आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नो मोबाईल...नो व्हाट्स अप...नो गेम्स नथिंग!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तंत्रप्रगतीच्या झपाट्याने रोजच्या जगण्याचे संदर्भ झपाट्याने बदललेत. व्यक्त होण्याच्या तऱ्हा बदलल्यात. व्यक्तीशी-समूहाशी संवाद आणि संपर्क साधण्याची साधनं बदललीत. आताशा कुणी सहसा मोबाइल-फेसबुक-व्हॉट्सअॅप... अशी सगळी संपर्क माध्यमं सोबत न घेता घराबाहेर पडत नाही. किंबहुना, घराबाहेर पडताना हे सगळं सोबत आहे ना, याची खात्री करून घेतली जाते; मगच लोक एकमेकांना भेटतात. भेटी-गाठी, नाक्यावरच्या गप्पाटप्पा, सभा-समारंभातल्या गांभीर्यपूर्वक चर्चा/टेलिव्हिजनवरचे वाद-विवाद हे सगळं सुरू असताना प्रत्येकाचा एक डोळा आणि एक कान इंटरनेट आणि मोबाइलवर सतत लक्ष ठेवून असतो. त्यामुळे अनेकदा नाक्यावर मित्र एकत्र येतात खरे; पण एकत्र आल्यावर ते आपापल्या मोबाइलमध्ये मग्न असतात... पण समजा, मोबाइलविना काही तास घालवायचे ठरवले तर? मोबाइल आणि संबंधित संपर्क माध्यमांचा वापर योग्य की अयोग्य, हा या प्रयोगाचा हेतू नाही; तर बदलत्या जीवनशैलीचा, बदलत्या युवामानसाचा अर्थ समजून घेणे हा आहे...

मोबाइल हाताळणाऱ्या पिढीतले, जास्तीत जास्त हाताळणाऱ्या वयातले म्हणजे १६ ते २५ वयोगटातले हे सात सदस्य. त्यांच्यात होता, नुकतीच दहावीची परीक्षा दिलेला ओमकार. याच्याकडे अजून स्वत:चा मोबाइल नाही; पण दिवसभर तो त्याच्या आईच्या फोनवर इंटरनेट सर्फिंग आणि चॅटिंग करत असतो. १८ वर्षांची पूनम... नुकतीच बारावीची परीक्षा दिलीय. घरी कडक शिस्तीचं वातावरण आहे, गप्पा मारायला खूप आवडतं, त्यामुळे रात्री गुपचूप गच्चीत जाऊन किंवा कॉलेजमधूनही मोबाइलचा वापर करत असते. १९ वर्षांचे सागर आणि समीर हे जुळे भाऊ... चेतना कॉलेजमधून कॉमर्सचा अभ्यास करून आता BMSच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहेत. त्यांना अनेक वेगवेगळे छंद आहेत, भरपूर मित्रमैत्रिणी आहेत. पण मोबाइलवरच त्यांच्याशी इंटरॅक्ट करायला आवडतं. २१ वर्षांची सिद्धी नुकतीच बीएच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देऊन आली होती. संस्कृत घेऊन रुईया कॉलेजमधून ती बीए करतेय. २५ वर्षांचा अंकुर एका सॉफ्टवेअर कंपनीत नुकताच रुजू झालाय. MCA होऊन आता त्याला नोकरी मिळालीय. हे सगळे जण एकत्र भेटले. महत्त्वाचे म्हणजे, एकमेकांना हे पहिल्यांदाच भेटत होते. त्यांच्या औपचारिक ओळखी करून झाल्यावर सकाळी ९ वाजता त्यांच्याकडून त्यांचे मोबाइल घेऊन दुसऱ्या खोलीत चालू स्थितीत ठेवले होते. त्या सर्वांना वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं, खेळ इ. असं सगळं उपलब्ध होतं; पण कोणतंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मात्र उपलब्ध ठेवलं नव्हतं. अॅक्टिव्हिटीमध्ये वेगळेपण येण्यासाठी एक पंचिंग बॅग, डम्बेल्स असं सगळं सामान, कॅरम, पत्ते असे खेळही ठेवलेले होते.

