आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एल्गार...... तोंडी तलाकविरोधात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तोंडी तलाक आणि हलालाच्या विरोधात बांगड्या मनगटापर्यंत घट्ट करून मैदानात उतरलेल्या तलाक पीडित महिलांची एक परिषद नुकतीच मुंबईत पार पडली. मध्य प्रदेश, कर्नाटक, तामीळनाडू, ओदिशा, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान अशा अनेक राज्यांतल्या मुली-महिला या वेळी हजर होत्या. त्या परिषदेचाच हा आँखो देखा हाल...
“जब निकाह होता है तो पहले लडकी की मर्जी पूछी जाती है. लेकिन जब तलाक होता है तो शौहर अकेलाही काफी होता है? लडकी को पता भी नहीं होता. बस तीन बार तलाक कह के आदमी आझाद होता है और बीबी को मानना पडता है,”
२२ वर्षांच्या करारी नेहा खानने धीटपणे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डला सवाल विचारलाय. भोपाळमध्ये राहणाऱ्या नेहाचा निकाह गेल्याच वर्षी झाला होता, मात्र वर्षभरातच तिच्या शौहरने म्हणजेच मोहम्मद अस्लमने तिला तोंडी तलाक दिला.

‘दो बार पेट से रही तो उसने कुछ गोली देकर बच्चा गिरा दिया. दो बार ज्यादा ब्लीडिंग होने के वजह से मैं बीमार पड गयी. तो आराम के बहाने वो मुझे अपनी अम्मी के घर छोड गया. फिर तीन महिनों तक ना मेरा फोन उठाया ना मुझे लेने आया. और फिर एक सुबह फोन पे ही उसने बताया की उसने मुझे तलाक दे दिया है.’
गोऱ्यापान, टपोऱ्या काळ्या डोळ्यांच्या, नाजूक दिसणाऱ्या नेहाने आता नवऱ्यासह मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डालाही जाब विचारायचं ठरवलंय. ‘भारतीय मुस्लिम महिला आंदोलन’ या संस्थेच्या महिला कार्यकर्त्यांच्या हाताला धरून ती कोर्टाच्या पायऱ्या चढतेय.

हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढलेल्या आणि न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर मजारपर्यंत जाण्याचा हक्क महिलांना मिळवून देणाऱ्या ‘भारतीय मुस्लिम महिला आंदोलन’ या संघटनेला नुकतीच १० वर्षं पूर्ण झाली. हाजी अलीच्या विजयानंतर आता या संघटनेच्या मुस्लिम महिला तोंडी तलाक आणि हलालाच्या विरोधात बांगड्या मनगटापर्यंत घट्ट करून मैदानात उतरल्या आहेत.
या निमित्त नुकतीच मुंबईत देशभरातील तोंडी तलाक पीडित महिलांची परिषद पार पडली. त्यात आपल्याला तलाक का आणि कसा मिळाला, याची कहाणी सांगत असताना बुरख्यात दडलेल्या या पंचविशीच्या आतल्या मुलींच्या डोळ्यांतलं पाणी लपत नव्हतं.

“निकाह को सिर्फ आठ महिने हुए थे और मुझे मोबाइलपे तलाक देके उन्हों ने दुसरी शादी कर डाली,” औरंगाबादमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय तबस्सुमचा मुंबईत राहणाऱ्या आमेर अली याच्याबरोबर निकाह झाला.
त्याच्याबरोबर अंधेरीतल्या घरात राहायला आलेल्या तबस्सुमला घरात एकटं टाकून त्याने पळ काढलाय. तबस्सुमचे सासू, सासरे, नणंदा, दीर कुवेतमध्ये राहतात. या सगळ्यांनीही तबस्सुमबरोबर संपर्क तोडलाय. घरकाम करून तबस्सुम कसेबसे दिवस काढतेय. तिला तलाकचं कारण हवंय.

