुन्या विचारांची पण प्रेमळ अशा आईचे अनेक किस्सेही रंगवून लिहितात. इस्मतआपांना सख्खे सहा भाऊ आणि तीन बहिणी (म्हणजे एकूण दहा भावंडं, त्यात यांचा नंबर नववा). या सगळ्यांविषयीचे किस्से, त्यातच मामा, माम्या आणि इतर अनेक नातेवाइकांचीही भर. हे सगळे वाचताना बऱ्याचदा आपला फारच गोंधळ उडतो आणि कुणाचा कोण याचा कधीकधी संबंधही लागत नाही. इस्मत चुगताईंची खोडकर आणि मिश्कील लेखनशैली, हे या आत्मकथनाचे ठळक वैशिष्ट्य आहे. खरे तर तो त्यांचा स्वभावविशेषच म्हणावा लागेल. उच्च शिक्षणाच्या ध्यासाने प्रसंगी धर्मही सोडण्याची तयारी असलेल्या इस्मतआपांचे प्रगतिशील धाडसी व्यक्तिमत्त्व या पुस्तकातून समोर येते. समाज आणि धर्म जाचक बंधने घालत असेल तर ती झुगारून देण्याचे साहस इस्मतआपांनी आयुष्यभर केले. अगदी लहानपणपासून बुरख्याला विरोध केला. स्त्रीपुरुष समानता स्वतःच्या कर्तबगारीवर आचरणात आणून दाखवली. सर्वधर्मसमभाव आपल्या घरापासूनच राबवला. त्यांची एक मुलगी आर्य समाजी झाली, तिने हिंदूशी विवाह केला. त्यांच्या मृत्यूनंतर मुस्लिम रीतीनुसार त्यांचे दफन न करता दहन करण्यात आले. तसे करावे ही त्यांची इचछा होती की, नव्हती याबद्दल मतमतांतरे आहेत. आपल्या लेखनातूनही त्यांनी नेहमीच समानता, स्वातंत्र्य याच मूल्यांचा पुरस्कार केला. उर्दूतील ख्यातनाम लेखिका कुर्रतुल रेहमान इस्मतआपांच्या या लढाऊ बाण्यामुळे त्यांना साहित्यातल्या ‘लेडी चंगेज खान’ म्हणत.

इस्मत चुगताईंसारख्या पुरोगामी आणि मुक्त विचारांच्या स्त्रियांची संख्या वाढणे ही आज मुस्लिम समाजाची गरज आहे. मुस्लिम स्त्रीसाठी अन्यायकारक अशा रूढींचा विरोध मुस्लिम स्त्रियांनी स्वतः करणे आवश्यक आहे. तरच तिहेरी तलाकसारख्या पद्धती बंद होण्याची शक्यता आहे.

janhavip@yahoo.com
बातम्या आणखी आहेत...