सुरुवातीच्या वेळात सर्वांना आपापल्या आवडीचं काम निवडण्यासाठी मोकळा वेळ देऊन त्यांचं निरीक्षण करण्याला सुरुवात झाली. ओमकार स्वत:च घरून आणलेली पुस्तकं वाचू लागला. अंकुर आणि सागर गप्पा मारू लागले. सिद्धी आणि पुनम थोडा वेळ खिडकीबाहेर पाहून मासिक वाचायला बसल्या. समीर भूक लागल्याचं सांगत दुपारचा डबा सकाळीच खायला घेऊन बसला. थोड्या वेळाने त्याने झोप काढायचं ठरवलं. साधारण एक तासाने अंकुरने सर्वांसाठी आणलेलं कोल्ड्रिंक सगळ्यांना सर्व्ह केलं. सगळेच जण थोडे सैलावून बसले. ओमकारने ऊनोचे पत्ते मिळाले म्हणून सर्वांना खेळायला बोलावलं. समीर सोडून सर्व जण उनो खेळायला बसले. हसणं, खिदळणं, मस्करी, गप्पांना आकार येऊ लागला. सगळे एकमेकांची चौकशी करू लागले. बाजूच्या खोलीतून व्हॉट्सअॅप अलर्ट‌, कॉल वगैरे एेकू येत होते; पण दरवाजा बंद करून घेतल्यावर तेही आवाज बंद झाले. हळूहळू भूक लागली, तेव्हा सर्वांनी आपापले डबे उघडले. सर्व जण एकमेकांना पहिल्यांदाच भेटत होते. तरी सगळ्यांनी आपापले डबे वाटून घेतले.

जेवण झाल्यावर सगळ्यांना थोडी सुस्ती आली. मग अर्ध्या तासाने एक छोटा क्वीझचा आणि STM (शॉर्ट टर्म मेमरीचा) आकड्यांचा खेळ घेतला. नंतर सर्वांना प्रत्येकी पाच गणितं सोडवायला दिली. तेव्हा जवळपास सर्वांचे हात पटकन मोबाइल शोधण्यासाठी गेले. पण मग सर्वांच्या लक्षात आलं आणि सगळे हातावर आकडे मोजत गणितं करू लागले. सर्वांना प्रत्येकी १० मोबाइल नंबर (कोणतेही- मित्र-मैत्रिणींचे) लिहायला सांगितले. फक्त सिद्धी, सागर आणि समीर १० जणांचे नंबर लिहू शकले. बँकेच्या अकाऊंटचा १४ आकडी नंबर मात्र संपूर्ण आठवून एकालाही लिहिता आला नाही.

मग सर्वांना थोडी गंमत म्हणून एक टास्क दिले गेले. प्रत्येकाने आज पहिल्यांदाच भेटलेल्या कोणाही एकाला, एक छोटंसं पत्र लिहायचं आणि त्या व्यक्तीने ते नंतर घरी घेऊन जायचं. ते पत्र कितीही लहान-मोठं असलं तरी चालेल, अशी मोकळीक दिली गेली. जवळपास सगळ्यांनीच शाळा संपल्यानंतर आत्ता पहिल्यांदाच कुणाला तरी पत्र लिहीत असल्याचं सांगितलं.

संध्याकाळी जवळच्या एका प्रशस्त मॉलमध्ये जायचं ठरलं. तेव्हा पुन्हा सर्वांनी आपापल्या मोबाइलसाठी खिसे चाचपले; पण नंतर मात्र पूर्ण सहकार्य दिलं. मॉलमध्ये शिरल्यावर मात्र सर्वांची थोडी चुळबूळ सुरू झाली. अंकुर आणि सिद्धीने बोअर होत असल्याचं सांगितलं. पण थोड्या वेळाने ते सर्वच जण विंडो शॉपिंगमध्ये गढून गेले. थोडं खाणं-पिणं झाल्यावर सर्वच जण थोडे अस्वस्थ झाले. त्यांच्या मोबाइलपासून दूर राहून त्यांना आता साधारण १० तास झाले होते.

