आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषविरोधी मूल्‍यांचा पुरस्‍कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्त्रीवादी चळवळीत गेली ३५ वर्षं वस्तीपातळीवर तळागाळात स्त्रियांसोबत काम करत असताना, गप्पा मारताना स्त्रीवाद्यांच्या काही स्टिरियोटाइप विधानांबद्दल पडू लागलेल्या प्रश्नांबद्दल...
मर्दपणाच्या व्याख्येबद्दलचा ‘बच्चनजी, मर्द कैसे होते है’ हा लेख वाचला. स्त्रीवादी चळवळीत गेली ३५ वर्षं वस्तीपातळीवर तळागाळात स्त्रियांसोबत काम करत असताना, गप्पा मारताना स्त्रीवाद्यांच्या काही स्टिरियोटाइप विधानांबद्दल मला अलीकडे काही प्रश्न पडू लागलेत. त्यातलेच एक विधान या लेखात आहे. ते असे - ‘पॉप्युलेशन फर्स्ट या लिंगभाव समतेवर काम करणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षा ए. एल. शारदा म्हणतात, ‘लिंगभेद कमी करण्यासाठी आपण थेट पितृसत्ताक पद्धतीलाच का नाही आव्हान देत? पुरुष, पौरुषत्व आणि स्त्री, स्त्रीत्वाच्या तोडक्यामोडक्या व्याख्येतच का खेळत बसतो? जाहिरातीत अशा प्रकारची व्याख्या केल्यामुळे समस्त पुरुषवर्गाला पुन्हा एकदा रक्षणकर्त्याच्या भूमिकेत बसवण्यात आले आहे. घरातील सदस्यांसाठी शौचालय बांधून दिले की आपण मर्द अाहोत, हे सिद्ध करण्याचा किती लाजिरवाणा प्रयत्न आहे हा.’

‘थेट पितृसत्तेलाच आव्हान का देत नाही?’ असं म्हणताना किती क्रांतिकारक असल्यासारखं वाटतं नाही? मलाही तसंच वाटायचं इतकी वर्षं! माझा साधा प्रश्न आहे, हे आव्हान कसं देणार? एनजीओच्या माध्यमातून स्त्रियांसाठी फॅमिली काउन्सेलिंग सेंटर्स चालवून? वेश्यांच्या मुलांसाठी पाळणाघरं किंवा अंगणवाड्या चालवून? की वर्षानुवर्षं संविधानातील समतेच्या तरतुदी वापरून एसएमएसवरून ट्रिपल तलाक मिळालेल्या कुटुंबवत्सल मुस्लिम गृहिणीची कोर्टात केस लढून? अशा अनेक केसेस जिंकलोयत की आपण. पण त्यामुळे पितृप्रधान व्यवस्थेला धक्का पोहोचला? बाकीचं तर सगळं सोडा, किमान ज्या स्त्रीसाठी आपण लढलो तिच्या तरी डोक्यात ‘पुरुष हा वरचढ असणारच’ या ‘नॉर्मल’ व्यवस्थेबद्दल संकल्पना बदलल्या का?

२०१३मध्ये बलात्कार विरोधी सुधारित कायदा आल्यानंतर कुमारी असलेल्या कोवळ्या मुलीशी संभोग केल्यावर पुरुषाची ताकद वाढते, या ‘सांस्कृतिक’ समजाला धक्का पोहोचला का?जिथे ही पितृसत्ता अतिशय रुद्र स्वरूपात दिसते, अशा तळागाळातल्या शोषित जातीतल्या एखाद्या पीडित स्त्रीला ही व्यवस्था तोडण्यासाठी किंवा थोडासा धक्का देण्यासाठी कोणता ‘मूर्त’ स्वरूपातला मार्ग सांगणार, हे नाही तुम्ही सांगितलंत. स्त्रीवादी तत्त्व आणि विचारांची भाषा त्या बाईपर्यंत पोहोचलीय का, याचा अंदाज कधी घेेतलाय तुम्ही?तसा तो शोध घेतलात तर लक्षात येईल की, त्या बाईच्या मनापर्यंत तेच पोहोचलेलं असतं जे तिच्या सांस्कृतिक चौकटीतल्या पर्सपेक्टिव्हशी खूप जोडलेलं असतं. मूर्त रूपात तिला पुरुष जसा दिसतो; बाप, नवरा, मुलगा, सासरा, दीर, मित्र, भाऊ या रूपात, तो जसा अनुभवाला येतो त्या रूपात ती पितृसत्ता स्वत: अनुभवत असते.त्यामुळे पितृसत्ता ही ‘न दिसणारी’ ‘अमूर्त संकल्पना’ मूर्त रूपात जशी अनुभवाला येते, तशी ती त्या विरोधात बंड करते. हे मूर्त रूप म्हणजे ‘मर्द’ असणे आणि रोजच्या व्यवहारात मर्दानगीच्या अभिव्यक्तीचा अनुभव येणे आणि त्याच्यातून आलेल्या भेदभावाची व विषमतेच्या व्यवहाराची चीड येणे, हे त्याचे वास्तव व्यवहारातले रूप आहे.

