आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोळावं वरीस धिटाईचं (कव्हर स्टोरी)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज संक्रांत. संक्रमणाचा, एक टप्पा ओलांडून दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करण्याचा दिवस. चांगल्यासाठी बदलण्याचा, सुधारणेच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकण्याचा. त्या निमित्ताने महिलांमध्ये होत असलेल्या सकारात्मक बदलांविषयीची ही कव्हर स्टोरी.

नव्या वर्षातील पहिला किंवा दुसराच दिवस. ठिकाण मुंबईचे सीएसटी स्थानक. वेळ रात्री साडेअकरानंतरची. रात्री उशिरा सुटणाऱ्या शेवटच्या लोकलची वाट पाहात महिला आणि युवतींचा एक गट फलाटावर थांबलेला. दिवसभर खडखडणाऱ्या लोकलच्या चाकांची धडधड आता काहीशी मंदावली होती, सोबतच या स्थानकावरील गोंगाट काही प्रमाणात कमी झाला होता. त्यामुळे नीरव नसली तरी स्थानकावर काही प्रमाणात शांतता होती. अशातच सोबत घरातील पुरुष नसताना इतक्या रात्री फिरणे योग्य आहे का, महिलांसाठी मुंबई किती सुरक्षित, याची जराही फिकीर न करता या दहा-बारा जणींच्या मस्त गप्पा सुरू होत्या. काही जणी स्थानकावरच्या मोठ्या घडाळातील वेळ मोबाइलच्या स्क्रीनवर दिसेल, अशा पद्धतीने उभं राहून सेल्फी घेत होत्या, काहींची लगेचच हे फोटो अपलोड करण्याची घाई चाललेली होती. लोकलच्या डब्यातही रात्रीचा हा फेरफटका त्या बिन्धास्त एन्जॉय करीत होत्या.

मुंबईतल्याच एका उच्चशिक्षित युवतीने स्वत:च्या फोटोसह अगदी खरी माहिती देऊन ऑनलाइन डेटिंग साइटवर स्वत:चे प्रोफाइल तयार केले. काही तासांतच तिच्या अकाउंटवर हजारो कमेंटचा पाऊस पडला. त्यातील प्रत्येक शब्द किळसवाणा, घृणा निर्माण करणारा.

पहिल्या उदाहरणात रात्री उशिराही किमान सभ्यपणा दाखवणारे पुरुष व्हर्च्युअल विश्वात मात्र सभ्यपणाच्या सर्व मर्यादा ओलांडून लैंगिक भूक शमवण्यासाठी कोणत्या टोकाला जाऊ शकतात, हे दाखवतात. वरील दोन्ही उदाहरणात काही त्रास झाला, एखाद्या महिला किंवा युवतीने तक्रार केलीच तर बनावट प्रोफाइलच्या आड दडून हा प्रकार करणारे सायबर क्राइम सोडवण्याच्या मर्यादा लक्षात घेता कदाचित सहज सुटू शकतात. मात्र तुला असे करायची काय गरज होती, हा प्रश्न विचारून मुलींनाच अाराेपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यास मागे-पुढे पाहिले जात नाही. परिणाम काय होऊ शकतात, याची संपूर्ण जाणीव ठेवून मुंबईसह राज्यात अाणि देशात, अगदी आपल्या शेजारच्या पाकिस्तानातही, अनेक ठिकाणी महिला असे प्रयोग करून पाहात आहेत. यातून अालेले अनुभव अनेक जणी सोशल मीडियावर शेअर करतात. व्हर्च्युअल विश्वात महिलांचा मुक्त वावर असलेल्या Whyloiter? या पेजवर मुद्दाम केलेल्या अशा धाडसी प्रयोगांचे अनुभव अाणि त्यावरील प्रतिक्रिया विचार करायला लावणाऱ्या आहेत. त्यातून युवती आणि महिला बिनधास्त पुढे येऊन ठरवून दिलेली नियमांची चौकट मोडण्यासाठी हटकून प्रयत्न करीत आहेत.

