आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहासासाठी दोन आसू, भविष्‍यासाठी दोन बाहू!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘जिंदा रहने के मौसम बहोत है मगर, जान देने की रुत रोज आती नहीं...’ आलीच संधी तर देशासाठी मरण पत्करु या, काही क्षण देऊ या... सध्या परत एकदा गो. नी. दांडेकरांचे ‘शिवकाल’ वाचत आहे. कितीदाही वाचले तरी मन भरत नाही, अशाच पुस्तकातील हे एक. खरं तर गोनीदांबद्दल आपण काय लिहावं? तेवढी पात्रता नाहीच. पण आजही ब-याच जणांना गो. नी. दांडेकर माहीत नसतात. त्यांच्या अनेक चांगल्या पुस्तकांपासून ते कोसो दूर असतात. त्यांची फक्त कीव करावी वाटते. मला नेहमीच अनेक प्रश्न पडतात; त्यातलाच हा एक- ज्या माणसांनी शिवकाल वाचला नाही, त्यांना भविष्याबद्दल काही बोलण्याचा अधिकार आहे का? भारताचं कसं होणार वगैरे वगैरे... प्रत्येक घरातून काही संस्कार व्हायलाच हवेत, त्यातील ‘वाचन संस्कार’ हा फार फार महत्त्वाचा संस्कार आहे. मला माझ्या आई-वडिलांनी व भावंडांनी वाचनाची आवड नुसतीच लावली नाही तर भरपूर चर्चा करून ती सकसपणे जोपासली.
मला माझ्या मामांनी एक गोष्ट सांगितली होती. अगदी सत्यकथाच. एक पदवीधर मुलगी व अत्यंत वाचनवेडी लग्नाच्या बाजारात उभी राहते. ५० वर्षांपूर्वीची गोष्ट. तिच्या आईवडिलांनी तिला एक स्थळ पसंत केले. नवरा देखणा, िशकलेला, संपत्ती गडगंज अशी. पण ज्या वेळी ती मुलगी त्या घरात लग्नापूर्वी घर पाहण्यासाठी गेली, सगळं घर पाहिलं, घरच्यांशी, नव-या मुलाशी बोलली व लौिकक अर्थाने सर्व सुंदर असून तिने ते स्थळ नाकारले...ज्या घरात ग्रंथ नाहीत व ग्रंथप्रेमी नाहीत तिथे माझी आयुष्यभर घुसमट होईल, मला पैशाने नको पण वैचारिक श्रीमंती असलेला नवरा हवा... न पाहिलेली ती मुलगी मला खूपच आवडली. पण मूळ मुद्दा वाचायचंच कशासाठी? हे एकदा समजलं, उमजलं की मग काय-काय वाचायचं, हे कळत जातं. माझ्या आईला समाज व देशाप्रती प्रचंड प्रेम. त्यामुळे मलाही तशी वाचनाची आवड लागली. शिवाजी महाराज हे तर आपले दैवत म्हणू या किंवा देशप्रेमाचा वस्तुपाठ. हे व्यक्तीभाव जेव्हा गोनीदा आपल्या पुढे साक्षात उभे करतात, तेव्हा आश्चर्य वाटतं, आदर वाढतो. दरारा वाटतोच वाटतो. पण मला नेहमी वाटतं, उद्योग असू दे, संस्था असू दे, तुम्ही शिवरायांना वाचलं पाहिजे. अगदी परिपूर्ण राजे होते शिवबा. कोणता गुण नव्हता शिवरायांच्यात? सध्या वाचत असलेलं पुस्तक कादंबरीमय शिवकाल, पाच कादंब-या एकत्रित आहेत. बया दार उघड, हर हर महादेव, दर्या भवानी, झुंजार माची, हे तो श्रींची इच्छा. गर्जत्या महाराष्ट्राचे चित्रण करणारा कादंबरीमय शिवकाल हे वाचताना गोनीदांच्या पायावर अनेकदा नतमस्तक व्हायला होते. प्रत्येक प्रसंग वाचणे ते वाचणे नव्हे, त्या काळात जाऊन प्रत्यक्ष अनुभवणेच. मला पुढील गाण्यातली आर्तता, सुरेल आवाज, संगीत सगळंच आवडतं, पण विचार पटत नाहीत.
‘जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय...’
हे फक्त सर्वसामान्यांच्या बाबतीत खरे आहे. पण शिवाजीराजे, सईबाई, जिजाऊ, दादाजी कोंडदेव, शंभूराजे यांच्या जाण्याने झालेली हानी कधीच भरून निघत नाही. खरं तर इथे नियती किंवा परमेश्वराचेही अपुरेपण जाणवते. अशी व्यक्तिमत्त्वं त्याला परत जन्माला घालणं जमलंच नाही. आपल्याकडे मनाला खिन्न करणारा प्रकार म्हणजे अशा थोर लोकांची जयंती, पुण्यतिथी करण्याचे प्रकार. आपण आपली पात्रता तपासून पाहायला हवी. अशा थोर लोकांच्या विचारांचे आचरण व्हायला हवे. परस्त्री मातेसमान असते, शत्रूचाही योग्य आदर राखायचा असतो. देश की कुटुंब, हा प्रश्न त्यांना पडलाच नाही. पूर्ण देश हेच त्यांचे कुटुंब होते. राजांची दूरदृष्टी व प्रत्येक सवंगड्याला आपलंसं करून त्याला देशासाठी प्राण देताना आनंद वाटावा असं घडवणं, हे फक्त शिवबाच करू शकले. खरंच, आपण सर्वांनीच शिवकाल फार बारकाईने वाचला पाहिजे व समाजासाठी, देशासाठी स्वतःला समर्पित करायची भावना, प्रेरणा, जागृती ठेवायला हवी. समर्पितपणाचे सध्याचे जितेजागते उदाहरण वाचनात आले. तामिळनाडूचे पालम कल्याणसुंदरमही एक अफाट व्यक्ती. दै. ‘लोकसत्ता’मधील चतुरंग पुरवणीमध्ये त्यांच्यावरचा लेख वाचला. माणसाने किती व कसं निस्पृह असावं?
आयुष्यभर जमवलेली सर्व पुंजी या माणसाने समाजाला दिली. पैशाला वेगळ्या वाटा फुटायला नको म्हणून अविवाहित राहिला. स्वतःच्या पुरस्काराचे ३० कोटी रुपयेही समाजालाच समर्पित केले. सर्वस्वाचे दान. शिवरायांचा हाही विशिष्ट गुण कधी कधी अशा व्यक्तींच्या रूपातून भेटतो.
१५ ऑगस्ट जवळ आला. नुसतीच गाणी ऐकणं व तिरंगा फडकवणं याही बरोबर इतिहास समजून घेऊ व भारताच्या उत्तुंग भविष्यासाठी माझेही दोन हात देण्याची तयारी ठेवू या!
लहेराये तिरंगा प्यारा, ये शुभदिन है हम सब का प्यारा...
dimple@palawi.org
बातम्या आणखी आहेत...