ती बाई तिच्या कुटुंबातील मर्यादित ताकदीनुसार हे व्यवस्थेविरुद्ध बंड करतच असते. आज ग्रामपंचायती आणि छोट्या समूहात वावरताना अनेक बायका हे करतातच. त्यांचा व्यवहारात अनुभवाला येणाऱ्या मर्दानगीच्या वागणुकीविरुद्ध लढा हा अंतिमत: पुरुषसत्ताक व्यवस्थेविरुद्धच असतो. त्या लढ्याचे मूर्त रूप म्हणजे व्यवहारातल्या ‘मर्द’ असण्याच्या साध्या संकल्पनांना धक्का देत जाणे, ज्याचा विचारच सामान्य पुरुषाने कधी केला नव्हता त्याचा विचार करायला लावणे. ही परिवर्तनाची पहिली पायरी असते. शंभरातले दोन पुरुष बदलले तरी ते इतर ५० जणांना बदलू शकतात. तरच स्त्रियांच्या पितृसत्ताविरोधी लढ्याला यश मिळेल. मे २०१५मध्ये मुंबई पुण्यातल्या काही संघटनांनी मिळून एक मर्दानगीविरोधी ‘पुरुषभान’ परिषद घेतली होती, त्यात मी पुढाकार घेतला होता, त्याचा हाच उद्देश होता. रोजच्या व्यवहारात दिसणारे मर्दानगीचे आविष्कार आहेत त्याबद्दल विचार करायला लावणे हे काम हाती घेतले गेले. अर्थात सरळ घाव घालून क्रांती होत असती तर गेल्या ७५ वर्षांत झालेल्या स्त्रीवादी चळवळीने पितृसत्ता उलथवून टाकली असतीच नाही का? पण वास्तवात आजही हाजीअली दर्ग्याच्या मझारपर्यंत पोहोचायला आपल्याला तुकड्या-तुकड्यात लढावे लागते आहे. हे उदाहरणच खूप बोलके आहे. दुसरे असेही माझ्या लक्षात आलेय की, हा वाद ‘अमूर्त’ पातळीवर विचार करणाऱ्या बुद्धिवादी तात्त्विक वैचारिक परंपरेची सवय असलेल्या उच्चभ्रू ब्राह्मणी स्त्रीवादी विरुद्ध मूर्त स्वरूपातील अनुभवाच्या आधारे विचार करणाऱ्या स्त्रियांमध्ये असलेल्या सांस्कृतिक दरीमुळे आहे.ही संस्कृतीभिन्नता संत कवयित्रींमध्येही दिसते. वेदाभ्यासाचे वातावरण घरात असल्यामुळे ज्ञानेश्वरांची भगिनी संत मुक्ताबाई उघड्यावर अंघोळ करताना त्यांच्याकडे पाठ फिरवून उभे राहणाऱ्या चांगदेवाला जसे वेदांमधले दाखले देऊन सणसणीत सुनावतात, ती नीडरता नसली तरी दलित समाजात जन्मलेल्या सोयराबाई मात्र आपल्या अनुभवाच्या आधारेच बोलू शकतात.

आपल्या आप्तेष्टांचे कान पिरगाळणाऱ्या शेतकरीकन्या बहिणाबाई, आणि अस्पृश्यतेबद्दल चीड व्यक्त करणाऱ्या चोखामेळ्याची बहीण सोयराबाई यांच्यातला आणि वेदपंडिता संत मुक्ताबाई यांच्यातला फरक हा जातीय भेदभावाच्या सांस्कृतिक परंपरेतला आहे. जे धारिष्ट्य पुरुष असून चोखामेळासुद्धा दाखवू शकला नाही, ते जळजळीत वास्तव व्यावहारिक अनुभवाच्या आधारानेच दाखवू शकतात. म्हणूनच सोयराबाई म्हणतात, देहीचा विटाळ, देहीच जन्मला, सोवळा तो झाला कवण धर्म?

आपली स्त्रीवादी पितृसत्ता विरोधी क्रांती अशाच सोवळेपणाच्या मूल्यांचा, पुरुषविरोेधी मूल्यांचा पुरस्कार तर करत नाहीय ना?इतकेच भान असू द्यावे, ही नम्र विनंती.
कुंदा प्रमिला निळकंठ, मुंबई
kundapn@gmail.com
बातम्या आणखी आहेत...