सीएसटी स्थानक, रात्रीचे भटकणे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून एका विशिष्ट वर्गापुरताच वा सायबर विश्वापुरताच हा प्रयोग मर्यादित राहिलेला नाही. सार्वजनिक ठिकाणे असतील किंवा धार्मिक स्थळे, प्रथा आणि परंपरेच्या नावाखाली आजही स्त्रियांवर अनेक बंधने लादलेली आहेत. बंधनांच्या या बेड्या तोडून स्वातंत्र्याचा अनुभव घेण्यासाठी महिला पुढे येत आहेत. शनी शिंगणापूर येथे एका युवतीने चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याचा केलेला प्रयत्न असेल, किंवा सातारा जिल्ह्यात सोळशीच्या शनी मंदिरात वर्षा देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी शनीची केलेली पूजा; यातून हेच स्पष्ट होतंय की, महिला आता गप्प बसून राहणार नाहीत. चुकीच्या, विनाकारण बंधनात टाकणाऱ्या बेड्या तोडण्यासाठी पावलं टाकण्याचा त्यांचा मानस आहे. आजपर्यंत हा विषय महिला संघटना, स्त्री मुक्तीसाठी काम करणाऱ्या स्त्रीवादी नेत्या आणि कार्यकर्त्या यांच्यापर्यंतच मर्यादित होता. परंतु तो आता मराठवाड्यातील बीड जिल्ह्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. शहरातल्या हनुमान मंदिराबाहेर ‘महिलांना प्रवेश नाही’ ही पाटी महिलांनी आग्रही मागणी करून हटवायला लावली. केवळ मंदिर किंवा चाैथऱ्यावर जाऊन दर्शन करायचे, या उद्देशापर्यंतच हा विचार मर्यादित नाही. राज्यघटनेने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराआड कुणी येत असेल तर त्याविरुद्ध महिलांनी उभारलेला लढा आहे, हा विचार त्यामागे आहे. किंबहुना स्त्रियांच्या स्वातंत्र्य-समतेसाठी हे आवश्यक आहे. एरवी कोणत्या देवाचे दर्शन करायचे, मुळात करायचे वा नाही, हा वैयक्तिक निर्णय असायला हवा, हेदेखील या कार्यकर्त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे. या विचाराला विरोध करणाऱ्यांकडून ‘हे आत्ताच का?’ असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे. परंतु गेल्या काही वर्षांत प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाचा वाढलेला प्रभाव याच्याशी या नव्या लढ्याचा संबंध नक्की आहे. भारतात १९७०च्या दशकात स्त्री मुक्तीची चळवळ खऱ्या अर्थाने सुरू झाली. त्यानंतर या संदर्भात वैचारिक पातळीवर लढा आणि सोबतच सविस्तर अभ्यास सुरू झाला. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांनी १९७५ हे वर्ष आंतराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केले. यामुळे पाश्चिमात्य स्त्रीवादी चळवळीतील विचार आपल्याकडे पोहोचले. देशात ही चळवळ स्थिरावू लागली. समतेबरोबरच आर्थिक स्वातंत्र्याचा मुद्दा पुढे आला. पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या अनेक क्षेत्रांत स्त्रियांनी वर्चस्व निर्माण केले आहे. छोट्या गावांत शेतीमधील नवीन बदल, बचत गट, शेतमालावरील प्रक्रिया उद्योग आदींच्या माध्यमातून संख्येने कमी असल्या तरी पूर्वीपेक्षा अधिक स्त्रिया आर्थिक स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहेत. दुसरीकडे माध्यम क्रांतीने जगभरातील विचार घरात पोहोचल्याने स्त्रियांमध्ये जागृती होत आहे. २०१५ या वर्षातच सौदी अरेबियासारख्या कट्टर विचारांच्या देशात २० महिला नगरपालिका निवडणुकांमध्ये निवडून आल्या आहेत. सोळाव्या वर्षात भारतातल्या महिला अधिक सक्षम, कणखर व धीट होऊन पावलं टाकताना दिसतायत, आपणही त्यांच्या संगतीनं चालत राहू.

krishna.tidke@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...