आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरात जाणारा फराळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटस्थापनेच्या मुहूर्तावर काही ठिकाणी एक ‘खमंग लगबग’ सुरू होते. चकली, कडबोळी, चिवडा, करंजी, लाडू, अनारसे, शंकरपाळे, शेव, यांचे घाणे काढले जाऊ लागतात. ही लगबग असते दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांची. मात्र इतक्या लवकर या घाईचे कारणही तसेच असते. हे पदार्थ पाठवायचे असतात परदेशांत. अमेरिका, कॅनडा, युरोप आणि मध्यपूर्वेतले देश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर. जिथे जिथे मराठी माणूस पोहोचलाय, तिथे तिथे दिवाळीच्या फराळाला पर्यायच नसतो. अशा खमंग निर्यातीची ही गोष्ट.

पुण्यातले बाजीराव रस्त्यावरचे ‘खाऊवाले पाटणकर’ दुकान त्याचे नाव सार्थ करत असतानाच, दिवाळीचा फराळ विदेशांमध्ये पाठवण्यातही अग्रेसर आहे. अशा ‘खाऊवाल्यां’च्या मालकीणबाई सोनिया पाटणकर या सध्या फराळाच्या खमंग लगबगीत गुंतल्या आहेत. फराळाच्या पदार्थांची पारंपरिक चव, दर्जा, अत्यंत आकर्षक आणि मजबूत पॅकिंग, वक्तशीरपणा, ऑर्डर घेण्यासाठीचे सर्व आधुनिक मार्ग ग्राहकांसाठी उपलब्ध असणे. अशा पंचसूत्रीवर पाटणकरांचा दिवाळी फराळ जगभरातल्या अनेक देशांत पाठवला जातो.

“सुमारे आठ वर्षांपू्र्वी आम्ही दिवाळीचा फराळ विदेशात पाठवायला सुरुवात केली आणि आता तो आमचा अॅसेट बनला आहे. ही कल्पना सुचायला एक ज्येष्ठ ग्राहकच कारणीभूत ठरले,” सोनिया पाटणकर सांगत होत्या. “एक दिवस एक ज्येष्ठ नागरिक आमच्याकडून काही पदार्थ खरेदी करण्यासाठी आले. त्यांनी खरेदी केली आणि ते कुरिअरवाल्याकडे गेले. पण ते पदार्थ योग्य पद्धतीने सामावून घेईल, असे खोके कुरिअरवाल्याकडे नव्हते. ते काका पुन्हा आमच्याकडे आले. आम्ही त्यांना योग्य आकाराचे खोके दिले. त्यात त्यांनी खरेदी केलेले सर्व पदार्थ छानपैकी पॅक करून दिले. मग ते पुन्हा कुरिअरवाल्याकडे गेले. तर त्याने वजनाचा मुद्दा काढला. मग ते पुन्हा आमच्याकडे आले. पुन्हा सगळे पॅकिंग अपेक्षित वजनानुसार करून दिले. ते पुन्हा कुरिअरवाल्याकडे गेले. हे करण्यात त्यांचे सुमारे तीन तास गेले. शिवाय दमणूक झाली ती वेगळीच. त्या एका उदाहरणावरून आम्हाला ही कल्पना सुचली की, आपणच अशी फराळाची पार्सल विदेशांमध्ये पुरवली तर काय हरकत आहे? मग लगेच प्रयत्न सुरू केले. पुण्यातल्या जवळपास प्रत्येक घरातली एक तरी व्यक्ती कुठल्या तरी कारणाने परदेशी असतेच. त्यामुळे संपर्क त्वरित शक्य झाला. नित्याचा व्यवसाय ‘खाऊ’चाच असल्याने प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होतेच. दर्जा, विश्वास, चवीची खात्री आणि सेवा या जमेच्या बाजू होत्या. त्यामुळे नवी कल्पना अल्पावधीत राबवता आली.

एकदा दिवाळीचा फराळ निर्यात करायचा, हे ठरल्यावर मग त्यासाठीचे पॅकेजिंग, विशिष्ट खोकी, त्याचे मटेरियल यांचा विचार करून वैशिष्ट्यपूर्ण बॉक्स डिझाईन केला. त्यात १४ विशिष्ट मापाचे ट्रे बसवले. शिवाय फराळ परदेशांत पाठवायचा असल्याने वजनाच्या मर्यादांचा बारकाईने विचार केला. फराळाचे जिन्नस ५ किलो आणि बॉक्स, पॅकेजिंग एक किलो, असे एकूण ६ किलो वजन पक्के केले आणि ते आजही कायम आहे. चार जणांच्या कुटुंबासाठी हा फॅमिली पॅक तयार केला. आज जगभर तो लोकप्रिय आहे. विदेशातील फराळाच्या एकूण मागणीपैकी ८० टक्के मागणी या फॅमिली बॉक्सची असते. एका बॉक्समध्ये साधारण १३ प्रकारचे फराळाचे पदार्थ असतात. त्यात लाडू, चिरोटे, शंकरपाळे आणि चिवड्याचे दोन-दोन प्रकार असतात. चकली, कडबोळी, करंजी, चिरोटे, अनारसे, शेव, शंकरपाळे असा फराळ असतो. ग्राहकांच्या मागणीनुसार पदार्थ कमी-जास्तही केले जातात. बेसन आणि मोतीचूर लाडू, खारे आणि गोड शंकरपाळे, पातळ पोह्यांचा आणि फराळाचा चिवडा, गोड व मसाला चिरोटे असे प्रकार असतात. अमेरिकेखालोखाल युरोपीय देश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दुबई, मस्कत, अशा अनेक देशांत फराळाला खूप मागणी आहे.”

ऑर्डरसाठीचे विविध पर्याय
नव्या काळात ग्राहकाभिमुख होऊन विचार केल्याने आमच्या संकेतस्थळावर दिवाळीच्या फराळाची ऑनलाइन मागणी नोंदवता येते. पैसेही देता येतात. आॅर्डर मेल करता येते. आम्ही फोनवरून ऑर्डर्स घेतो. व्हॉट‌्सअॅप मेसेजवर बुकिंग घेतो. शिवाय विदेशात राहणाऱ्यांचे असंख्य नातेवाईक दुकानात येऊन आॅर्डर देतात. आमचा सर्व माल ताजा असतो. इतका हजारो मैलांचा प्रवास केल्यावरही फराळाचे पदार्थ तुटलेले, भुगा झालेले नसतात. ती पॅकेजिंगची किमया आहे. दिवाळी म्हणजे फक्त फराळ नसतो. त्यामुळे आम्ही फराळासोबत आमच्या वतीने पणत्या, आकाशदिवे आणि दिवाळी अंकांच्या रूपाने साहित्यिक फराळही भेट म्हणून पाठवतो. एका फराळाच्या फॅमिली बॉक्सची किंमत यंदा ६,४५० रुपये आहे. याशिवाय मागणीनुसार फराळाचे सुटे पदार्थही आम्ही पुरवतो.
jayubokil@gmail.com
बातम्या आणखी आहेत...