आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविवाहित असल्‍याचं सुख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तामीळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या काही जुन्या मुलाखती पाहण्यात आल्या. १९९९मध्ये प्रसारित झालेल्या रांदेवू विथ सिमी गरेवाल या कार्यक्रमात त्या म्हणतात, माझ्या मागे कसलेही पाश नाहीत म्हणून मी चांगलं काम करू शकते, मी स्वतंत्रपणे विचार करू शकते. मला काळजी करायची असते ती फक्त पक्ष कार्यकर्त्यांची. माझ्या आयुष्यातली पहिली १६ ते १८ वर्षं मी आई म्हणेल तसं वागले, तिच्या हट्टामुळे चित्रपटक्षेत्रात गेले. नंतरची काही वर्षं एमजीआर यांच्या प्रभावाखाली होते, त्यांनी आग्रह केला म्हणून राजकारणात आले. आता मी माझ्या मनासारखं वागू शकते. मला तुम्ही स्वार्थी म्हणाल कदाचित, पण मला कोणाचंही मन राखण्यासाठी काही करावं लागत नाही, याचा आनंद आहे.

स्त्री किंवा पुरुष कोणीही असो, लग्न झालेलं असलं की, त्या व्यक्तीवरच्या जबाबदाऱ्या वाढतात. विशेषकरून सामाजिक कार्य किंवा राजकारण करायचं असलं की, लग्न आणि बायको वा नवरा, मुलं, नातलग या सगळ्याचं ओझं वाटू शकतं. आपल्या ओळखीत अशा अनेक व्यक्ती असतात, ज्या सामाजिक कार्यात इतक्या मग्न असतात की, घरच्यांसाठी त्यांना वेळच नसतो. का केलं लग्न, लष्करच्या भाकऱ्याच भाजायच्या होत्या तर, हा प्रश्न त्यांच्या घरच्यांना कायमच पडलेला असतो. आपल्याला अशाही व्यक्ती माहीत असतात, ज्या अविवाहित राहून खूप कामं करत असतात वेगवेगळी. नोकरी, छंद, सामाजिक काम, या सगळ्याला त्यांच्याकडे वेळ असतो. अर्थात हे सगळं करणाऱ्या विवाहित व्यक्तीही असतातच, पण त्यांची धावपळ किंवा तारेवरची कसरत जरा जास्तच होत असते. विवाह असा बंधनात अडकवतो का व्यक्तींना? की हे हवंहवंसं बंधन असतं? या बंधनात राहूनही नोकरी, छंद आणि सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींकडे आपण समाज म्हणून कोणत्या नजरेने पाहतो, विशेषकरून स्त्रियांकडे? मुलांना टाकून ती बाहेर जाते, साधा स्वयंपाकही करत नाही घरी, घरच्या लग्नकार्यालाही हजेरी लावत नाही, वगैरे वगैरे टोमणे आपणच मारतो ना?

काय वाटतं तुम्हाला? आहेत तुमच्या ओळखीत अशा अविवाहित व्यक्ती ज्या संपूर्ण आयुष्य जगतायत? नक्की कळवा आम्हाला.
मृण्मयी रानडे, मुंबई
mrinmayee.r@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...