आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सामर्थ्य आहे हस्ताक्षर चळवळीचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हस्ताक्षराचे महत्त्व त्रिकालाबाधित राहणार आहे. कागदाचाही शोध लागलेला नव्हता, तेव्हा तर भूर्जपत्रावर हस्ताक्षरात ज्ञानाचा अखंड साठा पुढल्या पिढीपर्यंत पोहोचला. नंतर कागदाचा शोध लागला, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आली, तरीदेखील हस्ताक्षराचे महत्त्व अबाधित राहिले...
‘घडवा सुंदर हस्ताक्षर, घडवा सुंदर मन’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये असलेल्या कैद्यांसाठी हा आगळावेगळा उपक्रम राबविला जात आहे... या शिवाय व्हॉट्सअॅप, यूट्यूब, ई-मेल, फेसबुक या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ही चळवळ जगाच्या कानाकोपऱ्यात मला पोहोचवायची आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्या किंवा पाट्यांच्या एेवजी ‘आकाश’ टॅब देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा तत्कालीन मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी केली होती. त्या वेळी वाटले, आता हस्ताक्षराचे काही खरे नाही. परंतु विचार केला, अशीच परिस्थिती टाइपरायटर आले त्या वेळीदेखील निर्माण झाली होती; परंतु अक्षर हे अक्षरच राहिले. हे हस्ताक्षर इतिहासजमा होण्याची भीती प्रथम टाइपरायटरमुळे आणि त्याच्या पुढच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संगणकामुळे निर्माण झाली होती. मला स्वतःला अनेक वेळा वाटलं होतं की, बस्स... आता आपल्या सुंदर हस्ताक्षर चळवळीला पूर्णविराम द्यावा लागेल. परंतु असं झालं नाही. माझी ‘घडवा सुंदर हस्ताक्षर’ ही चळवळ गेल्या १९ वर्षांपासून सुरूच आहे. महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यांमधून ४००हून अधिक सुंदर हस्ताक्षराबाबत कार्यशाळा, प्रात्यक्षिकासह मार्गदर्शनपर शिबिरे हा या चळवळीच्या यशस्वितेचा एकप्रकारे पुरावाच आहे.

मी नाशिकच्या एका दैनिकात उपसंपादकाची नोकरी करीत एचपीटी कॉलेजमध्ये पत्रकारितेचा पदवी अभ्यासक्रम शिकत होतो. त्या वेळी आमच्या वृत्तपत्र कार्यालयात नागपूर येथील सुंदर हस्ताक्षराचे प्रचारक नाना लाभे आले होते. त्यांनी सुंदर हस्ताक्षराबाबत मार्गदर्शन केले. खरे तर आपण बनचुके झालो आहोत, आता कशाला हस्ताक्षर सुधारते, असा विचार करून नानांची टिंगल केली. स्वतः नानांनी २०० पेजेस वही दिली. त्यात लिपीची मूळ चिन्हे, शब्द आणि वाक्य असा सराव करावा, असे त्यांनी सांगितले. त्या वहीवर सराव करायचा प्रयत्न केला, तेव्हा आपल्या हस्ताक्षरात पूर्वीच्या तुलनेत आता चांगले परिवर्तन झाले असल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्यांना सुधारलेल्या अक्षरात पत्र लिहिले. हस्ताक्षर सुधारले, याचे त्यांनी कौतुक केले. गुरुदक्षिणा म्हणून सुंदर हस्ताक्षराबाबत किशोर, तू आता मार्गदर्शन करायला सुरुवात कर, असा आदेश मिळाला. त्यांना गुरुदक्षिणा म्हणून इतरांना हस्ताक्षराबाबत मार्गदर्शन करू लागलो.

हस्ताक्षराचे महत्त्व त्रिकालाबाधित राहील, असा विश्वास आहे. पूर्वी सहाव्या-सातव्या शतकात कागदाचाही शोध लागलेला नव्हता, तेव्हा तर भूर्जपत्रावर हस्ताक्षरात ज्ञानाचा अखंड साठा पुढल्या पिढीपर्यंत पोहोचला. नंतर कागदाचा शोध लागला, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आली, तरीदेखील हस्ताक्षराचे महत्त्व अबाधित राहिले. आता संगणक आले, तरीदेखील हस्ताक्षर हे अक्षर राहणार आहे. भविष्यातदेखील त्याचे महत्त्व अजिबात कमी होणार नाही. ज्या संगणकामुळे हस्ताक्षर लोप पावेल की काय, अशी परिस्थिती निर्माण होऊ पाहते आहे; त्याच तंत्रज्ञानाचा उपयोग करून हस्ताक्षराचे महत्त्व जन-जनांपर्यंत पोहोचवायचे; त्यासाठी हव्या त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करता आला तरी तो करून घ्यायचा, असे उद्दिष्ट आहे. पूर्वी हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांपर्यंत मर्यादित होता; परंतु आता तो व्यापक केला आहे. ‘घडवा सुंदर हस्ताक्षर घडवा सुंदर मन’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये असलेल्या कैद्यांसाठी हा आगळावेगळा उपक्रम राबविला जात आहे. याशिवाय व्हॉट‌्सअॅप, यूट्यूब, ई-मेल, फेसबुक या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ही चळवळ जगाच्या कानाकोपऱ्यात मला पोहोचवायची आहे.

sunderakshar@gmail.com
बातम्या आणखी आहेत...