आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लय-सूर-तान (शब्दवेल)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्याची लय किंवा सूर खरंच केव्हा सापडतो? जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी समर्पण भावनेनं जे काही करता, तेव्हा खरं तर ते आपल्यासाठीच असतं. आपल्या घराचा, देशाचा इतिहास पाहा. जेव्हा जेव्हा समर्पण, त्याग या वृत्ती त्या-त्या व्यक्तीच्या नसा-नसातून वाहात होत्या, तेव्हाच काहीतरी चांगलं व अद्वितीयही घडत गेलं.

मला संगीतातलं काही कळत नाही. पण कामातली लय साधून दिवसाचा सूर कसा सांभाळावा व मस्त तान कशी घ्यावी, हे आयुष्यात आलेल्या अगणित माणसांकडून शिकत राहिले. आणि एकूणच आयुष्यात लय किती महत्त्वाची, हेही कळलं.
पहिला संस्कार आजीचा. मी असेन आठ-नऊ वर्षांची. ओसरी झाडत होते. तोच आजीने मला असं काही झाडलं की बस्स. आजीनं मारलं कधी नाही, पण बोलण्याचा धाक जबरदस्त. तिने धडा दिला, “असं झाडतेत का. केरसुणीला केरसुणी सलग लागून आली पाहिजे. एक इकडे एक तिकडे मारून घर स्वच्छ होतं का? सलग एका सरीत नीट झाडत जा.” या गोष्टीला ५०-५५ वर्षं झाली, पण आजही झाडू हातात घेतला की आजी आठवते व एका सरीत झाडू लागते.
माझी मामी व आई धुणं इतकं सुंदर धुणार. नेमकी साडी कुठं दुमडायची, कशी आपटायची, तोंडाने येणारा सूऽसूऽऽ आवाज, सगळ्या घरचं धुणं रहाटाने पाणी काढून भर दुपारी धुणार. त्या आधी घरातील १०-१५ माणसाचा स्वयंपाक केलेला पण केलेलं काढून दाखवणं कधीच नाही. एवढं करून हिला थकलेलं मी कधीच पाहिलं नाही. काळाच्या ओघात मोट गेली. पण माझा भाऊ जेव्हा मोटेनं साऱ्या रानाला व धान्याला पाणी पाजायचा, तो मोटेचा कुई-कुई आवाज, नंतर एकदम सांडलेल्या पाण्याचा आवाज, बैलाच्या पाठीवर हात फिरवत व हवेत चाबूक मारत तास न् तास भावानं साधलेली कष्टाची लय व घरात येणाऱ्या सोन्या-मोत्याच्या राशी. पण या राशीतून पहिलं देणं बलुतेदाराला.
ज्याच्या-त्याच्या कष्टाचा वाटा न मागता त्याला दिला जायचा. याच भावाची बायको, माझी भावजय माधवी भाभी. लग्न होऊन घरात आल्या व एकच व्रत सांभाळलं, नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून कष्ट व फक्त कष्ट करायचे. माझ्या आजीचा करारी स्वभाव त्याची झळ माझ्या आईला व या माझ्या भाभीला बसली. पण वय लहान असूनसुद्धा घर व माणसे सांभाळली. हिने घर हसतं ठेवलं. कधीच कसली तक्रार न करता. हिच्याच मदतीने भावाने गाड्यावर सुरू केलेला चौपाटी भेळ हाऊस अालिशान राधेश, राधेश गार्डनमध्ये विसावलं आहे. हे सूर जुळलेले होते.
असंच उत्तम लय-सूर साधणारं उदाहरण माझ्या सुजाता काकी. हे झालं माहेरचं. मी लग्न होऊन सासरी आले. त्या वेळी पुरतं न आकलन झालेलं, पण जसं जसं पुढं जात राहिले तसं अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व माझ्या मोठ्या जाऊबाई सौ. अंजली भाभी घर कसं सांभाळावं, सासरच्या माणसांचा नुसता मानच नव्हे तर मायेनं, आदरानं कसं करावं, घरात येणाशी हसून बोलणं, आग्रहाने खाऊ-पिऊ घालणं. दिर, नणंदा, जावा, सासूबाई यांचं येणं-जाणं, आजारपण, बाळंतपण यासाठी कष्ट घेणं व तेही अत्यंत मायेनं. मला त्यांचा अत्यंत आवडता गुण म्हणजे त्यांच्याकडे दुजाभावच नाही. जावेचं मूल स्वत:च्याच मुलाइतकं प्रेमाने सांभाळणे. रात्री-अपरात्री रडणाऱ्या डिंपलसाठी उठणे-फिरवणे. उदंड माया पेरत राहिलेल्या अंजली भाभी घरात, समाजात आदराचं स्थान मिळवून ठाम उभ्या आहेत. त्यांच्याकडून खूप संस्कार घेण्यासारखे आहेत.
ही अशी माणसं भेटत गेली. बरंच काही शिकवत, रुजवत गेली व जाताहेत. आज बरेच जण मॉडर्न, स्वातंत्र्य, स्वैराचार, करिअर या नावाखाली जे काही वागत आहेत, करत आहेत, आपलं व पर्यायाने कुटुंबाचं स्वास्थ्य, आनंद घालवू पाहात आहेत.

आयुष्याची लय किंवा सूर खरंच केव्हा सापडतो? जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी समर्पण भावनेनं जे काही करता, तेव्हा खरं तर ते आपल्यासाठीच असतं. आपल्या घराचा इतिहास पाहा, देशाचा इतिहास पाहा; जेव्हा जेव्हा समर्पण, त्यागी वृत्ती त्या-त्या व्यक्तीच्या नसा-नसातून वाहात होत्या, तेव्हाच काहीतरी चांगलं व अद्वितीयही घडत गेलं. कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था आनंदी व निरोगी राहावी असे वाटत असेल, नव्हे ती तशी ठेवणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारीच आहे. परिघात राहूनही खूप काही करता येतंच की. आपल्या जगण्याची लय फक्त साधली जायला हवी.
dimple@palawi.org