आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळस वापर आयड्रॉप्सचा (औषधजागर)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही गोष्टी आपण गृहीत धरूनच चालत असतो. आयड्रॉप्सच्या बाबतीतही हेच घडत असते. असे वागून आपण अत्यंत महत्त्वाच्या आणि नाजूक अवयवावर अन्याय करत असतो...

आयड्रॉप्सकडे डोळस नजरेने पाहणे व ते काळजीपूर्वक वापरणे महत्त्वाचे. कवी भाषेत, ‘डोळे हे जुल्मी गडे’ पण, आपण मात्र या डोळ्यांवर निष्काळजीपणाने कोणतेही जुलूम करत नाही ना, हे जरूर पाहायला हवे.
समस्त सृष्टीकडे पाहण्यासाठी दृष्टी आवश्यक व दृष्टीसाठी डोळे आवश्यक. डोळे हा आपला अत्यंत नाजूक, संवेदनशील अवयव. झोपेचे काही तास सोडले, तर सतत कार्यरत असणारा हा अवयव. बाहेरच्या वातावरणाच्या संपर्कात असल्याने अंतर्गत व बाह्य दोन्ही घटकांनी डोळ्यांवर परिणाम होत असतो. वाढते प्रदूषण, वृद्धत्व, जीवनशैलीने होणारे आजार, मोबाइल व कॉम्प्युटर्सचा सततचा वापर, चुकीचा आहार अशा कारणांनी डोळ्यांचे आरोग्य बिघडत असते. अशा वेळी डोळ्यांसाठी वापरण्याच्या औषधप्रकारांमध्ये सर्वात कॉमन प्रकार म्हणजे, आयड्रॉप्स.
आयड्रॉप्स म्हणजे, अर्थात डोळ्यात घालायचे थेंब. औषधी द्रव्य. डोळ्यातील अश्रूपूर्ण खारटपणाशी मिळतेजुळते घेण्यासाठी आवश्यक तेवढे मीठ, टिकाऊपणासाठी प्रिझर्व्हेटिव्हज् (preservatives) हे यातील मुख्य घटक. डोळ्यांना सूक्ष्म जंतूंचा संसर्ग होऊ नये, यासाठी आयड्रॉप्स हे पूर्णपणे निर्जंतुक म्हणजे स्टराईल(sterile) केलेले असतात. वेगवेगळी इन्फेक्शन्स, डोळ्यांचा कोरडेपणा, काचबिंदू, मोतीबिंदू, शस्त्रक्रिया, डोळ्यांची सूज व दृष्टिदोषांचे निदान करण्यासाठी आयड्रॉप्स वापरतात.

