आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदलापूरची बखर : कचरे में रहने दो, कचरा ना उठाओ...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदलापुरातल्या जागृत लोकांना एकदा आला कचऱ्याचा तिटकारा. काहींनी यावर उपाय सुचवणाऱ्या पाट्याही लावल्या. मात्र, या पाट्यांचा कसा उलट परिणाम झाला, पाहूया आजच्या बखरीत..

प्रभंजनकुमार लैच वैतागला होता. घरी, दारी, अंगणात, रस्त्यावर जिथ्थं तिथ्थं कचरा. चालताना कुठंही पचापचा थुंकणारे लोक. रस्त्याच्या कडेची गटारं रस्त्यात मधोमध आलेली... ओघळाओघळांनी ओळख करून घेत येकमेकांची ख्यालीखुशाली विच्चारणारी... रस्त्यात मधोमध उभं ऱ्हाउन घाईघाईत निवांत गप्पा छाटणाऱ्या बायकांसारखी डिट्टो! ओघळ चुकवण्यासाठी मारलेली उडी म्हशीच्या ताज्या गरम शेणातच पडावी ना? दुर्दैव - दुर्दैव म्हणतात ते ह्येच्च असणार!
कधी सुधरणार आप्ली लोकं? त्याची चिडचिड होत होती. सकाळपास्नंच येकेक वाईट वाईट गोष्टी घडत होत्या. रस्त्यात जोशीबुवा भविष्यवाले भेटले, तेव्हा तो त्यांना म्हणला की, “कस्ला दिवस उजाडलाय जोशीबुवा? काहीच कळून नाही ऱ्हायलं बगा.”
जोशीबुवा म्हणले, “रास कोण्ती तुझी? पत्रिका घिऊन ये घरी... मग बघू.”
आता येवढ्यातेवढ्याला कोण आशी पत्रिका घिऊन जातं का ज्योतिष्याकडे, असा विच्चार मनात आला आणि प्रभंजनकुमारला थोडं बरं वाटलं. अनाहूतपणानं ‘येवढ्यातेवढ्याला’ हा शब्द आपल्या मनात आला, याचा अर्थच असा हये का ही गोष्ट काही लै मोठी नाहीय्ये. तरी च्यानलच्या ऑफिसात आल्यावर त्यानं आधी सगळ्या न्यूजपेपरांचा गठ्ठा उचलून आपल्या ट्येबलावर न्येला आणि येकेक पेपर उचलून वाचू लाग्ला. ऑफिसातले सगळे दचकू-दचकू पाहात होते. आज तर पेपरांमध्ये कुठं ब्यांशी टक्के, कुठं आठ्याहत्तर टक्के जाहिराती होत्या. इत्कं खिळून वाचावं आशी कोण्तीच बातमी नव्हती. याला काय गवसलं आसंल बॉ? की कोणतरी कायतरी क्लू देल्हा आसंल आणि हा शोधत आसंल. पण येकेका पेपरसरशी प्रभंजनकुमारच्या चेहऱ्यावरचा गोंधळ उर्फ कन्फ्यूजन वाढतच ग्येलं. सगळे राशीभविष्यवाले निरुपयोगी आहेत... तो चिडून स्वतःशीच पुटपुटला. कारण स्पष्ट होतं, प्रत्येक पेपरातलं त्याच्या राशीचं भविष्य वायलं वायलं होतं. म्हणजे उदाहरणार्थ बघा...
१. प्रयत्न करा, २. हळवेपणाला आवर घाला, ३. कठोर निर्णय टाळा, ४. मानसिक आरोग्याचे रक्षण करा, ५. समाजसेवेची संधी लाभेल, ६. अनुभवातून नवीन बोध घ्या, ७. मेजवानी मिळेल, ८. उपासमार सोसावी लागेल, ९. शांतचित्ताने स्वस्थ बसा, १०. प्रगतीची दारे उघडी ठेवा, ११. प्रवासात मौल्यवान वस्तू जपा, १२. यशाचा गुणाकार जमणार नाही, १३. वात्सल्य लाभेल, १४. बलाढ्य ग्रहांनी आपल्या बाबतीत पाठ फिरवली आहे, तरी गांगरून जाऊ नका, १५. अतिउत्साह टाळून दोन शब्द कमी बोला....