ओदिशाच्या नसीमा बेगमला वयाच्या १८व्या वर्षी दोन मुलांसह नवऱ्याने घराबाहेर काढलं. घरगुती भांडणात तीनदा तलाक उच्चारून त्याने स्वतःची सुटका करून घेतली आणि नसीमाला ‘दरदर की ठोकरें खाने के लिये’ सोडून दिलं.
मिळेल तिथे काम करत, धुणीभांडी करत प्रसंगी कामाच्या ठिकाणी पुरुष करत असलेल्या अतिप्रसंगाला सामोरं जात नसीमा मुलांना वाढवतेय. तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणं आता मात्र तिला अमान्य आहे. तिला शौहरला धडा शिकवायचाय.

पश्चिम बंगालची रहिमा शेख, कर्नाटकची नसरीन आणि नादिरा, महाराष्ट्राची रुबिना शेख, गुजरातची शरीफा... नावं घ्यावी तितकी कमी. भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या व्यासपीठावर आपलं दुःख सांगणाऱ्या या सगळ्यांना वयाच्या बाविसाव्या वर्षी किंवा त्याहीआधी तलाक देऊन शौहरने घराबाहेर काढलंय. प्रत्येकीची कहाणी वेगळी असली तरी प्रत्येकीच्या डोळ्यांत एकच खंबीर भाव आहे.

मियाँ, बीबी और तलाक
शरीयत आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या कायद्यानुसार, शौहर आपल्या बीबीला तीनदा तलाक देऊ शकतो. त्यात दोघांमध्ये सुलाह होण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी दिलेला आहे. मात्र मुस्लिम पुरुष वाट्टेल तेव्हा पत्नीच्या गैरहजेरीत तोंडी तलाक देतात आणि सोपस्कार म्हणून तिला कळवतात, असं आंदोलनाच्या कार्यकर्त्या सांगतात.

“शादीशुदा आयुष्यातलं स्थैर्य कधी मुस्लिम महिलांच्या वाट्याला येतच नाही. नेमकी काय चूक होईल आणि नवरा मला तलाक देईल, माझं काही चुकलं आणि त्याने दुसरं लग्न केलं तर? या भीतीत या महिला जगत आहेत. तलाकची धमकी तर अनेकदा दिली जाते.
पुरुषप्रधानतेच्या या अट्टाहासामुळे आज कित्येक मुस्लिम कुटुंबे तबाह झाली आहेत,” भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या संस्थापक नूरजहाँ नियाज सांगत होत्या. कुराणमध्ये तोंडी तलाकचा उल्लेखही नाही. मात्र तरीही मुस्लिम स्त्रियांना अन्यायकारक ठरणारी ही तोंडी तलाकची घाणेरडी प्रथा अजूनही सुरू आहे.
भारतीय मुस्लिम महिला संघटनेतर्फे तोंडी तलाकवर बंदी आणली जावी, यासाठी नूरजहाँ नियाज आणि झकिया सोमण यांनी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली आहे. भारतीय मुस्लिम महिला आता मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला कोर्टात फरफटत आणत असल्यामुळेच जिथे तिथे या महिलांना अपमान सहन करावा लागतो. ‘शरीयत, कुराण और मजहबी मामलों में औरतों को पडने की जरूरत नाही,’ असंच आजही मुस्लिमधर्मीय पुरुषांना वाटत असतं.

‘आज तोंडी तलाक मिळालेली मुस्लिम महिला न्यायालयात दाद मागू शकत नाही, कारण असा कायदाच अस्तित्वात नाही. दाढीवाल्या कट्टर मौलवींची मक्तेदारी मोडून काढत, मुस्लिम पुरुषांना वठणीवर आणण्यासाठी आणि तलाकशुदा महिलांच्या आयुष्यातला संघर्ष मानाच्या पातळीवर आणण्यासाठी आम्ही नव्या कायद्याची मागणी करत आहोत. तोंडी तलाकवर बंदी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार,” नूरजहाँ नियाज आणि झकिया सोमण निर्धाराने सांगतात.

