आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तो राजहंस एक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण तळ्यातल्या बदकाचे कुरूप पिल्लू असूही कदाचित. पण आपल्यातही एक राजहंस लपलेला असतोच, नव्हे आहेच. त्याला बाहेर काढा आणि बघा जग कसं तुमच्याकडे सन्मानानं आणि कौतुकाने बघतं ते.
माझ्या भाचेसुनेने व्हॉट्सअॅपवर ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिलू तयात एक’ या गाण्याचे अॅनिमेटेड चित्र पाठविले. ते गाणे ऐकताना मी भूतकाळात कधी शिरले ते कळलेच नाही.
आम्ही सहा बहीणभावंडं. माझी भावंडं गोरी, सुरेख. मी सावळी, प्रकृतीने अशक्त. आईला त्यावेळी सर्वच म्हणायचे, ‘अगं लीला, ही मुळी लेक शोभतच नाही मुळी.’ मला फार वाईट वाटायचं. माझी प्रकृतीही वारंवार बिघडायची. त्यामुळे उपेक्षित असूनही संपूर्ण घरातल्यांना माझ्याभोवती धावायला लावायची मी.

पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेतानाही माझ्या साधारण दिसण्याचा न्यूनगंड व त्यात तारुण्यपीटिकांची भर, त्यामुळे गंड वाढतच गेला. पण तरीही शिक्षण घेत गेले. वृत्तपत्रातून कधीतरी माझी एखादी कविता प्रकाशित होत होती. लग्नाच्या बाबतीतही सगळीकडे नकारघंटाच. त्यामुळे आत्मविश्वासही कमी झालेला. मात्र एकदाचं माझं लग्न झालं. माझ्या भावंडांचीही लग्नं झाली. त्यातही माझी आर्थिक परिस्थिती जेमतेमच, त्यामुळे तिथेही मी एक कुरूप पिल्लूच. मात्र पती नाट्यक्षेत्रात सक्रिय. त्यांच्यासोबत मित्रमंडळीत मिसळत गेले. नवीन अनुभव, नवीन विचार जोपासत गेले. एकदा अशीच एक कथा लिहून पाठविली, ती प्रकाशित झाली. एका वाचकाची त्यावर सुंदर प्रतिक्रिया आली आणि माझ्यातला राजहंस जागा होऊ लागला. मग मी कथा, लेख, विविध वृत्तपत्रांतून पाठवू लागले. दिवाळी अंकांतून विविध पुरस्कार मिळू लागले. माझ्या ‘एक घर सावलीचे’ या कथासंग्रहाला साहित्य संस्कृती मंडळ, मुंबईचा पुरस्कार मिळाला. बोलण्यात, वागण्यात आत्मविश्वास आला.

बीएससी होतेच. नंतर इितहास व मराठीत अतिरिक्त बीए, एमए केले. एका प्राथमिक शाळेत नोकरी लागली. तिथेही आपल्या बोलण्याचा, शिकविण्याचा प्रभाव पडतो हे लक्षात आल्यावर बीएड केले व सध्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नोकरी करीत आहे. मी मूळची सायन्सची विद्यार्थिनी असूनही हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना मराठी शिकवते. पण इंग्रजी माध्यमाची शाळा, शाळेत रथी-महारथी. त्यात आपले कसे होणार, ही भावना होतीच. पुन्हा आपण कुरूप पिल्लूच आहोत, असे वाटू लागले होते. मात्र संस्थाचालकांच्या व मुख्याध्यापकांच्या प्रोत्साहनाने पुढे जात राहिले. आज पंधरा वर्षे झालीत, शिक्षिका आहे. अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रमातून आत्मविश्वासाने आपले मत मांडत आले आहे. माझ्यातल्या कुरूप पिल्लाचे राजहंसात नसेल कदाचित पण आत्मविश्वासू, कणखर स्त्रीमध्ये कधी रूपांतर झाले ते कळलेच नाही.
मला नोकरी तर लागली पण वाहन कुठलंच चालवता येत नव्हतं. लहानपणी भित्री असल्यमुळे साधी सायकलही शिकले नव्हते. स्कूटर वगैरे शिकायची तर हिंमतच नव्हती. घरच्यांना शिकवा म्हटलं तर ‘साधी सायकल येत नाही आणि चालली स्कूटर शिकायला,’ असे टोमणे ऐकावे लागले की पुन्हा एकदा कुरूप पिल्लू डोकावू लागायचं. मग निश्चय केला. घरातल्या घरात तीन खोल्यात हातात सायकल घेऊन फिरवायला सुरुवात केली. बॅलन्स साधला. मग दांड्यावर व नंतर सीटवर बसायला शिकले. मग सायकल बाहेर काढली. लोक हसायचे, या वयात सायकल चालवून कुठे जाणार म्हणायचे. मग स्कूटरसाठी पतिदेवांच्या मागे भुणभुण लावली. रोज बोलणी खात लूना शिकले व शाळेतही न्यायला लागले. मात्र अजूनही कोणाला डबलसीट नेताना मात्र माझ्यातलं कुरूप पिल्लू आडवं येतंच. अर्थात बँकेतली कामं, बिलं भरणं इ. छोट्यामोठ्या कामांसाठी दुचाकी शिकल्यामुळे कोणावर अवलंबून राहावे लागत नाही.

म्हणूनच मधुरिमाच्या माझ्या सर्व मैत्रिणींना मी सांगू इच्छिते की, आपण तळ्यातल्या बदकाचे कुरूप पिल्लू असूही कदाचित. आपल्यातही एक राजहंस लपलेला असतोच, नव्हे आहेच. त्याला बाहेर काढा आणि बघा जग कसं तुमच्याकडे सन्मानानं आणि कौतुकाने बघतं ते.
मैत्रिणींनो, उठा आणि राजहंस व्हा. यशस्वी व्हा.
बातम्या आणखी आहेत...