आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Mansi Fadke In Madhurima Rangoli Secial Issue

हा पसारा नव्हे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आईने रेखाटलेली सुंदर रांगोळी
ओतला होता जीव तिने रांगोळी काढताना
देहभान तिचे हरवले होते
रांगोळीचे ठिपके जोडताना
मनातले स्वप्न तिने रांगोळीत मांडले होते
आनंदाचेच रंग तिचे रांगोळीत सांडले होते
रांगोळीचे हे रंग नेहमीच बालपणात घेऊन जातात. आज या रांगोळीची आठवण होण्याचं कारण होतं ते आमच्या शेजारी नुकतंच राहायला आलेलं जोडपं आणि त्याचं वर्ष सव्वा वर्षाचं मूल. ते बाळ खूप खेळायचं, उपद्व्याप करून आईला भंडावून सोडायचं. ती सकाळी दाराशी रांगोळी काढू लागली की तो त्याच्यावर, बाजूला आपली रांगोळीची उधळण व कलाकारी सुरू करायचा. या सगळ्याची तक्रार ती आई माझ्याकडे करत होती. मी तिला धीर दिला आणि त्याची ही कलाकारी किती फायदेशीर आहे, हे सांगितले. आज मुलाच्या शिक्षणाप्रति अत्यंत जागरुक असलेले पालक मूल दीड-दोन वर्षाचं झालं की शाळेत टाकतात. काहीच दिवसात म्हणजेच अडीच-तीन वर्षाचं ते पोर शाळेतून आल्यावर दोन-दोन पानावर स्टँडिंग लाइन्स आणि स्लीपिंग लाइन्सचा होमवर्क घेऊन येतं. एवढ्या रेघा मारताना मुलाचे हात दुखतात, पाठ दुखते. अभ्यासक्रमच तेवढा असल्याने पालकांचाही नाइलाज असतो. दुखणाऱ्या पाठीवरच रपाटे घालत तो होमवर्क पूर्ण करवून घेतला जातो. पण मूल या रेघा काढण्याकरिता कंटाळा का करतं, ह्यामागील शास्त्रीय कारणही महत्त्वाचं अाहे.

जन्मल्यापासून मानवी मेंदूच्या विकासाचे वेगवेगळे टप्पे असतात. या विकासप्रक्रियेत मेंदूतील ग्रॉस आणि फाइन मोटर स्किल्स अर्थात स्थूलकारक आणि सूक्ष्मकारक कौशल्येही विकसित होत जातात. फाइन मोटर स्किल्समध्ये बोटांच्या अतिशय छोट्या छोट्या हालचाली जसे की जमिनीवरून बारीक वस्तू उचलणे, नाणी खाचेत टाकणे, डाळीतील खडे बाहेर काढणे, चमचा उचलणे अशा क्रिया येतात. यामुळे मुलांची बोटेे, मनगट, ओठ, जीभ या अवयवातील लहान स्नायू विकसित होत असतात.

बाळ जन्मल्यावर त्याचे हात एकात एक गुंतलेले असतात. थोड्याच काळात ते विलग होतात. मग हाताकडे एकटक बघणे, हात नाचवणे, हातात वस्तू दिली तर ती पकडणे, खालचे खडे-माती उचलून खाणे, मुंगळा पकडायचा प्रयत्न करणे, चमच्याने ढवळणे, पुस्तकाची पाने उलटणे, छोट्या कात्रीने पेपर कापणे, दाराची कडी उघडणे, कागदाच्या घड्या पाडणे, इत्यादी. हे बाळाचे खेळही असतात आणि विकासाचे टप्पेही. भावी आयुष्यातील बारीक कामांसाठीचा हा पाया असतो. म्हणूनच तो हळू व विशिष्ट क्रमाने विकसित व्हायला हवा. यात आपल्या हातात असते, त्यांना या क्रिया करू देणे व हे करताना त्यांची काळजी घेणे. मूल या विकासाच्या टप्प्यांमधून गेले नसेल तर त्याला पेन्सिलने लिहिणे कठीण जाते. भविष्यकाळात त्याला अधिक जटिल आकृत्या काढणे किंवा एखाद्या यंत्रामधील जटिलता समजावून घेण्यातही अडथळे निर्माण होऊ शकतात. आपल्या अपेक्षा व त्याचा ताण वाढतच जातो.

हे ऐकल्यावर शेजारच्या बाळाची आई त्याला रोज रांगोळी व ती भरून ठेवण्यासाठी छोटीशी डबी देऊ लागली. हळूहळू तिची चिडचिडही थांबली. पसाऱ्यापेक्षा मुलाच्या विकास प्रक्रियेला तिने प्राथमिकता दिली.
mansiphadke5@ gmail.com