आयड्रॉप्सच्या बाटलीला थेंब पडण्यासाठी छिद्र करताना बाटलीच्या ड्रॉपरवरील कॅप फिरवायची. छिद्र करण्यासाठी सुई, टाचणी असे काही वापरणे अयोग्य. फिरवतानाही विनाकारण जास्त जोर दिल्यास छिद्र गरजेपेक्षा मोठे होते व पडणारा थेंब हा ठरलेल्या डोसपेक्षा अधिक जास्त असतो. म्हणूनच औषध उघडल्यापासून ते नीट हाताळणे, वापरणे यासंबंधी संपूर्ण माहिती असणे आवश्यक. औषधासोबत सहसा माहितीपत्रक असते. लेबलवर सूचना असतात, त्या नीट उजेडात वाचणे महत्त्वाचे. आणि डॉक्टर, फार्मासिस्टशी बोलूनही आयड्रॉप्सचे तंत्र समजून घेता येते.
डोळ्यांना जंतूसंसर्ग होऊ नये, म्हणून आयड्रॉप्सचे निर्जंतुक असणे महत्त्वाचे. आयड्रॉप्स हे पूर्णपणे निर्जंतुक असतात, ते बाटली उघडेपर्यंत. बाटली उघडल्यानंतर जर नीट हाताळली, तर साधारण एक महिन्यापर्यंत त्यात असलेल्या प्रिझर्व्हेटीवमुळे त्यात जंतूंची वाढ होण्याची शक्यता नसते. पण या कालावधीनंतर मात्र ही खात्री देता येत नाही. म्हणूनच बहुतांश आयड्रॉप्सच्या लेबलवर ते एक महिन्यातच वापरण्याची सूचना असते. याचा अर्थ, आयड्रॉप्सना दोन एक्स्पायरी तारखा असतात. उदा. समजा बाटलीवरील अंतिम मुदत ऑगस्ट १६ अशी उत्पादकाने दिलेली असेल; पण आपण बाटली जर ८ ऑगस्ट २०१५ला उघडली, तर ती ८ सप्टेंबरपर्यंत वापरायची, जरी त्याची अंतिम मुदत तब्बल अजून एक वर्षाने दूर असली तरी. हे महिन्याचे काऊंटडाऊन महत्त्वाचे व म्हणूनच बाटली उघडल्या दिवशीच बाटलीवरील लेबलवर वा बॉक्सवर मार्कर पेनने तारखेची नोंद करायची व एक महिन्यानंतर औषध उरले तरी वापरायचे नाही.
आयड्रॉप्स वापरताना जंतूंचा संपर्क (contamination) ड्रॉप्सना व पर्यायाने डोळ्यांना होऊ नये, यासाठी काळजी घेणे महत्त्वाचे असते. म्हणूनच बाटलीच्या नॉझलचा, ड्रॉपरचा कोठेही स्पर्श होणे टाळले पाहिजे. याचा डोळ्यांनाही स्पर्श होता कामा नये. ड्रॉप्स घातल्यानंतर ड्रॉपरवरील कॅप ताबडतोब लावणे, ती उघडी न ठे‌वणेही महत्त्वाचे. सूर्यप्रकाश, दमटपणा, लहान मुले यांच्यापासून दूर अशा ठिकाणीच आयड्रॉप्स घरात ठेवायचे.

डोळ्यात थेंब घालताना हात स्वच्छ धुवून व कोरडे करूनच डोळ्यांना व बाटलीला स्पर्श करायचा. औषध घालताना झोपलेल्या स्थितीत उशी न घेता वा बसलेल्या स्थितीत औषध घालायचे. बाटली हलवून कॅप काढायची व डोके थोडे मागच्या बाजूस करून छताकडे बघत, खालची पापणी हळुवार खाली खेचायची. डोळ्यांच्या आतल्या बाजूस त्यामुळे औषधासाठी खळगा (पॉउच) तयार होतो, त्यात ड्रॉपरने औषधाचा एक थेंब टाकायचा व डोळा मिटून घ्यायचा. पापणीची उघडझाप टाळायची. तर्जनी ते डोळ्याच्या आतल्या कॉर्नरला, नाकाच्या बाजूस हळुवार दाब द्यायचा. त्यामुळे जास्तीत जास्त औषध डोळ्यात राहते व इतरत्र पसरत नाही. डोळ्यांची थेंब सामावून घेण्याची क्षमता अगदीच मर्यादित असते. म्हणून एका वेळी एकच थेंब घालायचा. दोन थेंब घालायचे असतील, तर मध्ये कमीत कमी एखादे मिनिट जाऊ द्यावे. दोन वेगळी औषधे घालायची असतील, तर मध्ये दहा मिनिटे जाऊ द्यावीत. कधीकधी थेंब घातल्यावर घशात त्याची चव येते. हे अर्थात, डोळा व नाक यांच्यातील कनेक्शनमुळे होते. मात्र ड्रॉप्स घातल्यावर डोळे चुरचुरणे, जळजळ असे प्रकार वारंवार होत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लेन्स वापरत असल्यास त्या काढून औषध घालायचे, नंतर साधारण १५ मिनिटांनी लेन्स परत लावायच्या.