‘भारतीय मुस्लिम महिला आंदोलन’ या संघटनेचं काम १५ राज्यांमध्ये सुरू आहे. संंघटनेने एक लाखपेक्षाही जास्त कार्यकर्ते घडवले आहेत. त्यात बहुसंख्य महिला आहेत. या संघटनेने मुस्लिम महिलांना एक जागा आणि आश्वासन दिलं की, पुरुषांनी लादलेल्या या चालीरीतींच्या जगात ती एकटी नाही. तिच्यासोबत लढायला चार हात आणखी आहेत.
तोंडी तलाकच्या अनेक केसेस संघटनेच्या केंद्रात सोडवल्या जातात. मियाँ बीबीमध्ये सुलाह करण्यासाठी सतत समुपदेशन करण्याकडे आणि कुटुंब न्यायालयातून पद्धतशीर घटस्फोट घेण्याच्या दृष्टीने या कार्यकर्त्या काम करतात.
तोंडी तलाकविरोधातल्या मुंबईतील परिषदेत भारतभरातून १००पेक्षा जास्त तलाकशुदा महिलांनी उपस्थित राहून न्यायालयापर्यंत जाण्याची तयारी दाखवणं हे दृश्य म्हणजे मुस्लिम समाजातील महिलांमध्ये होत असलेल्या बदलाची अजान आहे...

तीन वेळेस ‘तलाक’ उच्चारून मुस्लिम महिलांना घटस्फोट देण्याच्या प्रथेवर अलाहाबाद उच्च न्यायालयानेही नुकतीच आपली तीव्र नाराजी दर्शवली आहे. मुस्लिम महिलांना अन्यायकारक ठरणारी ही पद्धत क्रूर आहे. यामुळे त्या महिलेचं संपूर्ण आयुष्य उद‌्ध्वस्त होत असल्यानं मुस्लिम पर्सनल कायद्यात काही सुधारणा करता येतील का, असा प्रश्नही न्यायालयानं उपस्थित केला आहे.
देशाच्या एकूण लोकसंख्येत मोठा हिस्सा असणाऱ्या मुस्लिम समाजातील महिलावर्गाला वर्षानुवर्षे महंमद पैगंबर आणि कुराणाच्या अगदीच विपरीत असलेल्या या कायद्यामुळे अन्याय सहन करावा लागणार असेल तर ते चुकीचं असल्याचं मतही न्यायालयानं नोंदवलं आहे.
एकीकडे आपण स्वत:ला स्त्री समानतेचा पुरस्कार करणारे म्हणत असू तर दुसरीकडे काही महिलांना असं परंपरेच्या जोखडात बांधून ठेवणं योग्य नाही, असं निरीक्षण न्यायालयानं एका खटल्याच्या निकालात नोंदवल्यानं, ही प्रथा बंद होण्यासाठी आशेचा किरण दिसतो आहे...

- तोंडी तलाक देणारा शौहर आपल्या पत्नीला खर्चासाठी कोणतीही रक्कम देत नाही. निकाहच्या वेळी मिळालेली मेहेर काही जण देतात, मात्र बहुतांशी मुलींना नेसत्या कपड्यांनिशी घराबाहेर काढलं जातं.

- तोंडी तलाक घेतलेल्या मुली लहान वयातल्या, क्वचित एखाद-दुसरं मूल पदरात असलेल्या असतात. एका निकाहमध्ये होरपळल्यामुळे बऱ्याच मुली पुन्हा निकाह करत नाहीत.

-भोपाळमध्ये तोंडी तलाकची पाठराखण करण्यासाठी १६५० मुलींनी स्वतःहून खुला घेतला, अशी आकडेवारी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने पसरवली होती.
नम्रता भिंगार्डे, मुंबई
bhingarde.namrata@gmail.com
बातम्या आणखी आहेत...