आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आभासी स्वातंत्राचा आवेगी प्रवास ( आभासाचा प्रयोग)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्याच्या एका तरुण मुलांच्या ग्रुपने ‘ऑल दॅट आय वॉन्ना डू’चा रंगमंचीय आविष्कार सादर केला. भावकवितांचे नृत्याविष्कार अनेकदा पाहिले, पण अशा वैचारिक बैठक असलेल्या एखाद्या कवितेचे असे माध्यमांतर हा दुर्मीळ प्रयोग असावा. त्या निमित्ताने हे रसग्रहण...

‘Mother died today, or may be yesterday; I can’t be sure.’ कामूच्या ‘द स्ट्रेंजर’च्या सुरुवातीचे मेसाँचे हे वाक्य म्हणजे साहित्यातील एका नव्या प्रवाहाची नांदी मानलं जातं. अस्तित्ववादी विचारधारेचा प्रभाव असलेल्या साहित्याचा प्रवाह तिथून बळकट होत गेला. वरवर पाहता अब्सर्ड, अर्थहीन जगातील माणसाच्या जगण्यातील तुटलेपणाचा, दिशाहिनतेचा मेसाँ प्रतिनिधी दिसतो. जगण्यातील कदाचित सर्वात महत्त्वाचा आधार गमावतानाही त्याबाबत बेफिकीर, खरं तर संवेदनाशून्य, कंटाळा असलेल्या, कोणत्याही बंधनातून दूर राहू पाहणाऱ्या, गुंतण्याचे टाळणाऱ्या व्यक्तींचा तो प्रतिनिधी बनून राहिला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर कामूच्या या नायकाची प्रतिरूपे प्रत्यक्ष जगण्यात दिसू लागली आणि साहित्यिकांनीही त्यांचा वेध घेण्यास सुरुवात केली.
‘माझा बाप मेला, आणि मी गावात हत्तीवरून साखर वाटून आलो.’ असे म्हणत आपल्या गोष्टीची सुरुवात करणारा संजीव खांडेकर यांच्या ‘ऑल दॅट आय वॉन्ना डू’ या कवितेमधील कुबडा मेसाँची आठवण करून देतो. मातेचा मृत्यू असो, मरीबरोबर केलेला सेक्स असो, की रेमंडच्या गर्लफ्रेंडने त्याच्यासाठी लिहिलेले पत्र असो; मेसाँ हा एकतर साक्षीदार आहे किंवा अंमलबजावणी करणारा तरी. निर्णय घेणारे वेगळेच आहेत. त्या निर्णयांच्या योग्यायोग्यतेबद्दलही त्याने फारसा विचार केलेला नाही, की घडल्या घटनेबद्दलही. एक प्रकारची निरिच्छ तटस्थता त्याला व्यापून राहिली आहे. या उलट खांडेकरांचा कुबडा हा स्वतःला काय मिळवायचे आहे, याचा निश्चित निर्णय घेतलेला, त्या साध्याला आवश्यक साधने काय, याचा वेध घेणारा आणि त्याच्या आड येणाऱ्या कुटुंबासह साऱ्या तथाकथित जवळच्या गोष्टी निर्ममपणे नाकारणारा, निष्ठुरपणे स्वतःच त्यांचा ध्वंस करणारा असा आहे.
या कुबड्याला ‘मि. इंडिया’ व्हायचे आहे! हे साध्य करण्यासाठी त्याला बुद्धाच्या मार्गावर जायचे आहे. हे साध्य नि साधन परस्परविसंगत नसले तरी त्यांत कोणती संगतीही नाही. पण आजचे जगच असे की, अशा परस्पर विसंगत भासणाऱ्या आकांक्षा ठेवणे, हे तितकेसे हास्यास्पद राहिलेले नाही. इतकेच नव्हे, तर कदाचित नव्या संदर्भात त्यांत काही संगती उगवूनही येते आहे. या कुबड्याच्या पाठीवरचे कुबड म्हणजे ते परंपरांचे, पूर्वग्रहांचे, कर्मकांडाचे जोखड आहे. ते कुबड हा त्याचा नकोसा झालेला वारसा आहे. कारण त्याला नाहीसे होत जाणाऱ्या जगाचे संदर्भ आहेत. कुबड्याला हे जोखड फेकायचे आहे, नव्या जगाच्या स्पर्धेसाठी तयार व्हायचे आहे. त्यासाठी त्याला बुद्धाचा मार्ग मदत करणार आहे. बुद्धमार्गाच्या आधारे एकदा का हे विरूप कुबड नाहीसे झाले, की मग शारीरसौंदर्याच्या आधारे मिळवले जाणारे, ते बिरुद मिळवणे त्याला शक्य होणार आहे.