औषध दिवसातून किती वेळा, किती थेंब, किती दिवस घालायचे, ते औषध प्रकार व नेत्रविकार याप्रमाणे बदलते. यासंबंधीच्या डॉक्टरांच्या सूचना तंतोतत पाळणे महत्त्वाचे असते. डोळ्यांच्या इन्फेक्शनसाठीच्या आयड्रॉप्समध्ये अँटिबायॉटिक्स (प्रतिजैविके) असतात. पोटात घेण्याच्या अँटिबायॉटिक्सप्रमाणे याचाही कोर्स असतो. तो पूर्ण करणे अत्यावश्यक असते.
आयड्रॉप्स हे प्रिस्क्रिप्शनने म्हणजे डॉक्टरांनी लिहून दिल्यावरच घ्यायचे. पण प्रत्यक्षात मात्र अनेक रुग्ण स्वमनाने औषधांच्या दुकानात जाऊन खरेदी करतात. पूर्वी डॉक्टरांनी काही दिवस घालायला सांगितलेले आयड्रॉप्स नंतरही स्वमनाने वापरत राहतात. स्टिरॉइड्स असलेल्या आयड्रॉप्सच्या बाबतीत सेल्फ मेडिकेशन सर्वात जास्त असते. डेक्सामिथासोन, प्रेडनिसोलोन, बिटमिथासोन अशी अनेक स्टिरॉइड्स गुणकारी असतात. डोळ्यांची सूज घालवण्यासाठी वा शस्त्रक्रियेनंतर, अॅलर्जिक विकारासाठी वगैरे ही औषधे वापरली जातात. यांचा गुणही झटपट येतो. यामुळेच त्याचा गैरवापरही होतो. अनेकदा डोळ्यांची साथ (‘कंजक्टिव्हायटिस’ म्हणजे डोळ्यातील इन्फेक्शन) आली किंवा इतरही काही कारणाने डोळे लाल होणे, चुरचुरणे, सुजणे असा काही त्रास असेल, तर डॉक्टरांना न विचारता स्वमनाने असे ड्रॉप्स वापरले जातात. स्टिरॉईड आयड्रॉप्सच्या स्वमनाने वारंवार केलेल्या वापराने दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात. उदा. कॉनिआ पातळ होणे, फंगल इन्फेक्शनचे प्रमाण वाढणे, काचबिंदू-मोतीबिंदू होण्याची शक्यता वाढणे. यातील काही दुष्परिणाम या औषधांच्या लेबलवरही नमूद केलेले असतात. म्हणूनच, आयड्रॉप्सचा स्वमनाने वापर कटाक्षाने टाळायला हवा. फार्मासिस्टनेही प्रिस्क्रिप्शनशिवाय ते विकू नयेत व सेल्फ मेडिकेशन करण्यास आलेल्या रुग्णांचे समुपदेशन करत वैद्यकीय सल्ला घेण्यास प्रवृत्त करावे. आयुर्वेदिक, हर्बल, अनेक बाबा/बुवा यांच्यातर्फे बनवले गेलेले आयड्रॉप्स वापरतानाही जागरुकता व वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्लाच महत्त्वाचा. जाहिरातींना भुलून डोळ्यांवर प्रयोग करणे योग्य नाहीच.

थोडक्यात, आयड्रॉप्सकडे डोळस नजरेने पाहणे व ते काळजीपूर्वक वापरणे महत्त्वाचे. कवी भाषेत, ‘डोळे हे जुल्मी गडे’ पण, मात्र आपण या डोळ्यांवर निष्काळजीपणाने कोणतेही जुलूम करत नाही ना, हे जरूर पाहायला हवे.
स्टिरॉइड आयड्रॉप्सच्या स्वमनाने वारंवार केलेल्या वापराने दीर्घकालीन
दुष्परिणाम होऊ शकतात. उदा. कॉर्निआ पातळ होणे, फंगल इन्फेक्शनचे प्रमाण वाढणे,
काचबिंदू-मोतीबिंदू होण्याची शक्यता वाढणे.
symghar@yahoo.com