दहा तासांनंतर सर्वांना त्यांचे मोबाइल परत दिले गेले. तेव्हा सगळे आनंदून गेले. पुढची १५ मिनिटे कुणीच कुणाशी बोललं नाही. नंतर एकमेकांच्या मोबाइल नंबरची देवाणघेवाण झाली आणि लगेचच व्हॉट्सअॅपवर नवीन ग्रुपसुद्धा तयार झाला. हा प्रयोग संपल्यावर Post-task questions आम्ही सर्वांना विचारले. हा प्रयोग कसा वाटला? नेमकं या क्षणी १० तासांनी फोन हातात घेतल्यावर तुम्हाला कसं वाटतंय? वगैरे...

निरीक्षणे
सगळ्याच वयोगटातल्या लोकांसाठी हल्ली मोबाइल ही एक चैन नसून गरज बनलीय. बऱ्याच गोष्टींसाठी आपण आपल्या मेंदूपेक्षा या यंत्रावर अवलंबून राहायला लागलो आहोत. आणि अनेक प्रकारच्या यंत्रांची कामं मोबाइलवर एकाच वेळी होऊ शकत असल्यामुळे तो आपल्याला सततच सोबत हवा असतो. येणाऱ्या पिढीतल्या मुलांना तर फारच लहान वयात तो हाताळायला मिळतो आहे. त्यामुळे केवळ बौद्धिक नव्हे, तर भावनिकरीत्याही मुलं-मुली त्यावर विसंबून राहिलेली आपल्याला दिसतात.
^ आता आठ तास तुम्हाला तुमचा फोन हाताळायला मिळणार नाही, असं सांगितल्यावर मुलांच्या संमिश्र प्रतिक्रिया होत्या, ज्यात भरपूर अस्वस्थता आणि प्रश्नार्थक हावभाव आणि थोड्या प्रमाणात पॅसिव्ह अॅग्रेशन दिसून आलं.
^ फ्री इंटरअॅक्शन आणि मनोरंजनासाठी वेळ दिला तेव्हा प्रत्येकाने आपापल्या सेकंडरी कम्फर्ट झोन आणि आवडीनुसार अॅक्टिव्हिटी निवडल्या. (उदा. पुस्तक वाचणे, झोपणे, गप्पा मारणे इ.)
^ या प्रयोगाबद्दल त्या मागच्या िथअरीबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता सहापैकी तीन जणांनी दाखवली.
^ मुलांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रांमध्ये सहापैकी पाच जणांच्या शुद्धलेखनाच्या चुका होत्या.
^ अचानक आलेलं / मिळालेलं निवांतपण, मेंदूला काही निश्चित व्याप नसणं एकालाही मानवलं नाही. एकानेही हा निवांतपणा घेतला नाही. सगळेच वेळ काढण्याच्या आणि दिलेले टास्क एकदाचे पूर्ण करण्याच्या प्रयत्नात होते. हे लक्षण त्यांच्या वयामुळे दिसू शकते, किंवा पुढे येणाऱ्या वर्कोहोलिशनचेही हे एक निदर्शक असू शकते.

शॉर्ट-टर्न मेमरी टेस्ट
^ १४ आकडी बँकेचा अकाऊंट नंबर एकालाही संपूर्ण लिहिता आला नाही.
^ सहापैकी तीन जणांचे तोंडी हिशेब आणि तीन अंकी संख्यांची पाचही गणितं बरोबर आली. बाकीच्यांची चुकली.
^ मोबाइल सोबतच रेडिओ, टी.व्ही., डीव्हीडी प्लेअर असं काहीच वापरण्याची परवानगी नसल्यामुळे आम्ही पुस्तकं हातात घेतली, असं जवळपास सर्वांनीच सांगितलं.
^ सहापैकी चार जण झोपतानाही मोबाइल जवळ घेऊन झोपतात, तर तीन जण तो बाथरूममध्येही बरोबर घेऊन जातात, असं त्यांनी कबूल केलं.
^ मॉलमध्ये त्यांच्या वर्तनात लक्षवेधी अस्वस्थता जाणवली. चलबिचल आणि अस्वस्थता दिसून आली. पण पोस्ट टास्क क्वेश्चन्सच्या वेळी त्या सर्वांनी कबूल केलं की, आम्ही आमचं खाणं आणि गप्पा मोबाइल हातात नसल्यामुळेच जास्त एन्जॉय करू शकलो.
^ सहापैकी चार जणांनी ‘मोबाइलवर काही मिसकॉल किंवा मेसेज आलाय का माझ्या? ते बघून मला सांगतेस का?’ असं तीन ते चार वेळा (प्रत्येकी) विचारलं.

