आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुभवांची पोतडी - पहाटेची जिलेबी अन् पोहे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिफ्ट ड्यूटी करणाऱ्या प्रत्येकाकडे काही तरी खास आठवणी असतात. कधी तरी मध्यरात्री संपूर्ण टीमसोबत केलेल्या आणि पहाटे हमखास हव्याशा वाटणाऱ्या नाष्ट्याची चव प्रत्येकाच्याच जिभेवर रेंगाळत असते. अशाच चवीची एक आठवण ताजी करणारी आजची अनुभवांची पोतडी...
काही विशेष बातम्यांसाठी जॉइंट बायलाइन नावाचा एक प्रकार असायचा, जो डेस्कवर काम करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा असायचा. वृत्तपत्रात बातमी करणाऱ्या रिपोर्टरचं नाव जातं. तसंच ते इथेही जायचं. पण त्यांच्यावर व्हिज्युअलचे संस्करण करणाऱ्यांचं नावंही जोडलं जायचं. अर्थात तुम्ही त्या बातमीवर तेवढी मेहनत घेतली असेल तरच. एडिट टेबलवर स्टोरी एडिट करताना मग बातमीबरोबरच व्हिज्युअलीही स्टोरी कशी छान होईल, ती दिसेल कशी यासाठी विशेष प्रयत्न व्हायचे. व्हिज्युअल सिक्वेन्सचंदेखील एक व्याकरण असतं. कुठल्या शॉटनंतर कुठला शॉट आला पाहिजे, पॅन शॉट असेल तर तो कुठे लावला पाहिजे, बातमीला पूरक असे शॉट्स असतील तर ते स्क्रिप्टमधल्या कुठल्या वाक्याबरोबर गेले पाहिजेत या सगळ्याचं भान ठेवत शॉट्स ग्रामर पाळलं जायचं. अर्थात त्या वेळी बातमीपत्रांची संख्या कमी असल्यानं एवढं संस्करण करायला अवधीही असायचा. आज हे सगळं भान कॅमेरामनला फील्डवर काम करतानाच पाळावं लागतं.
एका शिफ्टला त्या वेळी आम्ही जास्तीत जास्त चार माणसं. प्रत्येकाची काम वाटून दिलेली. न्यूज रूम म्हणावी तर दोन एडिट मशीन्ससह चार माणसं बसू शकतील एवढीच. रन ऑर्डर आणि अँकर टाइप करण्यासाठी एक कॉम्प्युटर.

स्क्रिप्टसाठी त्या वेळी टेलिप्रॉम्प्टरवर नव्हता (म्हणजे वृत्तनिवेदकाच्या समोर, प्रेक्षकांना दिसणार नाही असा, पडदा ज्यावरचे शब्द निवेदक वाचतो) तर खास झीसाठी बनवलेला केलीप्रॉम्प्टर होता. झीचे त्या वेळचे टेक्निकल हेड केली सर यांनी तो खास बनवून दिलेला म्हणून केलीप्रॉम्प्टर. टीव्ही स्क्रीनच्या आकाराची एका बाजूने रंगवलेली काच ठेवली जायची. टीव्हीच्या डिस्प्ले स्क्रीनला रिव्हर्स पद्धतीने बसवलं जायचं. वर कॅमेरा असायचा. त्या कॅमेऱ्याच्या स्क्रीनसमोरून स्क्रिप्ट हातानं सरकवलं जायचं. ते स्क्रिप्ट वृत्तनिवेदकाला मात्र स्क्रीनवर व्यवस्थित दिसायचं.

संगणकावर एमएस वर्डमध्ये हे स्क्रिप्ट टाइप केलं जायचं. सर्व अँकर एकमेकांना चिकटवले जायचे आणि रेकॉर्डिंगच्या वेळेला एकजण स्टुडिओत बसून हे स्क्रिप्ट वर हलवायचा आणि त्यानुसार निवेदक ते वाचायचा. पण कधी कधी प्रिंटर अनेकदा शेवटच्या क्षणी दगा द्यायचा आणि मग सगळ्या बातम्यांचं स्क्रिप्ट हातानं लिहून काढावं लागायचं. अगदी पहिल्या नमस्कारपासून शेवटच्या उद्या भेटूयापर्यंत. बातम्यांचं स्क्रिप्ट लिहिताना किंवा अँकर लिहिताना लिखाण शुद्ध असलं पाहिजे, याबाबत देवदास मटाले दक्ष असत. केवळ सुटसुटीत वाक्यरचनाच नव्हे, तर ऱ्हस्व आणि दीर्घ आकार-उकारांबाबतही ती नीट लिहिली पाहिजेत यावर त्यांचा कटाक्ष असे. टेलिप्रॉम्प्टर पुढे सहा महिन्यांनी आला. पण त्यामुळे आमच्या टीममधल्या सगळ्यांचं अक्षर मात्र सुधारलं.