बुद्धापर्यंत पोहोचायचे तर सीमेपार जायला हवे, इतके कुबड्याला ठाऊक आहे. पण तिकडे जाण्याचा मार्ग त्याला ठाऊक नाही. पण वर्षानुवर्षे उपस्थित असलेले बडवे, पंडे आता ‘बडी’ म्हणून जवळीक साधत हा मार्ग दाखवण्याचे आश्वासन देत आहेत आणि तुझा मार्ग कोणता हे तुझ्या खिशात किती पैसे आहेत यावर ठरेल, असे बिनदिक्कतपणे सांगत आहेत. पण धार्मिक क्षेत्रात ईश्वराचे ठेकेदार म्हणून उभे राहिलेल्या पंड्या-बडव्यांविरोधात झालेली जागृती अजून या नव्या वारसदारांबाबत झालेली दिसून येत नाही. या कुबड्याच्या बुद्धमार्गावरही कधीकाळी थेट लोकांची हत्या करून त्यांची बोटे माळ करून गळ्यात मिरवणारे ‘अंगुलीमाल’ बुद्धाचा अनुग्रह झाल्याचा दावा करत बस्तान बसवून आहेत. एक वेळची भूक भागवत मरत्या माणसाला जेमतेम जिवंत ठेवणाऱ्या वडापावपासून सेलेब्रिटी अंत्यसंस्कारांपर्यंत सर्व काही आता ‘अंगुलीमाल’ ब्रँड आहे. साऱ्या जगण्याचेच आता ब्रँडिंग झाले आहे.
केवळ मार्ग दाखवूनच ते थांबत नाहीत, त्या मार्गावरचा प्रत्येक थांबा हा त्यांनी आपल्या मालकीचा करून घेतला आहे. जगातील शासनांच्या ध्येयधोरणांवर, हाडामांसाच्या माणसांच्या जगण्यातील निर्णयांवर ही नवी सत्ताधारी जमात अधिराज्य गाजवते आहे. एक प्रकारे हा एक विशाल असा खेळ ती खेळते आहे नि यातील माणसे जणू यातील केवळ अँड्रॉइड्स किंवा रोबॉट्स बनून राहिली आहेत. असे असूनही त्यांना निर्णयस्वातंत्र्य असल्याचा आभास निर्माण करण्यात सत्ताधारी जमात यशस्वी होते आहे.
सारे जग जणू धावते ट्रेडमिल झाले आहे. या ट्रेडमिलवरच हे अंगुलीमाल धावण्याच्या शर्यती आयोजित करताहेत. केवळ एकालाच अंडे फलित करण्याची संधी मिळेल, हे ठाऊक असूनही आकांताने धावणाऱ्या शुक्रजंतूंप्रमाणे सारे ऊर फुटेपर्यंत धावत आहेत, पण अंडे फलित करण्याचा हक्क पुन्हा अंगुलीमालच मिळवत आहेत. अंगुलीमालांच्या कृपेने कुबड्याचे कुबड तर गळते, परंतु त्या यशाचे नवे कुबड उलट दिशेने पोटावर उगवून येते आहे. थोडक्यात, एका समस्येचे निराकरण करणारे अंगुलीमाल तुमच्यावरच्या ओझ्यांची जागा फक्त बदलत आहेत. पुन्हा त्या नव्या ओझ्यावरचे उपायही तेच तुम्हाला देत आहेत. जुन्या विरूपतेला मागे सारून नवी विरूपता तिची जागा घेते आहे.

‘ऑल दॅट आय वॉन्ना डू’चा पुण्याच्या एका तरुण मुलांच्या ग्रुपने रंगमंचीय आविष्कार सादर केला. भावकवितांचे नृत्याविष्कार अनेकदा पाहिले, पण अशा वैचारिक बैठक असलेल्या एखाद्या कवितेचे असे माध्यमांतर हा दुर्मीळ प्रयोग असावा. कवितेतील मिथक नेमके पकडून त्याचा सादरीकरणाशी मेळ घालण्याचे कौशल्य अविनाश सपकाळ या तरुणाने उत्तम पेललेले दिसले. मूळ कवितेमध्ये दिसणारा कुबड्याचा ‘प्रवास’, त्यातले टप्पे हे संहितेमध्ये आणताना त्याला एखाद्या कॉम्प्युटर गेमच्या ‘स्टेजेस’मध्ये रूपांतर करून त्याचे प्रवाहीपण राखण्यात त्यांची टीम बव्हंशी यशस्वी झाली. संहिता आणि सादरीकरणाचा नवा बाजही कवितेच्या मूळ विषयाला पूरक ठरणारा. कवितेच्या पहिल्याच वाक्यात असलेला ‘मी साखर वाटून आलो’ या उद‌्घोषणेतला निष्ठुर नि ठाम निश्चय मात्र त्यांच्या हातून निसटलेला दिसतो. कुबड्याचे कुबड नेमके कोणत्या टप्प्यावर गळून पडले, हेही ठसठशीतपणे समोर आणण्यात दिग्दर्शक फारसा यशस्वी झालेला दिसला नाही. परंतु या प्रयोगात सर्वात उल्लेखनीय गोष्ट होती ती, मूळ कवितेच्या कथनाला जोडलेला उपसंहार. कवितेचे सारे मर्म एकाहून अधिक पात्रांच्या तोंडून उलगडत त्यातून एका गोंधळाचा, संभ्रमाचा आभास निर्माण करण्यात प्रयोग चांगलाच यशस्वी झाला, असे म्हणावे लागेल...
ramataram@gmail.com
बातम्या आणखी आहेत...