वर्तमानाचा संदेश
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही संस्था दरवर्षी आठवी ते दहावी या वर्गात शिकणाऱ्या मुला-मुलींच्या तंत्रज्ञानाधारित उपकरण वापराचे सर्वेक्षण करते. तरुण पिढीच्या बदलत्या सवयी, बदलते मानस समजून घेणे, हा या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश असतो. सन २०१४-१५ या वर्षासाठी जुलै ते नोव्हेंबर २०१४ या कालावधीत भारतातली १४ शहरे, १७३९ शाळा आणि १२,३८५ उच्च माध्यमिक शाळा यांमधून संस्थेतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातली ही ठळक वैशिष्ट्ये :
* ७२ टक्के युवा स्मार्ट फोन बाळगतात. दहापैकी चार जण स्मार्टफोनलाच पसंती देतात.
* ५० टक्के युवा डेस्कटॉप किंवा लॅपटॉपद्वारे इंटरनेटचा वापर करतात.
* दहापैकी नऊ जण फेसबुक अकाऊंटचा वापर करतात. यातले ५२ टक्के एका तरी कम्युनिटीचे सदस्य असतात.
* ६५ टक्के युवा गुगल प्लस अकाऊंट वापरतात. दहापैकी सहा जण व्हॉट्सअॅप वापरतात.
* दहापैकी चार जण ट्विटर अकाऊंट वापरतात. त्यात ६६ टक्के क्रीडापटूंना, ५५ टक्के सर्व क्षेत्रातल्या सेलेब्रिटीजना आणि ५४ टक्के सिनेतारे-तारकांना फॉलो करतात.
* सोशल मीडियाचा वापर अभ्यासापेक्षाही मित्र-मैत्रिणी, कुटुंबीयांशी संपर्क ठेवण्यासाठी आणि ताज्या घडामोडींसाठी उपयुक्त मानतात.
* ७६ टक्के युवा दिवसाला सरासरी ६० मिनिटे सोशल मीडियावर असतात.
* पोस्ट लिहिणे (२९ टक्के), चॅटिंग (२५ टक्के), फोटो अपलोड करणे (१४ टक्के) या प्राधान्यक्रमाच्या कृती असतात.
* ४६ टक्के युवा फेसटाइम / स्काइप / गुगल हँगआऊटचा वापर करतात.
* सर्वेक्षण झालेले दोन तृतियांश युवा ऑनलाइन गॅजेट खरेदी करतात. त्यात इलेक्ट्रॉनिक्स (६६ टक्के), पुस्तके (६१ टक्के), सिनेमे (४१ टक्के), ट्रॅव्हल (३९ टक्के), कपडे (३६ टक्के) असा क्रम लागतो.
* ५२ टक्के युवा म्हणतात की, पालक त्यांच्यावर पाळत ठेवून असतात.
* विकिपीडिया (६३ टक्के), पीडीएफ (५१ टक्के), ऑनलाइन व्हिडिओ (४४ टक्के) असा साधारण युवावर्गामध्ये वापर असतो.
* सर्वेक्षण झालेल्यांमध्ये ७६ टक्के मुले-मुली बातम्यांसाठी टीव्ही आणि वर्तमानपत्रांचा वापर करतात.
* आयटी आणि इंजिनिअरिंग या दोन क्षेत्रांना प्रामुख्याने युवा पसंती देतात.
(स्रोत : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस जेन-वाय रिपोर्ट)

manasiamdekar@gmail.com
(लेखिका ठाणे येथील सारथी कौन्सिलिंग सेंटरच्या संस्थापक-संचालिका आहेत. संस्थेच्या सहयोगी-संचालिका स्नेहा दीक्षित यांनीही या प्रयोगात भाग घेतला.)
बातम्या आणखी आहेत...