त्या वेळी एकूण बातमीपत्रं असायची अवघी दोन. एक सकाळी सात वाजता आणि एक संध्याकाळी सात वाजता. तीही रेकॉर्डेड. त्यामुळे एकूणच कामाचं स्वरूप आत्ताच्या तुलनेत खूपच सुटसुटीत होतं. डेस्कवरच्या दोनतीन माणसांकडून ते निपटूनही जायचं. पुढे चारपाच महिन्यांतच टीम वाढली. एक बातमीपत्र वाढलं. काँट्रॅक्टवरचे अँकर जाऊन स्टाफमधल्या लोकांनीच अँकरिंग करायचं असा निर्णय झाला. मग अल्फा मराठीवर मी अँकरिंग करू लागले. मोजकाच स्टाफ असल्यानं आम्हा सगळ्यांचाच एक फायदा हा झाला की सगळी कामं सगळ्यांना येऊ लागली. ग्राफिक्स, आउटपुट, इनपुट, प्रॉडक्शन ही जी आज २४ तास चालणाऱ्या चॅनेलमधली आवश्यक डिपार्टमेंट आहेत तशी तेव्हा नव्हती. त्यामुळे सगळेच मास्टर बनले.

इथली नाइट शिफ्ट सुरू व्हायची ती रात्री ८ वाजल्यापासून आणि बातमीपत्र रेकॉर्ड व्हायचं ते पहाटे तीन वाजता. याच दरम्यान अल्फाचं गुजराती चॅनलही मुंबई ऑफिसमधून सुरू झालेलं. मोजकीच माणसं. आणि त्यामुळे त्यांचं रेकॉर्डिंगही पहाटेच. तोवर पहाटेचे चार-साडेचार वाजायचे. शक्यतोवर सहा साडेसहापर्यंत आम्ही ऑफिसमधून निघायचो. पण त्याधी एक गोष्ट हटकून करायचो ती म्हणजे समोरच्या आजरा हॉटेलमध्ये मिळणारी गरमागरम जिलेबी आणि पिवळ्या-केशरी रंगाचा गोड शिरा खाण्याचा कार्यक्रम. एकाच बशीत अर्धे पोहे आणि अर्धा पिवळ्या रंगाचा शिरा. खरं तर ऑफिसचा हा परिसर म्हणजे गिरणगावाचाच एक भाग. परिसरात सगळ्याच चाळी. चाळीतल्या आयुष्यातला जिवंतपणा रस्त्यावरही दिसायचा. आजरा ह़ॉटेलच्या परिसरात राहणारे अनेकजण कोल्हापूर परिसरातून आलेले. त्यामुळे सकाळी पाचपासूनच चाळीच्या खाली, फूटपाथलगत स्टोव्ह धडधडायचे आणि शिरा-पोहे-चहा यांचा रतीब लागायचा तो सकाळी सात-साडेसातपर्यंत. या परिसरात तेव्हा आजरासारखी चार पाच टेबलांची छोटी छोटी हॉटेल्सच अधिक. आणि ती सगळी त्या वेळी आमचा जेवढा खिसा होता त्या खिशाला परवडतील अशीच होती. अगदी सामिष भोजनंही. ऑफिसचा हा बाहेरचा परिसर नेहमीच गजबजलेला असायचा. मला तो खास वाटायचा एवढ्यासाठी की रात्री अकराला बुलेटिन संपल्यानंतरही या रस्यावरून स्टेशनपर्यंत पायी जायला भीती वाटायची नाही की पहाटे साडेपाच वाजताही. दुसरं म्हणजे या भागात साजरे होणारे सण. दहीहंडी, गणपती आणि नवरात्र. त्यांचं कव्हरेज करण्यासाठी इतरत्र जावंच लागायचं नाही. ऑफिसच्या बाहेर पडलं की पायी पायी चालतही स्टोरी होऊन जायची. नंतर ऑफिसची जागा बदलली. पण तो माहौल नेहमीच लक्षात राहील असा. पश्चिम उपनगरं, सेंट्रल, हार्बर आणि दक्षिण मुंबई शहर यांना मध्यवर्ती अशी ही जागा होती. शहरात घडणाऱ्या घटनांचं फुटेज तेव्हा झीवर सगळ्यांच्या आधी जायचं याला हेही एक कारण होतं.
(क्रमश:)
mitali.mathkar@gmail.com
बातम्या आणखी आहेत...