आता या कशाचा कशाशी काय संबंध? मेजवानी नको आणि उपासमार तर नकोच नको, निदान इडली-वडा तरी खायला मिळावा. प्रगतीची दारं उघडी ठेवून मौल्यवान वस्तू कशा जपता येतील? तो इत्का कन्फ्युजला की टण्णकन त्याचा हात बेलवर पडला. म्हणजे हात पडल्यावर बेल टण्णकन वाजली आणि येरवाळी चारचारदा बेल वाजवून न येणारा प्यून आत्ता चुकून वाजलेल्या बेलला दाद देत झटक्यात आत आला.
“काय पायजेलंय सायेब?” त्यानं तोंडातला तोबरा सांभाळत विच्चारलं. तरी ओठांच्या कडेनं लाल मुखरस ओघळलाच.
“कचऱ्यात टाक हे सगळे प्येपर!” तो भडकून म्हणाला.
“कचऱ्यात कायले? रद्दीचा भाव कोसळला का?” त्यानं विच्चारलं.
“घेऊन जा प्येपर...” तो वैतागून म्हणला.
“काय झालंय काय तुला?” यांकर सुजाता घालमोडेनं विच्चारलं.
“तुझं नाव भोचकच पाह्यजे होतं,” प्रभंजनकुमार उत्तरला.
“उग्गं वडाचं तेल वांग्यावर काढू नक्कोस,” ती फणकाऱ्यानं म्हणाली, “काय झालं ते सांग मुकाट्यानं.”
“वडाचं तेल नाई गं बाई, वड्याचं तेल.” तो कावून म्हणाला.
“तेच्च ते. सांग तुझा प्रॉब्लेम. मागे तुझ्या घरासमोर कचरा टाकत होते, तो प्रॉब्लेम माझ्या आयडियानं सुटला की नाई? आता आजचा प्रॉब्लेमपण सोडवून टाकेन. फटाफट,” सुजाता घालमोडेनं सांगितलं.
“तू कस्लं सोल्युशन देल्हं होतंस माझे आई? सांग बरं.” प्रभंजनकुमारनं हात जोडून विच्चारलं.
“सोप्पं होतं ना... बायका जिथं कचरा टाकायच्या, तिथं मी तुला येक पाटी लावायला सांगितली : ‘जी बाई इथं कचरा टाकेल, तिचा नवरा मरेल!’ आठवडाभर टाकला नाही ना कुणी कचरा? यापुढेही टाकणार नाहीत. यू नो, मला बायकांची सायकॉलॉजी नीट्टंच म्हाईतीय्ये,” सुजाता घालमोडे खिदळत म्हणली.
“तुला बायकांची सायकॉलॉजी म्हाईती आसेल, पण बदलापुरातल्या बायकांची सायकॉलॉजी कळायला त्या फ्रॉइडलाही सात जन्म घ्यावे लागतील,” प्रभंजनकुमार म्हणाला, “आठवडाभर कुणी कचरा टाकला नाई ह्ये खरंये. पण पाटीचा येगळा परिणाम झालाच. बदलापुरातले जे जे नवरे बेवडे, मारकुटे, संशयी, रिकामटेकडे, मवाली हयेत ना... त्या सगळ्यायच्या बायका रात्रीच्या गपचिप यिऊन बरोब्बर पाटीखाली कचरा टाकून जाऊन ऱ्हायल्यात. काल रात्री तर कुणी तरी येकीनं पाटीला फुलांचा हारसुद्धा घातला आणि ‘नवरा खरंच लवकर म्येला तर कचरेदेवाची पूजा घालून गावजेवण देईन’ आसा नवस बोलून कचऱ्यावर दिवा ठेवला... मी खिडकीतून बघत होतो...”
“अग्गोबाई... मग?” सुजाता घालमोडेचे मिचमिचे डोळे शक्य तित्के विस्फारले आणि फडफडवताना खोट्या पापण्या गळून पडल्या. त्या घाईघाईनं उचलून घ्येत तिनं ‘पुढे काय?’ हे खुणेनेच विच्चारलं.
“मग काय? आग लागली. आधीच आठवड्यातून येकदा पाणी येऊन ऱ्हायलंय. भरून ठिवलेले आर्धे हंडे आग विझवण्यात वाया गेले,” प्रभंजनकुमार हताशपणे म्हणला आणि अस्वस्थपणे गुणगुणू लागला, “कचरे में रहने दो, कचरा ना उठाओ... कचरा जो उठा दिया
तो भेद खुल जायेगा... तौबा मेरी तौबा... तौबा मेरी तौबा!”

kavita.mahajan2008@gmail.com
बातम्या आणखी आहेत...